Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पेरणी...झाडांची!

इ
इरसाल कार्टं
Sun, 05/14/2017 - 12:59
🗣 66 प्रतिसाद
होय, पेरणीबद्दलच बोलतोय मी. पण झाडांच्या. कसंय ना, आता पावसाळा आला म्हणजे सगळेजण झाडे लावा झाडे लावा म्हणत बोंबलातील. मोठेमोठे बॅनरही लागतील ज्यात नेते मंडळी झाडांपेक्षा मोठी भासतील. पण दरवर्षी 'लावलेल्या' या झाडांचे पुढे काय होते? बऱ्याचदा वृक्षारोपण करायला म्हणून जी झाडे वाटली जातात त्यात आपल्या आसपास वाढणारी(म्हणजे ज्यांची आपण काळजी घेतो आणि वाढवतो) अशी झाडे वाटली किंवा लावली जातात. हि झाडे शाळा परिसर/ गावाच्या परिसरात लावली तरीही त्यांची काळजी घेतलीच जाईल याची शाश्वती नसते आणि ती सुकून/मरून जातात. आणि पुन्हा पुढल्या वर्षी येरे माझ्या मागल्या म्हणत जुन्याच झाडांच्या जागी नवी झाडे लावली जातात सुकून जाण्यासाठी. या समस्येवर मी तीन चार वर्षे विचार करतोय पण काय करावे हे कळत नव्हते, अडचण एकच होती कि पावसाळा संपल्यानंतर झाडांची काळजी कशी घ्यावी? त्यातही इकडे ग्रामीण भागात आणखी समस्या असतात, शेळ्या, बकऱ्या आणि गुरं या रोपांना खाऊन टाकतात, कधी शेतांच्या बांधांवर लागलेल्या आगीत हि रोपं सुकून जातात तर कधी वणव्यांनी. आपण घराभोवती लावतो ती नेहमीची झाडे इथे कुचकामी ठरतात हे कळून चुकले होते. आणखी एक समस्या होती ती वहातुकीची. पिशवीत रुजवलेली रोपं जास्त दूरवर नेणे शक्य होत नाही पावसाळ्यात. जर तुम्हाला ती डोंगर पायथ्याशी किंवा माळरानावर लावायची असतील, किंवा आपल्या जिव्हाळ्याच्या गड किल्यांवर तर लावायची असतील ते खूपच कठीण होते. याला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज होती आणि या वर्षी फक्त विचार न करता काहीतरी कृती करायचे ठरवलेच. अपयश आले तरी बेहत्तर पण प्रयत्न करायचेच असे ठरवले आणि सगळ्यात आधी खालील मुद्यांचा विचार केला: १) झाडे लावायची कशी? खासकरून दुर्गम भागात. २) कुठल्या प्रकारची झाडे निवडायची? ३) जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी काय करावे? स्वात:च शोधून काढलेली उत्तरे: १) झाडे लावायची नाहीतच, ती पेरायची. झाडांची रोपे रुजवणे म्हणजे वीची मर्यादा आडवी येते, ती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लावायला हवीत. जेणेकरून किमान दिवाळीपर्यंत जमिनीतला ओलावा मिळून ती जास्तीत जास्त वाढतील आणि तग धरू शकतील. पण पावसाळ्यात रानवाटा तेवढ्या चांगल्या स्थितीत राहात नाहीत आणि प्रतिव्यक्ती जास्त झाडे नेणेही शक्य नाही. म्हणून झाडे लावायची नाहीत, पेरायची. जेणेकरून प्रतिमानशी जास्त झाडे नेता येतील. म्हणजे आपण झाडांच्या बियांना फक्त पसरण्यास मदत करायची, बाकी ती त्यांच्या नैसर्गिक इच्छाशक्तीवर वाढतील. याचा आणखी एक फायदा, वर्षभरात कधीही ट्रेकला गेलो तरी हि पेरणी करता येईल, बिया पावसाळ्यात रुजतील. २) निवडायची झाडे अशी हवीत: रानोमाळी जगू शकतील अशी रानटी. कमी पाण्यावरही जगातील अशी. शक्यतो मूळची भारतीय असलेली. वेगाने वाढणारी. बियांच्या स्वरूपात रुजवता येणारी. आणि मग भराभर मागच्या दोन तीन वर्षातील जाणीवपूर्वक केलेली निरीक्षणे नोंद केली, झटक्यात एक छोटीशी यादी तयारही झाली. ती यादी पुढीलप्रमाणे: १)कडुनिंब: थंड सावलीची अनुभूती देणारे हे झाड मी सौराष्ट्राच्या रखरखीत उन्हात बाभळीच्या जोडीला पाहिलेय मागच्या दोन वर्षांत जामनगर-द्वारकेला दिलेल्या वारंवार भेटींमध्ये. जामनगर सोडले तर ओसाड जमिनींवर मला निवडुंग, बाभळी आणि नंतर कडुनिम्बच जास्त दिसले. माझ्या धावण्याच्या सरावादरम्यानही टेकडीवर कित्येक कडुनिंबाची खोडे दिसली, वारंवार तोडली जाऊनही हार ना मानणारी. त्यामुळे याला पहिले स्थान. २) करंज: दाट पानांनी जवळजवळ वर्षभर हा रुक्ष हिरवागार असतो. कुठल्याही देखभालीची गरज अर्थातच नाही, याच्या बियाही सहज मिळतात रानात. बऱ्याचदा रस्त्याच्या कडेलाही, त्यामुळे हाही आला यादीमध्ये. ३) बहावा: दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवणारं हे अजून एक झाड. मला भावतं ते याच्या सोनेरी फुलांमुळे. एप्रिल मे महिन्याच्या गर्मीत पिवळ्या धमक फुलांची झुंबरं लेऊन हा वृक्ष असा डोलत असतो कि ऊन्हानेही गुडघे टेकवत. याच्या शेंगाही मोठ्याप्रमाणावर मिळतील म्हणून मी याच्या पेरणीचा विचार मागच्या वर्षीच पक्का केला. मी आणि बायकोने मागच्याच वर्षी वज्रेश्वरी मंदिराच्या वरच्या टेकडीवर याच्या भरपूर बिया पेरल्याही होत्या. ४)गुलमोहर अवाढव्य आकार आणि कमीत कमी निगराणी ची गरज. याचेही स्थान आढळच. आणि याच्या बहराचा महिमा तो काय वर्णावा. ५)उंबर, वड, पिंपळ डेरेदार आणि आपल्या खोडाच्या ढोलीमध्ये अनेक पक्षांना आसरा देणारे हे वृक्ष कुठेही उगवतात. मेख एवढीच कि बिया म्हणून यांची अख्खी फळेच गोळा करावी लागणार. ६) चिंच नाव घेताच आठवतो तो डेरेदार वृक्ष आणि बालपण. याच्याबद्दल काही लिहायची गरज नाहीच म्हणा. महत्वाचं म्हणजे चिंचोके दुकानातही सहज मिळून जातील. ७) आपटा दसऱ्याच्या दिवशी याच्या पानांचे महत्व आपल्याला माहित आहेच. हाही रानोमाळी सहज वाढतो. पण याच्या बिया नवरात्रीनंतर मिळतील. आता मी ज्यांना स्थानिक नावांनी ओळखतो ते वृक्ष. ८) शिंद मुळात हा खजूराचाच प्रकार, पण कमी गर असलेली आणि काहीशी तुरट लागणारी फळे येतात. पण कुठेही वाढतो म्हणून याला यादीत स्थान, पण काहीसं दुय्यम. 9)शेलटु याला प्रमाण भाषेत काय म्हणतात माहित नाही पण पसरट गोलाकार पाने, खेळायच्या गोट्यांच्या आकाराची, आत अत्यंत चिकट द्रव्य असणारी काहीशी गोड फळे असतात याची. वाढेल कुठेही. १०) हुंब या फळाची फक्त दोन झाडे आतापर्यं मी पहिली आहेत, तीही मावशीच्या गावी. बऱ्याचदा सरळसोट वाढतो आणि बऱ्यापैकी गोड आणि फळाच्या आतमध्ये लाल द्रव असतो . याच्या दुर्मिळ बिया मिळवण्याचे काम खास मावसभावाला द्यावे लागेल. ११) बिबोटी म्हणजेच बिबवे, हेही रानात जोमाने वाढतात, बिया(बिबवे) मिळणे तेवढं मुश्किल झालंय हल्ली. या यादीमध्ये खास दोन फळझाडे आहेतच, आपल्या सगळ्यांच्या आवडीची: करवंदं आणि जांभळं, यांच्या बिया तर जमवल्याही मित्राने. मीही आज सायकलिंग करताना आडवाटेला जात रस्त्यालगत असलेले उंबर, करंज, बहावा हेरून ठेवले आजच. एक दोन दिवसात पिशवी घेऊन भरून आणीन. जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी काय करता येईल या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे, वर्षभर आपण प्रवास, ट्रेक करतोच. हल्ली मी सायकलनेही रानवाटांना फिरायला लागलोय. कुठेही जाताना प्रत्येक झाडाच्या थोड्या थोड्या इया घेऊन जायच्या, वाटलं तिथे पेरायचा. निवडलेली सगळीच झाडे रानात वाढतील अशीच आहेत. जेवढी जगली-वाढली तेवढी वाढली, आपले प्रयत्न का सोडा. आणि महत्वाचे म्हणजे जांभळं, करवंदे तर आपण घरी खातो तेव्हा त्यांच्या बिया जपणे सहज शक्य आहे. या झाडांपासून फक्त फळेच नाही तर सावली, फुलांतील मध, लाकडं आणि काहीच नाही तरी किमान शुद्ध हवा तरी मिळेलच. त्यात पुन्हा विशेष काळजीची हमी ना घेता केलेल्या वृक्षारोपणाच्या मानाने हि झाडे जगण्याची शक्यताही जवळ जवळ तेवढीच असेल असे मला तरी वाटते. याउलट बिया कमी जागेत आणि कमी वजनात जास्त प्रमाणात पसरवता येतील. पारंपरिक पद्धतीने झाडांच्या बियांना पसरवणारे पक्षी प्राणी आपल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आले त्यामुळे आपल्या स्वात:साठी तरी ही जबाबदारी आपल्याला उचलावी लागणारच ना? बऱ्याचदा ट्रेकिंग करताना उघडे बोडके भकास डोंगर बघताना काळजात चर्रर्र होते, अपराधीपणा वाटतो तो थोडातरी कमी होईल. आता तुम्हाला आधीच असलेल्या माहितीची उजळणी करण्याचे कारण हे की तुम्हाला माहित असलेल्या इतर झाडांचा या यादीत समावेश व्हावा तसेच कोणाच्या मनात इतर काही आयड्याच्या कल्पना असतील तर त्याही कळाव्यात. आपल्यापैकी कोणी असा प्रकल्प राबवला असेल तर अनुभवांचे स्वागतच आहे आणि सूचनांचेही.

प्रतिक्रिया द्या
23166 वाचन

💬 प्रतिसाद (66)
स
सस्नेह Tue, 05/16/2017 - 10:04 नवीन
हापिसच्या दारात ओळीने सात आठ बुचाची झाडं आहेत. त्याचं एक पिल्लू काल दत्तक घेतलय. आता जूनात त्याला घरासमोर रस्त्यावर जमिनीत पेरणार.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/16/2017 - 12:35 नवीन
भारी धागा आहे .... ह्याच धर्तीवर बाल्कनीतल्या इवल्याश्या बागेत कोणती कोणती रोपे लावावीत ह्यावरही चर्चा व्हावी . मी माझ्या बाल्कनीत सध्या तरी तुळस , मोगरा आणि कडुनिंबाची रोपे लावली आहेत . मधुमालतीचे वेल लावावेत काय असा सध्या विचार करत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/16/2017 - 12:44 नवीन
आणखी एक म्हणजे ह्या धाग्यावरुन समर्थांन्नी लिहिलेले बागप्रकरण आठवले ... प्रसंग निघाला स्वभावें । बागेमध्ये काय लावावे । म्हणूनि घेतली नावे । काही एक ॥ संपुर्ण प्रकरण येथे उपलब्ध आहे : http://www.maayboli.com/node/49586
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अद्द्या Tue, 05/16/2017 - 13:50 नवीन
सुंदर उपक्रम .. दार वर्षी तो फक्त फोटोसाठी रोपे " लावण्याचा " कार्यक्रम करण्यापेक्षा हे खूप चांगलं .. मी अधे मध्ये जांभूळ करवंद आवळे चिंच खाताना बिया थोड्या दार टाकण्याची सवय लावून घेतली होती मध्ये.. आता पुन्हा सुरु कारेन.. आणि या वेळी बिया मुद्दाम जमवून त्या वापरेन .. उंबराची झाडे हि आहेत इथे जवळपास.. त्यांची फळे पण गोळा करायला सुरुवात करतो .. तेवढाच खारीचा वाटा :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Tue, 05/16/2017 - 16:23 नवीन
आणि हो, हा धागा इतरांनाही पाठवायला विसरू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
ए
एस Tue, 05/16/2017 - 17:16 नवीन
नांदुरकीचे झाडसुद्धा वडासारखे पारंब्या असलेले असते. हेसुद्धा लावता येईल.
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 05/16/2017 - 20:41 नवीन
छान धागा.. उत्तम उपक्रम.
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Wed, 05/17/2017 - 01:45 नवीन
लोक सकाळी गावाबाहेर फिरायला जातात तेव्हा छोट्या पाण्याच्या बाटल्या भरुन सोबत नेतात आणि रस्त्याकडेच्या पालिकेने लावलेल्या झाडांना पाणी घालतात. झाडं चांगली तगली आहेत आणि हा उपक्रम गेली दोन तीन वर्ष सुरु आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरिंजय Wed, 05/17/2017 - 16:38 नवीन
खरोखर कौतुकास्पद काम आहे हे. खरी वृक्ष जोपासना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
इ
इरसाल कार्टं Fri, 05/19/2017 - 16:01 नवीन
Image removed. आपल्या एका मिपाकराने हे व्हाट्सअपले होते, इथे देतो सगळ्यांसाठी.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 05/19/2017 - 21:03 नवीन
वा.. फारच उपयुक्त. सानझरीचे सर्व प्रतिसादही फार माहितीपूर्ण आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं
प
प्रमोद देर्देकर Sat, 05/20/2017 - 08:03 नवीन
वा खूप उपयुक्त माहिती, अजुन येवू द्या.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 05/20/2017 - 19:51 नवीन
भटकी भिंगरी यांनी ही pdf पाठवली आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 06/27/2017 - 12:27 नवीन
माहितीपूर्ण. वाचनखुण साठवतो.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 07/11/2017 - 13:56 नवीन
डोन्गरी आवळ्याच झाड पण चान्गल असत लावायला ... हिरडा, बेहडा, चिन्च
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Wed, 07/12/2017 - 12:26 नवीन
मागच्या वर्षी पेरलेल्या बहाव्याच्या बियांतून एकही रोप निघालेसे वाटत नाही. दोन वेलाजवून आलो पाहणी करून पण बहाव्याचे एकही रोप उगवलेले नाही. यावेळी बहाव्याचीपेरणीनं करता नर्सरी बॅग्स मध्ये रुजवण्याचाही प्रयत्न केला पण एकही बी रुजलं नाही. याउलट जांभळं, आंब्याच्या बिया जोमाने उगवल्या. बाहव्यासाठी काय करावं कळेना झालंय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा