पाककृती

बैदा रोटी आणि इतर...

Primary tabs

प्रिय सर,
"गणपती साठी गावी जात असल्या कारणाने मी आज अर्ध्या दिवसाच्या रजेवर जात आहे" ,

असे इ पत्र साहेबाला पाठवून अस्मादिक तडक आमिर चिकन सेंटर ह्या दुकानासमोर जाऊन प्रकटले, 2-3 कोंबड्यांचे निरीक्षण करून एका कोंबडीचा माझ्यासमोर बळी द्यायला सांगितला, आणि मग सर्व पाहिजे ते अवयव पाहिजे त्या आकारात कापून घेऊन, खिमा मनासारखा बारीक झाल्यावरच दुकानदाराला सोडले.
आणि सुरु झाला एका पाकृ चा प्रवास.

श्रावण संपला आणि मग मग वेध लागले ते बैदा रोटी चे. तसंही गणपा यांनी हि पाकृ टाकून आमचा श्रावण संपण्याची वाट बघत असलेला चातक करून टाकलाच होता,त्यातच सौ. माहेरी गेल्याने आमची भीड अजूनच चेपली (कारण "तू पदार्थ कमी आणि पसारा जास्त करतो" हे समस्त बायकांचे त्यांच्या नवऱ्याबद्दलचे मत आम्हालाही लागू होते).

मूळ प्रेरणा : गणपा
मुख्य बल्लवाचार्य : झुमकुला,
मुख्य सहाय्यक बल्लवाचार्य : गणामास्तर
मुख्य छायाचित्रकार: हलकट बाब्या

साहित्य: कमीत कमी भांडी आणि मोजकेच ग्लास घ्यावे (कारण दुसऱ्या दिवशी कामवाल्या मावशींनी मी केलेल्या कामाचा (आणि दारुकामाचा) इत्थंभूत वृत्तांत सौ पर्यंत पोहोचवला होता.)
500 ग्राम खिमा, 3 मोठे कांदे बारीक चिरून, 2 टोमॅटोची प्युरी, 10-15 तिखट हिरव्या मिरच्या, आले लसूण पेस्ट अर्धी वाटी.कढीपत्ता, कॊथिंबीर बारीक चिरून,लाल तिखट, हळद, मीठ, तेल
रोटी साठी- मैदा 250 ग्राम, चिमूटभर मीठ, फेटलेली अंडी 2
चिकन सुखा साठी, 1 kg चिकन, किसलेले खोबरे एक वाटी, कांदा लसूण मसाला अर्धी वाटी.
raw

कृती बैदा रोटी
सर्वप्रथम खिमा स्वच्छ धुवून घ्या.
ad
एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या, नंतर त्यात हिरव्या मिरच्या( सढळ हाताने), टोमॅटो प्युरी, लाल तिखट (सढळ हाताने), आले लसूण पेस्ट,हळद टाकून मिश्रण जरा परतून घ्या, थोड्यावेळाने त्यात खिमा टाकून मिश्रण एकजीव करून मीठ टाकून, 15-20 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवून शिजवून घ्या.
gv

al

रोटी ची कृती
मैदा एका भांड्यात चाळुन त्यात चिमुटभर मीठ आणि फेटलेली अंडी टाकून नीट मळून घ्या( तांत्रिक सूचना- फेटलेली अंडी एकदम टाकू नयेत, हळू हळू अंदाज घेऊन टाकावीत, कारण 250 ग्राम मैद्याचा अंदाज मास्तरांनी एकदम टाकलेल्या अंड्यांमुळे नंतर 500 ग्रामचा झाला.)
तयार मैद्याचा गोळा ओल्या कापडामध्ये झाकून ठेवावा (श्री गणपा यांनी सांगितलेल्या कृतीचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला गेला)
kk

एकीकडे खिमा शिजत असताना दुसरी कडे चिकन सुका साठी तयारी चालू केली (एकाच वेळी अनेक पदार्थ फक्त स्त्रियाच न चुकता बनवू शकतात ह्या प्रमेयाला छेद देण्याचा एका केविलवाणा प्रयत्न (यशस्वी) केला गेला.)

एका कुकर मध्ये तेल घेऊन त्यात चिकन थोडे फ्राय करून घ्या वरून हळद आणि मीठ टाकून पाणी टाका आणि कुकर चे झाकण लावून घ्या. एक शिट्टी मोठया आचेवर घेऊन बाकीच्या 2 शिट्या मंद आचेवर घ्या. वेळ साधारण 20 मिनिट.
(ह्या 20 मिनिटामध्ये हलकट बाब्या सारखा फ्रिज उघडून बाटल्यांकडे बघून येत होता)

कुकर गार झाला की अळणी वाटी तयार, (मग आम्ही प्रत्येकाने 3 -3 वाट्यांचा आणि हलकट बाब्याने एका बाटलीचा आस्वाद घेतला.)

al

आता पुन्हा बैदा रोटीकडे वळतो,
(चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की तोपर्यंत खिमा पण शिजला आहे)

आता मैद्याच्या पातळ अशा चपात्या(?) थापून घ्या आणि त्यात खिम्याचे सारण भरून ती चपाती सगळ्या बाजूंनी बंद करून घ्या , आता नॉन स्टिक पॅन वर थोडे तेल टाकून हि बैदा रोटी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.

agjhdg

आता पुन्हा चिकन सुका कडे वळतो.

एका भांड्यात सर्वप्रथम किसलेलं खोबरं लालसर भाजून घ्या, त्या नंतर कांदा ब्राउन (तपकिरी?) रंगावर परतून घ्या त्यात मिरच्या (स.हा.), कडीपत्ता,आले लसूण पेस्ट, लाल तिखट (स.हा.), टोमॅटो प्युरी, हळद, आणि कांदा लसूण मसाला (स.हा.) टाकून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता ह्यात भाजलेले खोबरे आणि चिकन घालून, मीठ घालून एकदा हलकेचं हलवून घ्या. दोन मिनिटांमध्ये गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
ui

काही निरीक्षणे आणि सूचना.
1) पाकृ मध्ये जरी थोडक्याच भांड्यांचा उल्लेख असला तरी एकंदर खूप भांडी वापरली (खराब केली) गेली, त्याचा दुसऱ्यादिवशी मला जबाब द्यावा लागला हेवेसांनल.
2) सढळ हाताने मिरच्या आणि तिखट ह्यांचा वापर स्वतःच्या जबाबदारीवर करण्यात यावा.
3) काही फोटो राहून गेले आहेत, कारण हलकट बाब्या सारखा फ्रिज कडे धाव घेत होता.
4) मैदा मळलेल्या भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवावे, दुसऱ्या दिवशी कामवाल्या मावशींनी घासायला त्रास झाला म्हणून भांडे फेकून दिले तर त्यास लेखक जबाबदार नाही.
5) वरील पाकृ किचनच्या सगळ्या खिडक्या सताड उघड्या ठेवून करावी, कारण मसाल्यांचा स.हा. वापर.
6) चिकन सुक्का, बैदा रोटी आणि मदिरेचा अंमल कितीही असला तरी बेसिक साफसफाई लगे हात करून घ्यावी.

अति महत्त्वाचा इशारा :
चिकन सुक्का चखणा म्हणून खायचे असेल तर एका जागीचं बसून खावे. उगाचं फिरत फिरत इकडे तिकडे प्लेट ठेवून विसरून येऊ नये नाही तर दोन दिवसांनी खूप वास उठतो. तसेचं बाटल्यांची झाकणे, रिकामी धुराकांड्यांची पाकिटे वगैरे लगोलग फेकून द्यावीत अन्यथा अचानक घरी आलेल्या मातोश्री/तीर्थरूप यांना ती बरोब्बर बेड अथवा सोफ्याखाली सापडू शकतात. ( हा फक्त काळजीपोटी दिलेला इशारा आहे, सदर घटनेचा कसलाही अनुभव लेखकाला नाही :)

लेखाच्या विस्कळितपणाकडे जेष्ठ आणि श्रेष्ठ मिपा बल्लवाचार्य आणि सुगरणी दुर्लक्ष करतील ही विधात्या चरणी प्रार्थना करतो.

अभ्या..

गणामास्तरने बरेच जणांना कामाला लावले दिसतेय.:)
एनीवे, म्युरलसारखेच झकास काम. येऊ पुण्यात एकदा भेटायला.

यशोधरा

काही फोटो दिसत नाहीत. थापलेल्या (?) चपातीची खरपूस भाजलेली बैदा रोटी व सुक्का चिकन छान दिसतेय.

गणामास्तर

यशोतै, चपाती थापलीचं होती :) खिमा भरून झाल्यावर अगदी भाकरी किंवा थालीपीठ थापतात ना तशी.

यशोधरा

चपाती थापायची आयड्या आवडलीच आहे, करुन बघेन कधीतरी. खिमा आणायला़ कॅंपमधील मार्केटात जाण्यापासून सुरुवात!

टवाळ कार्टा

काय हलकटपणा सुरु आहे....कोणीतरी कट्टा झाहिर करा रे ता

नूतन सावंत

बैदारोटी चिकन खिम्याची केली नाही कधी,पण तुमची छान खरपूस दिसतेय न सुक्का चिकनही छान दिसतंय.

आमच्याकडे दसर्‍यापर्यंत खात नाहीत. तोवर #ईर्ष्या #मत्सर #जळजळ

सूड

आम्ही पनीरची केली होती, तस्मात जळजळ वैगरे काय्येक झालं नाही. गणामास्तरास्नी सैपाक येतो हे नव्यानं कळलं.

गणामास्तर

येतो उगी थोडा फार. पण तुझ्याइतका पट्टीचा बल्लव नसल्याने इथे काही टाकायचा कॉम्प्लेक्स येतो.

केडी

मस्त जमलाय ...पाककृती आणि धागा देखील!

ज्याक ऑफ ऑल

आता खाऊन आणखी वाढवावया लागतील ...

मस्त लेखन आणि छायाचित्र पण तितकीच भारी !!

हलकट बाब्या

शेवटी कोणीतरी छायाचित्रांची प्रशंसा केली ...!! आभारी आहे. ;)