Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंडलेल्या फिटनेसची कहाणी

व
वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 10:41
🗣 25 प्रतिसाद
ब्लॉग दुवा मिपावर सद्ध्या फिटणेसविषयक धाग्यांची लाट आलेली आहे. त्यात भर म्हणून हा धागा. खरं तर प्रतिसाद लिहायला घेतला, पण धागा झाला. लोकं व्यायाम, आहार, आराम यांची आपापली तर्कहीन त्रिसूत्री मांडताना बघितली की फार उद्विग्न व्हायला होतं. अर्थात फिटनेस, आरोग्य याला कुणी किती महत्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणी त्या गोष्टीला महत्व दिलं नाही तर त्यात माझं काही नुकसान नसतं, पण त्यांचं स्वतःचं नक्कीच असतं. फिट असायला हवं, असं सामान्यतः प्रत्येकाला वाटतं. असं असतान अनेकदा इच्छा असूनही आरोग्यासाठी वेळ काढला जात नाही. मान्य; की प्रत्येकाला आपापले व्याप, अडचणी, सुखःदु:ख असतात. आणि कुठेतरी हे ही माहित असतं की व्यायाम हा गरजेचा आहे, ही 'वाटलं तर करा' अशी गोष्ट नाही. पण तरीही प्रचंड आळस माणसांच्या स्वभावात मूळ धरतो, आणि मग तो आळस हटवादीपणाचं रूप घेतो. साधारण कॉलेजमधे जाण्याच्या वयात फिटनेस, व्यायाम या गोष्टींचं स्वाभाविकपणे आकर्षण वाटतं. मित्रमंडळींच्या संगतीने फिटनेसचा पाठपुरावाही केला जातो. इथेच दोन पंथ होतात. एकांना मेहनत करायची असते, एकांना नसते. ज्यांना मेहनत करायची नसते त्यांच्या फिटनेसचं जीवनचक्र साधारण असं असतं. काही बाबतीत जिम लावलं जातं. आठवड्याभरातच टीशर्टच्या बाह्या फोल्ड होऊ लागतात. 'सही झालीय रे बॉडी' म्हणणारे दोस्तही मिळतात. इथे फिटनेसची व्याख्याच चुकलेली असते. पण तरीही मग 'झाली आता बॉडी' म्हणून टाळाटाळ सुरू होते. किंवा सुरुवातीपासूनच 'मला कुठे स्पर्धेत उतरायचंय?' आणि अशा इतर अनेक कारणांपैकी कारणं दिली जातात. म्हणजे, समोर असलेला ऑडियन्स बघून वेगवेगळं कारण लोक देतात. 'पावडर बॉडी', 'जिम सोडलं की डबल व्हायला होतं' वगैरे भलभलत्या तर्कांचाही आधार घेतला जातो. जिम बंद होतं. a छायाचित्र आंतरजालावरून साभार मग कधी अशी वेळ आलीच की बाबा एखादी गोष्ट बरोबरचे लोक करतायत, आपल्याला झेपत नाहीये, की मग कारणांवरून गाडी प्राधान्यक्रमाकडे येते. उदाहरणार्थ: 'ट्रेक ला जाऊ' असं ग्रूपमधे कुणी म्हणावं, की 'ट्रेक बिक काय यार त्यापेक्षा रेसॉर्ट ला जाऊ. मस्त चिल्ल करू.' असं म्हणणारी व्यक्ती तुम्ही बघितली असेलच. ट्रेक ला नं जाणं हा तिथे प्रेफरन्स नसतो, ती इनॅबिलिटी असते. पण, प्रेफरन्स मानून ती व्यक्ती स्वतःला फसवते. मग एखादी टेस्ट कधीतरी केली जाते तापानिमित्त वगैरे. त्यात कळतं की कोलेस्टरॉल किंवा काही इतर गोष्टी वर खाली आहेत. मग डॉक्टर वजन कमी करायला सांगतात. डॉक्टरांचं पण मला कळत नाही. ते ही अशा वेळी अर्धवट सल्ले देतात. वजन म्हटलं की मग सर्वसाधारण दोन पर्याय समोर येतात, व्यायाम किंवा डाएट. डाएट अर्थातच सोप्पा पर्याय, माणीस तोच निवडतो. चूझिंग द ईझी ऑप्शनः माणसाची सहजप्रवृत्ती. मग एखाद्या डायटिशियनचा पाच-सात हजारचा धंदा केला की घरी जोशात सांगितलं जातं, 'आजपासून मी गोड नाही हं खाणार'. 'चहा बिनसाखरेचा पिणार'. ऑफिसात, फेसबुकवर जाहिरात होते; 'फर्स्ट डे ऑफ डाएट - फीलिंग ऑसम'. हजार बाराशेचा वजनकाटा घरी येतो. त्यावर येताजाता उभं राहिलं जातं. साखर बंद करणं, ही ती अति खाण्याइतकंच घातक असतं हे डॉक्टर सांगत नाहीत बहुदा किंवा ती मंडळी तेवढं नेमकं ऐकत, वाचत नाहीत. रणबीर कपूर ची सध्याची मैत्रीण कोण हे वाचतील मात्र. असे काही दिवस जातात. अधे मधे दिवसाच्या शेवटी 'थोडंसं श्रीखंड खाल्लं म्हणून काय होतंय' असं म्हणून ते साखर बंद प्रकरणही मोडलं जातं. पुन्हा स्वतःशी प्रामाणिक न राहणं. मग पुढे डाएटही झेपत नाही. डिटर्मिनेशनचा अभाव. निग्रह नाही. मग चीट डे ची वाट बघणं सुरू होतं. 'डाएटचं सर्वात काय आवडतं सांगू, चीट डे!' असं सांगून दोन डाएट करणारे टाळ्या देतात, हसतात; चीट कोण होत असतं हे जणू माहितीच नसल्यासारखं. हे चीट डे कधीकधी एकापेक्षा अधिकही होताना दिसतात. दरम्यान डाएट चालू असतानाही व्यायाम किंवा तत्सम श्रमाचं काही कुणी सुचवलं, की 'अरे व्यायाम कितीही केला तरी डाएट नसेल ना प्रॉपर, तर काह्ह्ही फायदा नाही' असं सांगून पुन्हा 'आपण करतोय ते योग्यच आहे' अशा भावनेने स्वतःची फसवणूक होते. मधेच एखादा मित्र मॅरेथॉन धावून फेसबुकवर फोटो लावतो. मिलिंद सोमणांच्या पोस्ट वाचनात येतात. आणि स्पोर्ट्स शूजची घरच्या चपलाबुटांच्या कपाटात प्राणप्रतिष्ठा होते. पहिल्या दिवशी धावायला मित्रमैत्रिणींसोबत जाऊन, मग नाश्ता करून घरी आल्यावर 'आज आम्ही फक्त चाललो. अ‍ॅक्चुअली चालून सुधा किती फ्रेश वाटतं माहित्ये. चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे खरं तर' असं सगळं बोलणं होतं. (रिमेंबरः चूझिंग द ईझी ऑप्शन) मग ते रनिंग शूज चालण्यासाठी वापरले जातात. रमत गमत, गप्पा मारत चालणं, कट्ट्यावर बसणं, अशा काही सकाळी जातात. मग त्याची वेळ संध्याकाळ किंवा रात्री जेवल्यावर अशी बदलते. 'सकाळी उठणं नाही जमत यार! बाकी काहीही बोल' असं पुन्हा आपलं एक कारण. a छायाचित्र आंतरजालावरून साभार हे सगळं मागे पडतं, जेंव्हा 'रोज प्राणायम करतो!' असं सांगणार्‍या कुण्या सत्तरीच्या आजोबांबद्दल माहिती कळते. मग काय! पडत्या फळाची आज्ञा. चूजिंग द ईझी ऑप्शन. चालणं बिलणं, डाएट बिएट बंद आणि फुसफुस सुरू. 'आपले पूर्वज ग्रेट होते यार. आज अमेरिकेतही लोक योगा करतात. त्यांनाही महत्व पटलंय त्याचं.' पुन्हा एकदा फसवणं. तरीही गुडघे दुखतात. तरीही पाठ आखडते. मग डॉक्टर गाठतात, डॉक्टर व्यायाम सांगतात. त्याला फिजिओथेरपी म्हटलं जातं. मग त्यावर पैसे खर्च होतात. आता संसाराचे व्याप असतात. करियर असतं. म्हणून ब्लेम लाइफस्टाइलवर जातो. ती बदलायचा प्रयत्न होत नाही केवळ कुढतच बसलं जातं. या स्थितीत सद्ध्या मी स्वतः आहे. मला आळस नाही उलट खूप इच्छा आहे परंतु वेळ खरंच मिळत नाही. अर्थात, हे मीच म्हटलं तरी मला पटत नाही. तेंव्हा हे डेडलॉक ब्रेक करण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. घरी का होईना, जमेल तितका का होईना मी व्यायाम करतो. हे नमूद यासाठी केलं की धागा वाचून 'आपण स्वतः काय करता?' हा प्रश्न वाचकांकडून उपस्थित होऊ शकतो. पुढे तब्येतीच्या कुरबुरी चालूच राहतात. एव्हाना वय जरासं वाढलेलं असतं. मग ते एक कारण मिळतं, की 'आता आम्ही कुठे व्यायाम करणार या वयात' वगैरे. मग गोळ्या, ज्यूस, मलमं आणि काय काय करायचं. आमच्या वेळी आम्हीही केला होता व्यायाम! असं सांगताना 'आमची वेळ' संपली असं कुणी जाहीर केलं होतं का? हा प्रश्न मंडळींना पडत नाही. ज्या तळमळीने 'त्याने किंवा तिने कस्स्लं मेंटेन ठेवलंय स्वतःला!' हे वाक्य म्हटलं जातं, ते बघून तसं म्हणताना नक्की अभिमान वाटतो, की हळहळ असं विचारावंसं वाटतं. पण नाही. हटवादीपणा संपेल कसा? मग तत्व असं असतं की 'काही नाही सग्गळं खायचं भरपूर! विचार नाही करायचा, मोजून मापून नाही जगायचं' 'पूर्वीची माणसं बघ. काय आहार होता त्यांचा!' सो; ईट एव्हरीथिंग. बी हॅपी. अशा तर्‍हेने 'वाट'चाल चालू राहते. यापैकी कुठल्याही वर्णनात आपण बसत असू तर आपण चुकतोय असं समजावं. हे लिहिता लिहिता मी स्वतःलाही बजावतोय, व नेहमीच बजावत असतो. उगीच 'लोका सांगे...' व्हायला नको. पण इथे वर्णन केल्यासमान असलेल्या कुणीही एक जरी व्यायाम, एक जरी डाएट, काहीही; फॉर दॅट मॅटर नियमितपणे, नेमाने, केलं तर या सगळ्या चक्रालाच फाटा मिळेल. पण तसं त्यांच्याकडून होतच नाही. एका नंतर दुसर्‍या प्रकारे ते शिस्तीला, मेहनतीला टाळत राहतात, आणि स्वतःला फसवत राहतात. अमूक एकच काहीतरी करा अशी सक्ती नसतेच आरोग्याच्या बाबतीत, किंवा हा एकच व्यायाम सर्वश्रेष्ठ, बाकी भंपक असंही नसतं. पण जे कराल त्यात सातत्य ठेवा इतकीच अट असते. फिटनेसमधे धरसोड, टाळाटाळ कामाची नाही. तिथे सातत्य हवं. काठिण्य पातळीत सतत प्रगती हवी. विविधता हवी. तरच परिणाम दिसतात. असो. यात हेटाळणीचा, दोषारोपाचा हेतू अजिबात नाही. साधा विचार आहे, की प्रत्येकाने आरोग्याची, शरीराची काळजी घ्यावी, आणि सुदृढ, सशक्त रहावं. शेवटी शरीर, आरोग्य ही एकमेव शाश्वत संपत्ती आपल्याकडे आहे. आता तिला गोळीसारखं मानून झाडून द्यायचं आयुष्यावर आदळण्यासाठी की बंदुकीसारखं मानून आपली पकड तिच्यावर मजबूत ठेवायची, जेणेकरून येणार्‍या अडचणींचा वेध घेता येईल, हा आपापला निर्णय आहे. शुभेच्छा.
वर्गीकरण
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
6006 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ध
धोणी Wed, 11/09/2016 - 10:48 नवीन
मस्त लिवलंय
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 11/09/2016 - 10:55 नवीन
पटतय.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 11/09/2016 - 11:00 नवीन
मी सुद्धा ह्याच सगळ्यातुन गेलेलो. साधारण तीशीपर्यंत व्यवस्थीत चाललं होतं. पण नंतर कदा मित्रांमध्ये एकाला हायपरटेन्शनच्या गोळ्या, काहिंना पाठदुखी, ताण वगैरे वगैरे गोळ्या दिसायला लागल्या. आमचंही बीपी हायर साईडला झुकत चाललं होत, वजनही वाढलं होत. अन अश्याचवेळी अचानक खाडकन डोळे उघडल्यासारखे झाले अन व्यायाम अन सोबतच जीम वगैरे सुरु झाले. अर्थातच ३० वर्षांची व्यायाम नसलेली बॉडी पटकन नीट व्हायची नाही, पण आताशा रुळावर येतेय. बर्यापैकी. अन आतातर जीम सोडायच्च नाहिच हे ठरवुन टाकलंय.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 11/09/2016 - 11:06 नवीन
शरीर, आरोग्य ही एकमेव शाश्वत संपत्ती आपल्याकडे आहे. आता तिला गोळीसारखं मानून झाडून द्यायचं आयुष्यावर आदळण्यासाठी की बंदुकीसारखं मानून आपली पकड तिच्यावर मजबूत ठेवायची, जेणेकरून येणार्‍या अडचणींचा वेध घेता येईल, हा आपापला निर्णय आहे.
+७ +७ यासाठी की ते पिळलेल्या दंडासारखे दिसतात!
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/09/2016 - 11:12 नवीन
अता मात्र चाललेच पाहिजे प्रत्यक्षात.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 11/09/2016 - 11:16 नवीन
छान लिहिलंय. नेमकं आणि मुद्देसुद.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 11/09/2016 - 11:33 नवीन
+१ नेमक लिहिलय!
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Wed, 11/09/2016 - 12:27 नवीन
सहमत .... हल्ली व्यायामाचा संबंध फक्त वजन कमी कारण्याची जोडतात तेंव्हा खरंच वाईट वाटते..
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Wed, 11/09/2016 - 12:56 नवीन
मस्त लिहिलंय. त्यामुळेच वजन अगदी नियंत्रणात असूनदेखील मी लहानपणापासूनच नियमित व्यायाम करत आलोय. त्यात बरेच फायदे असतात...जे दिसत नाही पण जाणवतात मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 11/09/2016 - 13:10 नवीन
छान लिहीलंयत. कोणाचा नाही चालू राहिला तरी आपल्या हेल्थ फ्रीकांचा व्यायाम उत्तरोत्तर चालू राहो हीच प्रार्थना. ;)
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Wed, 11/09/2016 - 14:48 नवीन
भारी लिहिलंय वेल्ला भटा .. व्यायामाची धर -सोड वृत्ती अतिशय घटक आहे (तुला पण लागू आहे हं :) ) योग्य व्यायाम + योग्य आहार + योग्य राहणीमान हि निरोगी आयुष्याची खरी गुरु-किल्ली आहे :)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 11/09/2016 - 18:02 नवीन
उत्तम लेख. व्यायाम म्हणजे काय हे जर नीट लक्षात घेतले, तर त्यासाठी सुरुवात म्हणून अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. व्यायाम म्हणजे जाणीवपूर्वक केली जाणारी अशी शारीरिक हालचाल (वा हालचाली) जिच्यातून रोजचे प्रापंचिक व्यवहार करताना जेवढा ताण स्नायुंवर/शरीरावर पडत असतो, त्यापेक्षा थोडा जास्त ताण मुद्दाम देण्यातून (नवीन, जास्त कठीण आव्हान निर्माण करण्यातून) विविध शरीरावयवांची शक्ती/क्षमता वाढीस लागून चयापचय (अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर होणे) जास्त परिणामकारकरित्या घडून येते. जास्तीची ऊर्जा मिळत राहण्याने शरीरात नवीन पेशी तयार होणे आणि विषारी घटकांचे नियंत्रण यांना हातभार लागून संपूर्ण जीवनावर त्याचे शुभ परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ, सोफ्यावर आरामात बसणे हा व्यायाम नाही, पण पाठ सरळ ठेऊन ताठ बसण्यात व्यायाम घडून येत असतो. सामान्य श्वासोच्छ्वास हा व्यायाम नाही परंतु साधे दीर्घ श्वसन किंवा कपालभाति इत्यादी नियंत्रित श्वसन हा व्यायाम होय. (याच न्यायाने 'जप' हा मानसिक व्यायाम होय, असे म्हणता येईल) वॉशिंग मशीन इत्यादी साधने घरात असूनही मुद्दाम हाताने कपडे धुताना वाकणे, कपडे पिळणे, झटकणे, हात उंच करून वाळत टाकणे, यातून व्यायाम होऊ शकतो. लिफ्ट ऐवजी जिने चढणे हा उत्तम व्यायाम आहे. ऑफिसमधे बसल्या बसल्या पाय सरळ करणे/गुडघ्यातून वाकवणे, तळपाय चक्राकार फिरवणे, मान फिरवणे, खांदे फिरवणे-पुढे मागे करणे, पोट आत-बाहेर करणे, दूर अंतरावरील वस्तुंवर डोळे फोकस करणे, हाता-पायांच्या बोटांची उघडझाप करणे, मनगटे वळवणे, पाठ मागे-पुढे, डावी-उजवीकडे झुकवणे, वाकून बुटांचे बंद बांधणे, अश्या हालचालीतून व्यायाम केला जाऊ शकतो. एवढे केले तरी खूप चांगले परिणाम दिसून येतात. हे सर्व "जाणीवपूर्वक" करणे हा भाग महत्वाचा आहे. घरी असताना बसून राहण्याऐवजी सर्व स्नायु आणि सांधे यांची काहीतरी हालचाल करत रहाणे हे तर प्रत्येकाला करता येण्यासारखे आहे. हे सुरू केले की आपोआपच शरीरात चपलता निर्माण होऊन वेळेच्या उपलब्धतेप्रप्रमाणे अन्य व्यायाम करण्यास उत्साह वाटेल. मी मागे 'शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?' या लेखात लिहील्यप्रंमाणे जास्तीचे वजन, सुटलेले पोट, मूळव्याध, फिस्टुला यातून मुक्ती मिळवली, त्यानंतर हलका व्यायाम, सायकलिंग तसेच दिवसातून एकदा तरी ताजे जूस, स्मूदी इ. पीणे चालू ठेवले आहे, ब्रेड वगैरे मैद्याचे पदार्थ वर्ज्य, गव्हाच्या पोळी ऐवजी भाकरी, थालीपीठ..इ.मुळे वजन आणि सर्व काही ठीक आहे.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Wed, 11/09/2016 - 22:24 नवीन
स्वतःपुरते बोलायचे झाले तर, जेव्हा मी काही वर्षांपूर्वी सुरुवात केली तेव्हा सर्वात मोठा अडथळा "आळस" हाच होता - जसे रविवारी पहाटे थंडीत पळायला उठणे (म्हणजे अक्षरशः उबदार पांघरूणातून बाहेर येणे) हीच एक प्रचंड मोठी अचिव्ह्मेंट होती - स्वतःच्या मनाशी केलेला लढाच म्हणाना. आळसाशी, अजूनही प्रत्येक वेळा व्यायाम करायच्या आधी सामना करायला लागतोच पण हल्ली तो सामना लुटुपुटीचा असतो. शिवाय, मी वर्कआउट कधीतरी (म्हणजे वर्षातून एखाद-दोन वेळा) चक्क बुडवतो पण आताशा मला चांगलंच ठावुक असते की त्या दांड्या मारण्याने माझा व्यायाम थांबणार नाहीच - उलट एखादी सुट्टी घेतल्यावर पुढच्या वेळेस दुप्प्ट जोमाने व्यायाम होईल. लेखात सांगितल्या प्रमाणे व्यायामाला सुरुवात करण्यासाठी "ट्रिगर" काहीही असो पण तो व्यायाम कायम चालू ठेवण्यासाठी सातत्य, पुरेसे आव्हान (progressive overload) आणि (वैविध्यातून आलेली) शरीराची सर्वांगीण प्रगती ही त्रिसूत्री अत्यंत महत्वाची आहे. अर्थात ह्या दृष्टीकोनात बदल होण्यासाठी मला एखादे वर्ष लागले. आणि त्या सुरुवातीच्या वर्षात ३ मुख्य गोष्टी मला अतिशय उपयोगी पडल्या - त्या चढत्या क्रमाने खाली देतो आहे. कदाचित इतरांना त्याचा फायदा होईल १. एखादे लक्ष ठेवा - हे लक्ष कसे असावे तर अ. लक्षपूर्तीसाठी ठरवलेली तारीख, वार आणि वेळ असावी. ब. लक्ष साधण्यायोग्य असावे - म्हणजे आयुष्यात कधी १ मैल सलग चालायची सवय नसताना, पुढच्या २ महिन्यात मॅरॅथॉन धावीन असे ठरवणे म्हणजे वेडेपणा आहे कारण अशाने लक्ष तर साधणार नाहीच पण वर निराशा पोटी येईल क. लक्ष पुरेसे आव्हानात्मक असावे - म्हणजे तुम्हाला ते साधायला जाणीवपूर्वक आणि सलग कष्ट करावे लागतील. उदा तुमच्या शहरातील जवळच्या ५ किमी/१०-किमी/हाफ मॅरेथॉन इ. शर्यतीसाठी नोंदणी करणे हे उत्तम लक्ष होय. २. लक्षपूर्ती साठी एक वेळापत्रक बनवा (आणि ते आवर्जून पाळा). त्याहून मह्त्वाचे म्हणजे या वेळापत्रकाची आखणी स्वतःच्या/कुटुंबाच्या दैनंदिन जबाददार्‍यांचा विचार करूनच करा ज्याने व्यायामच्या वेळांमधे पुरेश्या पर्यायी वेळांचा अंतर्भाव असेल (flexibility in schedule) म्हणजे काही कारणामुळे एखाद्या दिवशी व्यायाम जमला नाही तर त्या खाड्याची परिणीती पूर्ण वेळापत्रक बारगळण्यात होणार नाही - काय आहे, की मला असं जाणवलं की सुरुवातीच्या दिवसांतला उत्साह ओसरला की व्यायामात खंड पडायाला फुसुकले कारणसुध्दा पुरते. विचार पूर्वक केलेले वेळापत्रक (आणि रग्गड इच्छा शक्ती) तेव्हा मदतीला येते. ३. उत्साहाच्या भरात (आरंभशूर) लक्षपूर्तीसाठी सुरू केलेला व्यायाम पुढे जिवन शैली म्हणून स्विकारा !! असो.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Wed, 11/09/2016 - 22:50 नवीन
व्यायाम कायम ठेवण्याबद्दल माझं मत वरती मांडलेच आहे. पण आयुष्यात मोठेपणी व्यायाम गंडायला शालेय जीवनात असलेला अभ्यास/शिकवण्यांवर भर - आणि पर्यायाने मैदानी खेळांवरून उडालेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय पालकांचा फोकस बर्‍याच अंशी कारणीभूत आहे असं मला वाटतं. अर्थात त्यामागे - "खो-खो खेळून/मंल्लखांब करून तू मोठेपणी पोट भरु शकणार नाहीस त्यामुळे तू खेळायला जायच्या ऐवजी क्लासला जा आणि इंजिनअर/डॉक्टर हो" हा विचार असतोच. < हिरवा मोड ऑन> पाश्च्यात्य देशांमधे कॉलेजीय शिक्षणाशी व्यावसायिक खेलजगताची घट्ट जोडलेली नाळ बर्‍यांच अंशी तेथील पालंकाना त्यांच्या मुलांना व्यायाम्/खेळांमधे प्राविण्य मिळवण्यासाठी मैदानात ढकलण्यासाठी भाग पाडते. त्यातून व्यायामाची आवड लागू शकते (शकते!!) पाशाच्यात्त देशात असलेला "लाईफ स्टाईल डिसिजेस" चा धुमाकूळ वरील विधानातील विरोधाभास दाखवतो पण तो मुद्दा इथे अप्रस्तूत आहे त्यामुळे नम्र पणे फाट्यावर मारण्यात आला आहे ;-))
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 11/10/2016 - 07:51 नवीन
संपूर्ण सहमती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
र
रुपी Wed, 11/09/2016 - 23:07 नवीन
लेख आवडला.. छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 11/10/2016 - 00:59 नवीन
मस्त लिहिलंय ...
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 11/10/2016 - 06:17 नवीन
डोळे उघडवणारा लेख! अगदी नेमका.
  • Log in or register to post comments
प
पलाश गुरुवार, 11/10/2016 - 07:15 नवीन
आरसा दाखवणारा लेख! उत्तम लेख. बरेच प्रतिसाद सुद्धा मार्गदर्शक आहेत.
  • Log in or register to post comments
स
सई कोडोलीकर गुरुवार, 11/10/2016 - 09:04 नवीन
पटण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. ती चीट डेची गंमत वगळता हे आपलंच लिहिलंय असं वाटत होतं वाचताना.
  • Log in or register to post comments
A
amit१२३ गुरुवार, 11/10/2016 - 11:41 नवीन
व्यायामाच्या बाबतीत मी लहानपणापासूनच खूप हौशी आहे. सातवी आठवी ला असल्यापासून सिक्स पॅक माहित असल्यामुळे ते मिळवण्याचे एक स्वप्न मी उराशी बाळगले आणि व्यायाम सुरु केला. दर दोन दिवसांनी मी माझी बॉडी आरशासमोर उभे राहून बघत असे ते आजपर्यंत तेच रुटीन चालू आहे. एवढ्या दिवसांपासून व्यायाम करतोय म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल कि मस्त ८ पॅक झाले असतील ...डोंबल माझं ..एवढा व्यायाम करतो पण शरीराला फक्त थोडासा आकार आलाय पॅक बिक काही नाही आलं. असं म्हणतात कि व्यायामाबरोबर तसा खुराक म्हणजेच डाएट असायला हवं म्हणजे ३०% व्यायाम आणि ७०% डाएट ..इकडे मेस च्या चपात्यांवर कसलं डाएट करतोय मी. त्यामुळे लहानपणापासून आहे असाच आहे नाही म्हणायला १ -२ मित्र बोलतात जरा तब्येत झालीये वाटत आणि घरी आल्यावर आई बोलते वाळत चाललंय गं माझं लेकरू ..असो जिम बीम च्या नादाला आपण कधी लागलीच नाही. जिम ची बॉडी पावडर खाऊन असते आणि ती जिम सोडल्यावर उतरते पण ह्याच्यावर आमचा विश्वास. त्यामुळे घरच्या घरी जे व्यायाम प्रकार जमतील तेच नित्यनेमाने करतो. आता एवढ्या वर्षाच्या व्यायामाने शरीरात एकवेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि अंगात खुमखुमी आल्यासारखी वाटते. त्याचीच परिणीती (चोप्रा नव्हे ) म्हणून ट्रेन मध्ये एकाचे नाक तोडले आणि स्वतःचे ओठ फोडून घेतले. तरीपण मला आजही हेच वाटते कि व्यायाम करणे हे अति उत्तम च आहे. एवढे बोलून मी माझे लिखाण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 11/10/2016 - 14:27 नवीन
समर्थांच्या मूर्खाम्च्या लक्षणासारखे सगळी लक्षणे मला लागु पडताहेत असे वाटतेय
  • Log in or register to post comments
N
nanaba Fri, 11/11/2016 - 04:25 नवीन
हा विचार योग्यच. पण वजन धोकादायक पातळीवर असेल आणि कमी करायचे असेल तर डायेटला खरोखर पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 11/11/2016 - 04:51 नवीन
चौफेर वेध घेणारा वास्तवदर्शी लेख आवडला. केवळ..
लोकं व्यायाम, आहार, आराम यांची आपापली तर्कहीन त्रिसूत्री मांडताना बघितली की फार उद्विग्न व्हायला होतं.
प्रत्येकाचं शरीर, आचार विचार राहणीमान सगळं वेगळं आणि त्याला काय लागू पडेल हे सांगणं तितकच अवघड. त्यामुळे यात कुणी एक एक्सपर्ट आहे किंवा एकच फॉर्म्युला/तर्क सगळ्यांना चालतो असे नाहीच. त्यामुळे उद्विग्न वगैरे व्हायची गरज नाही. :) तसेच, निरोगी शरीर मिळवण्याआधी स्थिर आणि निरोगी मन असणे आवश्यक असते असे मला वाटते. चित्त थार्‍यावर असलं की शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपोआपच प्रेरणा मिळते.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 11/11/2016 - 05:46 नवीन
एकच फॉर्म्युला/तर्क सगळ्यांना चालतो असे नाहीच. त्यामुळे उद्विग्न वगैरे व्हायची गरज नाही. :)
सहमत; तसं म्हटलंयही मी पुढे लेखात. पण काहीतरी विचार करून, अभ्यास करून, योग्य ते समजून घेऊन मग कुणी विधानं केली तर ठीक. आपल्याला हवं तेच बरोबर आणि नको ते पच्याक, असं म्हणतान दिसलं कुणी की ते उद्विग्न वगैरे होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा