ब्राह्मण्य म्हणजे काय ? चर्चा संजय सोनवणींच्या मतांची ..
नमनाला घडाभर;
२०व्या शतकातील विचारमंथन आणि प्रबोधन पुस्तकांच्या दोन एक हजार निघणार्या प्रती, प्रत्येक प्रतीमागे अधीकतम दहा वाचक धरले आणि प्रत्येक विषयावर पाच पुस्तके धरली तरी प्रती विषय एखाद लाख प्रतीच्या पलिकडे जात नव्हते. एकाच विषयावरची पाचही पुस्तके वाचली गेली असेही कमी होत असेल. नाही म्हणायला वृत्तपत्रे आणि सभांमधून संबोधीत करणारी वक्ते मंडळी यांची पोच दहापट धरली तरी प्रती विषय दहा लाख लोकांपर्यंत एखादा विषय पोहोचू शकतो. शालेय पाठ्यपुस्तकांनी काही प्रमाणात काम केले तरी वृत्तपत्रे काय किंवा पाठ्यपुस्तके काय एखाद्या विषयाचा पाच-दहा पुस्तकातील सांगोपांग दृष्टीकोण समस्त जनते पर्यंत पोहोचवू शकतात असे होत नाही. २१ वे शतक आले तेच आंतरजालाचे नवे माध्यम घेऊन ज्यात माहिती उपलब्धता अधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सामार्थ्य असले तरी २०व्या शतकातील ग्रंथात बंधीस्त वैचारीक मंथन आंतरजालावर विवीध कारणाने मुक्तपणे आज तागायतही पुर्ण पणे उपलब्ध दिसत नाही मग - हि एक प्रकारे आंतरजाल हाती असूनही माहितीज्ञान पोकळी आहे, त्यामुळे ज्या विषयांचा २०व्या शतकातच निकाल लागलेला आहे असे काही विषय २१व्या शतकातही आपण मिपा आणि समाजमाध्यातून चघळताना दिसतो. पण 'आलीया भोगासी असावे सादर' अशी एक म्हण आहे. असो.
चर्चा विषयाच्या मुद्याकडे
मनुस्मृती बद्दल शरदजींच्या धागा मालिकेमुळे एक चर्चा पार पडली, मराठी आंतरजालातील तेवढीच चर्चा आणि माहिती पोकळी भरुन निघाली. त्या चर्चेतील अरविंद कोल्हटकर, गापै या सदस्यांतील चर्चेमुळे 'ब्राह्मण्य' या शब्दाकडे लक्ष गेले. ब्राह्मण्य आणि 'वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार" ह्यावर टिका होताना दोन्ही साधारणतः एकच धरले जातात, टिकेला प्रतिसाद देणारेही दोन्ही एक आहेत असे समजतात असे काही आहे का ? मराठी आंजावर शोध घेताना संजय सोनवणींचा एक लेख सापडला ज्यात त्यांनी 'ब्राह्मण्य' आणि 'वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार" यात फरक करण्याचा रोचक प्रयत्न केला आहे.
संजय सोनवणींना सरसकट नाकारणारी मंडळी आहेत -काहीजण संजय सोनवणींच्या काही राजकीय अतटस्थतेच्या मर्यादा काही आधार नोंदवण्याबाबत साशंकतांमुळे त्यांच्यावर टिका करतात पण बरेचजण असेही आहेत जे त्यांच्या वैचारीक भूमिकेतला काही ना काही भाग आपल्या सोईचा नसल्यामुळे नाकारत असावेत - प्रमाण लेखन शैलीस न अनुसरण्याची त्यांची माझ्या प्रमाणे असलेली भूमिकाही काही जणांना खटकत असावी, त्यांचे सर्वच लेखन तटस्थ असते अथवा त्यांचे सर्व संदर्भ साधार असतातच असे नसावे पण त्यातल्या त्यात एका वेगळ्या तार्कीक भूमिकेतून पहाणारे लेखक म्हणून त्यांना पहाता येते आणि प्रस्तुत विषयातील 'ब्राह्मण्य' आणि 'वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार" यात फरक करण्याचा प्रयत्नाचा लेखा जोखा या निमीत्ताने घेतला जावयास हवा असे वाटते.
कॉपीराईट समस्यांमुळे त्यांचा ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा हा सबंध लेख इथे क्वोट करणे शक्य नाही पण त्याबाबत चर्चेच्या ओघात टिका टिपण्णीकरत क्वोट करणे शक्य असावे.
चर्चेसाठी त्यांचे काही मुद्दे हायलाईट करतो पण त्यांचा ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा मूळातून वाचणे अधिक श्रेयस्कर असावे. त्यांची सर्वच मते मला पटलेली आहेत असे नाही त्यामुळे त्यांच्या सर्व मतांना मला या चर्चेत डिफेंड करता येईल असे नाही. आणि ते मिपावर नसावेत म्हणजे ते स्वतःही डिफेंड करतील असे नव्हे. पण त्यांच्या विचारांचा जमेल तेवढा उहापोह करण्यास हरकतही नसावी.
ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा लेखक संजय सोनवणी
ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद हे आज चर्चेचे विषय झाले आहेत. या तीनही बाबी एकच आहेत म्हणुन त्या तिरस्करणीय आहेत असा आक्षेप नोंदवला जातो. ब्राह्मण्यवादाचा "संसर्ग" इतर जातीयांनाही होवु लागला आहे असेही म्हणण्यात येते. यावर ब्राह्ह्मण समाजाचा आक्षेप आहे असे दिसते. ब्राह्मण्य हा जणु काही एक रोग आहे असा अर्थ त्यातुन निघतो, त्यामुळे काही ब्राह्मणही "मी ब्राह्मण आहे पण बाह्मण्यग्रस्त नाही" असे म्हणु लागतात. खरे तर ही एक विपरीत स्थिती आहे आणि त्यावर चर्चेची निकड आहे.अशी त्यांच्या भूमिकेची सुरवात आहे.
"ब्राह्मण" हा एके काळी फक्त वर्ण होता. "जो मंत्र रचतो तो ब्राह्मण" ही ऋग्वेदाची व्याख्या आहे, मग त्याचा अन्य व्यवसाय काहीही असो. उपनिषदांच्या द्रुष्टीने पाहिले तर "ज्यालाही ब्रह्माचे द्न्यान आहे तो ब्राह्मण." महाभारतात युधिष्ठीराने " ज्याच्या अंगी द्न्यान, भुतदया, शील, क्षमा इ. गुण आहेत त्याला ब्राह्मण म्हणावे." अशी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. पौराणिक व्याख्या पाहिली तर "जो ब्राह्मण मातापित्यांच्या पोटी जन्माला आला आहे, उपनयन झाले आहे, ज्याने वेदाध्ययन केले आहे, जो यद्न्यकर्म जाणतो तोच ब्राह्मण होय."संजय सोनवणींच्या मतानुसार ब्राह्मण शब्दाच्या व्याख्येस बहुतांश (ब्राह्मण) संपूर्णपणे कोणत्याही काळी पात्र होउ शकत नाहीत. लोकसंख्येच्या ५% दराने सुद्धा १९ माणसामागे एक ब्राह्मण होतो आणि मागणी पेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे केवळ पौरोहीत्यावर बहुसंख्य जन्माने ब्राह्मणांचा उदर निर्वाह कोणत्याही काळी शक्य नसतो, त्यांना वेगगवेगळे व्यवसाय पत्करावेच लागतात, वर्तन विषयक अटींची संख्यापण खूप मोठी आहे; ज्यातील अनेक व्यवसाय ब्राह्मणपणाच्या वेगवेगळ्या ग्रांथीक व्याख्यांनुसार त्यांना ब्राह्मण म्हणून घेण्यास तांत्रिक दृष्ट्या अपात्र ठरवत असतात . सोनवणी त्यांच्या लेखाच्या ओघात म्हणतात "...पण जर इतिहास पाहिला तर असे दिसते की ब्राह्मणांनीच या स्म्रुती धाब्यावर बसवल्या..." आणि त्याची ते काही उदाहरणेही देतात.
सोनवणी पुढे म्हणतात ....थोडक्यात वर्णाश्रमाचे स्वत: कोनतेही नियम पाळायचे नाहीत आणि वर वैदिक संस्क्रुतीचा टेंभा मिरवीत सांस्क्रुतीक वर्चस्ववाद गाजवण्याचा प्रयत्न करायचा यालाच सध्या "ब्राह्मणवाद", माझ्या मते याला वैदिकवाद म्हणतात. वैदिकवाद म्हणून त्याचा ब्राह्मण्याशी संबंध नाही, कारण वैदिक असल्याची श्रेष्टा ते मनोभावे जपत असले तरी ब्राह्मण या वैदिक संज्ञेपासून, ज्या स्म्नृतींचा ते गौरव करतात त्या स्मृत्यांपासून त्यांचे व्यावहारिक आचरण कधीच तडीपार झालेले आहे.
सोनवणी पुढे म्हणतात ....त्यामुळे "ब्राह्मण" आणि "ब्राह्मण्य" हा खरे तर कळीचा मुद्द बनण्याचे काहीएक कारण नाही. परंतु जन्माधारीत जात म्हणुन पाहिले तर ब्राह्मण हे ब्राह्मणच आहेत, परंतु त्यांचे वर्ण म्हणुन आजचे स्थान काय हाही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जात म्हणुन ब्राह्मण असणे आणि वर्ण म्हणुन ब्रह्मण असणे यात मुलभुत फरक आहे आणि तो फरक खुद्द ब्रह्मण समाजालाच न समजल्याने हा घोटाळा झाला आहे. ...पण ज्याअर्थी तो घोटाळा झाला आहे त्या अर्थी ब्राह्मणपक्षांची काहीतरी गफलत होते आहे. म्हणजे वैदिक वर्णाधारित अर्थानेही आम्ही उच्च...आणि जात म्हणुनही उच्च असा काहितरी ग्रह झाला आहे.परंतु, प्रश्न असा आहे कि ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात भेद करता येइल काय? असा प्रश्न उपस्थीत करत ब्राह्मण्याची कड घेता येईल अशी व्याख्या देतनाचा कडक टिकाही सोनवणी पुढील प्रमाणे करताना दिसतात.
....ब्राह्मण ही जात मानली आणि केवळ एक जात म्हणुन तिच्याकडे पहायचे ठरवले तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वैदिक अर्थाने वेगळे आहे असे म्हणता येइल. जो धर्माचा पुरोहीत आहे, जो समाजाच्या पारलौकिक हिताची काळजी वाहतो त्या ब्राह्मणात ब्राह्मण्य आहे असे म्हनता येइल. किंवा जीही कोणी व्यक्ति समाजास द्न्यान देण्यासाठी कटीबद्ध आहे, वा संस्क्रुतीत मोलाची भर घालत आहे अशा व्यक्तींतही ब्राह्मण्य आहे असे म्हणता येइल. त्या अर्थाने ब्राह्मण्य हे आदरार्थीच घ्यावे लागेल. खरे तर आजचे बव्हंशी ब्राह्मण असे धर्मोक्त/वेदोक्त ब्राह्मण्य पाळत नाहीत आणि तरीही श्रेश्ठत्वाच्या व वैदिक वर्चस्वतावादाच्या भावना बाळगतात म्हणुन ते निंदेस पात्र झाले आहेत असे म्हणावे लागेल.
सोनवणी पुढे म्हणतात ..."ब्राह्मणवाद" हा वरील अर्थाने मान्य होवु शकत नाही. ब्राह्मणांवर होणार्या जहरी टीकेमागे मुळात ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याबाबत झालेली गफलत आहे. बाह्मण्याचा अस्त घडवुन आणत फक्त जन्माधारीत ब्राह्मण असण्याचा अहंकार बाळगत ज्याही कोणी ब्राह्मण विद्वानांनी वैदिक ब्राह्मणत्व श्रेश्ठत्वाचे डंके पिटले त्यातुन निर्माण झालेली ही अवस्था आहे... ..... त्या अर्थाने सर्वच जाती समान आहेत. पण त्या समान न मानण्याची कारणे वैदिक धर्मीय संकल्पनांत आहेत हे ब्राह्मणांनी लक्षात घेत पुढे यायला हवे. विषमतावादी सामाजिक तत्वज्ञान वैदिक धर्म देतो आणि तोच विषमतावादी विचार हिंदू समाजात घट्ट बसला आहे. त्यामुळे वैदिकत्व घेत श्रेष्त्वतावाद जपायचा कि ब्राह्मण ही अन्य जातींप्रमाणे एक हिंदू जात आहे असे समजत परस्पर जातीसन्मानाची भावना बाळगत, तसे वागत "सर्व जाती समान" या तत्वाप्रत येत सर्वच जातींचे एक दिवस विलयन होईल हे पहायला हवे.त्यांच्या लेखातील शेवटच्या परिच्छेदाशी पूर्णपणे सहमत होणे कदाचित बर्याच जणांना जमणार नाही . त्यांच्या लेखातील शेवटचा परिच्छेद वाचण्या पुर्वी ते हिंदू = वैदीक अशी व्याख्या करताना टाळतात आणि शैव आणि शैवेतर अशा स्वरुपाचा त्यांचा वेगळा वाद त्यांनी त्यांच्या वेगळ्या पुस्तकातून मांडत, वैदीकपुर्व शैवत्वाची कड घेतलेली दिसून येते.
"सोनवणींच्या लेखातील शेवटचा परिच्छेद ...मला ब्राह्मण चालेल- ब्राह्मण्य नको...हे म्हणण्यापेक्षा वैदिक वर्चस्वतावादी जन्माधारित अहंकार नको अथवा वैदिकवाद नको असे म्हणायला हवे. कारण ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यात ब्राह्मण्याचे जन्मदातेही ब्राह्मण ठरतात. तेही वास्तव नाही. विषमतेची मुळे वैदिक तत्वज्ञानात आहेत. म्हणून ते तत्वज्ञान हिरीरीने प्रचारत बसण्यापेक्षा त्या तत्वज्ञानाचा त्याग महत्वाचा ठरेल. ...* संदर्भ संजय सोनवणींचा ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्सा Thursday, October 14, 2010 लेख https://sanjaysonawani.blogspot.in/2010/10/blog-post_14.html पत्त्यावर हा धागा लेख लिहिताना म्हणजे दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १२ वाजता जसा दिसला. * चर्चा सहभगा बद्दल आणि अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे आणि तथाकथित शुद्धलेखन भूमिकांची मांडणी टाळण्यासाठी आभार.
💬 प्रतिसाद
(51)
च
चौकटराजा
गुरुवार, 10/26/2017 - 16:24
नवीन
भारतीय राज्य घटनेतच जात हे वास्तव एच टू ओ म्हण्जे पाणी या सारखे स्वीकारणे हे अब्राह्मण्य आहे. म्हणजे माझी ब्राह्म्हण्याची व्ख्याख्या स्पष्ट होईल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2