हिमालय, रॉली आणि मी ....
फार पूर्वी ठरवलं होतं की बाकी कुठेही कितीही उंडारलो तरी हिमालयात मात्र पन्नाशी ओलांड्यावरच जायचं. हिमालय म्हणजे विरक्ती आल्यावर जायचे ठिकाण अशी माझी काहीशी समजूत होती. पण एक दिवस हा पूर्वग्रह बाजूला सारून ६ वर्षांपूर्वी एकटाच कुमाऊं ला गेलो आणि माझ्या डोक्यातली जळमटं धूवून निघाली. त्यानंतर दरवर्षी मला हिमालय बोलावत राहिला आणि मी पण न चुकता जात राहिलो. इतका.. की त्यानंतर माझी आजवर दक्षिणेत एकही मोहीम झाली नाही. सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जी मैत्री टिकते ती कायम राहते असे कुठेशी ऐकले होते. आमची मैत्रीही त्याच वाटेवर आहे.
जास्त सहवास झाला की व्यक्तीचे विविध पैलू समजू लागतात तसेच हिमालयाबद्दलही झाले. मला वरवर वाटला तसा काही तो फक्त विरक्त भाव घेऊन पद्मासन घालून बसलेला नाही. त्याचा मूड सतत बदलत असतो आणि तो सांभाळून घेतला तर मग मात्र त्याच्यासारखा मित्र नाही. वयाने बराच मोठा असल्यामुळे नमतं घेण्यात कधी कमीपणा वाटून घेऊ नये. त्याला त्याचा मान दिला की मग मात्र मैफल मस्त जमून येते. या माझ्या मित्राला मी आता ओळखायला लागलो आणि त्याच्याशी थोडा बिनधास्त वागू म्हणालो तेव्हा एकदा मला चांगलाच धडा मिळाला आणि मी जमिनीवर आलो. पण तेवढाच. कारण त्यानेही माझा हात पिरगाळून मला फक्त जाणीव करून दिली आणि मग मात्र एखाद्या मोठ्या भावासारखे सांभाळून घेतले.
दिल्ली हून लेह ला जाणारे विमान भल्या पहाटे निघाले की बहुतेक प्रवासी पेंगलेले असतात. पण मी मात्र खिडकीची जागा पकडून खाली मित्राची वाट बघत असतो. थोड्याच वेळात हिमालय ढगांची गोधडी पांघरून अस्ताव्यस्त पसरलेला दिसायला लागतो. त्याचीही झोप इतक्या सकाळी कदाचित पूर्ण झालेली नसते. गोधडीतून एखादा हात पाय बाहेर यावा तशी त्याची काही शिखरं बाहेर डोकावत असतात. यावेळी त्याचे पोर्ट्रेट काढायला कुठलाही कॅमेरा आणि लेन्स असमर्थ असतो. हळूहळू विमान पुढे सरकत असते आणि हिमालय आणि त्याच्या कुशीतली छोटी छोटी गावं जांभया देत जागी होत असतात.
डिसेंबर महिन्यात पर्यटकांची फारशी लुडबूड नसल्यामुळे मी नेहमी त्याच वेळी माझ्या या मित्राला भेटायला गेलो आहे. पण गेल्या वर्षी पोटा-पाण्याच्या खटाटोपात ही भेट काही झाली नाही. आता परत डिसेंबरपर्यंत वाट बघणे काही माझ्याच्याने शक्य होणार नव्हते म्हणून न राहवून जूनमध्येच एक दिवस मी निघालो.
यावेळी लेहमध्ये मला एक मस्त गोरीगोमटी मैत्रीण मिळाली . फक्त वरलिया रंगाला भुलल्यामुळे मला ती आवडली नव्हती तर थोड्याच संवादानंतर एखाद्याशी आपली वेव्हलेंग्थ जुळावी तसे आमचे सूत जुळले. ही मैत्रीण म्हणजे पांढरीशुभ्र रॉयल एनफिल्ड. हिचा स्वभाव मात्र मला पूर्णपणे ठाऊक नव्हता. त्यामुळे मी तिला दोन दिवस लेह जवळच फिरायला घेऊन गेलो आणि तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या. (भलत्यावेळी ब्रेकअप ची रिस्क मला परवडणार नव्हती आणि माझा मित्र पण या भानगडीत पडणार नाही हे मी जाणून होतो).
दोन वेगळ्या जातकुळी असलेल्या त्सेमो नामगयाल आणि माथो मोनॅस्टरी. लेह च्या वातावरणाशी आणि रॉलीशी जुळवून घेण्यासाठी उत्तम.
हिमालयाचा एकंदर मूड पाहून मला सर्व आखणी करायची होती. लेह ते तुर्तुक हा प्रवास काही थोडा थोडका नाही. बऱ्याच ठिकाणी तर मी, हिमालय आणि माझी रॉली (रॉयल एनफिल्ड ला मी प्रेमाने रॉली म्हणायला लागलो) यांच्याशिवाय कोणीच असणार नाही. तेव्हा भरपूर भूकलाडू आणि तहानलाडू मी रॉली च्या सॅडलबॅग मध्ये भरले. लेह - खारडुंग ला - नुब्रा- तुर्तुक असा माझा मार्ग उत्तुंग हिमशिखरं, नद्या , वाळवंट, अनेक रंगीबेरंगी छटा असलेले डोंगर यामधून बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) ने बांधलेल्या अफलातून, घाटदार रस्त्यांवरून जाणार होता.
सकाळी सकाळी हॉटेलातून हिमालयाकडे बघितले तर त्याचा मूड काही चांगला वाटला नाही. काल संध्याकाळी बिअर पिता पिता गप्पा मारल्या तेव्हा तर एकदम मस्त होता. एकदम काय बरे झाले. पण हे असेच आहे. त्याचे मूड स्विन्ग्स भल्या भल्याना पण अजून कळले नाहीत. मी मात्र आपला जुना मित्र आहे, वेळेवर घेऊ बघून म्हणून रॉली च्या पाठीवर थाप मारली आणि सकाळची थंड, स्वच्छ हवा फुफ्फुसात भरत खारडुंग-ला च्या दिशेने कूच केले. हा प्रवास मात्र मला एक मोठा धडा शिकवणार आहे हे तेव्हा तरी माझ्या ध्यानी-मनी नव्हते.
मी जसा जसा हिमालयाच्या खांद्यावर चढायला लागलो तसा तसा त्याचाही पारा आणखी वर चढला (मूड चा , तापमानाचा नव्हे) आणि अचानक हिमवर्षाव सुरु झाला. रॉली हेलकावे खायला लागली आणि नंतर बर्फात रुसून बसली. आसपासचा सर्व आसमंत पांढराशुभ्र झाला आणि पंधरा-वीस फुटांपलीकडलेही दिसेनासे झाले.
पण कुठूनसे लष्करातले दोघेजण देवासारखे आले आणि त्यांच्या बंकर मध्ये काही काळ त्यांनी मला आसरा दिला.
काही तासांनी मी परत हिमालयाशी संवाद साधायचा प्रयत्न केला पण आज त्याचे भयंकर काहीतरी बिनसले होते आणि पलीकडच्या खारडुंग गावापर्यंत (साधारण सायंकाळचे सहा वाजेपर्यंत) हिमालयाने मला कधी बर्फ, कधी गारा, कधी पाऊस तर कधी सोसाट्याचा वारा असे सतत बडवून काढले. हात, नाक, ओठ आणि दोनही मांड्या यातल्या जाणिवा संपल्या होत्या आणि अशातच आशेचा किरण म्हणून एक बरा निवारा गवसला. गरम गरम "थेंथुक" (तिबेटी सूप आणि नूडल्स) खाऊन गरम दुलईमध्ये बसल्यावर मी स्वतःला आणि रॉलीला उगाच नसत्या संकटात टाकल्याबद्दल मनोमन सॉरी म्हणून टाकले.
दुसऱ्या दिवशी मात्र आम्हा तिघांचाही मूड चांगला झाला आणि यापुढच्या प्रवासात आमची मैफल झकास जमून आली. प्रवासात ऐकायला मोबाईलवर मस्त गाणी होती पण तो बेत मी रद्द केला. हिमालय आणि रॉली चा रिदम असा काही जमला की त्यापुढे बाकी कुठलेही संगीत फिके वाटावे. माझा पुढचा संपूर्ण प्रवास हिमालय आणि रॉलीने अनुभवसंपन्न बनवला.
नुब्रा व्हॅली आणि शॅयोक नदी ....
नुब्रा व्हॅली .... सॅल्यूट टू बी.आर.ओ !!!
हुंडर येथील थंड वाळवंट
तुर्तुक चा रस्ता .... एकीकडे शॅयोक नदी सतत सोबत करते.
रस्ता दिसतोय ???
तुर्तुक, बाल्टिस्तान. इथून पाकव्याप्त बाल्टिस्तानातील हिमशिखरं दिसतात.
माझी लाडकी रॉली....
आणि मी.........






















प्रवासात ऐकायला मोबाईलवर मस्त गाणी होती पण तो बेत मी रद्द केला. हिमालय आणि रॉली चा रिदम असा काही जमला की त्यापुढे बाकी कुठलेही संगीत फिके वाटावे.अगदी बरोबर बोललात.. पहिल्यापासून त्या रिदमची अशी सवय लागली आहे की माझ्या रॉलीवर बसल्यानंतर हेडफोनमध्ये गाणी लावावीच लागत नाहीत..!!मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेनु काला चश्मा जचदा ए...जचदा ए गोरे मुखडे ते.... ;) :- Baar Baar Dekho