पाककृती

उपासाच्या सुरळीच्या वड्या

Primary tabs

नवरात्र चालू आहे. नऊ दिवस उपास करणाय्रांसाठी थोडी वेगळी पण चविष्ट पाककृती घेऊन आलेय. उपास नसला तरी करून आस्वाद घ्यायला हरकत नाहीच!
साहित्यः
पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं.
vadya
कृती:
खोबरं खवून घ्यावं. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरच्या वाटून घ्याव्या. खोबरं कोथिंबीर, मिरचीचं वाटप आणि मीठ एकत्र करावं. दोन वाट्या पाणी आणि ताक नॉनस्टीक पॅनमध्ये एकत्र करावं. चवीनुसार मीठ, लाल तिखट घालावं. आता त्यात शिंगाडापीठ आणि साबुदाणा पीठ घालून नीट मिसळावं. गोळी होता कामा नये.
vadya
आता मंद गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहावं. दोन ताटाना तूपाचा हात लावून घ्यावा. मिश्रण शिजत आलं की घट्ट होत जातं. पिठाचा रंग बदलतो. आता मिश्रण उलथ्याच्या सहाय्याने भराभर ताटावर पसरावे. त्यावर खोबरं कोथिंबीर घालावी. तूप जिय्राची फोडणी करावी. या मिश्राणावर पसरावी. हा फोटो फोडणी घालण्या पूर्वीचा आहे.
vadya
आता उभ्या रेषा मारून घ्याव्या. अर्ध्यापर्यंत गुंडाळावे.
vadya
अश्या पध्दतीने सर्व वड्या गुंडाळून घ्याव्या. मस्त डीश तयार आहे. आता मनसोक्त उपास करा!!!
vadya

मनिमौ

कसले सही पदार्थ सांगतेस तु
मला तर कधीच असल काही येत नाही.

अनन्न्या

नक्की करशील तूही, आणि करायला लागलं सुचत जातं.

खटपट्या

हे उपवासाला चालतं? हे खाललं तर मग उपवास कसला?
बाकी पाकक्रुती खांडवीसारखी दीसतेय...

सूड

तुम्ही म्हणताय ती खांडवी गुजराती थाळीतली, ती मराठीत सुरळीची वडी!! मराठीतली खांडवी ही!!

खटपट्या

ओह धन्यवाद. मराठीत खांडवी असते हे माहीत नव्हते..

पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं.

हे सगळं उपवासाला चालतं.. मग ह्याचं थालपीठ बनवा नाही तर सुरळीच्या वड्या.. फर्क की पेंदा!
भारतीय हिंदु उपवास तरी असेच असतात.. खाऊन पिऊन.. जीवाला त्रास नाही!!

बाकी अनन्या, महान आहेस!!!!!! साध्या सुरळीच्या वड्या जमायला अवघड, तू शिंगाड्याच्या पीठाच्या कशा जमवतेस ग बाई!!!

खूपच मस्त...कधी कल्पनाच केली नव्हती शिन्गाड्याच्या पिठाचे असे भारी काहीतरी करता येइल. धन्यवाद...!

रेवती

मस्त पाकृ. हा प्रकार माहित नव्हता.

विशाखा राऊत

रेखीव वड्या झाल्या आहेत. एकदम मस्त :) (मी सुरळीची वडी केली तर ताट घासायच्या आधी चिकटलेले पीठ खावे लागते. तुझे ताट एकदम साफ सुधरे असेल ना ;) )

अनन्न्या

यातली फक्त कोथिंबीर काहीजण उपासाला खात नाहीत पण बाकी सर्व उपासाचेच आहे! शेवटी एवढं करायचं ते जीभेचे चोचले पुरवायला!!!

गवि

क्या बात है... वा वा वा...!!!

केल्याच पाहिजेत आता.

केडी

वाह, मस्त वेगळा प्रकार आहे, करून पाहतो एकदा.

Mrunalini

छान पाकृ आणि फोटो सुद्धा!.

दिपक.कुवेत

ईथे साध्या सुरळीच्या वड्या जमताना मारामार...तू चक्क उपासाच्या केल्यास!!! ईथूनच दंडवत घालतो...एक ताट्भर पाठवून दे ईकडे....तोंड खवळलय.

अजया

एकदम हटके आणि मस्त पाकृ.