जगा आणि जगू द्या!!
बुद्धाची शिकवण आणि आपण,
"खून ऋजुरात" आमच्या कंपनीच्या थायलंड युनिटची स्टोर्स मॅनेजर. अतिशय बुद्धिमान, दर आठवड्यात होणाऱ्या प्रोजेक्ट स्टेटस मिटिंगमधे कंपनीच्या सीईओच्या प्रश्नांनी फाफलणारे एक आम्ही आणि एका दमात क्रिस्टल क्लीअर रिपोर्ट देणारी "खून ऋजुरात" दुसरीकडे. ३० जणांच्या स्टाफला आणि स्टोर्स डिपार्मेंटला लीलया हाताळते. ऑडिटर्सना आजतागायत स्टोर्स डिपार्टमेंटच्या चुका शोधता आल्या नाहीत. तिच्या कामाची पद्धत इतरांनाही शिकावी म्हणून तिला मागे आमच्या स्विझर्लंड युनिटच्या स्टोर्स डिपार्मेंटला ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले होते.
"खून नुआन" परचेस डिपार्टमेंटमधील एक सर्व साधारण स्टाफ, कायम कामात गढून गेलेली पण उत्तम विनोदबुद्धी असलेली. कधी कॉफी मशीनपाशी भेटली तर आंनदाने मला कॉफी बनवून देणारी. अशीच अजून एक "खून वानविस्या" जॉईन झाल्यापासून सेफ्टी पॉलीसीमधे अमूलाग्र बदल घडवून आणणारी कंपनीची डॅशिंग सेफ्टी ऑफिसर.
आवांतर:- थाई भाषेत Mr., Mrs, Miss या सगळ्यांसाठी "खून" हा कॉमन शब्द वापरला जातो.
आता तुम्ही म्हणाल "धत तेरी" यात काय विशेष आहे? भारतात अशी उधाहरणे सतराशे सत्त्याण्णव, अगदी किलोच्या भावात सापडतील, पण मी जेव्हा सांगेन कि यातली पहिली "लेडी बॉय" आहे, दुसरी "टॉमबॉय" आहे आणि तिसरी "गे" आहे तेव्हा खात्रीने सांगतो, भारतातल्या उधाहरणासाठी तुम्हाला १०० ग्रॅमचं मापही जास्त होईल. माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही तर समान हक्कांच्या जोडीला आदरही देणाऱ्या थाई समाजाच्या वैशिष्ट्याला सलाम केल्याशिवाय तुम्ही रहाणार नाही.
आपण ज्याला किन्नर, तृतीयपंथी किंवा हिजडा संबोधतो तो समाज थायलंडमधे ठायी ठायी सापडतो. तो तुम्हाला भाजीवाला म्हणून दिसेल, मासे विकणारी कोळीण म्हणून दिसेल, ७/११ शॉपमधे अदबीने स्वागत करत काम करणारे दिसतील, तुमच्या गाडीत पेट्रोल भरतांना गन धरून असलेला दिसेल, बँकेत अधिकारी म्हणून दिसेल, टूर गाईड म्हणून दिसेल, ट्रक चालवणारे दिसतील, एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफ म्हणून दिसतील इतकंच काय थाई राजाच्या ग्रँड पॅलेस मधे सिक्युरिटी गार्ड म्हणूनही दिसतील. आणि या सगळ्यांत न शिकलेले तुम्हाला पटाया बीचवर देह विक्रय करणारे म्हणूनही दिसतील.
काठोकाठ भरलेल्या दुधाच्या भांड्यात दूध उतू जाऊ न देता साखर जशी विरघळते तितक्या सहजतेने हि मंडळी थाई समाजात सामावली गेली आहेत. इथे कुणी स्वतःची "थर्ड जेंडर" हि आयडेंटी लपवतांना दिसत नाही. यातली टॉमबॉय असलेली "खून नुआन" आमच्या युनिअन लिडरची मुलगी आहे म्हणजे एका बापाला आपल्या मुलीचं स्टेटस समाजापासून लपवावंसं वाटत नाही हे विशेष.
हिच ऋजुरात, नुआन आणि वानविस्या भारतात जन्माला आल्या असत्या तर एखाद्या सिग्नलवर टाळ्या वाजवत भिक मागत असतांना दिसल्या असत्या. अश्याच कुठल्याश्या उकिरड्या वस्तीत, पत्र्याच्या घरात दिवस कंठत असत्या. "जगा आणि जगू द्या" हा महान संदेश देणाऱ्या बुद्धाचा जन्म भारतात व्हावा मात्र विचारांची फुलं थायलंडमधे पडावीत हा आपला कपाळ करंटेपणा म्हणायला हवा. ख्रिस्ती देशांत आजही पृथ्वी सपाट आहे असं मानणारे लोकं जसे सापडतात तसे "हिजडा" म्हणजे मागच्या जन्मीची पापं असं मानणारे बरेच भारतीय सापडतील (बरेच हा शब्द 'सगळेच'असा वाचलात तरी हरकत नाही)
आजकाल वाढत चाललेली नास्तिकांची संख्या पहाता असं म्हणतात कि विज्ञानात आपल्या अंधश्रद्धांचे जस जसे तर्क सापडत जाणार तस तसा देव अधिक दुर होत जाणार. पण त्याच विज्ञानाने कितीतरी आधी "किन्नर" म्हणजे फक्त हार्मोनल मिस मॅच आहे. यात त्या जिवाची काहीही चूक नाहीये हे सांगितले असतांना देखील "पूर्वजन्मीचे भोग" हे लेबल नास्तिक लोकही सहज लावतांना दिसतात. त्यांना जन्म देणाऱ्या आई-बाबांना समाजाची सहानुभूती मिळते, खुनी, चोर, रेपिस्ट उजळ माथ्याने समाजात वावरतात पण स्वतःची काही चूक नसलेल्या आणि कोणताही त्रास न देणाऱ्या हिजडा समाजाला तिरस्काराशिवाय आपण काहीही देत नाही.
अर्जुन देखील बृहन्नडा झाला होता, रामायणात देखील किन्नरांचा आदरार्थी उल्लेख आहे. मोगलांच्या भटारखान्यात किन्नरांचा मुक्त वावर होता. आपल्यावरचे हे सगळे संस्कार गेले कुठे? काही म्हणतात त्यांच्या बीभत्स हावभाव, भडक मेकअप तसेच त्यांच्या लोकांकडून पैसे काढण्याच्या पद्धती यामुळे असावा. पण त्यांच्यावर भीक मागण्याची परिस्थिती आणली कोणी? एखाद्याचा हात अपघातात तुटला किंवा पाय तुटला तर आपण त्याचा स्वीकार करतो. मात्र केवळ लिंग ठरवणारा अवयव बाद झाला तर त्याला अयोग्य समजतो. अजबच आहे सगळं.
खून ऋजुरात जेव्हा याबद्दल मला तुमच्या भारतात कसं असतं? असं विचारते तेव्हा खरंच मान शरमेने खाली जाते. तिला फक्त एव्हढच सांगतो कि तू नशिबवान आहेस भारतात जन्माला आली नाहीस. आम्ही खूपच मागासलेले आहोत. थाई समाजाने तुमच्या जगण्याचा अधिकार मान्य केला आहे पण भारतात अजूनही हि मंडळी. रेशनकार्ड, इलेक्शन कार्ड आणि मरणोत्तर विधीसाठी हक्काची स्मशानभूमी यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवताहेत.
१५ एप्रिल २०१४, सुप्रिम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयात "थर्ड जेंडर" हि आयडेंटिटी हिजडा समाजाला मिळाली देखील पण आजही पाच लाख (Third gender census count २०१४) किन्नर, दुय्यम नागरिक म्हणूनच जगताहेत. कितीतरी ऋजुरात, कितीतरी नुआन आणि वानविस्या या पाच लाखांत घुसमटत असतील. काल्की सुब्रमण्यम, गौरी सावंत, लक्ष्मी नारायण त्रिपाठी, LGBTI ऍक्टिविस्ट बिंदूमाधव खैरे यांसारखे काही आशेचे किरण या समाजाला लाभलेत हि एक जमेची बाजू धरली पाहिजे.
बुद्धाची शिकवण आपल्या देशात वाया गेली असं तुम्हाला वाटतं का?
"ट्रान्स जेंडर" हा शब्द जनरली ज्यांनी आपल्या शरीरात शस्त्र क्रियेद्वारा बदल करून घेतला आहे अश्या लोकांसाठी वापरला जातो.असं नाहीये हो. इथं पाहा. अवघड आहे.