Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा प्रश्न कसा सोडवावा?

उ
उपयोजक
Wed, 07/26/2017 - 14:04
🗣 138 प्रतिसाद
सध्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी वधुसंशोधनाच्या कामात मलाही सामील करुन घेतलंय.बरेचसे मित्र हे ब्राह्मण समाजातील आहेत.त्यानिमित्याने विविध वधुवरसंशोधन संस्थांना भेटी देणं सुरु आहे.बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत.शिक्षणही आर्टस किंवा कॉमर्स शाखेतून पदवी,पदव्युत्तर असेच आहे.वयंही साधारण २८ ते ३५-३६ या गटातील आहेत.सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत. वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्‍याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्‍या करणार्‍या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत. जी समस्या सध्या सगळीकडे आहे तीच इथेही जाणवली.मुलींच्या अवाजवी अपेक्षा! मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत. मुलगा इंजिनियर किंवा तसंच शिक्षण असणारा,मुंबई किंवा पुणे,बंगळूर अशा मोठ्या शहरात राहणारा,महिना किमान ४० हजारांवर पगार असणारा,स्वत:चा फ्लॅट असणारा हवा.अशा अपेक्षा आहेत या मुलींच्या! चांगल्या पोस्टवर असणार्‍या,बर्‍यापैकी मिळवणार्‍या मुलींच्या अपेक्षा समजण्यासारख्या आहेत,पण १२ वी किंवा BA असं शिक्षण असणार्‍या जेमतेम पगार मिळवणार्‍या मुलींनादेखील लग्नासाठीचा मुलगा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण असणारा किंवा सरकारी नोकरी असणारा हवा आहे. मुलींची वयं २९,३२,३४ झाली तरीही या अपेक्षा कमी होत नाहीत. आपल्या जातीत कमी शिकलेल्या मुली मिळत नसतील तर दुसर्‍या जातीतील मुली करुन घ्या, हा ही सल्ला मुलांना देऊन झालाय.पण पौरोहित्य करणार्‍या किंवा छोट्या गावांमधे नोकरी करणार्‍या मुलांना किंबहुना त्यांच्या पालकांना पटणारा,रुचणारा नाही.कदाचित यामुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा कुटूंबातील अन्य सदस्यांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात.आंतरजातीय विवाहासाठी खरंतर प्रबोधन करायला लागेल पण सध्या तेवढा वेळ देणं शक्य नाही.कारण आधीच या मुलांची लग्नाची वयं उलटून चाललेत. मग यावर बरंच डोकं खाजवून काही उपाय सापडले आहेत. ते असे, १) भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा! २) हल्ली नोकरीच्या निमित्ताने किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे रोजचं जीवन हे खुप दगदगीचं झालेलं आहे.बर्‍याचदा प्रसारमाध्यमांतून असं वाचायला,ऐकायला मिळतं की तिशीनंतर मुलींसाठी अपत्यप्राप्ती ही सहजसाध्य नसते.मग काही वेळा खर्चिक डॉक्टरी उपायांनंतर हे साध्य होतं. तर यात कितपत तथ्य आहे? हे जर सरसकट होत असेल,अपत्यप्राप्तीला असा विलंब हमखास होतंच असेल तर यासंबंधी शास्त्रीय माहिती मुलींना देऊन योग्य वयात विवाह करण्यासंबंधी त्यांचं प्रबोधन करावं.मतपरिवर्तन करावं (यासंबंधी शास्त्रीय माहिती,लिंका इथे कोणी दिल्या तर आभारच!) ३) होणार्‍या नवर्‍याला तिशीच्या आतच गलेलठ्ठ पगार असावा अशी बर्‍याच मुलींची किंबहुना त्यांच्या आईवडीलांची तशी अपेक्षा असते.वाढलेली महागाई हे कारण त्यांच्याकडून पुढे केलं जातं. आता ही महागाई कुठे भेडसावते?तर काही मुख्य गोष्टींमधे म्हणजे, * मुलानं घर/फ्लॅट घेतला असेल तर त्याचा हप्ता, * हल्ली प्रत्येक घरात किमान दुचाकी तरी असतेच त्यासाठी लागणारं पेट्रोल,किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केल्यास होणारा खर्च. * घरखर्च. * होणार्‍या अपत्याच्या इंग्रजी माध्यामातल्या शिक्षणाचा खर्च.(त्यासाठी हल्ली खुप आधीपासून बचत करावी लागते!) या सगळ्या खर्चांबाबत फक्त मुली त्यांचे पालक आणि एकुणच समाजाचं काही प्रमाणात प्रबोधनाचा प्रयत्न करणे.कारण बर्‍याचदा आपण आंधळेपणाने दुसरा तसं करतो म्हणजे आपणही(ऐपत,क्षमता नसताना) असं असंच केलं पाहिजे या सामाजिक दबावाला बळी पडतो. ४) काही असे कोर्सेस किंवा व्यवसाय ज्यांमधे आर्थिक प्राप्ती चांगली आहे पण त्यांना तितकसं ग्लॅमर नाही.उदा. ITI किंवा पौरोहित्य. माझे पती ITI आहेत किंवा भटजी आहेत हे सांगण्यात मुलींना कमीपणा वाटतो. दुर्दैवाने आताशा या ग्लॅमरस शिक्षणालाच जास्त महत्व आलंय. काहीवेळा ITI झालेल्या व्यक्तीच्या नोकरीची स्थिरता अधिक असू शकते. हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. ५) पती-पत्नी दोघांनी मिळून कष्ट केले,विश्वास ठेवला,लग्नानंतरही सुरुवातीची काही वर्षे दोन्हीकडच्या पालकांनी थोडाफार आर्थिक,मानसिक पाठींबा या जोडप्याला मिळाल्यास पुढील वाटचाल सुसह्य होईल असा विश्वास निर्माण केला पाहिजे. आता हे सगळे उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय करता येईल? किंवा अजून काही उपाय असतील तर तेही सुचवले जावेत. आज हा प्रश्न ब्राह्मण समाजात प्रकर्षाने जाणवत असला तरी काही वर्षांनी इतर समाजातही जाणवू लागेल किंवा लागलाही असेल.इथे पुरोहितांना नाकारलं जातंय,इतर समाजात कदाचित शेतकरी मुलगा नाकारला जाईल. एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!
वर्गीकरण
मदत हवी आहे

प्रतिक्रिया द्या
41136 वाचन

💬 प्रतिसाद (138)
अ
अभ्या.. Wed, 07/26/2017 - 14:16 नवीन
भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा!
हायला, त्यापेक्षा जातीचा आग्रह सोडलेलं श्रेयस्कर की. संस्कार थोडे वेगळे असतील पण भाषा तरी सेम असेल ना. का पौरोहित्य करणार्‍यांना इंटरकास्ट मॅरेजचे वावडे आहे की काय? का ब्रह्मतेजात काही फरक पडतो काय?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 16:02 नवीन
परराज्यातील मुलींना मराठी शिकवणं त्याहीपेक्षा जास्त सोपं आहे. प्रश्न ब्रह्मतेजाचा नाही पण त्यानंतर त्या पुरोहितांना स्थानिक जनतेकडून जे सोसावं लागेल ते निस्तरायला आपण नसणार ना तिथे! शिवाय पौरोहित्याचा व्यवसाय हा समाजाच्या आधारावरच चालतो. बाकीचे पुरोहित या आंतरजातीय विवाह केलेल्या पुरोहिताला असहकार्य करु शकतात. त्यावेळी आपण जाणार आहोत का मदतीला? अाणि तेज जातं का काय असा प्रश्न असेल तर इथल्या ब्राह्मण उच्चशिक्षित तरुणींनी पुरोहिताशी लग्न केलं तर त्या तरुणींचं विद्येचं तेज जातं का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार Wed, 07/26/2017 - 17:00 नवीन
केअशु नवी भाषा शिकवण सोप का मुलींना ब्राह्मण करुन घेण सोप ? ब्राह्मण होण्यासाठी मुलींना नेमक काय कराव लागत ? -माहित नसेलतर सध्या मनुस्मृतीची नवी ओळख करुन देणारा मिपा धागा आला आहे तो पाहून घ्यावा ;) म्हणजे दुसर्‍या पुरोहीतांची तोंडे बंद करता येतील- किमान काही पुरोहीतांनी मुलींना -आणि आमच्या मते मुलांनाही- ब्राह्मण करुन घेण्याचाच व्यवसाय चालवला तर उत्पन्नही वाढून संसार चालवण्यास मदत होईल ( तरीही कुणी ब्राह्मण होण्यास तयार होत नाही हे लक्षात आलेच तर धर्म बदलून दुसर्‍या धर्माचे पौरोहीत्य करुन तरी उदर निर्वाह साधता येतील ;) ह.घ्या. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
म
माहितगार Wed, 07/26/2017 - 17:51 नवीन
केअशु नवी भाषा शिकवण सोप का मुलींना ब्राह्मण करुन घेण सोप ? ब्राह्मण होण्यासाठी मुलींना नेमक काय कराव लागत ? -
केअशु, अभ्या, माहितगार आणि इतर मिपाकर कै पण सांगतात असे वाटत असेल तर हे घ्या संदर्भ मनुस्मृती अध्याय २ चा संदर्भ देऊन आपले आदरणीय मिपाकर मित्र शरद सर सांगतात "स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. " शरद सरांच्या धाग्याचा संदर्भ आणि शरद सरांवर विश्वास नाही वाटला तर ट्रांसलीटरल डॉट ऑर्गवरील अनुवाद (३८ व्या क्रमांकावर) जरासा वेगळा पण तरीही रोचक आहे. "अति सुंदर स्त्री आपल्या अपेक्षेने नीच कुलात जरी उत्पन्न झालेली असली तरी तिच्याशी विवाह करावा" ट्रांसलिटरल डॉट ऑर्गचा संदर्भ दुवा, संदर्भ दुवे हा प्रतिअसाद लिहिण्याच्या वेळी जसे दिसले. दोघांनीही मूळ संस्कृत श्लोक उधृत केलेला नाही त्या बद्दल इतरांनी मदत जाणकारांनी करावी अनुवाद मुळ लेखकांप्रमाणे संदर्भासाठी दिले आहेत, तसे आम्ही कोणत्याही जाती कुळ वंश धर्मास नीच समजत नाही आणि तसे समजणे निषेधार्ह समजतो हे वेगळे सांगणे न लगे. पण एकुण सुंदर भासणारी श्रेष्ठ स्त्री ब्राह्मणाशी विवाहा नंतर ब्राह्मण स्विकार्ह आहे असा मनुस्मृतीचा अर्थ/मार्ग प्रथम दर्शनी दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एस Wed, 07/26/2017 - 14:16 नवीन
फार वेळा चर्चिला गेलेला विषय आहे. मिपावरील सर्वात जास्त प्रतिक्रिया आलेला एक धागा होता. तो शोधून पहा.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 15:45 नवीन
पाहिलाय.पण इथं काही उपाय सुचवले आहेत.ते execute करण्यासाठी मदत झाली तर बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ग
गॅरी ट्रुमन Wed, 07/26/2017 - 14:23 नवीन
हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.
कोणाला कोणत्या गोष्टीचे ग्लॅमर वाटावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. इतरांना अमुकएक गोष्ट आवडली पाहिजे किंवा त्याचे ग्लॅमर वाटले पाहिजे यासाठी इतरांनी प्रयत्न करू नयेत असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण असे प्रयत्न इतरांनी करणे म्हणजे आपल्या मतांमध्ये इतरांनी विनाकारण केलेली लुडबुड आहे असे वाटून जो अपेक्षित परिणाम आहे त्याच्या बरोबर उलटा परिणाम बघायला अनेकदा मिळतो. अनेक कट्टर कर्मकांड करणार्‍यांची मुले त्याच्या बरोबर उलटी होतात यामागे हे एक कारण आहे असे वाटते. तेव्हा इतरांना काय आवडावे किंवा आवडू नये याचा निर्णय त्यांच्यावरच सोडलेला श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 07/26/2017 - 14:27 नवीन
त्यांना "ग्लॅमर" नसून "स्वीकारार्हता" (अ‍ॅक्सेप्टिबिलिटी) किंवा कलंकमुक्ती (डीस्टिग्माटायझेशन) म्हणायचं असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 16:22 नवीन
दुर्दैव! पण ग्लॅमर आल्याशिवाय स्विकारार्हता वाढेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पुंबा Wed, 07/26/2017 - 14:26 नवीन
आंतरजातीय लग्न करणे हा योग्य पर्याय वाटतो. चांगला जीवनसाथी मिळणे अधिक महत्वाचे की जातीच्या खोट्या भ्रामक मृगजळामागे धावत, नैसर्गिक प्रेरणांना बांध घालत जातीतील मुलीची वाट पाहणे हे ज्याचे त्याने ठरवावे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 16:27 नवीन
स्वजातीय विवाहात नुकसानच होतं का? या नैसर्गिक प्रेरणा मुलींनाही असतातच की! पटदिशी अवास्तव अपेक्षा त्यांनाही धोक्याच्याच ठरु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा गुरुवार, 07/27/2017 - 13:48 नवीन
नुकसान म्हणत नाही परंतू, फार काळ वाट पाहत बसलं की लग्न होण्याची शक्यताच मावळत जाते. तेव्हा ठरावीक वर्षे जातीत लग्न व्हायची वात पाहिली परंतू होत नाही असे असेल तर आंतरजातीय विवाह हाच चांगला पर्याय वाटतो. तुम्ही म्हणालात ती ग्राहकांचा विश्वास कमी होणे, कार्याला न बोलावणे वगैरे शहरांत होत नसावे असे वाटते(होत असेलही, भटजी कम्युनिटीने बातमी पसरवल्यामुळे). बाकी अवास्तव अपेक्षा कालांतराने बदलतात. मुलींची लग्ने(निदान ब्राह्मणांत) मोठी समस्या राहिएल्ली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
म
माहितगार गुरुवार, 07/27/2017 - 13:58 नवीन
राष्ट्रीय एकात्मतेपेक्षा अधिक धर्म्य काय आहे ? स्वतःचे ज्ञान श्रेष्ठ असल्याचा आत्मविश्वास असेल तर समाज आपोआपच पाठीशी येतो. आणि प्रत्यक्ष अप्रत्क्ष जात पंचायती भरवून बहिष्कृततेची तलवार अंगावर येऊ नये म्हणून कायद्याचेही पुरेसे संरक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
क
कंजूस Wed, 07/26/2017 - 14:38 नवीन
दिवसेंदिवस हीच परिस्थिती बिकट होत चालली आहे. समाजाचे मतपरिवर्तन करण्याचा खटाटोप करणे व्यर्थ.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 07/26/2017 - 14:39 नवीन
अभ्याशी सहमत. ब्राह्मतेजाचा प्रश्न आवडला. ;) एसभाऊ, त्या धाग्याची लिंक दिलीत तर पुढील दंगा करायला येथे सुरुवात करता येईल. ;) एक प्रश्न आहे. मुलींच्या अपेक्षेनुसार पगार ४० हजाराच्या वर हवा म्हणतायत. महागाई हे कारणही पालकांकडून दिले जातेय असे म्हणताय तर...... लहान मोठ्या शहरांमध्ये भाड्याने घर घेणे (किंवा हप्ता), ग्रोसरी, वीजपाण्याची, फोनची बिले, प्रवासखर्च, गरजेपुरता कपडा व भविष्य तरतुदीसाठी महिना ४० ह. लागत नाहीत काय? जर उत्तर हो असेल तर मागणी योग्य समजावी काय? जर उत्तर नाही असेल तर मात्र अवास्तव मागणी म्हणता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 16:05 नवीन
निदान छोट्या शहरांमधे तरी एवढाल्या पगाराची अपेक्षा अवास्तवच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 07/26/2017 - 18:51 नवीन
मोठी शहरे म्हणजे मेट्रो सिटीज. मुंबई, हैदराबाद, बंगळुरुरु, दिल्ली, चेन्नै वगैरे. लहान शहरे म्हणजे पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपुर वगैरे. वगैरे लिहिलय, लगेच "आमच्या शहराचं नाव आलं नाही" म्हणू नये. मेट्रोमध्ये रहायला चार लोकांच्या कुटुंबाला किती खर्च येतो ते माहित नाही पण पुण्यात किती येतो त्याचा अंदाज बांधू शकीन. थोड्याफार फरकाने बाकीच्या ठिकाणीही असे असावे. अगदी नवे जोडपे रहातेय म्हटले तरी कुंटुंबविकास थोड्याच कालावधित होतो म्हणून दोन लहानगी मुले व आई बाप. गावाकडून येणारा जाणारा असतोच! भयंकर समंजस बायको असल्याने तिने भाडेतत्वाचे घर प्रथम मान्य केले, तेही १ बेडरुमचे, तरी फर्स्ट ह्यांड अनुभवावरून त्याचे भाडे किती येऊ शकेल ते सांगू शकते. दोन बेरुच्या घराला किती भाडे तेही सांगू शकते. एरिया कोणता ते जाऊ देत, सरासरी घेऊ! माणूस दुसर्‍या गावाहून येतोय म्हणजे सहसा नोकरीसाठी येतो. कंपनीला खेटून घर नसले तरी विसेक किमी जाताना + २० किमी येताना हा आकडा धरून चालू. भयंकर गोड स्वभावाची बायको असल्याने "मला गडे कोणतेच वाहन नसले तरी चालेल" असे म्हटल्याने सार्वजनिक वाहतुकीवर सगळी भिस्त आहे. वीजबिल, सेलफोन (लँडलैन नाहीये), पिल्लांच्या साध्या शाळा, किराणा सामान, कपडे, भाजी, दूध अशी असंख्य बिले, त्यात डॉक्टरांचे खर्च धरले नाहीयेत याची कल्पना आहे. भविष्याची तरतूद वगैरे धरून चालले तर ४० हजार रुपये फार महान रक्कम आहे असे वाटत नाही. म्हणजे रक्कम महान आहे पण खर्च आहेतच! आता यात बायकोने नोकरी केली तरी मुलांच्या सांभाळण्याच्या सोयिवर बरेच पैसे खर्च होतात. पुण्यापेक्षा लहान शहरात अपेक्षा ४० हजार रू पेक्षा कमी असेल असे धरून चालू तरी किती कमी असणे अपेक्षित आहे. तुमच्या बहिणीचे लग्न करून देताना तुम्ही काय अपेक्षा कराल? ते जातीधर्माचं जाऊ दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक गुरुवार, 07/27/2017 - 04:26 नवीन
अपेक्षा कमी ठेवल्या तर या छोट्या शहरांमधे अगदी महिना २० हजार रुपयांमधेही व्यवस्थित जगता येतं! माझ्या बहिणींची लग्नही या पेक्षा कमी पगार मिळवणार्‍या मुलांबरोबर झाली आहेत. सुरुवातीला आर्थिक स्थिती बेताची होती पण कष्ट घेऊन परिस्थिती बदलण्यात यश मिळवले आहे. आधीपासूनच सगळं सेटल हवं ही अपेक्षा चुकीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 07/27/2017 - 14:16 नवीन
प्रतिसाद आवडला पण लहान शहरांमध्ये घरभाडे एका बेरूसाठी बर्‍या वस्तीत अगदी कमी म्हटले तरी ८ ते १० हजार रुपये आहे. मनुष्याने ट्याक्स भरणे अपेक्षित आहे. सर्व युटिलिटीजची बिले कमीतकमी धरली तरी भविष्य तरतूदीसाठी फारशी रक्कम हातात राहील असे नाही. तरीही माझ्यापेक्षा तुम्हाला यातील जास्त अनुभव आहे म्हणून मान्य करते की ४० हजार रु. मासिक प्राप्ती ही अपेक्षा अवास्तव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 07/27/2017 - 14:30 नवीन
लहान शहरांमध्ये घरभाडे एका बेरूसाठी बर्‍या वस्तीत अगदी कमी म्हटले तरी ८ ते १० हजार रुपये आहे.
नाही. कोल्हापूर, सांगली, कराड, नगर सारख्या शहरात १ बेडरूम फ्लॅट ४ हजारांपर्यंत मिळून जाईल. ८-१० हजार मध्ये पुण्यासारख्या शहरात बऱ्यापैकी वस्तीत देखील भाड्याने फ्लॅट मिळणार नाही. कमीत कमी १२ हजार लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 07/27/2017 - 14:36 नवीन
होय. ते माहितिये तरी किमती खालच्या बाजूला धरून क्याल्क्यूलेशन केले तरी ४० हजार रुपये मासिकप्राप्तिची अपेक्षा मला अवास्तव वाटत नाहीये पण मी पुण्यातून बाहेर पडून दोन दशके झाल्याने त्यांचे म्हणणे मान्य करतिये. भाड्यातील किमतीचा फरक आता पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या लहान शहरांमध्ये व सातारा, सांगली, कराड, नगर या विकसनशील शहरांमध्ये असा वेगळा करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
त
तेजस आठवले Wed, 07/26/2017 - 14:49 नवीन
एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!
फारच आशावादी तुम्ही बुवा. मिपावर ह्या धाग्याचा निकाल नक्कीच लागेल. :)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 16:14 नवीन
मिपावर सर्व प्रकारचे लोक अाहेत.यावर मदत करणारे सुध्दा असतील.वाट पाहुया. आंतरजातीय विवाह नको का म्हणता? कुठल्या युगात राहता तुम्ही? मुली मिळवत्या आहेत! ठेवल्या अपेक्षा तर चुकलं कुठे? त्यांच्या कष्टानं मिळवताहेत त्या. थोडे परंपरावादी विचार मांडले कि हा असा हल्ला गृहित धरावाच लागतो.बर्‍याचदा प्रश्न काय आहे,कोणाबद्दल आहे हे समजून न घेता जुनाट,परंपरावादी असे शिक्के मारले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
म
माहितगार Wed, 07/26/2017 - 15:02 नवीन
वधू-वर परिचय ह्या विषयातील तज्ञ नाही. हा प्रश्न कसा सोडवावा शीर्षकामुळे आलोच आहे. तर चकटफूच्या सूचना पुढच्या प्रतिसादातून देण्याच्या आधी चकटफूचे दोन शब्द मांडतो. पण त्या आधी निसटत्या बाजू आंतरजातीय विवाहच नाही तर आंतरधर्मीय विवाह करुन वधूस हिंदू संस्कृतीचे शिक्षण देण्याची हिम्मत नसलेल्या (तथाकथीत पुरोहीत) मुलांशी अगदी ब्राह्मण मुलींनीही का म्हणून विवाहास पात्र समजावे ? म्हणून अभ्याच्या मताशी सहमत आहेच. सोबत उत्पन्नाबाबत शिक्षीत मुलींच्या अपेक्षा थोड्या वरच्या बाजूस असल्यातरी अवाजवी कसे म्हणता येईल. दुसरे असे कि आंतरजातीय नाही आंतरधर्मिय विवाह केले तरी इतर जाती किंवा धर्मातील किंवा परराज्यातील मुलींच्या अपेक्षा कमी का म्हणून असतील किंवा त्यांनी तात्कलीक अडचणींमुळे विवाह मान्य केले तरी आर्थीक अडचणींनंतर घरी वाढीव उत्पन्न आणण्याचा तगादा त्या कशावरुन लावणार नाहीत ?
  • Log in or register to post comments
न
नया है वह Wed, 07/26/2017 - 15:10 नवीन
मुलींच्या अवाजवी अपेक्षा! ? का मुलांचे मागासलेपणं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
जेनी... Wed, 07/26/2017 - 15:51 नवीन
मुलांचे मागासलेपण ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नया है वह
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 16:30 नवीन
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नया है वह
म
माहितगार Wed, 07/26/2017 - 15:17 नवीन
१) ऑनलाईन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन आणि शोध घेण्यास खर्च मोठा नाही म्हणून पण इथे अधिक सुशिक्षीत व अधिक अपेक्षा असलेल्या मुलींचा राबता असण्याची शक्यता अधिक व यशाची शक्यता कमी पण कुणाच्या ओळखीच्या ओळखीत परदेशातील मुली वगैरे मिळण्याचा योग आल्यास पुरोहीत मंडळींना आमेरीकेतील व्हीसा मिळणे नॉन-पुरोहीत ब्राह्मणांपेक्षा सोपे आहे झाले असल्यास आमेरीकेतील विवाहार्थ ब्राह्मणच जावई हवा आहे पण ट्रंपानी अधिक शि़क्षीत ब्राह्मणांना व्हीसा बंड केल्यामुळे अशा पालकांना ऑनलाईन विवाहोत्सूक पुरोहीत ब्राह्मणांचा विचार नक्कीच करता येईल. :) हाच मुद्दा वधूवर सूचक मंडळात आणि रोहिणी टायप वधूवर सूचक मासिकातून मांडता यावा. आता जरा गंभीर सल्ले २) पुढारी लोकमत अशा वृत्तपत्रातून महाराष्ट्र व्यापी छोटी जाहीरात प्रभावी ठरावी. म्हणजे छोट्या गावातील अधिक विवाहोत्सुक मुलींपर्यंत जाहीरात पोहोचून रिस्पॉन्स तपासून पहाता येईल. ३) त्या शिवाय तुमच्या कडे अर्धा डझन इच्छूक वर आहेत म्हणता आहात तर वरील प्रमाणे जाहीरात देतानाच वधू-वर परीचय मेळावाची बातमी अशा वृत्तपत्रातून छापून आणण्याची वृत्तपत्रांना गळ घालण्यास हरकत नसावी. वधू-वर परीचय मेळाव्यात प्रत्यक्ष भेटी नंतर मुलगा आवडला तर मुलींच्या अवाजवी अटी गळून पडण्याची शक्यता अधिक असू शकेल. पण एनी वे परदेशातील मुली इसिस सारख्यांच्या मागे जाण्या पेक्षा भारतीय पुरोहीतांनी प्रयत्न केल्यास जगातला दहशतवाद कमी होण्यास जरा मदतच होईल :) (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Wed, 07/26/2017 - 15:50 नवीन
धन्यवाद माहितगार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
जेनी... Wed, 07/26/2017 - 15:54 नवीन
त्या शिवाय तुमच्या कडे अर्धा डझन इच्छूक वर आहेत म्हणता आहात तर वरील प्रमाणे जाहीरात देतानाच वधू-वर परीचय मेळावाची बातमी अशा वृत्तपत्रातून छापून आणण्याची वृत्तपत्रांना गळ घालण्यास हरकत नसावी. वधू-वर परीचय मेळाव्यात प्रत्यक्ष भेटी नंतर मुलगा आवडला तर मुलींच्या अवाजवी अटी गळून पडण्याची शक्यता अधिक असू शकेल. एकदम सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पिलीयन रायडर गुरुवार, 07/27/2017 - 00:12 नवीन
घरातच हे सगळं अनुभवलं असल्याने मुली पटकन मिळत नाहीयेत हे नक्की. माझ्या अनुभवांवरुन ज्या दोन चार गोष्टी समजल्यात त्या अशा १. पत्रिका - अर्धी निम्मी स्थळं तर इथेच मार खातात. इथे तडजोड शक्य असेल तर लग्नाचे चान्सेस बरेच वाढतील. २. फोटो - दुर्दैवाने आजही रंग रुपाला अवास्तव महत्व आहे. अरेंज मॅरेज मध्ये तसंही स्वभाव कसाय हे समजुन घेण्याची सिस्टिम नाहीये. त्यामुळे अनेक स्थळं केवळ फोटो पाहुन नाकारली जातात. आयडीयली बोलायचं तर फोटो न बघता किमान १-२ दा तरी बोलणे व्हायला हवे. माझ्या माहितीत एकीने असे केले आहे. शादी.कॉमवर तिने प्रोफाईल पिक ठेवलेलेच नव्हते. ती अत्यंत हुषार आणि देखणी सुद्धा आहे. तिला तिच्या दिसण्यापेक्षा तिच्या शिक्षण आणि स्वभावाकडे पाहुन लग्न करणारा मुलगा हवा होता. तिचे प्रोफाईल पाहुन अनेकांनी तिला अ‍ॅप्रोचही केले. त्यात काहींनी सगळ्यात आधी तिला फोटो मागितला. तिने त्यांना तिथेच नाकारले. केवळ एकाने पार २ महिने तिच्याशी उत्तम गप्पा मारल्या. ह्या मुलाचे अन आपले मत जुळते आहे असे दिसल्यावर मगच तिने फोटो दिला. पण तोवर त्यालाही ती आवडली होतीच. अर्थात ही परिस्थिती फार आयडियल आहे, पण रंग-रुपावरचा भर कमी व्हायला हवाय हे नक्की. जोडी अनुरुप असावी, पण अगदी गोरीच मुलगी हवी किंवा चष्मा नकोच वगैरे अतिरेकी अपेक्षा मुलांनीही ठेवु नयेत. ३. अपेक्षा - शेवटी अरेंज मॅरेज हा बाजारच आहे. जो तो बेस्ट डील मिळवण्याच्या प्रयत्न करतोय. एखाद्या मुलीसमोर जर पुण्यात मोठ्या कंपनीत काम करणारा मुलगा आणि पौरोहित्य करणारा मुलगा असे पर्याय असतील तर ती मुलगी काय निवडेल? पालकांनी सुद्धा जास्तीत जास्त सेटल आणि जबाबदारी शक्य तेवढी कमी असणारा मुलगा का निवडु नये? ह्यात परत दुर्दैव असंय की पौरोहित्य करणारा मुलगा कदाचित जास्त समंजस आणि उत्तम जोडीदार असेल, पण ते कळणार कसं? एक दोन भेटीत सगळेच चांगलेच वागतात. एक प्रश्न नेहमी येतो की मुली आपल्यापेक्षा कमी पगाराचा मुलगा का स्वीकारत नाहीत. लव्ह मॅरेज मध्ये अनेकदा स्वीकारताना पाहिल्यात. पण अरेंज मॅरेजमध्ये आधीच आपल्या पेक्षा मोठा मुलगा बघण्याची पद्धत आहे. किमान आपल्या एवढा शिकलेला म्हणलं तरी वयाने मोठा मुलगा हा जास्त पगारावरच असणार ना? आणि "मी माझ्याहुन जास्त पगाराची बायको स्वीकारेन" हे तरी मुलं कुठे धडधडीत सांगतात? त्यांनाही ते नकोय. अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई वडील. आजही आपला पारंपारिक दृष्टिकोन बदलत नाहीये. मुलांना शिकलेली, सवरलेली, नोकरी करणारी आणि ते सांभाळुन "माझ्या आईवडीलांना सांभाळायला हवंच, शिवाय सण वारही करावे लागतील." ह्या अटींसकट मुलगी हवीये. आई वडीलांचं तर सर्वांनीच करायला हवं. पण ह्यात जेव्हा मुलीच्या आई वडीलांचा प्रश्न येतो तेव्हा एकुलती एक नको, नुसत्या बहिणीच नको, भाऊ हवा असे म्हणुन मुलेही सासु - सासर्‍यांची जबाबदारी टाळायला बघतात. असे कसे चालेल? डोक्यावर शैक्षणिक कर्ज असणारी मुलगी तर फार हाल सोसते. मी एक लग्न त्यापायी मोडलेलं पाहिलंय. ह्या सर्वांवर मला वाटणारा उपाय म्हणजे मुलांनी सुद्धा स्पष्टपणे - स्वयंपाक येतो - करण्याची तयारी आहेच, माझ्याहुन जास्त पगाराची मुलगी चालेल, लग्नाचा खर्च अर्धा उचलला जाईल, नोकरीत संधी असल्यास बायकोसोबत मुव्ह होण्याची तयारी आहे, सासु - सासर्‍यांची जवाबदारी निसंशय माझीही आहे अशा भुमिका आपणहुन मांडायला हव्यात. मला खात्री आहे की भरभक्कम पगाराच्या मुलापेक्षाही हे बोलणारा मुलगा कधीही जोडीदार म्हणुन मुली निवडतील. त्यांनाही आपल्या आई वडिलांची काळजी असते. जो मुलगा हे आधीच स्पष्टपणे बोलु शकतो तो नक्कीच जोडीदार म्हणुन उत्तम असेल. जितकं शक्य आहे तितका फोकस स्वभावांवर, विचारांवर ठेवायला हवा. त्याला महत्व दिले गेले पाहिजे. शेवटी प्रत्येक जण जास्तीत जास्त चांगले स्थळ मिळवायचा प्रयत्न करतो आणि आजही लग्नं रंग-रुप-पैसा-अडका ह्याच गोष्टी पाहुन होतात. स्वभाव वगैरे कळणार कसा हा प्रश्नच आहे. त्यामुळेच बारावी पास मुलगी होता होईतो जास्त पगाराचा मुलगा शोधते. तसं तिने करण्यात काही चुकही नाहीये. कारण समजा ती काळी असेल तर तिचा स्वभाव पाहुन समजुन वगैरे कुणी मुलगा तिला निवडणार नसतो. मुलं सुद्धा रंग-रुपाच्याच शोधात असतात. त्यामुळे अवाजवी अपेक्षा दोन्ही बाजुंनी आहेत. प्रबोधनाला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 07/27/2017 - 03:47 नवीन
खुप खुप आभार पिलियन रायडर! उपयुक्त प्रतिसाद.नेमकं लिहिलयंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रे गुरुवार, 07/27/2017 - 04:32 नवीन
माझ्या माहितीत एकीने असे केले आहे. शादी.कॉमवर तिने प्रोफाईल पिक ठेवलेलेच नव्हते.
इंटरेस्टिंग केस आहे. त्या मुलीचे पुढे काय झाले? त्याच मुलाशी लग्न जमले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 07/27/2017 - 04:37 नवीन
हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
प
पिलीयन रायडर गुरुवार, 07/27/2017 - 04:40 नवीन
पण एक महत्वाची गोष्ट.. ती मुलगी परदेशात असते आणि तिकडे मराठी मुलगा शोधत होती. त्यामुळे दोघेही भारताबाहेर वाढलेले आहेत. आणि मुलगी प्रथितयश संस्थेतुन संपुर्ण स्कॉलरशिप घेऊन डॉक्टर होत आहे. तिचे प्रोफाईल खरंच दण्दणीत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
र
रुपी गुरुवार, 07/27/2017 - 00:51 नवीन
ओळखीतल्या बर्‍याच मुलांच्या बाबतीत सध्या हे पाहिलंय.. त्यावरुन तरी मला वाटतं, मुलींच्या (आणि मुलांच्याही) अवास्तव अपेक्षा हा प्रश्न एखाद्या समाजापुरता, जातीपुरता मर्यादित नाही. फार लिहायला वेळ नाही, म्हणून तुमच्या प्रश्नाबद्दल लिहिते. तुम्ही जे उपाय सुचवलेत त्यात २-५ इथे फार काही उपयोगी नाहीत. समाजप्रबोधन कधी करणार आणि लोक कधी बदलणार, त्याने तुमच्या मित्रांना आत्ता तरी काही फायदा नाही. उपाय १ बद्दल - भौगोलिकदृष्ट्या मागासलेले भाग दुसर्‍या राज्यातच का शोधायचे समजले नाही. महाराष्ट्रातही छोट्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये मुली शोधता येतीलच. शिवाय, वर लिहिलेल्या काही गोष्टी - "मित्र सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत. बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत. वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्‍याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्‍या करणार्‍या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत." मला वाटते बरेच मिसमॅच इथेच आहे. कोणती शहरे चांगली वगैरे वाद सुरु करायचे नाहीत. पण पुणे-नाशिक आणि सांगली, कोल्हापूर या भागांत वातावरणात फार फरक आहे. ही सर्वच शहरे मोठी असली तरी पुणे-नाशिक यासारख्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर नोकरी करणार्‍या मुली दुसर्‍या शहरात जाणार म्हणजे नोकरी सोडावी लागणार, मग त्या इतर बाबतींत जास्त अपेक्षा साहजिकच ठेवत असणार. या मुलांची वये उलटून चालली आहेत म्हणत आहात तर मुलींनी कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात वगैरेपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांवरुन कोणत्या आर्थिक, सामाजिक इ.इ. परिस्थितीतली स्थळे जास्त सूटेबल आहेत ती शोधणे हे जास्त महत्त्वाचे आहे. जर संस्थांमध्ये फार स्थळे सापडत नसतील तर लोकांशी बोलूनही स्थळे शोधावीत. भारतात आपल्याला बरेच ओळखीपाळखीतले लोक अमुक अमुक स्थळ सुचवतात ते आवडत नाही, पण खरं तर हा मोठा प्लस पॉइंट आहे. सर्वांनाच काही स्वतःची लग्ने जमवायला जमत नाहीत आणि संस्थांमध्ये, मॅट्रीमोनी साइट्सवर सर्व स्थळे नसतात. नात्यातल्या काही मुलांची मध्ये लग्नं झाली तेव्हा त्यांनाही अश्या अडचणी आल्यात. मुलगा पुण्यातलाच हवा (नगर, सांगली इ. नको), किंवा निदान पुण्यात स्वतःचा फ्लॅट तरी हवा, शिकलेला हवा (व्यवसाय करणारा पण बी.कॉम. शिकलेला नको), मोठे कुटुंब नको, अश्या बर्‍याच मुलींच्या अपेक्षा होत्या. आणि सध्याचे मुलींचे दर हजारी प्रमाण कमी वगैरे कारणांमुळे या मुलांच्या नातेवाइकांनीही खूप वर्षे वाट न पाहता लवकरच वधूसंशोधन सुरु केले. मुलीचे रंगरुप, आर्थिक परिस्थिती इ. गोष्टींना महत्त्व न देता मुलीचा आणि घरच्यांचा स्वभाव यालाच महत्त्व देऊन कुठे ना कुठे तडजोड करुन लग्न जुळवले. (तडजोड या अर्थी म्हणत आहे की, एकांना वाटत होते की मुलीकडचे खूप पैसेवाले असावेत वगैरे, पण आधी ठरलेल्या एका स्थळात काहीतरी अडचण आल्यावर त्यांनी ती अट सोडून दिली.)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 07/27/2017 - 04:11 नवीन
महाराष्ट्रात बराच शोध घेतलाय.अगदी उस्मानाबाद,बीड,चंद्रपूर,धुळे अशा तुलनेने मागास ठिकाणीही शोधलेत.पण तिथल्या मुलींना तिथला किंवा बाजूच्या जिल्ह्यातला मुलगा हवा किंवा या जिल्ह्यातल्या मुली नोकरीसाठी पुणे,मुंबई,नागपूर गाठतात.त्यामुळे त्यांनाही तिथलाच मुलगा हवा असतो. कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर ही शहरेही हळूहळू सुधारत आहेत.लग्न झाल्यानंतर मुलींना इथेही जॉब मिळू शकतो.अगदी पुण्या-मुंबई-नाशिकएवढे पगार नाही मिळणार.पण पुण्या-मुंबईसारखी टोकाची दगदग इकडे नाही.हा फायदा मानावा का? शिवाय पुण्या-मुंबईतल्या नोकरीच्या अनुभवावर स्वतंत्रपणे एखादा व्यवसाय करु इच्छित असेल तरीही अशा मुलींना सासरच्यांकडून पाठिंबा मिळू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
उ
उपयोजक गुरुवार, 07/27/2017 - 04:18 नवीन
उपाय क्र २ बद्दल मिपावर माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. इथे वैद्यकिय क्षेत्रातले लोक आहेत.त्यांनी माहिती दिल्यास आभारी राहीन. ५ वा.प्रबोधनाचा मार्ग वापरल्यास निदान यानंतरच्या मुलांनातरी वेळेत वधु मिळेल अशी आशा आहे. आशावादी रहायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
य
योगेश लक्ष्मण बोरोले गुरुवार, 07/27/2017 - 01:47 नवीन
रुपी चे निरीक्षण बरोबर आहे. बर्‍याच समाजांमध्ये लग्न जुळण्याच्या व नंतर ते टिकुन राहण्याच्या समस्या दिसतायत. मग आंतरजातीय विवाह तरी कसे जुळणार व टिकणार? आमचा लेवा पाटिदार समाज त्या मानाने फार छोटा आहे. पण आमच्यातसुध्धा शेतकरी मुलांबरोबर समाजातील मुली लग्नाला तयार होत नाहीत. शहरातील थोड्या पगारावरील तरुण एकवेळ चालतो पण गावाकडील शेतकरी नको असतो. तर जास्त शिकलेल्यांमध्ये अवास्तव अपेक्षांमुळे वयं वाढली तरी लग्न जुळत नाहीत. समाजांचे विविध शहरांत भरणारे वधु-वर मेळावे व त्यांमध्ये जेष्टांनी केलेले समुपदेशन यांनी मला वाटते थोडा तरी सकारात्मक फरक पडावा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/27/2017 - 07:34 नवीन
आंतरजातीय विवाह तरी कसे जुळणार व टिकणार?
जातींचे अस्तीत्व नाकारण्याची हिम्मत दाखवली की आपोआप जुळून येऊ लागतील. सुशिक्षीतांचे विवाह टिकणे न टिकणे हे त्यांच्या स्वभाव आणि वैचारीकतेवर अवलंबून असणार त्याचा एकजातीय अथवा आंतरजातीय विवाहाशी संबंध असणे गरजेचे नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले
अ
अत्रे गुरुवार, 07/27/2017 - 04:27 नवीन
माझ्या मते ज्या मुलींची लग्ने होत नाहीत (काही समाजातील रूढींच्या पगड्यामुळे) अशा मुलींचा शोध घेऊन त्यांच्याशी जुळते का हे पहावे. शेवटी काहीहि असले तरी "सम:दु:खी" लोकच कम्पॅटिबल असतात असे मला वाटते. उदा. अनाथ आश्रमात वाढलेल्या मुलींच्या लग्नाच जमायला प्रॉब्लेम येत असतील - तर मग अशा मुलींचा शोध घेऊन त्यातल्या कोणाशी आले जमते आहे का हे त्या मुलांनी बघावे. पण असे करताना आपण कोणावर उपकार करत आहोत हे दाखवू नये/ अशी भावना मनात ठेऊ नये (ते कसे करावे हे माहित नाही, कोणाला यावर जास्त सांगता आले तर उत्तम)
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/27/2017 - 07:31 नवीन
कोणावर उपकार करत आहोत अशी भावना मनात ठेऊ नये
सहमत आहे. पुरो हा शब्द पुरोगामीत्वाचे दर्शक असेल तर, पुरोहीत मंडळींनी विधवा विवाहांचाही आणि सावरकर म्हणतात तसे आंतरजातीय विवाहाचा विचार करुन समाजापुढे आदर्श उभा करण्यात खरे तर पुढाकार घ्यावयास हवा. पुरोगामीत्व साधल्यास धागा लेखिकेला अपेक्षीत ग्लॅमर आपोआप येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
स
सिरुसेरि गुरुवार, 07/27/2017 - 13:21 नवीन
अत्रे व डॉ . खरे यांचे प्रतिसाद माहितीपुर्ण . + १०० .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
उ
उपयोजक गुरुवार, 07/27/2017 - 16:00 नवीन
लेखिका नाही लेखक आहे मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ए
एमी गुरुवार, 07/27/2017 - 06:06 नवीन
दोन वेगवेगळ्या प्रतिसादात आलेली वाक्य • आणि सध्याचे मुलींचे दर हजारी प्रमाण कमी वगैरे कारणांमुळे • ५ वा.प्रबोधनाचा मार्ग वापरल्यास निदान यानंतरच्या मुलांनातरी वेळेत वधु मिळेल अशी आशा आहे. यावरून पडलेले प्रश्न: • 20 आठवड्यानंतर गर्भपात करायचा नाही हा कायदा 1971चा. • सोनोग्राफी मशीन त्यानंतर आल्याने लिंगसापेक्ष गर्भपात 80च्या दशकात चालू झाले. म्हणून स्रीपुरुष गुणोत्तर गंडले. आत्ता 28 ते 35 वयातल्या मुलांची लग्न होत नाहीत यामागे हे गंडलेले गुणोत्तरदेखील एक कारण आहे असे काहीजणांना वाटते. • लिंगसापेक्ष गर्भपात करू नका म्हणून समाजजागृती 2000 नंतर चालू झाली. सोनोग्राफी मशीनना ट्रॅकर लावणे, डॉक्टरना शिक्षा करणे वगैरेदेखील गेले काही वर्ष चालुय. मग आता 0-5, 5-10, 10-15 या वयातील स्त्रीपुरुष गुणोत्तर काय आहे? • यानंतरच्या मुलांनातरी वेळेत वधु मिळेल अशी आशा योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 07/27/2017 - 17:19 नवीन
http://m.timesofindia.com/india/Sex-ratio-skew-worsens-with-age-Census-2011-data-finds/articleshow/22406192.cms या बातमीमधून Among children up to 15 years old, there are 1.8 crore fewer girls than boys — the sex ratio at 914 girls per 1,000 boys remaining the same as a decade ago. Among infants who are less than a year old, boys outnumber girls by about 9.55 lakh. But by six years, the difference increases to nearly 7 million (69 lakh). This is also described as a sex ratio of about 919 girls per 1,000 boys. The story doesn't end here. There is an appalling drop in the population of girls after that. The difference in the population of boys and girls aged seven to 15 years rises to nearly 11 million (1.1 crore). That's a sex ratio of 911 for this age group. सो प्रबोधन वगैरे करून काही फार फरक पडेल असे वाटत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
स
सुबोध खरे गुरुवार, 07/27/2017 - 07:12 नवीन
Image removed. वय आणि प्रजननक्षमता यांचा आलेख दिला आहे. हा फक्त स्त्रीबद्दल आहे. जी मुलगी उशिरा लग्न करते तिचा नवरा सहसा अजूनच जास्त वयस्कर असतो. त्यामुळे दोघांची मिळून प्रजननक्षमता अजून निम्म्याने येते. त्यातून उशिरा लग्न झालेली बरीचशी मुले आणि मुली मधुमेह किंवा लठठपण याचीही शिकार असतात. त्यामुळे प्रजननक्षमता बरीच कमी होते. करिअरच्या मागे लागल्यामुळे किंवा मते जास्त कणखर (RIGID) झाल्याने मुले आणि मुली सहजपणे तडजोड करीत नाहीत. त्यामुळे लग्नाला आधीच उशीर झालेला असतो. त्यातून अत्यंत धावपळीची आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे "माझ्या वाचनाप्रमाणे" स्त्रीच्या ३० वया नंतर ४० टक्के आणि ३५ वयानंतर ७० टक्के स्त्रियांना मूल होण्यासाठी वंध्यत्वावर उपचार घ्यावे लागतात. याची सांख्यिकी मिळाली कि देईनच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/27/2017 - 07:37 नवीन
वैद्यकीय हिशेब बरोबर डॉ. साहेब. पण आर्थीक गणितांच्या जुळणीचे काय करणार ? नव्या पिढीत बहुतेकांना विभक्त कुटूंब पद्धती हवी आहे. आणि रहाण्याच्या जागांच्या किमती वाढत्या लोकसंख्ये सोबत मागणी वाढून आभाळाला टेकत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/27/2017 - 08:32 नवीन
माहित गार साहेब माझे स्वतःचे १ बेडरूमचे घर माझ्या वयाच्या ३८ व्य वर्षी झाले. तो वर मी सरकारी( भाड्याच्या) घरातच राहत होतो कि. आणि आजकाल तर भाडी पूर्वीपेक्षा नक्कीच स्वस्त आहेत. जागेचे भाव आभाळाला भिडले आहेत हि वस्तुस्थिती. पण स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न करणे हि चूक आहे. पैसे किंवा मालमत्ता हि नंतर कमावता येते पण हातातून निसटून गेलेले वय परत येत नाही बरीच मुली सेट्ल झालेला मुलगाच पाहिजे म्हणून होतकरू तरुणांना नाकारतात आणि मग शेवटी सर्वच बाबतीत तडजोड करण्याची पाळी येते. आमच्या नातेवाईकांपैकी गडगंज पैसे असलेल्या बापाची एकुलती एक मुलगी. तिने केवळ स्वतःचे घर नाही म्हणून एका सर्वच तर बाबतीत चांगल्या असलेल्या मुलाला नकार दिला.( पत्रिका पासून सर्व गोष्टी जुळत असून मुला- मुलींची पसंती झाली तरीही) हा मुलगा सी ए होता. पुढे त्याने भरपूर पैसे कमावले लग्न करून सुस्थितीत आहे आणि हि मुलगी आता पन्नाशीला आली अविवाहितच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 07/27/2017 - 08:48 नवीन
आणि आजकाल तर भाडी पूर्वीपेक्षा नक्कीच स्वस्त आहेत.
हे माहित नव्हते, अशीच इतरांचीही माहिती आहे का ? सिए किंवा प्रोफेशनल कोर्स झालेला मुलगा स्वतःचे घर नाही म्हणून नाकारणे सामान्य ज्ञानाचा अभाव दर्शवते किंवा वर वरचे सांगोपांगी कारण असावे. बाकी या धागा लेखात चालू विषय तगडे प्रोफेशनल क्वालीफीकेशन अथवा तगडा जॉब नसलेल्या मुलांबाबत आहे. त्यांच्या दृष्टीनी घरभाड्यांचा आर्थिक हिशेब महत्वाचा असावा आणि विभक्त कुटूंब सांभाळण्याच्या दृष्टीने गणित त्यांच्या साठी किती सहज साध्य असेल हे माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा