पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई .
आम्ही , म्हणजे अस्मादिक आणि आमचं खटलं , साधारण जुलै मध्ये राजस्थान स्वारी वर गेलो होतो. संपूर्ण ट्रीप नेहमी प्रमाणे मी स्वत:च प्लान केली होती. सबब अगदी पहिल्या दिवसापासून Adventure असणार ही कल्पना होतीच. पण ते मुंबई पासूनच सुरु होईल याची तिळमात्र ही कल्पना आम्हांला नव्हती. त्यात अस्मादिक पडलो मराठवाडी , त्यामुळे निजाम-गती (ही कूर्मगती पेक्षा पण हळू असते) ही आमच्या पाचवीलाच पुजलेली . त्यामुळे आमच्या सौ”नी सांगून सुद्धा ,”अगं विमान १२ चे आहे, आपण ११ पर्यंत पोचलो तरी चालेल !" असं म्हणून क्याब ८ ची बुक केली. की बाबा अगदी मुंबई मुंबई म्हणतात तशी गर्दी लागली तरी ३ तासात ३८ किमी पोचणे अवघड नाही !!
इथेच घात झाला. त्यात निघायला पण १५-२० मिनिट उशीर झाला, पण त्यादिवशी फारफार गर्दी दिसल्यावर मी आपलं धास्तावूनच ड्रायवर ला विचारलं, “पोचू नं ? “ त्यावर तो "आगरी पार्थसारथी" म्हणाला , “सायेब तसं म्हणाल तर ता १-१:३० तासात पोचायला हवं , पण कंदी ४-५ तास पन लागतात . अन आज मेगाब्लॉक आय ना ... ता गर्दी आसनार भुतावळी-पिसवली पासून !!” . ईथे आवंढा क्रमांक १.
या संवादानंतर मी आपलं उगाच “मुंबई मध्ये कशी गर्दी आहे , लोकांनी कसं काय राहायचं या गर्दीत ?” अश्या निराशाजनक गप्पांवर आलो. पण त्याचा ड्रायवर (अन बायकोवर पण) परीणाम होत नाहीये हे पाहून मी आपलं “वड्याचं तेल वांग्यावर” या न्यायाने “कांडी-क्रश” मध्ये डोकं खुपसलं . कॅब मध्ये बसून साधारण २ तास झालेत हे लक्षात आल्यावर मी आपलं ड्रायवरला आवाजात उसना विश्वास आणून विचारलं की “झालं आता पोचूच बहुदा अर्ध्या तासात नं ?” , त्याने स्थितप्रद्न्यपणे (स्थितप्रद्न्य लक्षणे - ईती स्थितप्रज्ञ लक्षणं ) मागे पाहून मला सांगितलं , “साहेब अजून पवई पन नाय आला , आजून २-१ तास लागतील !!” ईथे आवंढा क्रमांक २ .
झाsssssलं .... माझं उरलं सुरलं अवसान गळून पडलं. त्यात बायको “कळलं आता?” युक्त नजरेने माझ्याकडे बघून खिडकीबाहेर पाहायला लागली. माझी आपली “मुंबई-गर्दी-ट्राफिक-गर्दी-मुंबई” ही टेप परत सुरु झाली. ईथे आवंढा क्रमांक ३ .
थोड्या वेळाने मी सवयी प्रमाणे (मी व्यवसायाने सीए असल्याने) समजा विमान चुकले तर ? असा हायपो. प्रश्न “Cost-Benefit” मांडण्यात मग्न झालो. त्या क्षणापर्यंत मी “आता कोठे धावे मन ? तुझे चरण देखिलिया !!” ईतपत विरक्ती पर्यंत आलो होतो. त्यामुळे “काय होईल ? फार तर ट्रीप चे ४०,००० जातील आणखी काय ?” या त्यागपूर्ण विचारापर्यंत आलो होतो . (कारण नंतर बायकोला काय तोंड द्यायचे या विचाराने घाम फुटायची वेळ येणार होती - हा विचार मनास शिवला नव्हता हे सांगायला नको ). तो शिवल्या नंतर आवंढा क्रमांक ४.
तितक्यात ड्रायवर ने “साहेब वेब चेकीन केलाय काय ?” असं विचारलं. अन मी चमकून त्याच्याकडे पहिलं . यावेळेस “स्थितप्रद्न्य” मी झालो होतो. मला काय उत्तराव कळेना. वेब चेकीन चा यत्न केला पण तो फेल झाला. फ्लाईटच्या एक तास आधी वेब चेकीन होत नसतं ही आमच्या ज्ञानात भर पडली. तो पुढे म्हणाला “साएब , इथून नायका एरपोट ९ किमी आय. तसं तर १ तास पन लागू शकतो , पण कालजी नका करू , आपन तुमाला पोचवायचा फुल प्रयत्न करनार . तुमी कालजी करू नका !!” अचानक मला तो ड्रायवर “शंखधारी-पद्मपाणी-चक्रवर्ती आभावलय असलेला पार्थसारथी" वगैरे वाटू लागला. आमचा हा संवाद चालू असताना आम्ही पवई लेक जवळ पोचलो होतो. आणि ड्रायवर एखाद्या सराईत मेजर-कर्नल वगैरे सारखा मला सूचना देत होता. “आपण आता असं असं पोहचू. तुम्ही सामान उचलून सेक्युरीटी ला जावा. मी वैनीना दारावर बरोब्बर सोडतो. पैसे वैनी देतील. तुमी पला.” इत्यादी.
आणि काय सांगावं ? फास्ट फ्युरीयस मधला डॉम टोरेतो काय गाडी चालवेल अशी तो गाडी हाणू लागला. एकीकडे “स्पीड लिमिट” तुटलीये म्हणून GPS मधली बाई जीवाच्या आकांताने ओरडायची थांबत नव्हती. प्रत्येक जाणाऱ्या किमी मागे ड्रायवर बद्दल माझा आदर सम प्रमाणात वाढत होता. आणि ११:४० वाजता ड्रायवर ने म्हणल्या प्रमाणे खरंच गाडी विमानतळासमोर उभी केली. शेवटचे ६-७ किमी त्याने खरंच १०-१२ मिनटात पार केले. ते पण मुंबई च्या गर्दीत. “अत्यंत आदर” – फक्त आणि फक्त .
८ ला बसलेलो , ११:४० ला विमानतळावर पोचलो. सगळं प्लानिंग बोम्बललं होतं. पण याच Adventure साठी तर “ग्रुप-टूर” टाळला होता. आणि हा टूर अपेक्षे प्रमाणे झक्कास होणार याचीच ही नांदी होती. पण हे जरा जास्तच फाष्ट होत होतं. म्हणजे आपण पोरीला प्रपोज करायला जावं , आणि तिने चल आपण “आपल्यासाठी” घर शोधुया का ? असं म्हणावं इतकं फाष्ट.
हुश्श .... शेवटी पोचलो. आता दुसरा पेपर सुरु झाला. सेक्युरीटी वगैरे सोपस्कार पार पडल्या नंतर आत गेलो अन लक्षात आलं की ब्यागेज चेकीन आणि बोर्डिंग बंद झालं होतं. आवंढा क्रमांक ... काय बर? जाऊदे मायला .. मी आवंढे मोजणंच बंद केलं होतं एव्हाना . तरी ईतक्या जवळ आलोय .. आता हरायचं नाही असा निश्चय करून एका क्र्यू ला अडचण सांगितली. त्याने अत्यंत प्रोफेशनली आम्हाला अटेन केलं आणि आश्वासक आवाजात “डोंट वरी , आय विल गेट यु ईन !!” असं म्हणत पुढचे सोपस्कार पार पडून आम्हाला बोर्डिंग गेटच्या दिशेला लावून दिलं. हुश्श .... शेवटी ... आम्ही उदयपुर ला जाणार”च” होतो.
एकदाचे इंडिगो च्या बुंssssग मध्ये बसून हवेत उडालो ... आता अर्ध्या तासाच्या निश्चिंती नंतर खरोखरच उदयपुर स्वारी सुरु होणार होती.
बाय बाय मुंबई ..
काना-मनात ऑलरेडी “केसरिया बाssssलम .. पधारो नी म्हारे देस !!” रुंजी घालायला लागलेलं होतं.
पोचलो एकदाचे
आता उदयपुर दर्शन ......
(क्रमश:)
बाकी ते विमानाने जायचं असलं की करतात तसं CA KEDAR D GOGATE is travelling to Udaipur from Chhatrapati International Airport to Dabok International Airport with one other - Feeling Excited " अशी चिंधीगिरी आम्ही पण करून घेतली ...हे असे फोटो टाकणं मस्ट असतंय
काना-मनात ऑलरेडी “केसरिया बाssssलम .. पधारो नी म्हारे देस !!” रुंजी घालायला लागलेलं होतं.
पोचलो एकदाचे
आता उदयपुर दर्शन ......
(क्रमश:)
शक्यय
बाकी झकास... -__/\__
एक आगाऊ सल्ला; ते प्रत्येक प्रतिसादाला धन्यवाद धन्यवाद करु नका....ओके .. यापुढे लक्षात ठेवू