Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जेनेरिक औषधे

स
सुबोध खरे
गुरुवार, 05/18/2017 - 09:47
🗣 70 प्रतिसाद
जेनेरिक औषधे -- हा एक अत्यंत विशाल असा महासागर असून यात जितक्या डुबक्या माराल तितकी रत्ने निघतील. पहिली गोष्ट म्हणजे जेनेरिक औषध म्हणजे काय. उदा पार्क डेव्हिस या कंपनीने क्लोरोमायसेटीन हे प्रतिजैविक शोधून काढले १९४७. टायफॉईड किंवा विषमज्वर यासाठी रामबाण असलेले हे पहिले औषध. शोध लावणाऱ्या कंपनिला तिच्या शोध लावण्याच्या प्रक्रियेसाठी आलेला खर्च भरून निघण्यासाठी पेटंट दिले जाते. या पेटंट द्वारे 20 वर्षेपर्यंत दुसरा कोणीही ते औषध बनवू/ विकू शकत नाही. ती कंपनी आपली मक्तेदारी वापरून औषध विक्री करू शकेल, ज्याद्वारे ती आपला नफा वसूल करू शकेल आणि पुढच्या अधिक संशीधनाला पैसा उपलब्ध होऊ शकेल हा पेटंट कायद्याचा मूळ हेतू. हे औषध १९४९ साली भारतात उपलब्ध झाले तेंव्हा एका (२५० मिग्रॅम) कॅप्सूल ची किंमत होती अडीच रुपये. दिवसाला सहा कॅप्सूल द्यायला लागत. म्हणजे रोजचा खर्च १५ रुपये. तेंव्हा सोन्याचा भाव होता ८० रुपये १० ग्रॅमला. आज क्लोरोमायसेटीनची किंमत आहे तीन रुपये कॅप्सूलला. विचार करा त्या कंपनीने किती नफा केला असेल ते.आमचे वडील सांगतात कि आमच्या आजोबाना आणि आमच्या काकांना टायफॉईड झाला आणि तो उलटला (relapse) त्यामुळे अगोदरच कुळकायद्यात जमीन गेलेली होती वर या उपचारांचा खर्च असल्यामुळे घरातील सर्वच्या सर्व सोने विकायला लागले. आमच्या कुटुंबाची परिस्थिती संपन्नावस्थेतून विपन्नावस्थेत गेली. पंधरा वर्षांनी जेंव्हा औषध पेटंट मुक्त होते तेंव्हा ते कोणतीही कंपनी बनवू शकते. आणि मग स्पर्धा सुरु होते. मग जो स्वस्तात ते औषध बनवू/ विकू शकतो तो या स्पर्धेत टिकतो. मग चांगल्या कंपन्या ज्यांच्याकडे ते औषध बनवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असते त्या ते औषध बनवण्यास सुरुवात करतात. अशी औषध बनवण्याची प्रक्रिया झाल्यावर औषधाचा दर्जा कसा असावा याची इत्यंभूत माहिती फार्माकोपिया नावाच्या पुस्तकात दिलेली असते. उदा IP किंवा INDIAN PHARMACOPOEA. हे पुस्तक भारत सरकार प्रसिद्ध करते. किंवा USP ( अमेरिकेचे) किंवा BP (ब्रिटनचे). प्रत्येक औषधात एका ग्राम मध्ये प्रत्यक्ष औषध कमीतकमी किती टक्के(उदा. ९९. ८७%), क्लोराईड किती(०.००१५%) , सोडियम किती, (ASH )राख किती इ. स्पष्टपणे दिलेले असते. असे घाऊक औषध विकणाऱ्या कंपन्या आपले औषध कोणत्या मानक पुस्तकाप्रमाणे आहे ते त्यावर लिहितात उदा. PARACETAMOL IP. किंवा IBRUPROFEN USP. (हे थोडेसे EURO ५ किंवा BHARAT ४ सारखेच आहे). एक लक्षात घ्या सर्वच औषध बनवणाऱ्या कंपन्या ती बाजारात विकतात असे नाही तर घाऊक प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्यांना विकतात.(आजकाल अशी घाऊक औषधे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वस्तात तयार होतात आणि ती जगभर निर्यात केली जातात.) घाऊक औषध विक्रेते मग ती औषधे मोठ्या कम्पन्याना प्रथम विकतात. कारण त्यांची ऑर्डर मोठी असते पण त्यांचे दर्जाचे निकष काटेकोर असतात. त्यांच्या दर्जात थोडी कमतरता आल्यामुळे नाकारलेली औषधाची बॅच मग ते छोट्या औषध उत्पादकांना विकतात. अर्थात हे फार गंभीर असेलच असे नाही. असे घाऊक औषध( BULK DRUG) विकत घेऊन चांगल्या कंपन्या आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष चाचणी करून खात्री करून घेतात आणि ते औषध वापरून तुम्हाला मिळणाऱ्या गोळ्या सिरप इ औषधीत रूपांतर करतात. चांगल्या कंपन्या मग अशा औषधांना स्वतःचे एक नाव (ब्रँड नेम) देऊन ते बाजारात उतरवतात. उदा. क्रोसिन. यात पॅरासिटामॉल हे मूळ औषध असते. क्रोसिनच्या गोळीची किंमत साधारण १ रुपयाला एक आहे. त्याच ऐवजी सिप्ला या कंपनीचे PARACIP हे ७० पैशाला मिळते. इतर कोणती कंपनी तेच औषध पॅरासिटॅमॉल म्हणून बाजारात जेनेरिक म्हणून २० पैशात विकते. जोवर औषधाच्या दर्जाची खात्री देता येते तोवर जेनेरिक औषध देणे हे नक्की चांगले आहे. काही कंपन्या स्वतः आपले ब्रँड आणि जेनेरिक अशी दोन्ही औषधे बाजारात आणतात. उदा रॉक्सीडं नावाचे प्रतिजैविक(ANTIBIOTIC) अलेम्बिक या कंपनीचे औषध ७२ रुपयाला १० गोळ्या मिळत असे आणि तेच औषध जेनेरीक म्हणून ४० रुपये MRP चे मिळत असे. हे औषध ४० रुपयाला रुग्णांना मूळ किमतीत उपलब्ध करून द्यावे म्हणून द्यावे आम्ही विकत आणून ठेवले होते. पण रुग्णांना वाटत असे कि यात डॉक्टरांचा फायदा आहे त्यामुळे ते ७२ रुपये देऊन केमिस्ट कडून औषध घेणे पसंत करीत. यामुळे आम्ही नंतर असा रुग्णांचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न सोडून दिला. असो. या रणधुमाळीत मग हवशे नवशे गवशे सगळेच सामील होतात. मग नकली औषधे निर्माण होतात आणि हातोहात खपवली जातात. सरकारी रुग्णालयात असणारे खरेदी विभागाचे साटेलोटे पासून खाजगी औषध विक्रेत्या बरोबर बनवलेले लागेबांधे. यात म्हणाल तेथे आणि म्हणाल त्या किमतीची औषधे उपलब्ध असतात. भारतात मिळणारी २५ % औषधे नकली आहेत. म्हणजे चारात एका रुग्णाला मिळणारी औषधे नकली आहेत. हा बाजार २५००० कोटी ( होय पंचवीस हजार कोटी) रुपयांचा आहे. http://www.downtoearth.org.in/news/fake-drugs-constitute-25-of-domestic-medicines-market-in-india-assocham-45393 हि २५ % नकली औषधे सोडून देऊ. बाकी ७५% औषधे नकली नाहीत हे मान्य. परंतु त्या औषधांचा दर्जा जागतिक दर्जाइतका आहे का? हा एक मोठा गहन प्रश्न आहे. अमेरिकेतील FDA हे अत्यंत कडक असून तेथे नकली औषध बनवणार्यांना आणि विकणार्यांना जबर दंड आणि शिक्षा आहे. त्यामुळे तेथे जेनेरिक औषधे देण्यास डॉक्टरना किंतु येत नाही. आपले FDA काय आणि किती कार्यक्षम आणि प्रामाणिक आहे याबद्दल न बोलणे बरे. साधे डोकेदुखीवर एस्प्रो (ASPRO) घ्या. हे ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिन असलेले औषध मायक्रोनाईजड कणाचे बनलेले असते. त्यामुळे तो गोळी आपल्या पोटात जाताच ताबडतोब म्हणजे १५ सेकंदात विरघळते. आणि याचा पूर्ण परिणाम १५ मिनिटात होतो. आपण डिस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवली आणि घेतली तरी असाच परिणाम दिसून येतो. याच ऐवजी हॅस्प्रो किंवा तत्सम जेनेरिक औषध असेल त्यात ३५० मिलिग्रॅम ऍस्पीरिनच असेल पण ते सूक्ष्म कणांचे ना बनवता साधे असेल तर ते पोटात विरघळायाला १५ मिनिटे लागतील. म्हणजे आपल्या डोकेदुखीपासून पूर्ण आराम व्हायला १५ च्या ऐवजी ३० मिनिटे लागतील. यात मूळ औषध चांगल्या दर्जाचे खरोखर आहे हे गृहीत धरले आहे. आता आपण मेट्रोनिडॅझॉल हे औषध घेऊ. आमांश किंवा अमिबिक डिसेंट्रीसाठी लागणारे औषध. हे औषध जठराच्या हायड्रोक्लोरिक आम्लात विघटीत पावते आणि शिवाय त्याच्या पदार्थामुळे जठराचा दाह होऊन आम्लपित्त होते. म्हणून ते एका इन्टेरिक कोटेड गोळी मध्ये मिळते. हि गोळी त्याच्या खास आवरणामुळे आम्ल वातावरणात विरघळत नाही तर अल्कलाईन वातावरणातच विरघळते. त्यामुळे औषधाचा परिणाम जठरावर होत नाही किंवा ते विघटन पावत नाही. आता मेट्रोनिडॅझॉलच्या २५० मिग्रॅमच्या जेनेरिक गोळीत तेवढे द्रव्य असेल पण जर ते इन्टेरिक कोटेड नसेलच तर रुग्णाला त्याचा फायदा होणार नाही उलट एखादा अन्य पॅथीवाला तुम्हाला ऍलोपॅथीची औषधे "उष्ण" पडतात म्हणायला मोकळा असतोच. याशिवाय औषध इंटेरिक कोटेड आहे पण त्याचे कोटिंग व्यवस्थित नसेल तर किंवा कारखान्यापासून रुग्णापर्यंत पोहोचण्यात होणाऱ्या हाताळण्यात जर त्याला भेगा पडल्या किंवा गोळीचा कोपरा तुटला तर या गोळ्यातील मेट्रोनिडॅझॉल बाहेर पडून रुग्णाला उपचार नाहोत अपायच होईल. या दोन्ही प्रकारांबद्दल डॉक्टरच्या हातात काय आहे? हे जेनेरीक औषध ना त्याने बनवले आहे ना त्याच्याकडे या औषधाचा दर्जा तपासण्याची यंत्रणा. परत रुग्ण बरा नाही झाला तर जबाबदारी डॉक्टरचीच असते. सुरुवात आपले निदान चुकले आहे का या शंकेपासून होते. निदानाबद्दल खात्री झाल्यावर रुग्णाने औषध व्यवस्थित वेळेवर आणि दिलेल्या डोसइतके घेतले आहे का याची शहानिशा होते.( औषध उष्ण पडते म्हणून तीन पैकी दोनच डोस घेणारे रुग्ण भरपूर भेटतात). आता निदान नक्की आहे आणि रुग्ण सुद्धा विश्वासू आहे आणि त्याने औषध व्यवस्थित घेतले आहे तरी उपचाराचा गुण का येत नाही हे पाहायला गेले तर औषधाच्या दर्जाबाबत शंका येणार.मग अशी परिस्थिती येण्यापेक्षा डॉक्टर सरळ प्रथितयश कंपन्यांची औषधेच लिहून देतात. याउलट जर तुम्ही उद्या टाटाने औषध कंपनी काढली तर ती औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरला शंका येणार नाही. कारण टाटांचे "नाव" आहे आणि आपल्या नावाला काळिमा लागेल असे ते काहीही करत नाहीत. हीच खात्री अगरवाल किंवा गोयल फार्मा कंपनी गुडगाव बद्दल देता येईल का? जर भारतात FDA ने सर्व औषध कंपन्यावर डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला आणि जर औषध कंपन्याना उत्पादनाचा परवाना देताना अत्यन्त कडक अशी तपासणी केली त्याचबरोबर नकली औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना सज्जड शिक्षा झाली. असे झाले तर भारतात जेनेरीक औषधे देण्यास कोणत्याही डॉक्टरना शंका येणार नाही. अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन अशा प्रत्येक कारखान्यावर कडक नजर ठेवून असते उदा. http://www.livemint.com/Companies/Z2tnAgoQ6vfRmvimSOdK8L/Ciplas-Indore-factory-gets-US-FDA-clearance.html आजची परिस्थिती काय आहे. मी जर जेनेरिक औषध म्हणून गंभीर असलेल्या मेनिन्जायटिसच्या रुग्णाला "मेरोपेनेम" लिहून दिले तर बाजारात त्याचे १२८ ब्रँड उपलब्ध आहेत. आणि त्यांची किंमत ९८० रुपयापासून २५०० रुपयांपर्यंत आहे. http://www.drugsupdate.com/brand/showavailablebrands/292/2 डॉक्टरने फक्त जेनेरिक औषधाचे नाव लिहून दिले तर आता सर्व निर्णय राह्तो केमिस्टच्या हातात मग जी कंपनी त्याला सर्वात जास्त कमिशन देईल त्याचेच औषध तो जेनेरिक म्हणून तुम्हाला विकणार. पण त्या कंपनीला हे औषध बनवण्याचा अनुभव त्याचे तंत्रज्ञान किती याचे केमिस्टला काहीच घेणे देणं नाही. यात रुग्ण दगावला तर केमिस्टची जबाबदारी शून्य. मार खाणार तो फक्त डॉक्टर.शिवाय त्याच्या बदनामीमुळे व्यवसायावर होणारा परिणाम वेगळाच. आज सर्व डॉक्टरना भीती आहे ती हीच कि केमिस्टने दिलेल्या जेनेरिक औषधाच्या दर्जाची खात्री कोण देणार. आजकाल लोकांचा धीर फार लवकर सुटतो आणि एकंदर सरकार आणि माध्यमे यांच्याकडून होणाऱ्या अपप्रचार यामुळे कोणताही डॉक्टर जरासुद्धा धोका पत्करायची तयारी दाखवत नाही. नकली औषध बनवल्याबद्दल त्या कंपनीच्या संचालकांना आणि ते विकल्याबद्दल केमिस्टला अटक होऊन त्यावर खटला चालून निकाल लागेपर्यंत बहुतेक वेळेस डॉक्टर वानप्रस्थाश्रमात पोचलेला असतो. आज डॉक्टर कमिशन मिळते म्हणून एखादे महाग औषध लिहून देतो त्यात त्याचा (गैर)फायदा आहे हे नक्की पण शेवटी स्वतःवर जबाबदारी असल्याने तो नकली औषध तरी नक्की देणार नाही. पैशासाठी फार तर नको असलेली व्हिटॅमिन्स, पूरक अन्न किंवा मिनरल्स सारखी भारंभार पण निरुपद्रवी औषधे लिहून देईल. आम्ही दवाखान्यात रुग्णांना देण्यासाठी जेनेरिक औषधे ठेवली तेंव्हा त्याच्या घाऊक विक्रेत्याला विचारले कि याच्या दर्जाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? त्यावर तो प्रामाणिकपणे म्हणाला कि सर मी तुम्हाला आज फसवले तर उद्या तुम्ही मला दारात उभे करणार नाही.एवढेच नव्हे तर तुम्ही इतर डॉक्टरना सांगाल कि माझी औषधे नकली आहेत. मलाही धंदा करायचा आहे.त्यावर माझेही पोट अवलंबून आहे. तुम्ही निश्चित राहा कि मी तुम्हाला पुरवतो ती औषधे उत्तम दर्जाचीच असतील. आतापर्यंत जेवढे स्मरणात आहे तेवढे लिहिले आहे. जसे अजून काही आठवेल तसे यात भर घालीन. क्रमशः

प्रतिक्रिया द्या
30930 वाचन

💬 प्रतिसाद (70)
ए
एस Mon, 05/22/2017 - 17:30 नवीन
बहुराष्ट्रीय कंपन्या, या छोट्या कंपन्यांची वेळोवेळी तपासणी करतात. पण ती रोज करत नसल्यामुळे, फक्त तपासणीच्या दिवशी स्वच्छता ठेवली जाते. इतर वेळी, कुत्री सुद्धा उत्पादन क्षेत्रांत फिरत असतात.
अगदी! आणि हे केवळ छोट्या कंपन्यांमध्येच घडते असे नाही, बऱ्याच प्रथितयश कंपन्यांच्या प्लॅन्टसमध्ये खूप निष्काळजीपणा केला जातो. केवळ ऑडिटच्या दिवशी साफसफाई. नाहीतर एका औषधाची एक बॅच संपली की मशीन साफ न करता त्यावरच दुसऱ्या औषधाची बॅच लावणे वगैरे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे, जेनेरिक औषधांच्या दर्जाबद्दल शंका असली तरी ब्रँडेड नामांकित औषधांच्या दर्जाबद्दल डोळे झाकून निश्चिंत राहावे अशी परिस्थिती भारतात नक्कीच नाहीये हे दुर्दैव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
प्राची अश्विनी Tue, 05/23/2017 - 08:36 नवीन
सहमत! ही जवळच्या नातेवाईकाबाबत घडलेली घटना. ती व्यक्ती एका मोठ्ठया ब्रँडच्या औषध कंपनीत quality control मध्ये उच्च पदावर होती. 2005 सालच्या मुंबईतील पूरात औषधांची मोठ्ठी बेच भिजली. या व्यक्ती ने.ती नष्ट करायची order दिली. पण वरचं कोटींग भिजलं पण आतलं औषध चांगलं आहे म्हणून तिने दिलेली order मागे घ्यावी म्हणून तिच्यावर कंपनीतर्फे दबाव आणला गेला. तिला नोकरी सोडावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुबोध खरे Tue, 05/23/2017 - 15:55 नवीन
ब्रँडेड नामांकित औषधांच्या दर्जाबद्दल डोळे झाकून निश्चिंत राहावे अशी परिस्थिती भारतात नक्कीच नाहीये हे दुर्दैव! इतकी वाईट परिस्थिती हि नाही. बऱ्याचशा चांगल्या कंपन्या मध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची चांगली काळजी घेतली जाते. आजकाल बरीचशी यंत्रे मानवी हस्तक्षेपाशिवायच काम करीत असल्याने दर्जा चांगला टिकवणे शक्य आहे. मूळ आपला प्रश्न आहे तो मनोवृत्तीचा. "सब चलता है" हि भारतीय मनोवृत्ती भारतीय कर्मचाऱ्यांच्या अंगात भिनलेली आहे ती अशी सहजासहजी जात नाही म्हणून असे मुद्दे उपस्थित होतात. पण केवळ नफ्यासाठी जिकडे तिकडे पैसे चारून उभ्या केलेल्या "जुगाड" कंपन्यांची परिस्थिती मात्र गंभीर आहे. एक चकाचक कार्यलय आणि एक चकाचक कारखाना नावापुरता उभा असतो. बरीचशी औषधे दुसर्याकडून बनवून घ्यायची. हे दुसरे बनवणारे सुद्धा कसे असतात. एकाकडून बल्क ड्रॅग घ्यायचे.चीन मधून स्वस्तात असे औषध जे मोठ्या कंपन्यांनी नाकारलेले आहे ते विकत घ्यायचे. गोळ्या तयार करायचे मशीन सेकंड हॅन्ड विकत घ्यायचे. (हे पन्नास हजारापासून मिळते.) त्यात गोळ्या तयार करण्यासाठी पूर्वी मोठ्या कंपनीत कामाला असणारा आठवी पास मजूर कमी पगारावर लावायचा आणि औषधे तयार करायची आणि ती अशा दिखाऊ कंपन्यांतर्फे विक्री करायची. आज तरी बहुराष्ट्रीय सोडा पण डॉ रेड्डी, सन फार्मा, अलेम्बिक (ग्लायकोडीन वाले ), FDC (इलेक्टराल वाले), सिप्ला, कॅडीला, इ अनेक नावलौकिक मिळवून असलेल्या भारतीय कंपन्या आहेत ज्यांच्या दर्जाबाबत बऱयापैकी खात्री देता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
रुपी Wed, 05/24/2017 - 03:59 नवीन
बर्‍याच वर्षांपूर्वी कॅडिला कंपनीला भेट दिली होती आणि तिथे गोळ्या तयार करण्याची प्रक्रिया पाहायला मिळाली होती. खूपच शिस्तबद्ध पद्धतीने काम चालू होते तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ए
एस Wed, 05/24/2017 - 08:16 नवीन
वरील किस्सा दुर्दैवाने तुम्ही उल्लेख केलेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीचा आहे. :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्राची अश्विनी Wed, 05/24/2017 - 08:56 नवीन
मी सांगितलेली कंपनी सुद्धा या वरच्या नावांपैकीच एक आहे.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुबोध खरे Wed, 05/24/2017 - 09:03 नवीन
स्वार्थ (आणि त्यासाठी भ्रष्टाचार) हा मूळ मानवी वृत्तीचा भाग. फोकस वॅगन सारख्या नामवंत जर्मन कंपनीने आपल्या डिझेल गाड्या विकण्यासाठी त्यांच्या प्रदूषण नियंत्रकात फेरफार केलेले उघडकीस आले. तसेच या चांगल्या कंपन्यांचे आहे. डॉक्टर शेवटी चांगल्या कंपन्यांची औषधे दर्जाबाबत असलेल्या एका (भाबड्या असेल) विश्वासानेच लिहून देत असतात. खरं तर जेनेरिक कंपन्यांकडून त्यांना "इतर सोयी सुविधा" जास्त मिळत असतात. पण दर्जाची खात्री नसल्यानेच बरेचसे डॉक्टर नामांकित कंपन्यांची औषधे लिहिताना दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्राची अश्विनी Wed, 05/24/2017 - 09:06 नवीन
खरंय. आजकालचा मुख्य प्रोब्लेम हा आहे की कुणाचाच कुणावर विश्वास उरला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा Mon, 05/22/2017 - 18:04 नवीन
उत्तम माहितीपूर्ण लेख आणि चर्चा.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 05/23/2017 - 06:54 नवीन
ब्रँडेड कंपन्यांची औषधे घेउन सुध्दा गुण आला नाही तर काय ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/23/2017 - 07:33 नवीन
डॉक्टरला हाणायचं हा का ना का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
पुंबा Tue, 05/23/2017 - 11:36 नवीन
डॉक्टरला हाणायला का काही कारण लागतं डॉक्टरसाहेब? रूग्णाच्या नातेवाईकातल्या दारूड्या टग्यांची रग जिरवायला कामाला येतो दवाखान्यातला एखादा डॉक्टर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी_माणूस Wed, 05/24/2017 - 06:42 नवीन
आजच्या लोकसत्ता मधे याच विषयावर एका डॉं. चा लेख आलेला आहे. http://www.loksatta.com/vishesh-news/quality-of-generic-drugs-1478428/ त्या लेखाचे समारोपाचे (सार ?) वाक्य असे आहे.
एकंदरीत पाहता लक्षात येईल की, जेनेरिक औषधांचा दर्जा सुमार असतो, ती ‘बायो- इक्विव्हॅलन्ट’ नसतात, हा दावा म्हणजे हा बिनबुडाचा प्रचार आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Wed, 05/24/2017 - 06:49 नवीन
तो लेख नेमका समजला नाही. वर त्यांनी म्हटलंय -
एक गोष्ट खरी की, काही कंपन्या मात्र दर्जा पाळत नाहीत. राष्ट्रीय औषध पाहणी (२०१४-१६) मध्ये भारतातील सर्व जिल्ह्यांमधून २२४ औषधांचे सुमारे ४८,००० औषध-नमुने गोळा करून त्यांच्यावर ६९ चाचण्या केल्यावर ३.१६ टक्के नमुने कमी दर्जाचे आढळले. हे प्रमाण खूप जास्त नसले तरी ते शून्यावर आणायला हवे. पण औषध कंपन्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवणारी अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) यंत्रणा अजूनही खूप अपुरी व भ्रष्टाचाराने ग्रस्त आहे.
खाली म्हणतात
एकंदरीत पाहता लक्षात येईल की, जेनेरिक औषधांचा दर्जा सुमार असतो, ती ‘बायो- इक्विव्हॅलन्ट’ नसतात, हा दावा म्हणजे हा बिनबुडाचा प्रचार आहे.
आखिर केहना क्या चाहते है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
स
सुबोध खरे Wed, 05/24/2017 - 07:11 नवीन
डॉ फडके यांनी लेखात जे लिहिले आहे तेच मी वरच्या लिहिलेले आहे. माझ्या लेखात ठळक शब्दात मी हेच लिहिले आहे जोवर औषधाच्या दर्जाची खात्री देता येते तोवर जेनेरिक औषध देणे हे नक्की चांगले आहे. हि दर्जाची खात्री टिकवणे हे काम डॉक्टरांचे नसून अन्न आणि औषध प्रशासनाचे आहे. एकंदर त्यांच्या कामाबद्दल न बोलणेच बरे. अशामुळेच कोणताही डॉक्टर जेनेरिक औषध देण्यास कचरतो. कारण औषध खराब होते कि नाही हे सांगणे कठीण आहे पण रुग्ण बरा झाला नाही तर त्याची जबाबदारी मात्र डॉक्टरांना घ्यावी लागते. आज डॉक्टरांनी जेनेरिक औषध लिहून दिले तर देणारा केमिस्ट मात्र त्याला सर्वात जास्त नफा देणाऱ्या कंपनीचेच औषध देणार( ज्याबद्दल डॉक्टरांना काहीच माहित नाही). याबाबतीत सरकार नक्की काय करणार आहे हे मात्र कुणालाच ( सरकारला सुद्धा) माहित नाही. यात फायदा केमिस्टचा, नुकसान रुग्णाचे पण जबाबदारी मात्र डॉक्टरची.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 05/24/2017 - 08:09 नवीन
जबाबदारी डॉक्टर लोक्सची असेल तर "ब्रान्ड त्यांच्याकडून अप्रूव्हड़" अशी काही सिस्टीम नाही का? नसेल तर बनवता येऊ शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 05/24/2017 - 08:57 नवीन
या कामासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही. फार्मसी ची पदवी घेतलेली व्यक्ती सक्षम असते. वरील लोकसत्तेच्या दुव्यात दिलेल्या सांख्यिकी प्रमाणे औषध निरीक्षक यांचे हे काम आहे. त्या दुव्याप्रमाणे ३२०० औषध निरीक्षक असणे आवश्यक आहे आणि प्रत्यक्षात फक्त ८४९ नेमलेले आहेत. त्यातून या खात्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत काय बोलणार. यामुळेच डॉक्टर लोक सहसा चांगल्या कंपन्यांच्या औषधाबाबत आग्रही असतात कारण यामागे निदान चांगल्या कंपन्या आपल्या "नावलौकिकासाठी तरी" औषधाचा दर्जा राखून असतील हा (भाबडा का होईना ) विश्वास असतो. अगदी नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीचे औषध खराब निघाले तर डॉक्टर एवढेच म्हणून शकतात कि आम्ही तर चांगल्या नामांकित कंपनीचे औषध लिहिले होते ते पण खराब निघाले तर आम्ही काय करणार? कितीही लोभी आणि भ्रष्ट डॉक्टर असेल तरीही आपला रुग्ण "बरा व्हावा" अशीच त्याची इच्छा असते. कारण त्याला "स्वतःच्या नावलौकिका"चीही चिंता असते. मी म्हटले तसे "टाटा" यांच्या नावासाठी लोक त्यांची उत्पादने खरेदी करतात. तसेच आहे हे. पण तिथेही आपलेच भारतीय लोक जर "सब चलता है" हीच वृत्ती बाळगुन असतील तर कोण काय करणार?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 05/24/2017 - 09:17 नवीन
एखाद्या इंजिनियर व डॉक ची प्रॅक्टीस ही वेगवेगळी असते. आज देखील व त्याअर्थाने कधीच वैद्यक हे परिपूर्ण शास्त्र होणार नाही. कारण अनेक गोष्टी इतक्या सूक्ष्म पातळीवर शरीरात होतात की कितीही शोध लागले तरी त्याचे १ अधिक १ बरोबर दोन असे उत्तर अभियांत्रिकी मधे देता येते तसे ते वैद्यकात देता येत नाही येणार नाही. सबब डॉ नी जेनेरिक औषध लिहून दिले तरी ते कोणत्या कंपनीचे घ्यायचे याची मुभा व साहजिकच जबाबदारी रूग्णावर आहे. तेंव्हा बरे होण्याची जबाबदारी वैद्यकीय व्यक्ती घेत नसतेच. तीवरची जबाबदारी फक्त निदानापर्यंतच सीमित आहे. आज मी ज्या दवाखान्यात औषध घेतो त्यावर डॉ. नामांकित कंपनीचे औषधच ( अलोपथिक) लिहून देतात त्याखाली एक नोट आहे ती अशी की " व यासम कोणतेही जेनेरिक औषध रूग्णाच्या पसंतीनुसार" अर्थात हे ठिकाण खाजगी डॉक चे क्लिनिक नाही. पण हेच डॉ खाजगी प्रॅक्टीस ही करतात. वरील नियम हा डॉ नी केलेला नाही तो रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने केला आहे. आता फरक एवढाच की सर्व डॉ. च्या प्रिस्क्रिप्शन खाली फक्त " रूग्ण आपल्या जबाबदारीवर जेनेरिक औषध घेऊ शकतो " असे वाक्य आले तर " जबाबदारी" तून डॉ. मुक्त होतीलच. कारण तशी १०० टक्के की गारंटी अतिशय यशस्वी ,नामांकित कंपन्याची ही देता येत नाही. एक वाचलेले वाक्य आठवते ते असे.... Doctor is not a magician , he is just a friend of yours on the way to death ! " .
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 05/24/2017 - 09:40 नवीन
तरी वेळ अली तर ब्रँडेड ला प्राधान्य असेल कोणी मत विचारलं तर . कालचीच गोष्ट आमच्या भागात पहिले जेनेरिक मेडिकल चालू झालंय. माझ्या सोसायटीतले एक काका मला तावातावाने सांगत होते बघ पहिले माझी हि गोळी २१० ची होती आता १२० ला मिळते . आपण फसवले जातो आणि बरंच काही . मला हा लेख वाचून खूप काही सांगण्याची उर्मी आलेली पण मी जाऊदे बोलो ते खुशीत तर काय होतंय . ते हार्ट पेशंट आहेत . मुख्य म्हणजे हा मेडिकल वाला नुसता डॉक कडून गोळ्या लिहून आणा असे सांगतो आणि जेनेरिक देतो . देतही असेल बरोबर पण आपला अजूनतरी विश्वास नाहीये . पण खरंच काही जेनेरिक चांगल्या असतील तर त्या गोळ्या सुचवायला डॉक्टरांनी हरकत नसावी .
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 05/24/2017 - 15:54 नवीन
माहितीपूर्ण आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा