ये,बैस ना जराशी...
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची
दररोज येत नाही ही रात चांदण्याची!
हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री
दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची!
कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे
कवळून जा उराशी तादात चांदण्याची!
येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या
स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची!
स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती
घेवून रात ये तू दारात चांदण्याची!
आलीस ना छतावर झटकून केस ओले?
शहरात होत आहे बरसात चांदण्याची!
—सत्यजित
आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची!क्या बात है... क्लास!