पुरूष इतर पुरूषांची बरोबरी का करतात?????
पुरूष इतर पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की इतर प्रसिद्ध, रफटफ, रगेल, रंगेल पुरुष ज्या गोष्टी करतात त्या केल्या की सामान्य पुरूषांना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. देव आनंद केसांचा कोंबडा ठेवायचा, मग करा त्याचे अनुकरण. अमिताभ मधोमध भांग पाडायचा, मग पाडा मधोमध भांग. कोहली बेकहॅमसारखे केस ठेवायचा, मग करा कोहलीचे अनुकरण. रितेश दाढी वाढवून केसांचा बुचडा बांधतो, मग करा तसे. प्रसिद्ध पुरूषांच्या केसांच्या शैलीची नक्कल करून आपल्याला त्या पुरुषांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' इतर पुरूष देत असतात. अरे कोहलीसारखा एखादा शॉट मारून दाखवा किंवा अमिताभ सारखा अभिनय करून दाखवा आणि मग ठेवा त्यांच्यासारखे केस. पण नाही.
२. राजेश खन्ना गुरूशर्ट वापरायचा. लगेच इतर पुरूष गुरूशर्ट वापरायला लागले. मोदी जाकिट वापरतात. लगेच इतर पुरूष अगदी तसेच जाकिट घालायला लागले. लोकमान्य टिळक पुणेरी पगडी वापरायचे. लगेच इतर पुरूष तशीच पगडी आणून आपले फोटो काढून फेसबुक, कायअप्पावर टाकायला लागले. पूर्वी वणकुद्रे, एम जी रामचंद्रन इ. रसिक पुरूष पांढर्या पिसांची गुलछबू टोपी वापरायचे. आता तोंडावरील माशी सुद्धा न हलणारे पापभीरू सदाशिवपेठी लुक असलेले पुरूष सुद्धा लगेच लग्नसमारंभात तशीच टोपी घालून आपण गुलछबू असल्याचा फील द्यायला लागले. अजिबात शोभत नसले तरी बेंगरूळ कपडे घालून फिरणारे पुरूष सर्रास दिसतात. गुरूशर्ट रसिक पुरूषाला रोमँटिक लुक देतो, हातात गजरे घालून मुजरा बघायला जाणार्या छंदीफंदी पुरूषांना पांढर्या पिसांची गुलछबू टोपी रगेल आणि रंगेल लुक देते, पगडी गंभीर चेहर्याच्या विद्वानांनाच चांगली दिसते, मोदी जाकिट फक्त मोदींनाचा शोभून दिसते. तसा लुक इतर पुरूषांना क्वचितच कॅरी करता येतो. पण नाही, इतर पुरुष करतात, तर आम्हीही करणार हा अट्टाहास कशासाठी?
३. काही पुरुष मोटारसायकल चालवतात, ती त्यांना जमतेही. पण आपली प्रकृती तोळामासा असताना, बाजारत गिअरलेस गाड्यांची फौज उभी असताना या किरकोळ शरीरयष्टीच्या पुरूषांनाही मोटार सायकल चालवायची असते. भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही काडीपैलवान तर बुलेटही चालवतात आणि आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात. यांना बुलेट स्टँडवर लावता येत नाही, लावली असेल तर काढता येत नाही, बुलेटची किक मारता येत नाही. गुळाच्या ढेपेवर बसलेला मुंगळा जसा दिसतो, तसे हे काडीपैलवान बुलेटवर बसल्यावर दिसतात.
४. एसयुव्ही फोरव्हिलर चालवणे हा खास तगड्या, शरीरयष्टीने भक्कम पुरुषांचा प्रांत. पण घुसघोरी करणार नाही ते काडीपैलवान कसले. आख्ख्या कुटुंबाला बकरा बनवून एसयुव्हीमध्ये शेजारी बसवले जाते आणि इतर वेळी मल्टीटास्किंग असणारे 'सदाशिव पेठ श्री' मात्र इथे गडबडतात. ॲक्सलेटर द्या किंवा ब्रेक द्या असे सांगितले की तिथपर्यंत यांचे आखूड पाय पोहोचतच नाहीत आणि शेवटी बसल्या सीटवरून उभे राहून ते अॅक्सलेटर किंवा ब्रेक दाबायचा प्रयत्न करतात. त्यातून पट्टा लावला असला तर उभे राहताना यांची जाम पंचाईत होते आणि वर यांना ऑटोमॅटीक किंवा लहान कार नको असते. यांनी खरं तर नॅनो किंवा फार तर मारूती ८०० चालवावी. पण यांना हव्या असतात एक्सप्लोरर, सुमो, टवेरा इ. टंगाळ्या आणि जंक्शन गाड्या. मग चढावर गाडी थांबल्यावर यांना हाफ क्लच द्यायचे सुचत नाही. मग गाडी मागे जायला लागली की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात. अरे काय वेडेपणा आहे हा?
५. दारु, मटण, नळी फोडणे या खास मर्दानी पुरुषांसाठी बनवलेल्या गोष्टी आहेत, पण आजकाल इतर सोवळ्या, तुपट चेहर्याच्या सदाशिवपेठी पुरूषांनी त्यात प्राविण्य मिळवले आहे, इतके की नुसत्या दारूच्या वासानेच यांना चढते आणि मटणाचा चमचाभर रस्सा खाऊनच यांचे पोट भरते. नळीबिळी तर लांबच राहिली.
तर सामान्य पुरूषांनो, जरुर इतर पुरुषांना कॉपी करा, त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका. कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.
तर सामान्य पुरूषांनो, इतर पुरुषांना कॉपी करणे म्हणजे आपण त्यांच्यासारखेच प्रसिद्ध, रफटफ, रगेल आणि रंगेल झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका. तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा. रफटफ, रगेल आणि रंगेल पुरुषांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या, after all not all men are macho and celebrities.
💬 प्रतिसाद
(10)
प
पाटीलभाऊ
Mon, 11/21/2016 - 10:36
नवीन
हे टोमणे खासकरून सदाशिव पेठवल्यांसाठी आहेत वाटत :P
- Log in or register to post comments
J
jp_pankaj
Mon, 11/21/2016 - 10:53
नवीन
माई मोड-काहिही हं श्री.!
आमचे हे कधी कुणाची बरोबर करतात का ? अगदी तुझी पण नाही.
बाई ग्ग..! तुमच्या दोघांची जुगलबंदी पाहण्यासाठी मी प्राण कुडीत ठेवुन आहे."मोड ऑफ.
आमिनामाश्रीचावसं
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Mon, 11/21/2016 - 11:03
नवीन
एक नंबर विडंबन श्रीगुरुजी,जमतेय ,लिहित रहा.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 11/21/2016 - 11:03
नवीन
सदाशिव पेठ सदाशिव पेठ बर्याचदा वाचलं.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Mon, 11/21/2016 - 11:08
नवीन
..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 11/21/2016 - 13:25
नवीन
खि खि खि
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 11/21/2016 - 15:06
नवीन
बाबो.. जब्री जमलंय
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 11/22/2016 - 10:03
नवीन
एकदम सुपर फास्ट ट्रेन वाटली...!!
एक नजरेत वाचून झाले...मस्त
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 11/23/2016 - 16:24
नवीन
इतक्या वेळा सपे वाचल आणि पुन्हा सपेचं मेटल सिद्ध झालं..
आमच नाव घेतल्याशिवाय चार वाचक मिळणं पण औघड आहे.
असो.
डुबते को तिनके का
- Log in or register to post comments
ए
एमी
Sun, 11/27/2016 - 06:30
नवीन
मस्त! झक्कास जमलंय :-D
- Log in or register to post comments