विक्री पश्चात सेवा आणि त्रास
आजकाल विक्री पश्चात सेवा असे काही शिल्लक आहे का हो ? कोणतीही वस्तू घ्या , जोपर्यंत पैसे विक्रेत्याच्या हातात पडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या मुखात साखर पेरलेली असते . जेंव्हा का पैसे त्यांच्या खिशात पडले कि त्यांची तोंडे झालीच वाकडी . सेवा देण्याचा नुसता बहाणा करतात. हे अगदी सर्व क्षेत्राला लागू होतंय . अगदी छोट्या सेवांपासून मोठ्या सेवापर्यंत . बिल्डर तर याचे सर्वात उत्तम उदाहरण आहेत . सेवेची दोन वर्षे बिल्डर आज करतो उद्या करतो म्हणून घालवतात मग म्हणतात दोन वर्षापर्यंतच सर्विस द्यायची असे तुमच्या कागदपत्रात लिहिलंय. मग ते घर गळायला लागूदे किंवा सर्व नळ , स्विच खराब होवूदेत . बिल्डरांच्या इतकी (म्हणजे त्यांच्या ऑफिसात बसलेल्या माणसांची ) निरडावलेली कातडी गेंड्याची पण नसेल.
तेच जिम चे , पर्सनल ट्रेनर च्या किमती अव्वाच्या सव्वा असतात आणि त्यांच्या जवळ उपलब्ध असणारी साधने तर विचारायलाच नको , त्यातली कमीतकमी रोज एक मशीन तरी बिघडलेलेच असते . पुन्हा तो ट्रेनर जिम सोडून गेला तर आपल्याला वाली नाहीच . पैसे आदीच वर्षाचे घेतलेले असतात मग बाकीच्या प्रशासनाला काही देणे घेणे नसते . दुसरा ट्रेनर घ्या नाहीतर येऊ नका त्यांना काहीही फरक पडत नसतो .इति जिम पुराण ...
पाणी म्हणजे जीवन , त्यात रिस्क घ्यायला नको म्हणून आपण पाणी शुद्ध करणाऱ्या मशीनबद्दल सहज चौकशी करतो. सेल्समन टाय , सूट , बूट घालून येतो . मशीनची माहिती देतो . तुमचे बजेट विचारतो , पाणी बोअर चे का कार्पोरेशन चे विचारतो . स्वतः फक्त पाणी चेक करतो पण त्यात काय बघतो हे सांगत नाही. आपण सांगितलेल्या उत्तराप्रमाणे तो हे मशीन घ्या सुचवतो . पण पाण्याचा टीडीएस किती आहे , तो तुम्हाला किती कमी करायचा आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला कोणते मशीन घेणे इष्ट ठरेल असे सांगणे त्याच्या गावीही नसते . शिवाय तुम्हाला पाणी पुरवणारा माणूस कसा कार्पोरेशनचेच पाणी बाटलीत भरून तुमची फसवणूक करतोय हे तो सांगायला विसरत नाही . सर्व ऐकून आपण थोडीफार खोलात माहिती विचारलीच तर काहीतरी थातुर मातुर सांगून ते मशीन गळ्यात मारण्याचे कसब त्याला मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात शिकवलेले असतेच . तो त्याचा पुरेपूर उपयोग करतो . आपण चेक जमा करोपर्यंत तो अगदी आपल्याशी गोडीगुलाबीने बोलतो . मशीन यायला पुढचे चारपाच दिवस आपण त्याला फॉलोअप करायचा , मग तो आज येईल , उद्या येईल, इकडे अडकलय , तिकडे अडकलय असे सांगत राहतो. यथावकाश मशीन लावणारा येतो , तो लावतो . तो स्वतःच पाणी चेक करतो. आपण विचारलेच तर ७०-८० टीडीएस येतोय , अजून कमी येईल असे बिनधिक्कत सांगतो . आपण उत्साहाने पाणी पिऊन बघतो . अरेच्चा पाण्याची चव तर बोअरच्याच पाण्यासारखी लागतिय मग पुन्हा त्या सेल्समनला फॉलोअप . त्याची टीडीएस कमी येईल हो ह्याची ग्वाही . आपण दोन दिवस वाट पाहून खुप कारवादलो कि त्याची कंप्लेंट करा अशी माहिती देणे . मग कंपनीचा माणूस येऊन चेक करायला अजून दोन दिवस .पुन्हा हे बदल, ते बदल असे करत करत मग तो सांगतो कि , मशीन बिघडलेले आहे , ५००+ टीडीएस येतोय . (आदींच्या मशीन बसवणाऱ्याने आपल्याला ७०-८० टीडीएस येतोय ये बिन्धिक्कत खोटं सांगितलेले असते ). मग पुन्हा नवीन मशीनसाठी कंपनीला रिक्वेस्ट . आता पुनः कमीतकमी आठ दिवस ते मशीन येत नाही. ते येते, ते हि आपला तोंड फुटेस्तोवर फॉलोप घेऊन सेल्समन ला शिव्या घातल्यावर.
एवढे करून आपले नशीब फळफळले असे अजिबात समजायचे नाही , कारण महिन्याभरातच मशीन लाल लाईट दाखवते . आपण कंप्लेंट रिक्वेस्ट पाठवायची मग तो येतो पुन्हा मेम्ब्रेन बदलायला लागेल अजून काय बदलायला लागेल असे सांगतो त्याची किंमत जवळपास २५००+८५० असते . ३३००रुपयात किती पाणी विकत आले असते ? पण आता हात चोळण्याशिवाय काहीही हाती नसते . १८००० ची मशीन तुम्हाला कशी स्वस्तात आहे हे तो कसे पटवून देतो हे आठवून आपण सेल्समनला फोन केल्यावर तो म्हणतो, तुमच्या इथले पाणी खूपच खराब आहे हो. ... इति पाण्याची मशीन ...
अशीच गत त्या यामाहाच्या फज २५ ची , एवढी किंमत देऊन ऍक्सेसरीज काय मिळतील विचारल्यावर - गार्ड, कव्हर आणि कायकाय मिळेल म्हणाला पण पैसे मिळाल्यावर ऍक्सेसरीज मिळतच नाहीत म्हणे . खूप फॉलोप करून , भांडून झाल्यावर ती बाई म्हणे कोणी सांगितले तुम्हाला ऍक्सेसरीज मिळतील, आमचे मालक आता चेन्नईला गेलेत त्यांना विचारून सांगतो आणि काय काय बरळायला लागली . शेवटी यामा कंपनी कडे तक्रार करून झाल्यावर तिने कोठून तरी लोकल मार्केट मधून गार्ड बसवून दिले , बाकी गेले ....
असेच त्या इनडोअर फर्निचर वाल्याने पण बेड दिला पण त्याच्या आतला प्लाय तद्दन टुकार आणि हलक्या प्रतीचा होता . घरात फर्निचर आल्यावर तो म्हणे असाच आलाय कंपनीकडून . दुसरा बदलून नवीनच बेड द्या तरीही नाही ... अजून अशी खूप उदाहरणे आहेत ,त्यात प्रामुख्याने ब्रॉडबँड सर्विसेस आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील , ह्यावर काय उपाय आहे - ग्राहक पंचायतीकडे जाणे हा उपाय आहे पण वेळ कोणाला आहे ते सर्व करायला ? वैताग आलाय नुसता ... ह्या सर्व विक्रेत्यांना लगाम लावायला नक्की कोणते उपाय करायला हवेत ?
प्रतिक्रिया