न्यू यॉर्क : ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर
"१९० स्ट्रीट"चा बोगदा एकदम "प्लेन जेन", एकरंगी आणि साधा पण नेहमी स्वच्छ व नीटनेटका असे; तर "१९१ स्ट्रीट"चा बोगदा सुंदर रंगीबेरंगी ग्राफितीने भरलेल्या भिंती, त्यावर मधूनच कोणीतरी स्प्रे पेंटने काढलेले फराटे व नावे आणि बर्याचदा काहीसा अस्वच्छ असा असे. एकमेकापासून जेमतेम दोन-तीनशे मीटरवर असणार्या या सबवेच्या दोन बोगद्यांतील फरक न्यू यॉर्क शहरात एकत्र नांदणारी विविधता अधोरेखीत करताना दिसतो.
जगाची थोडीबहुत माहिती आहे पण न्यू यॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे नाव माहीत नाही असा माणूस विरळा असेल. केवळ अमेरिकेचाच नव्हे तर जागतिक अर्थकारणाचा मानबिंदू असलेल्या या संकुलातले मानाचे दोन टॉवर्स ११ सप्टेंबर २००१ रोजी अतिरेकी हल्ल्यामध्ये विमानांच्या आघातांनी जमीनदोस्त केले गेले. अगोदर माहीत असले नसले तरी या दुर्घटनेमुळे हे जुळे टॉवर्स जगातल्या बहुतेक लोकांना माहीत झाले. त्यानंतर त्या घटनेमुळे सुरू झालेल्या प्रतिक्षिप्त सामरिक व आर्थिक, कृती व घटनांच्या साखळीने सर्व जग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ढवळून निघाले आहे. अजूनही त्या परिणामांचे दीर्घकालीन धक्के अजूनही संपलेले नाहीत आणि नजिकच्या काळात संपतील असे वाटत नाही.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१)
या संकुलात एकूण सात महाकाय इमारती होत्या. मात्र, या संकुलाचे नाव जगभर प्रसिद्ध झाले ते ०४ एप्रिल १९७३ साली जनतेसाठी खुले केलेल्या जुळ्या टॉवर्समुळे. आजवरही बहुतेक सर्व जणांच्या मनात "वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे हे दोन जुळे टॉवर्स होते" हेच समीकरण कायम आहे. १वर्ल्ड ट्रेड सेंटर ४१७ मीटर व २वर्ल्ड ट्रेड सेंटर ४१५ मीटर उंच होते. हे जुळे टॉवर काही काळ जगातल्या उंचीने एक आणि दोन क्रमांकाच्या इमारती होत्या. थोड्या काळातच, मे १९७३ मध्ये, शिकागोतल्या ४४० मीटर उंच सिअर्स टॉवरने जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब पटकावला. तरीही, न्यू यॉर्क शहराचे वलय सभोवती असलेल्या या इमारतींचे पर्यटन नकाश्यावरचे महत्त्व अजिबात कमी झाले नाही. शिवाय, २०१० मध्ये दुबईमधील बुर्ज खलिफा ही इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत सर्वात जास्त ११० मजले असलेली इमारत म्हणून १ वर्ल्ड ट्रेड सेंटरचा विक्रम अबाधित होता. अर्थातच, न्यू यॉर्कला भेट देणार्या पर्यटकांचे वर्ल्ड ट्रेड सेंटर हे प्रथम क्रमांकाचे आकर्षण होते यात काहीच आश्चर्य नव्हते.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०१. जुळे टॉवर्स आणि परिसर (जालावरून साभार)
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०२. जुन्या संकुलाचा आराखडा (जालावरून साभार)
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९७३ ते २००१) : ०३. एकशे दहाव्या मजल्यावरचे खुल्या आकाशाखालचे ऑब्झर्व्हेशन डेक
(जालावरून साभार)
वर्ल्ड ट्रेड सेंटर (सन १९८९)
१९८९ मध्ये झालेल्या अमेरिका फेरीमध्ये या संकुलाला भेट देऊन ११०व्या मजल्यावरील खुल्या आकाशाखालच्या ऑब्झर्व्हेशन डेकवरून न्यू यॉर्क आणि परिसर पाहण्याची संधी मला मिळाली होती. त्या वेळचे, आता तांबूस-धूसर होत असलेले, काही फोटो पाहून त्या काळाची थोडीशी कल्पना करता येईल...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०१. जुळ्या टॉवर्सची धुक्यात हरवलेली शिखरे
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०२. पायथ्याजवळून टॉवरला कॅमेर्याच्या कवेत घेण्याचा प्रयत्न
...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ऑब्झर्व्हेशन डेकवरून दिसणारे न्यू यॉर्क :
०३. ब्रूकलीन पूल आणि परिसर व ०४. हडसन नदी आणि तिच्या काठावरच्या गगनचुंबी इमारतींच्यावर असलेले बगीचे
...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ऑब्झर्व्हेशन डेकवरून दिसणारे न्यू यॉर्क :
०५. जवळच्या गगनचुंबी इमारती व ०६. दूरवर पसरलेले मॅनहॅटन
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आमच्या भेटीच्या दिवशी कर्मधर्मसंयोगाने फ्रेंच राज्यक्रांतीचा द्विशतकी सोहळा चालू होता. त्यानिमित्त रंगीत पाण्याचे फवारे उडवत चाललेल्या बोटींच्या संचलनाचे विहंगम दर्शन ऑब्झर्व्हेशन डेकवरून झाले...
...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (१९८९) : ०७. बोटींच्या संचलनाचे दृश्य व ०८. स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचे विहंगम दर्शन
वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नवा अध्याय (२००१ पासून पुढे)
या परिसराला ९/११ च्या विध्वंसातून बाहेर काढून त्याचा पुनर्विकास करण्यासाठी २००१ साली The Lower Manhattan Development Corporation (LMDC) ची स्थापना करण्यात आली. तिने एक स्पर्धा आयोजित केली व Daniel Libeskind याने बनविलेला विकास आराखडा निवडला. त्यात नंतर बरेच बदल केले गेले. अनेक वर्षांचा विलंब आणि अनेक वादंग यांच्या पार्श्वभूमीवर १३ मार्च २००६ ला या जागेवरचा उरलेला राडारोडा काढायची सुरुवात झाली व २७ एप्रिल २००६ ला नवीन बांधकाम चालू झाले. ते अजूनही चालू आहे. या १६ एकर जागेवर, सद्या मान्य असलेल्या आराखड्याप्रमाणे ६ टॉवर्स; ९/११ स्मारक आणि संग्रहालय; एक मॉल; एक वाहतूक संकुल (transportation hub); एक गाडीतळ; एक बगिचा (लिबर्टी पार्क) आणि एक चर्च (St. Nicholas Greek Orthodox Church) बांधले जाईल. या सर्व विकास कामाचा जमिनी आराखडा (ग्राउंड प्लॅन) खालीलप्रमाणे आहे...
वर्ल्ड ट्रेड सेंटर (२००१ पासून पुढे) : ०१. नव्या संकुलाचा आराखडा. निळ्या रंगांचे चौकोन नष्ट झालेल्या जुळ्या टॉवर्सच्या पायांची जागा दाखवत आहेत. (जालावरून साभार)
वर्ल्ड ट्रेड सेंटर (२००१ पासून पुढे) : ०२. नवे संकुल पूर्ण झाल्यावर कसे दिसेल याचे एक कल्पनाचित्र (जालावरून साभार)
7WTC ही इमारत मे २००६ मध्ये सर्वप्रथम पूर्ण झाली. त्यानंतर ९/११ स्मारक (२०११) आणि संग्रहालय (२०१४); 4WTC (२०१३); 1WTC (२०१४) व लिबर्टी पार्क इतके काम पुरे झाले आहे. 3WTC आणि वाहतूक संकुलाचे काम २०१७/१८ मध्ये पुरे होणे अपेक्षित आहे. 2WTC मधील जागेला अजून पुरेसे खरेदीदार न मिळाल्याने तिचा आराखडा बदलत गेला आहे आणि ती बांधली जाईल की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे आहे. 5WTC च्या बांधकामाची जबाबदारी पाथ (Port Authority of New York and New Jersey) वर सोपविलेली आहे पण तिचे काम सुरू होण्याची तारीख अजून नक्की केलेली नाही. हुश्श ! मोठ्या प्रकल्पांतले घोळ ही केवळ भारताची खासियत नाही असेच दिसते ! :) असो.
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर असे अधिकृत नाव असलेली ही इमारत फ्रीडम टॉवर, १ वर्ल्ड ट्रेड सेंटर, One WTC आणि 1 WTC अश्या अनेकविध नावांनी ओळखली जाते. ही पश्चिम गोलार्धातली सर्वात उंच इमारत केवळ वर्ल्ड ट्रेड सेंटर संकुलाचाच नव्हे तर संपूर्ण न्यू यॉर्क शहराचा शीर्षबिंदू आहे. अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणेच्या इसवीसनाच्या आठवणीसाठी तिची उंची १७७६ फूट (५४१ मीटर) ठरवली आहे. १३ फूट ४ इंच उंचीचे १०४ मजले असलेल्या या इमारतीत ३५ लाख चौ फूट व्यापारी जागा आहे. या इमारतीच्या लॉबीची उंची ५० फूट आहे, तिच्यात ७३ लिफ्ट्स आणि एस्कॅलेटर्स आहेत. तिच्या बांधकामाला $३९० कोटी इतका खर्च आला आहे. या इमारतीत ५० पेक्षा जास्त चित्रपट, टिव्ही सीरियल्स व टिव्ही कार्यक्रमांचे चित्रीकरण झाले आहे.वन वर्ल्ड ऑब्झरवेटरी
चला तर मग वन वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या वन वर्ल्ड ऑबझर्व्हेटरीमधून न्यू यॉर्क शहर आणि परिसराचे विहंगम निरीक्षण करायला. सर्वप्रथम A सबवे पकडून चेंबर्स स्ट्रीट गाठला आणि बाहेर पडून मॅनहॅटन डाऊनटाऊनच्या काँक्रिटच्या जंगलातून वाट काढत पाच एक मिनिटे चाललो...
मॅनहॅटन डाऊनटाऊन
आणि अचानक तो सामोरा आला...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०१
अजून पाच मिनिटे चालल्यावर इमारतीच्या पायथ्याशी पोहोचलो. या इमारतीचा बाहेरील पृष्ठभाग काचेच्या आठ त्रिकोणांनी बनलेला आहे. त्यामुळे दिवसाच्या बदलत्या प्रकाशात त्याचे रूप सतत बदलताना दिसते. या इमारतीचा दर्शनी भाग फारसा आकर्षक नाही. मात्र, पायथ्याशी उभे राहून वर पाहिले तर तिचे अणकुचिदार टोक ढगांत खुपसलेल्या सुरीसारखे दिसते...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०२
इमारतीत गेल्यावर, ऑब्झरवेटरीकडे नेणारा लिफ्टचा मार्ग आपल्याला ९/११ च्या दुर्घटनेची आठवण करून देतो. त्या खडबडीत भिंतींवर चलतचित्रांद्वारे ही इमारत बांधण्यात हातभार लावणार्या कर्मचार्यांच्या कथा आपल्याला सांगितल्या जातात...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०३
या इमारतीला खरे तर ९४ मजले आहेत. पण, सर्वात वरच्या मजल्याला १०४ क्रमांक दिलेला आहे. १०० ते १०२ क्रमांकाच्या तीन मजल्यांना मिळून ऑब्झर्वेशन डेक असे नाव असले तरी केवळ १०० वा मजला पर्यटकांना निरीक्षणासाठी ठेवलेला आहे. १०१ व्या मजल्यावर रेस्तराँ आहेत आणि १०२ मजला खास कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेला आहे. वर जात असताना अतिजलद लिफ्टच्या चारी भिंतींवर जमिनीपासून-ते-छपरापर्यंत असलेल्या LED पडद्यावर आपल्याला गेल्या ५०० वर्षांत न्यू यॉर्क शहरात झालेली स्थित्यंतरे दिसतात; ती पाहताना १०२ वा मजला केव्हा आला ते कळतच नाही. १०२ व्या मजल्यावरच्या एका मोठ्या भिंतीसमोर असलेल्या पडद्यावर चलतचित्रांद्वारे न्यू यॉर्क शहराच्या वेगवेगळ्या रूपाचे आणि धावपळीच्या जीवनाचे दर्शन करविले जाते...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०४
या सादरीकरणाच्या शेवटी पडदा मिनिटभर वर जातो आणि त्याच्या मागच्या काचेच्या भिंतीतून मॅनहॅटनची एक झलक दिसते...
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर : ०५
...आणि पडदा लगेच खाली येतो ! यानंतर पुढे गेल्यावर, वाटेत "आपला ऑब्झरवेटरीचा अनुभव अत्युत्तम बनविण्यासाठी हे विकत घ्या, ते विकत घ्या" असे मार्केटिंग होते. पण तिकडे दुर्लक्ष करून आपण १०० वा निरिक्षणमजला गाठायचा असतो. या मजल्यावरून चहुबाजूच्या परिसराचे मनोहर विहंगम दर्शन होते. डाऊनटाऊनमधल्या गगनचुंबी इमारतींच्या डोक्यावरून त्यांच्याकडे पाहण्यात आणि ७०-८० किलोमीटर दूरवर पसरलेला परिसर पाहण्यात एक वेगळीच मजा आहे...
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०१. डाऊनटाऊन, इस्ट नदी, ब्रूकलीन पूल आणि ब्रूकलीनचा काही भाग
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०२. हडसन नदी, डाऊनटाऊन आणि दूरवर दिसणारी टोकदार शिखर असलेली एम्पायर स्टेट इमारत
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०३. हडसन नदी आणि तिच्या पलीकडील जर्सी सिटी व तिथले डाऊनटाऊन
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०४. हडसन नदी आणि तिच्या मुखाजवळील बेटावरील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०५. हडसन नदीकिनार्यावरील गगनचुंबी इमारतींवरील बगीचे
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०६. मॅनहॅटनचे दक्षिण टोक आणि बॅटरी पार्क
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०७. जुळ्या टॉवर्सपैकी एकाच्या पायाच्या जागेवर बांधलेले कारंजे
या मजल्याच्या एका भागात गोलाकारात बसवलेले दहा-अकरा टिव्ही वापरून न्यू यॉर्क आणि परिसरातल्या आकर्षणांची आणि खादाडीची माहिती दिली जाते...
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०८. न्यू यॉर्क आणि परिसराची माहिती देणारे प्रात्यक्षिक
ऑब्झर्वेशन डेक वरून : ०९
ऑब्झर्वेशन डेक वरून : १०
इमारतीवरून खाली येऊन संकुलाच्या परिसरात फेरी मारताना दोन मोठे चौकोनी मानवनिर्मित खड्डे दिसतात. नष्ट झालेल्या जुळ्या टॉवर्सच्या पायथ्यांच्या जागी उरलेले खड्डे भरून न काढता त्यांना तसेच सुशोभित करून त्यांत सपाटीवर पाणी वाहणारी कारंजी बनवली आहेत. खड्ड्यांच्या कठड्यांवर ९/११ च्या दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांची नावे लिहिलेली आहेत..
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नष्ट झालेल्या टॉवरच्या पायथ्यांच्या ठिकाणी बनवलेले कारंजे
संकुलाचे आवार झाडे व फुलझाडांच्या वाफ्यांनी सुशोभित केलेले आहे...
संकुलाचे आवार
या परिसरात, दीड दशकांपूर्वी, शांतताकाळातील जगातील सर्वात मोठा विध्वंस घडला होता यावर विश्वास बसणार नाही इतपत हा परिसर बदललेला आहे. (क्रमश :) =============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका... ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ... ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३... १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१... १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय... १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१... १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास... २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन... २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२... २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर... २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२... ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल... ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस... ===============================================================================
Book traversal links for न्यू यॉर्क : ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments