teen age बालक आणि त्यांचे पालक!!!
teen age बालक आणि त्यांचे पालक!!!
"chill मॉम! उग्गाच चिडू नकोस. किती वेळा आवरायला सांगशील?"
"अग किती सारखा पसारा करतेस. मग नको सांगू आवरायला?"
"आई, परत होणारच आहे न माझा पसारा?"
"हो! करशीलच परत दोन दिवसात."
"अग, मग आवरून ठेवूच कशाला? तूच म्हणतेस ना वेळ वाया घालवू नये! मग जर मी परत पसारा करणार आहे तर आवरू कशाला?"
"कमाल आहे ह तुझी!" (नवऱ्याकडे वळून) "अरे तू तरी बोल काहीतरी."
"हे काय ग सानु? आई आवर म्हणते आहे तर आवर की एकदा." वडिलांच नरो वा कुंजरो वा!
"अहो बाबा.... पण माझा मुद्दा बरोबर आहे न? परत पसारा होणारच आहे तर का आवरू मी? तुम्हाला पण पटत आहे. उगाच आई म्हणाली म्हणून तुम्ही मला रागावू नका."
"अशक्य आहेस अगदी. जिभेला हाड नाही तुझ्या. आम्ही नव्हतो अस बोलत आमच्या आई-वडिलांशी." आईचं काहीसं मुलीच्या दिशेने आणि काहीसं स्वगत. नवरा मुलीला रागावत नाही याचा देखील थोडा राग मनात.
साधारण चौदा-पंधरा वर्षाची मुलं असणाऱ्या सगळ्याच सुखवस्तू घरातून अशाच प्रकारचे संवाद आपण ऐकत असतो. पण याचा अर्थ ही मुलं उद्धट असतात का? त्यांना त्यांच्या आईवडिलांची किंमत नसते का? मला नाही तसं वाटत.
एकतर अलीकडे आपण पालकच मुलांशी खूप मोकळेपणाने बोलतो-वागतो. त्यामुळे आपण सांगत असलेलं एखाद काम 'नाही करणार' अस बिंदिक्तपणे सांगताना ही मुलं विचारसुद्धा करत नाहीत. त्यात आपण पालक आपल्याला जे मिळालं नाही ते सगळ आपल्या मुलांना मिळावं म्हणून धडपडत असतो; त्याशिवाय जे आपण देऊ शकतो ते तर देतोच. ही सवय त्यांना लहानपणापासूनच लागलेली असते. मग मुलं मोठी व्हायला लागतात आणि आपल्याला वाटत त्यांना आपण शिस्त लावली पाहिजे. त्यामुळे क्वचित कधी जर म्हंटल,"हे काम कर तर ते देईन." तर ते मुलांना मान्य होत नाही. कारण मुळात आपण त्यांच्या मनाची घडण तशी केलेलीच नसते. तोपर्यंत teen age मध्ये आलेल्या या मुलांना प्रत्येक गोष्ट त्यांचा अधिकार वाटायला लागलेला असतो.
पण आपण त्यांना शिस्त लावायचीच नाही का? 'आम्ही नव्हतो अशी उत्तरं देत.... किंवा बोलत आमच्यापेक्षा मोठ्या माणसांशी.' अस त्यांना ऐकावाण्यापेक्षा मुळात लहानपणी केलेल्या दोस्तीचा... मोकळेपणी बोलतो-वागतो त्याचा आपणच योग्य वापर करून काही गोष्टी मुलांना कमी शब्दात आणि कमी वेळात सांगितल्या तर नात्यात असणाऱ्या मोकळेपणामुळे ही मुलं आपलं म्हणण समजून घेतील अस मला वाटत.
माझा विश्वास आहे की त्याक्षणी जरी ही मुलं आपलं बोलण म्हणजे लेक्चर म्हणत असली आणि दुर्लक्ष करत असली तरी त्यांची संस्कारक्षम मनं आपण सांगितलेले मुद्दे नक्की मनात साठवत असतील. आणि कधी ना कधी त्यांना या जगात स्वतःच्या पायावर उभं रहायचंच आहे... त्यावेळी हेच आपले बोल ती आठवतील.
नात्यात येणाऱ्या कडवटपणाला टाळून कदाचित् आपणच समजावायची आणि त्यांना समजून घ्यायची नवीन वाट शोधायला हवी.
माझा विश्वास आहे की त्याक्षणी जरी ही मुलं आपलं बोलण म्हणजे लेक्चर म्हणत असली आणि दुर्लक्ष करत असली तरी त्यांची संस्कारक्षम मनं आपण सांगितलेले मुद्दे नक्की मनात साठवत असतील. आणि कधी ना कधी त्यांना या जगात स्वतःच्या पायावर उभं रहायचंच आहे... त्यावेळी हेच आपले बोल ती आठवतील.+१ नक्कीच.