मागचा जन्म!
काही वेळा आपण आपल्या जीवनात येणार्या समस्यांसंदर्भात ज्योतिषीय मार्गदर्शन घेताना ज्योतिषांकडून मागच्या जन्माचा संदर्भ बर्याचदा वापरला जातो.ज्योतिषशास्त्रावरच्या बर्याचशा पुस्तकांमधेदेखील या पूर्वजन्माचा उल्लेख बर्याचदा असतो.
बरेच प्रयत्न करुनही जातकाला एखाद्या गोष्टीत हवं तसं यश मिळत नसेल किंवा जातकाचं अपत्य अपंग असेल,अपत्य कटकटी असेल किंवा एखादा गंभीर आजार असेल तर "मागील जन्मातल्या इच्छा अपूर्या राहिल्या असल्याने किंवा मागील जन्मी काहीतरी पाप केल्यामुळे आताच्या जन्मात हा त्रास भोगावा लागतोय" हे कारण बर्याचदा सांगितलं जातं.शिवाय ही पूर्वजन्माची थेअरी बरेच ज्योतिषी मानतात.काही ज्योतिषी तर विज्ञान/तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतलेले आहेत.तेही यात मागे नाहीत.
तर खरंच हा मागचा जन्म असतो का? काहीजणांना मागच्या जन्मातल्या काही घटना,ठिकाणं आठवतात म्हणे.पण या घटना काहीजणांनाच का आठवतात? अगदी ती पास्ट लाईफ रिग्रेशनची थेरपी जरी दिली तरी सर्वांना मागचा जन्म आठवत नाही.याचं कारण काय?
ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्यापैकी येतो.
उदाहरणार्थ,
१.धनु राशीचा जातक बर्यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.
२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.
३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.
४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.
५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.
६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.
७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.
८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!
९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.
१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)
"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर सर्रास भाकित चुकलं पाहिजे.पण वरच्या बर्याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते खरं असावं हे पटतं.
पण पूर्वजन्माचे मात्र असे मोठ्या प्रमाणावर प्रत्यय येत नाहीत. जगाची लोकसंख्या ८ अब्ज धरली तरी किमान ६ अब्ज लोकांना तरी आपला पूर्वजन्म का आठवू नये? किंवा ती ८४ लक्ष योनींची थेअरी मान्य केली तरीही किमान २ अब्ज किंवा काही करोड लोकांना तरी पूर्वजन्म आठवायला हवा. पण पूर्वजन्म ज्यांना आठवतो त्यांची संख्या तुलनेने नगण्य म्हणावी एवढीच आहे.
विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी अशाच प्रकारच्या अतींद्रिय गोष्टींचा विज्ञानाच्या मार्गे उलगड्याचा थोडा प्रयत्न केलाय.त्यासंदर्भाने लिहिलेल्या 'संभव-असंभव' या पुस्तकात पूर्वजन्म आठवण्याला 'देजा व्हू' असं म्हटलं आहे.या नुसार आपण पूर्वी या ठिकाणी आलोय.इथल्या काही लोकांना भेटलोय असे भास होणं हे यामागचं कारण सांगितलंय.
आता या काथ्याकूटाचा फायदा काय? असाही प्रश्न पडला असेल तर पूर्वजन्म वगैरे नसल्याचे फायदे बघा.
१. पूर्वजन्म नसेलच तर ज्योतिषशास्त्रातून तो विषय वगळून योग्य दिशेने संशोधन करता येऊ शकतं. पूर्वजन्माची आभासी खुंटी पकडावी लागणार नाही.
२. मागच्या जन्माचं पाप म्हणून होणारी बतावणी आणि त्या अनुषंगानं येणारी धार्मिक कृत्ये,कर्मकांड यांना आळा बसेल.(आणि याचं प्रमाण खुप मोठं अाहे.निदान हिंदू धर्मात तरी!)
किंवा पूर्वजन्म असतो हे मान्य केल्यास त्याचेही फायदे बघा.
१. अनैतिक,समाजाच्या दृष्टीने हानीकारक वर्तन करणारे लोक,गुन्हेगार,राजकारणी हे सुध्दा कधी ना कधी ज्योतिषाकडे जातात.त्यांच्या गैरकृत्यांना काही प्रमाणात आळा घालण्यासाठी याचा उपयोग करता येईल.(अतर्क्य किंवा कायच्या काय वाटलं तरी अपेक्षा करायला हरकत नसावी.)
२.कोणी बघितलाय मागचा जन्म? असला,नसला काय फरक पडतो? सध्याच्या जन्मावर फोकस करा राव! वाट्टेल त्या मार्गानं रग्गड पैसा कमवा.त्या जोरावर कसंही वागा.हवं ते खा,प्या मजा करा.जिंदगी ना मिलेगी दोबारा असं म्हणून काहीजण स्वैराचाराचा परवाना मिळाल्यासारखे वागतात.त्यालाही पायबंद बसेल.
पूर्वजन्म आणि ज्योतिषशास्त्र यांची तुलना करता ज्योतिषशास्त्र हे बर्यापैकी प्रत्यय येणारं आहे.भारतातले बरेचसे प्राचीन गणितज्ञ हे ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक होते.तरीदेखील ज्योतिषशास्त्र हे थोतांड म्हणणार्यांची संख्या कमी नाही.पण पूर्वजन्माची उदाहरणे नगण्य असूनही त्याला मात्र थोतांड म्हणणारे फार कमी लोक आहेत.
असेलच मागचा जन्म तर तो सगळ्यांना/बहुतांश जणांना का आठवत नसावा?पूर्वजन्म सगळ्यांनाच आठवला तर ते त्रासाचं होईल वगैरे म्हणण्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही.कारण आपल्या सध्याच्या आयुष्यातील वाईट घटनासुध्दा आपल्याला आठवतातच की!
तळटीपा
१.सदर धाग्याचा विषय दशक्रिया सिनेमा आणि त्याला होणारा विरोध इकडे वळवून धागा भरकटवू नये.
२. माझा मागचा जन्म अमुकतमुक होता वगैरे गंमतीची विधाने करुन वेळ आणि धाग्याची लांबी अकारण वाढवू नये.धाग्यावर गंभीर चर्चा अपेक्षित आहे.
तरीही इतर कोणीही संशय घेतला तरी मला जोपर्यंत त्यांची मांडणी संशयास्पद वाटत नाही तोपर्यंत मी तरी त्या संशयावर विश्वास ठेवणार नाही.सहमत. मी पुनर्जन्म या विषयावर खूप वाचलंय. डॉ. स्टीव्हनसंनपासून परमहंस योगानंद ते अगदी पु ना ओक यांच्या लेखनापर्यंत. रूढार्थाने मी नास्तिक आहे. मात्र तरीही पुनर्जन्म याविषयात रस आहे. जे साहित्य वाचलंय त्यात काही सामाईक मुद्दे असे आढळले: १. ज्या मुलांना आपला पुनर्जन्म आठवतो ती मुलं त्यांना बोलता येऊ लागल्यापासून साधारण सहा सात वर्षांची होईपर्यंत त्यांना मागील जन्माच्या गोष्टी आठवतात. नंतर ही मुलं हळूहळू मागच्या जन्माच्या गोष्टींबद्दल बोलायचे बंद करतात. २. पुनर्जन्माचा लिंगाशी संबंध नसतो. मागच्या जन्मी पुरुष असणारी व्यक्ती या जन्मी स्त्री म्हणून जन्माला येऊ शकते किंवा यांच्या उलटही होऊ शकते. ३. ज्या मुलांना आपला मागील जन्म आठवतो त्यातील बहुतेकांचा अपघाती किंवा हत्या होऊन मृत्यू झालेला असतो. ४. पुनर्जन्म झालेल्या व्यक्ती काही वेळा आपल्याच घरात जन्म घेतात तर काही वेळा मैलो दूर जन्म घेतात. यात निश्चित असा नियम नाही. ५. काही वेळा मागील जन्मी ज्या कारणामुळे मृत्यू झाला त्याच्या दृष्य खुणा शरीरावर चालू जन्मात दिसतात. ६. काही भारतीय लेखकांचे लेखन वगळता इतरांच्या लेखनात कुठे "अतृप्त आत्मा" किंवा "भूत योनी" असलं काही आढळलं नाही. आत्मा मागील जन्माचा मृत्यू आणि पुढील जन्म यातील संधिकाळात केवळ निरीक्षक असतो. ६. पुनर्जन्माच्या उदाहरणातील लहान मुले याआधीच्या जन्माविषयी इतर कुणीही माहिती न देता आपल्या पूर्वीच्या जन्मातील व्यक्ती, ठिकाणे आणि खाणाखुणा ओळखतात. हे निष्कर्ष नाहीत. मी गेल्या चार पाच वर्षात पुनर्जन्मावर जे लेखन वाचले त्यातील काही सामाईक मुद्दे आहेत.