पाककृती

रेषादो मसाला बांगडा फ्राय

Primary tabs

Main 1

साहित्य
२ माध्यम आकाराचे बांगडे, साफ करून चिरा मारून
३ ते ४ सुक्या लाल मिरच्या
१० ते १२ लसूण पाकळ्या
१ इंच आलं
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखट
१ चमचा हळद
१ चमचा जिरं
१ चमचा काळीमिरी
१ दालचिनी
३ ते ४ लवंग
१ लिंबा एवढा चिंचेचा गोळा
३ ते ४ चमचे व्हिनेगर
चवीनुसार मीठ
१ चिमूट साखर (ऐच्छिक)
२ चमचे तेल, शॅलो फ्राय साठी

कृती
पोर्तुगीज मध्ये रेषादो म्हणजे स्टफ्फ्ड. एखाद्या माश्या (बांगडा किंवा पापलेट) मध्ये तिखट लाल मसाला भरून तो शॅलो फ्राय करणे हि गोव्या मधली उत्कृष्ट पाककृती. हा रेषादो मसाला अजून बऱ्याच मत्स पाककृतींन मध्ये वापरता येतो. व्हिनेगर च्या वापरामुळे हा मसाला काही महिने आरामात टिकतो.

ह्या मसाल्याची बरेच प्रकार घरोघरी प्रचलित आहेत, पण सर्वसाधारणपणे, व्हिनेगर मध्ये खडे मसाले, लाल मिरच्या चिंच, आलं लसूण इत्यादी घालून त्याची एक घट्ट पण स्मूथ पेस्ट बनवले जाते. [मुलं खाणार असल्यामुळे मी लाल मिरच्यांचे प्रमाण कमी ठेवले, आणि त्या ऐवजी काश्मिरी लाल तिखट वापरलय, ह्याने आपल्याला हवा तो रंग मस्त येतो]

बांगडे साफ करून धुवून कोरडे करून घ्या. आलं, लसूण बारीक चिरून घ्या. एका भांड्यात बांगडे, तेल आणि साखर सोडून इतर सगळे जिन्नस कालवून घ्या. हे मिश्रण साधारण २५ ते ३० मिनिटे मुरत ठेवा. मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्या. लागलंच तर थोडं पाणी घालून घटसर पण मऊसूद वाटून घ्या. [हा मसाला साठवून ठेवायचा असेल तर पाणी न वापरता तेल किंवा थोडंसं व्हिनेगर वापरा]. (ह्याला थोडा वेळ लागेल, पण हे मिश्रण अगदी स्मूथ झाले पाहिजे). वाटताना एक चिमूट साखर घाला. [आपण चिंच आणि व्हिनेगर वापरतोय, त्यांचा आंबटपणा थोडासा बॅलेन्स करायला साखर मदत करते]

Ingredients Step1Step2 Step3

ह्या मिश्रणाचे ३ ते ४ चमचे बांगड्याना आतून बाहेरून व्यवस्थित लावून घ्या. आता हे मसाला लावलेले बांगडे साधारण २० ते २५ मिनिटे मुरत ठेवा. तव्यावर २ चमचे तेल टाकून तवा गरम झाला कि बांगडे दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या.

Step4 Step5Step6

[साधारण ३ ते ४ मिनिटे एका बाजूला, हे तुमचे मासे किती छोटे किंवा मोठे आहेत ह्यावर अवलंबून आहे, मासे पटकन शिजतात, हे वेगळे सांगायला नकोय. अर्थातच, तुम्ही हे मासे एयर फ्रायर मध्ये तेलाचा स्प्रे मारून एयर फ्राय करून घेऊ शकता, किंवा तेलाचे बोट लावून ओव्हन मध्ये बेक सुद्धा करून घेऊ शकता.].

असे खरपूस शॅलो फ्राय केलेले मासे गरम गरम सर्व्ह करा! ह्या बरोबर भात आणि सोलकढी कॉम्बिनेशन एकदम भारी!

[मसाला वाटताना, तो खूपच आंबट झालाय असे मला वाटत होते, पण बांगड्याला लावून तो मुरवल्यावर, आणि खाताना तो आंबटपणा एवढा जाणवत नाही, एक छान तिखट आंबट मसालेदार चव माश्याला येते. हाच मसाला कोळंबी लावून, त्यांना रवा आणि तांदळाचे पिठात घोळवून, शॅलो फ्राय करून सुद्धा छान लागतात]

Main 2

रषातु

आयडी बॅन करा... एकच पर्याय आहे

केडी

आणि केलात कि इकडे फोटो टाका... :))

पिंगू

केडीशेठ, रेषादो मसाला वापरुन कुठली व्हेज पाककृती करता येईल का?

केडी

आपले नेहेमीचे यशस्वी व्हेज जिन्नस आहेत की!
१. उकडलेले छोटे बटाटे, मसाला लावून फ्राय/बेक करून
२. पनीर, मश्रुम बटाट्या प्रमाणेच
३. सोया चनक्स, आधी गरम पाण्यात वाफवून, मग मसाला लावून हलके फ्राय करून

हे पर्याय आता सुचतायत, करून बघा, तुम्हाला पण सुचतीलच नक्की!

मोदक

कोबी, फ्लॉवर, केळी, सुरण, रताळे.

काहीही कर. फक्त दुसर्‍या दिवशी नीट असलास तर नक्की कळव. ;)

केडी

...बल्लवाचार्य आहेत, असे ऐकून आहे, त्यामुळे त्यांना हि काळजी नसावी :-))

पिंगू

डोंबल्याचा बल्लवाचार्य.. कसला काय आणी फाटक्यात पाय. कधी तरी स्वंयपाकघरात अवचित उगवणारा धूमकेतू मी.

नीळा

याच मसाल्यात थोडा खरपुस ब्राउन तळलेला कांदा (बिर्यानी टिईप) वाटला तर मस्त लागतो

अन्नू

छान आहेत. सध्या त्याचंच जेवण चाललंय त्यामुळे जळजळ वाटत नाही ;) पाकृ बाकी मस्तंय

साहना

ह्या बांगड्याची संपूर्ण चव मसाल्याचा दर्जावर अवलंबून असते. आम्ही जो रेशियाद मसाला घरी करतो त्यांत भरपूर साखर सुद्धा टाकतो (वजनाने सुमार ३०%). साखर टाकलेला आणखीन कुठलाही मसाला मी आयुष्यांत पाहिला नाही. :)

गोव्यांत ओली कोथंबीरीचा ग्रीन मसाला घालून सुद्धा भरलेलं बांगडे करतात. माझ्या मते रेशाड पेक्षा ते जास्त चविष्ट असतात. करणारी व्यक्ती स्किल्ड असेल तर काटा सुद्धा काढून टाकू शकते म्हणजे बांगडा आपण सॅन्डविच प्रमाणे खाऊ शकता.

शाकाहारी माणसे आपल्या आवडीची कटलेट्स हा मसाला लावून बनावू शकतात.

केडी

गोव्यांत ओली कोथंबीरीचा ग्रीन मसाला घालून सुद्धा भरलेलं बांगडे करतात. माझ्या मते रेशाड पेक्षा ते जास्त चविष्ट असतात. करणारी व्यक्ती स्किल्ड असेल तर काटा सुद्धा काढून टाकू शकते म्हणजे बांगडा आपण सॅन्डविच प्रमाणे खाऊ शकता

अगदी, आमच्याकडे आई असा हिरवा मसाला घालून हलवा किंवा मोठं पापलेट करते. कधी कधी त्यात उकडलेले अंड कुस्करून, तर कधीतरी लहान कोळंबी घालून. एकदम मस्त!