एक्सपायरी डेट.
रेशमी साड्यांच्या बासनात
मोरपिशी साडीच्या घडीत
अलगद ठेवलेलं, ते पत्र..
तिथून बाहेर नाही काढत कधी
हलकेच चाचपडते अधूनमधून
त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे...
त्यातला शब्दंशब्द पाठ आहे
लिहून खोडलेला ,
पाण्याने पुसटलेला...
किती मिनतवा-या. हट्ट,
रुसवे फुगवे काय अन् काय
हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी..
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं,
(नव्हतं तेच जास्त खरंतर)
ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव
(ते तेव्हांही खटकलेलं थोडं)
एका अधमु-या नात्याची एकमेव खूण..
का कोण जाणे पण आज अचानक वाटलं,
हर रिश्ते की एक उमर होती है तशी,
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?असायला हवी खरतर. लेट गो करणं सोपं नसतं पण आवश्यक असतं. कविता आवडलीच.