Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंदिरा गांधी जन्मशताब्दी

ग
गॅरी ट्रुमन
Sun, 11/19/2017 - 05:08
🗣 93 प्रतिसाद
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जन्मशताब्दी आहे.त्याबद्दल त्यांना अभिवादन. 1 या निमित्ताने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात लिहितो. एक भारतीय म्हणून मला वाटते की त्यांची कारकिर्द भारतासाठी संमीश्र होती. म्हणजे त्यांनी देशासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या आणि काही वाईट गोष्टीही. चांगल्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी देशाला एक कणखर नेतृत्व दिले. १९७१ मध्ये रिचर्ड निक्सन-हेनरी किसिंजर या जोडगोळीच्या धमकावणीला अजिबात धूप न घालता त्यांनी समर्थपणे देशाचे नेतृत्व केले आणि पाकिस्तानविरूध्दच्या युध्दात विजय मिळवून दिला. पोखरणमध्ये १९७४ मध्ये पहिली अणुचाचणीही इंदिरांनीच घडवून आणली. तसेच नेहरूंच्या काळात भारताचे परराष्ट्रधोरण काहीसे स्वप्नाळू होते. ते तसे न ठेवता त्याला वास्तविकतेची जोड इंदिरांनी दिली. १९८३ मध्ये सियाचीनमध्ये पाकिस्तानी सैन्य पोहोचायच्या आत त्यांनी भारतीय सैन्याला तिथे जायचा आदेश दिला. तेव्हापासून आजपर्यंत सियाचीनमध्ये आपले सैन्य पाकिस्तानी सैन्यापेक्षा अधिक उंचीवर आहे आणि त्याचा आपल्याला फायदा मिळत आलेला आहे. त्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सी.सुब्रमण्यम यांना कृषीमंत्री म्हणून नेमले. सुब्रमण्यणम यांनी एम.एस.स्वामीनाथन, बी.शिवराम आणि नॉर्मन बोरलॉग या तज्ञ सल्लागारांच्या मदतीने पावले उचलली, महत्वाचे निर्णय घेतले आणि १९७० च्या सुमारास भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. इंदिरांनी काही वाईट गोष्टीही केल्याच होत्या. १९८० च्या दशकात पंजाब आणि आसामचा प्रश्न उग्र झाला. पंजाबच्या प्रश्नात तर त्यांच्या सरकारने केलेल्या काही चुकांमुळे जरनेलसिंग भिंद्रनवालेला फायदा झाला.त्यानंतर ८-१० वर्षे पंजाबची जखम भळभळत होती. पंजाबमध्ये दहशतवाद थंडावे पर्यंत हजारो लोक मारले गेले. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैसे खर्च करणे आणि म्हणून भ्रष्ट मार्गांचे अवलंब करणार्‍यांकडे कानाडोळा करणे या वाईट प्रकाराची सुरवात इंदिरा गांधींनी केली. न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ करून आपल्या सरकारला रूचणारा निर्णय देणार्‍या न्यायाधीशांना सेवाज्येष्ठता डावलून मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणे हा प्रकार इंदिरांच्या सरकारने एकदा नाही तर दोनदा केला. पंडित नेहरूंनी सुरवातीच्या काळात काही संस्थांचे पावित्र्य जपले होते त्याची पायमल्ली इंदिरांनी केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला समाजवादी वळण लावून अनेक उद्योगांमध्ये राष्ट्रीयीकरण करणे (बँका, कोळसा, पेट्रोलियम) हे प्रकारही इंदिरांनीच केले. त्यातून इंदिरांचा पंतप्रधानपदाचा काळ म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काहीसा 'स्टॅगनेशन' असलेला काळ ठरला. इंदिरांच्या काळाचे मूल्यमापन करताना आणीबाणीचा उल्लेख करायलाच हवा. आपले पंतप्रधानपद वाचविण्यासाठी इंदिरांनी आणीबाणी आणली. त्या काळात उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. लाखभर लोकांना अनिश्चितकाळासाठी तुरूंगात डांबले गेले, हजारो लोकांची सक्तीने नसबंदी करण्यात आली. संजय गांधीसारखे घटनाबाह्य सत्ताकेंद्र तयार झाले. आणीबाणी हा इंदिरांच्या पंतप्रधानपदावर मोठा कलंक होता हे नक्कीच. तरीही ही आणीबाणी आली त्या पार्श्वभूमीत विरोधकांची (विशेषतः जयप्रकाश नारायण आणि सहकार्‍यांची) भूमिकाही धुतल्या तांदळासारखी नक्कीच नव्हती. आणीबाणी आणली ही इंदिरांची चूक झालीच. पण त्याचबरोबर विरोधकांनी कोणत्या चुका केल्या याचा उल्लेख फार होताना दिसत नाही. १९८९ मध्ये नेहरूंची जन्मशताब्दी होती त्यावेळी मी शाळेत होतो. १९८८ च्या शेवटपासूनच नेहरू जन्मशताब्दीबद्दल अनेक कार्यक्रम आयोजित केले जायला सुरवात झाली होती. त्यावेळी वाटले होते की २०१७ मध्ये इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीला पण असेच होईल. पण त्यावेळी सत्तांतर झाले असेल ही कल्पना थोडीच होती :) असो. हा छोटेखानी लेख संपविण्याआधी एक गोष्ट लिहितो. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय आपल्या जीवावर बेतणार हे त्यांना चांगलेच माहित होते. तरीही तो निर्णय घेताना इंदिरा अजिबात डगमगल्या नाहित. आपल्या जीवावर बेतू शकेल असा निर्णय बेधडकपणे घ्यायला जबरदस्त जिगर लागते. ती जिगर इंदिरांमध्ये नक्कीच होती. अशा जिगरबाज नेत्याला अभिवादन. या निमित्ताने इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर साधकबाधक चर्चा व्हावी ही अपेक्षा. अशाप्रकारचे लेख लिहिताना नेहमी मी जितकी तयारी करून लेख लिहितो त्याच्या ५% तयारीही हा लेख लिहिताना केलेली नाही आणि हा लेख तसा घाईतच लिहिला आहे. इंदिरांच्या काळाचे व्यवस्थित मूल्यमापन करणारा लेख लिहायचा असेल तर किमान आठवडाभर आधी असा लेख लिहायला सुरवात करायला हवी. ती मी केली नव्हती. आणि आजच इंदिरांची जन्मशताब्दी असल्यामुळे आजच्या दिवशीच लेख येणे गरजेचे होते. यावर जर चर्चा अधिक रंगली तर एकेक मुद्द्यावर प्रतिसादात लिहिता येईलच. आजपर्यंत मी मिसळपाववर इंदिरांवर बरेच लिहिले आहे. तेच प्रतिसाद आधार म्हणून घेतले किंवा अगदी कॉपी-पेस्ट केले तरी चालतील :) तेव्हा इंदिरांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीविषयी तुमचे मत काय?
वर्गीकरण
चर्चा
राजकारण

प्रतिक्रिया द्या
22273 वाचन

💬 प्रतिसाद (93)
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/21/2017 - 08:52 नवीन
मोदी देखील ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती करत आहेत असे वाटते आहे.
यात एक फरक आहे. इंदिरा गांधींची १९६६ ते १९७७ ही पहिली टर्म आणि १९८० ते १९८४ ही दुसरी टर्म होती. या काळात इंदिराच पंतप्रधान होत्या. तर १९९८ ते २००४ या काळात एन.डी.ए चे सरकार असले तरी वाजपेयी पंतप्रधान होते आणि २०१४ पासून मोदी पंतप्रधान आहेत. म्हणजे आताचे सरकार दुसर्‍या नेत्याच्या नेतृत्वाखाली आहे. १९८० मध्ये सरकार त्याच नेत्याच्या नेतृत्वाखाली होते. दुसर्‍या नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार बनते तेव्हा तो नेता पहिल्या नेत्याच्या नेतृत्वाखालीलच टिम नेमेल असे नाही. निक्सन-फोर्डच्या मंत्रीमंडळातलेच सगळे रॉनाल्ड रेगनच्या मंत्रीमंडळात नव्हते. रेगन मंत्रीमंडळातले सगळे वरीष्ठ जॉर्ज बुशच्या मंत्रीमंडळात नव्हते. बिल क्लिंटनच्या मंत्रीमंडळातले सगळे ओबामांबरोबर नव्हते अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्याप्रमाणेच दुसर्‍या टर्ममध्येही त्याच नेत्याने आपली जुनी टिम कायम ठेवली पाहिजे असेही कोणते बंधन नाही. इंदिरांनी यशवंतराव चव्हाणांना परत मंत्रीमंडळात घेतले नाही यावरून हा मुद्दा निघाला म्हणून त्याचा उल्लेख केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
ल
लाल टोपी Mon, 11/20/2017 - 03:13 नवीन
चार फेब्रुवारी, १९८४ ला लंडनच्या भारतीय दूतावासातील अधिकारी रविंद्र म्हात्रे यांचे काश्मिर लिबरेशन फ्रंटच्या अतिरेक्यांनी अपहरण केले. त्या गटाचा संस्थापक सदस्य मकबूल भट्टची सुटका करण्याची मुख्य मागणी म्हात्रेंच्या अपहरणकर्यांनी ठेवली होती. भट्टला भारतीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे निर्णयासाठी प्रलंबीत होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी मागणी स्पष्ट शब्दात फेटाळल्यानंतर ६ फेब्रुवारीला अतिरेक्यांनी म्हात्रे यांची हत्या केली. त्यानंतर पाचच दिवसात आवश्यक ती कायदेशीर कारवाई पूर्ण करून ११ फेब्रुवारीला मकबूल भट्ट्ला फाशी देण्यात आले. या सर्व घटनाक्रमात इंदिरा गांधींचा पंतप्रधान म्हणून असणारा कणखरपणा दिसून आला . ईंदिराजींना जन्मशताब्दी दिनानिमित्त आदरांजली. ✖
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 11/20/2017 - 11:41 नवीन
भट्टला भारतीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे निर्णयासाठी प्रलंबीत होता.
हे सगळ्यात महत्वाचे. अनेकदा असा समज असतो की रविंद्र म्हात्रेंची हत्या दहशतवाद्यांनी केली त्याला उत्तर म्हणून मकबूल बटला फाशीवर लटकवण्यात आले. रविंद्र म्हात्रेंची हत्या केली म्हणून दयेचा अर्ज फेटाळायची प्रक्रीया अधिक वेगाने झाली असेलही पण रविंद्र म्हात्रेंची हत्या दहशतवाद्यांनी केली म्हणून मकबूल बटला फाशी द्यायचे अधिकार पंतप्रधानांकडे नसतात. मागे एकदा अविनाश धर्माधिकारींच्या भाषणातही त्यांनी या घटनेचा उल्लेख केला ते ऐकल्यास एखाद्याला तसेच वाटू शकेल. अर्थातच ते चुकीचे आहे. कधीकधी वाटते की मकबूल बटचा दयेचा अर्ज फेटाळण्याची प्रक्रीया म्हात्रेंची हत्या होण्याच्या आधीच सुरू झाली होती की काय. कारण रविंद्र म्हात्रेंचा मृतदेह मिळाला ४ फेब्रुवारी रोजी आणि मकबूल बटला फासावर लटकवले ११ फेब्रुवारी रोजी. तुरूंगाच्या नियमांनुसार कुणाही कैद्याला फासावर लटकवण्याची एक प्रक्रीया असते. म्हणजे त्याचे वजन करून त्याच्या वजनाच्या पुतळ्याला सुरवातीला मॉक फाशी देणे, कैद्याच्या गळ्यावरून फाशीचा दोर सहजपणे स्लाईड व्हावा म्हणून पिकलेल्या केळ्याचा गर त्या दोरावर लावून तो दोर सुकविणे वगैरे. याविषयी अधिक http://www.rediff.com/news/report/spec/20040812.htm वर. हे सगळे एका आठवड्यात पूर्ण होते का याविषयी शंका वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लाल टोपी
ल
लाल टोपी Mon, 11/20/2017 - 18:37 नवीन
न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण झाली होती, राष्ट्रपतींच्या निर्णयात गृहमंत्रालयाची शिफारस महत्वाची ठरते त्याठिकाणी पंतप्रधानांच्या कणखर निर्णय निर्णायक ठरला असावा. १९७६ पासून प्रलंबीत असणारा दयेचा अर्ज बरोबर या घटनेनंतर फेटाळला जाणे हे उच्च्पदस्थ सरकारी अधिका-याच्या हत्येला कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन फाशी हे उत्तर होते अशीच त्यावेळी उमटलेली प्रतिक्रिया होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हुप्प्या Mon, 11/20/2017 - 05:40 नवीन
इंदिराबाईंचे अजून एक मोठे दुष्कृत्य म्हणजे त्यांनी लाल बहादूर शास्त्रींना विषप्रयोग करुन ठार मारले. लाल बहादूर शास्त्री ह्या नि:स्पृह , स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याला हटवून स्वतःला सत्तेवर आणण्याकरता त्यांनी हे दुष्कृत्य केले. अर्थात ह्याचा कुठला पुरावा समोर आलेला नाही. पण कुठलाही रोग नसताना ताष्कंद इथे ६५ च्या युद्धानंतर (ज्यात भारताची जोरदार फत्ते झाली होती) पाकिस्तानशी वाटाघाटी चालू होत्या तेव्हा अत्यंत संशयास्पद पद्धतीने त्यांचा मृत्यु झाला. चौकशी वगैरे काही झाले नाही. पण नंतर सगळी सूत्रे इंदिराबाईंकडे गेली. अशा प्रकारे तो चांगला नेता संपवला गेला नसता तर भारताचे भविष्य कदाचित जास्त चांगले घडले असते. घराणेशाहीचा कलंक धुतला गेला असता. पण ते घडले नाही. ह्याची एक बिनबुडाची कॉन्स्पिरसी थियरी म्हणून संभावना करता येणे शक्य आहे. पण त्या काळात घडलेल्या घटना अत्यंत संशयास्पद आहेत आणि त्यामागे काहीतरी मोठे कारस्थान आहे असे वाटायला वाव आहे.
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Mon, 11/20/2017 - 09:01 नवीन
बिनबुडाचे आरोप, इंदिरा गांधी कशाला मारतील या मागे काही आंतरराष्ट्रीय राजकारण नक्कीच आहे CIA KGB वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Tue, 11/21/2017 - 06:15 नवीन
इंदिरा गांधी का मारेल शास्त्रींना? अहो प्रचंड घबाड मिळाले ना बाईंना नंतर ? भारताच्या अनभिषिक्त सम्राज्ञी बनल्या. जर शास्त्री युद्ध जिंकून जिवंत परत गेले असते तर त्यांना हरवून सत्तेवर येणे अत्यंत अवघड गेले असते. इतका कर्तृत्त्ववान, स्वच्छ नेता पराजित करणे सोपे नव्हते. कुठल्या परकीय सत्तेशी हातमिळवणी करुन शास्त्रींचा काटा काढून सत्ता पटकावणे हे एक मोठे आकर्षण होते. आणि ते साध्य केले गेले. शास्त्रींच्या मृत्यूमागची कारणे तपासली गेली नाही, गुन्ह्याचा व्हावा तसा तपास झाला नाही. कारण नव्याने जे सत्तेवर आले त्यांना ते प्रकरण दाबण्यात स्वारस्य होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द
B
babu b Mon, 11/20/2017 - 09:12 नवीन
अगदी आक्षेपार्ह प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
B
babu b Mon, 11/20/2017 - 08:48 नवीन
बॅंकिंग व इन्शुरन्स क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
  • Log in or register to post comments
B
babu b Mon, 11/20/2017 - 12:27 नवीन
...Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 11/20/2017 - 13:24 नवीन
माणशी उत्पन्न. Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 11/20/2017 - 16:55 नवीन
समाजवादाला चोंबाळून बसल्यावर दुसरे काय होणे अपेक्षित आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
त
तर्राट जोकर Mon, 11/20/2017 - 20:24 नवीन
देशाला देश लावायचे आणि तुलना करायची ही चालबाजी का ढेरेसाहेब? दरडोई उत्पन्न बघायचे तर मग साउथ बॉम्बेत छोट्या भागात राहणार्‍या माणसाचे उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या प्रदेशाच्या दरडॉइशी तुलना करण्यासारखे आहे. परत इतर मुद्दे आहेतच. यादीतले इतर देश यांचे आकार, लोकसंख्या, समाज, इतिहास आणि इतर समस्या भारताप्रमाणे अगदी सेम टू सेम होत्या? पण असले प्रश्न तुम्हाला कशाला पडतील? इंदिरा गांधींना कसेही करुन नाकर्ते दाखवणे इतकेच काम आपले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
B
babu b Tue, 11/21/2017 - 01:48 नवीन
इतिहासात भाजप्यांचे योगदान शून्य आहे. वर्तमान आणि भविष्य घडवणे हेही भरकटलेलेच आहे. त्यामुळे इतिहासातील मोघल , फाळणी , नेहरूंच्या मैत्रिणी , नेताजी फाइल , आणीबाणी , आरक्षण हे असे मुद्दे उगाळून २०१४ पूर्वी भारत किती घाण होता , हे उगाळून इतरांवर टीका सुरु असते. नथुरामाचे ते रावण चित्र् आजही तसेच आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अनुप ढेरे Tue, 11/21/2017 - 05:44 नवीन
यादीतले इतर देश यांचे आकार, लोकसंख्या, समाज, इतिहास आणि इतर समस्या भारताप्रमाणे अगदी सेम टू सेम होत्या?
या गोष्टी १९६५ साली इतर देशांपेक्षा जास्तं उत्पन्न असायला कशा काय कारणीभूत ठरल्या नाहीत? का १९६५ ला भारताची लोकसंख्या खूप कमी होती का विविधता, आकार कमी होते? हे टेबल १९६५ ते १९८४ या काळात आपण आपल्या बरोबर स्वतंत्र झालेल्या देशांपेक्षा कसे मागे पडत गेलो हे दाखवतं. मागे पडलो याचा अर्थ आधी पुढे होते हाही आहे. ज्या गोष्टी तुम्ही कारणं म्हणून देताय त्या गोष्टी १९६५ सालीही तशाच होत्या. १९८४ला पण. मध्ये काय घडलं/ कोणामुळे झालं याचे निष्कर्ष ज्याचे त्याने काढावेत. पण हे ही ध्यानात ठेवावं की वर उल्लेखलेल्या गोष्टी १९६५साली देखील होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 11/21/2017 - 08:36 नवीन
परत तुम्ही नगाला नग लावून तुलना करत आहात. हाथी की घोडे से तुलना कर रहे हो, कृपा वहीं अटकी है..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Tue, 11/21/2017 - 09:58 नवीन
मुद्दा तसा सोपा आहे. १९६५ साली हे देश भारतापेक्षा गरीब होते. भारत तोच, भरपूर लोकसंख्या, विविधता वगैरेवाला. १९८४ साली भारत या देशांपेक्षा बर्‍यापैकी गरीब होता. सो १९६५ पर्यंत तुम्ही म्हणता त्या गोष्टी आड आल्या नाहीत पण ६५-८४ या वीस वर्षांत या गोष्टींमुळे भारत मागे पडला असं म्हणताय. काहीतरी चुकतय. असं काय झालं की या गोष्टी १९९६५ पूर्वी आड आल्या नाहीत पण नंतर आल्या. १९९१ नंतर परत आपले दरडोई उत्पन्न इतरांपेक्षा जास्तं दराने वाढलेले दिसेल असा अंदाज आहे. १९९१ला काय झाले ते सर्वजण जाणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
व
विकास Mon, 11/20/2017 - 17:45 नवीन
इंदिराजींच्या ज्या दोन गोष्टींमधे त्यांचे कणखर नेतृत्व ठळकपणे दिसून आले, त्या म्हणजे बांग्लादेश स्वातंत्र्य आणि ऑपरेशन ब्लु स्टार. त्यातील ऑपरेशन ब्लूस्टार हे अधिक महत्वाचे आहे. कारण त्यात भारत तुटण्याची शक्यता होती. ज्यामुळे ते झाले त्याला कारणीभूत देखील इंदिराजींचे राजकारण होते. ज्यात शिखांना आपले खेळणे करून टाकले आहे असे वाटले असल्यास नवल नाही... पण त्यांचे मोठेपण इतकेच की चूक लक्षात आल्यावर ती धोका पत्करून दुरुस्त केली. विशेष म्हणजे शिख शिपायांनाच अंगरक्षक करून त्यांनी धोका पत्करला होता. असे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विरळाच! त्यांना विनम्र आदरांजली. वरील चर्चेत काही गोष्टी आल्या नाहीत त्याचा उल्लेख करावासा वाटतोयः यातील प्रत्येक गोष्ट इंदीराजींनी जाणूनबुजून केली असेल असे मला म्हणायचे नाही. तसेच त्यांच्या देशाबद्दलच्या आस्थेबद्दल मला कुठेही शंका नाही. पण आपण, एक नेतृत्व म्हणून करत असलेल्या निर्णयांचे पुढे काय परीणाम घडणार आहेत, हे एकतर त्यांना समजलेच नाही अथवा समजून देखील त्यांना पर्याय मान्य नसल्याने, तेच पुढे रेटण्यात धन्यता मानली... पहिली म्हणजे त्यांचे राजकीय जीवन हे शीतयुद्धाच्या काळातले होते. भारताने (पक्षी: त्यावेळेस काँग्रेससरकारने) कितीही जरी अलिप्ततावादी धोरण वगैरे म्हणले तरी, त्यांच्या काळात कदाचीत नेहरूंपेक्षाही भारत हा तत्कालीन सोव्हिएट रशियाच्या कह्यात गेला होता. काही अंशी ती राजकीय खेळी म्हणून ठिकही ठरले असते. पण हे धोरण भारताची राजकीय अपरीहार्यता असल्यासारखे ठरले. परीणामी आपण अमेरीका आणि भांडवलवादी पाश्चात्य राष्ट्रांपासून लांब राहीलो. पाकीस्तान त्यांच्या जवळ गेला आणि त्याचा तोटा केवळ आपल्यालाच नाही तर सार्‍या जगाला आजही भोगावा लागत आहे. (याचा अर्थ पाकीस्तान सारखे अमेरीकेच्या कह्यात जायला हवे होते असे नाही. पण आपण नेतॄत्व दाखवू शकलो नाहीत हे वास्तव आहे.). सोव्हिएट रशियाजवळ गेल्याने, डाव्यांचा प्रभाव असलेली अर्थव्यवस्था आली. परमिटराज आले, बाबू गिरी प्रबळ होत गेली. "गरीबी हटावो" हे "all are equal" प्रमाणे केवळ एक समोर लावून ठेवलेले गाजरच ठरले. इंदीराजींच्या काळात अजून एक गोष्ट सातत्याने झाल्याची आठवते, ती म्हणजे विधानसभा बरखास्त होणे! घटनेच्या ३५६ व्या कलमाचा आधार हा वाट्टेल तसा घेतला. मला आठवते त्याप्रमाणे शरद पवारांचे पुलोद सरकार पण त्यांनी असेच गुंडाळले होते. तेच त्यांनी मुंबई पालीकेच्या बाबतीत केले होते. राज्यांमधे राष्ट्रपती राजवट आणून सत्तेचे आणि सरकारचे टोकाचे केंद्रीकरण केले गेले. या सर्वाचा परीणाम म्हणून भारतीय राजकारणात वेगळे नेतृत्व तयार होऊ शकले नाही. सुरवातीस (शास्त्रींच्या निधनानंतर) पंतप्रधान झाल्यावर त्यांना त्यावेळच्या बड्या धेंडांचा विरोध झाला होता. त्यामुळे त्यांनी तो विरोध गुंडाळण्यासाठी टोकाची भुमिका घेतली असे वाटते. त्याचा परीणाम काँग्रेसपक्षावर झालाच पण त्याच बरोबर संपुर्ण राजकीय वातावरणावर झाला - "हे असेच करावे लागते" ही भावना आणि वृत्ती सातत्याने वाढत गेली. महापौर, मुख्यमंत्र्यापासून सगळेजण दिल्लीश्वरांवर निर्णय घेण्यासाठी अवलंबून राहू लागले. तेच कल्चर काँग्रेसमधे आजही चालू आहे. कदाचीत सध्या दिल्लित सत्ता नसल्याने त्यामानाने काँग्रेसशासीत राज्यांना किंचीत स्वातंत्र्य मिळाले असेल. मला वाटते, व्हि व्हि गिरीं निवडून आलेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रसंगानंतर इंदीराजी या कदाचीत अधिकाधिक राजकीय दृष्ट्या कडवट होत गेल्या आणि एकाधिकारशाही वाढवत राहील्या. त्याची सगळ्यात मोठी परीणिती म्हणजे आणिबाणी होती. अजून एक गोष्ट नेहरूंनंतर शास्त्री आले, शास्त्रींनंतर इंदिराजी (अर्थात हंगामी पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदा सोडल्यास). त्यांना पंतप्रधान करून अथवा त्यांनी तसे स्विकारून देशात घराणेशाही स्थिर केली. जी जागोजागी "काँग्रेस गवता"सारखी उगवू लागली! याचा अर्थ ती नव्ह्ती असे नाही. पण त्याला कुठेतरी अधिकृतता प्राप्त झाली. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर देशाला काँग्रेस पक्षाला कुठलाही अनुभव नसलेले राजीवगांधीचे नेतृत्वच दिसले. इतके की प्रणवकुमार मुखर्जींनी तशी इच्छा व्यक्त केल्याचे माहिती झाल्याने त्यांना वाळीत टाकण्यात आले आणि त्यांना स्वतःचा राष्टॄय समाजवादी काँग्रेस पक्ष तयार करावा लागला. आजही आपण तेच बघतोय की १९ वर्षे सोनीया गांधी पक्षाध्यक्षा होत्या आणि आता त्यांचे चिरंजीव होणार! ------ मला, इंदीरा गांधी हत्येनंतर मोरारजी देसाईंनी प्रतिक्रीया देताना, "बुरे काम क बुरा नतिजा" असे म्हणल्याचे (आणि मी ते वाचल्याचे) आठवते. ही प्रतिक्रीया खचितच योग्य नव्हती. तरी देखील त्यावर विचार करताना मला वाटते की, इंदीरा गांधींच्या "बुरे काम" अथवा चुकीच्या निर्णयापेक्षा, त्यांची जी सभोवतालची गणंग मंडळी सल्लागार झाली, ती त्यांना आणि परीणामी सार्‍या राष्ट्राला भोवली. त्यातून बाहेर येण्यासाठी खूप काळ जावा लागला आणि अजूनही लागणार आहे. तरी देखील, आज इंदीराजी असत्या आणि त्यांना जर स्वतःच्या आधीच्या चुका समजल्या असत्या तर त्या नक्की बदलल्या असत्या असेच वाटते. तो समंजसपणा आणि जाणीव असलेले व्यक्तीमत्व आज विरोधकांमधे नाही ही विरोधकांची सगळ्यात मोठी दुर्बलता आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/21/2017 - 05:16 नवीन
धन्यवाद विकास. मला वाटते की इंदिरांच्या काळात भारत रशियाच्या कळपात जास्त गेला हे होणे काही अंशी अपरिहार्यच होते. सुरवातीपासून अमेरिका-इंग्लंडने काश्मीर प्रश्नात पाकिस्तानची बाजू घेतली होती.त्यामुळे भारत-अमेरिका संबंधात कटुता आली होती. त्यातच नेहरूंचे सगळ्या जगाला तत्वज्ञान शिकवायला जायचे स्वप्नाळू धोरण होतेच. अमेरिकेने कम्युनिस्ट चीनला मान्यताही दिलेली नसताना आपले चीनबरोबर गळ्यात गळे असणे, सीएटोमध्ये सामील व्हायचे आमंत्रण भारताने नाकारणे हे मुद्दे होतेच. कधीही अमेरिकेने कोणती आगळीक केली की ताबडतोब त्याचा निषेध करणे पण त्याचवेळी हंगेरीमध्ये रशियाने केलेल्या आगळीकीवर काही न बोलणे वगैरे गोष्टींमुळे भारत अमेरिका संबंधात अजून वितुष्ट आले. लालबहादूर शास्त्रींनीही अमेरिकेने व्हिएटनाममध्ये केलेल्या प्रकारांविरूध्द जोरदार निषेध केलाच होता. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी भारत अन्नधान्यातही स्वयंपूर्ण नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरवातीच्या काळात नेहरूंनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांना अमेरिकेत पाठवून भारताला अन्नधान्याची मदत करावी यासाठी प्रयत्न केले होते. म्हणजे चित्र असे उभे राहिले की हे लेकाचे स्वतःच्या लोकांचे पोट भरायलाही समर्थ नाहीत आणि तरीही जगाला तत्वज्ञान शिकवायला सर्वात पुढे. ज्यांना नावे ठेवायची त्यांच्याकडूनच धान्यही मागायचे असे प्रकार कोण ऐकून घेणार होते? दरम्यानच्या काळात पाकिस्तान मात्र अमेरिकेच्या जास्त जवळ जायला लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला रशियाच्या कळपात जाण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.
इंदीराजींच्या काळात अजून एक गोष्ट सातत्याने झाल्याची आठवते, ती म्हणजे विधानसभा बरखास्त होणे!
हो. १९६७ ते १९६९ या काळात विरोधी पक्षांची सरकारे पडणे, मग नवे कडबोळे सरकार बनणे, पक्षांतरे होणे, विधानसभा बरखास्त होते, कलम ३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट येणे हे प्रकार घाऊक प्रमाणात घडले होते. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या राज्यात काँग्रेसने अर्ध्यापेक्षा कमी जागा जिंकल्या होत्या त्या राज्यातील काँग्रेसची सरकारे जनता पक्षाच्या केंद्र सरकारने बरखास्त केली होती. १९८० मध्ये इंदिरांचे पुनरागमन झाल्यावर त्यांनी त्याचे उट्टे फेडलेच. अपवाद एका राज्याचा होता. आणि तो म्हणजे हरियाणा. त्या राज्यातील मुख्यमंत्री भजनलाल यांनी जनता पक्षाचे सगळे आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे त्यांचे सरकार वाचले.
या सर्वाचा परीणाम म्हणून भारतीय राजकारणात वेगळे नेतृत्व तयार होऊ शकले नाही.
हो. १९६९ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर इंदिरा बर्‍यापैकी संशयी झाल्या आणि कोणावरही विश्वास ठेवणे त्यांनी बंद केले. कोणत्याही राज्यात कोणीही मुख्यमंत्री अधिक काळ टिकू न देणे हे प्रकार त्यांनी केले. कारण कोणीही मुख्यमंत्री अधिक काळ स्थिरावला तर दुसरे सत्ताकेंद्र तयार होईल ही त्यांची भिती. वास्तविकपणे १९७५ मध्ये न्यायालयाचा निर्णय विरूध्द गेल्यावर स्वतः राजीनामा देऊन आपल्या विश्वासातल्या कोणाला तरी पंतप्रधान करणे आणि मग सर्वोच्च न्यायालयात अनुकूल निकाल लागायची वाट बघणे हा प्रकार (जयललितांनी एकदा नाही तर दोनदा हा प्रकार केला होता त्याप्रमाणे) त्यांनी करायला हवा होता पण त्यांच्या तितक्या विश्वासातले कोणी राहिलेच नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
राही Fri, 11/24/2017 - 21:57 नवीन
पब्लिक लॉ ४८० खाली अमेरिकेने धान्यमदत दिली होती. अमेरिका काही अटींवर भारतास इतरही मदत करण्यास उत्सुक होती. आपण त्या अटी स्वीकारल्या नाहीत हे बरेच झाले. निदान काही अंशी स्वयंपूर्णता तरी आली असे पाकिस्तानच्या उदाहरणावरून म्हणता येण्याजोगे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
राही Tue, 11/21/2017 - 05:03 नवीन
भारतात राजेशाही होती हे आपण सारे जाणतोच. यातले बहुतेक संस्थानिक विलासी, जुलमी होते. कित्येकांची संस्थाने खालसा होऊन ब्रिटिशांकडून मिळणाऱ्या तनख्यांवर ते मजेत जगत होते. ब्रिटिश रेसिडेंट ऑफिसर कारभार पाहात असे. प्रजाहितदक्षता वगैरे गोष्टी दुर्मीळ होत्या. ब्रिटिश इंडियामध्येसुद्धा ऑफिसर्सची चैन असे. न्यायव्यवस्था ठीक असली तरी प्रजेचा उद्धार, दलितोद्धार वगैरे बात नव्हती. एकोणिसाव्या शतकात भारतात प्रबोधनाची पहाट फुटू लागली आणि काही मोजक्या सुधारकांनी प्रचंड विरोध अंगावर घेऊन ही वाट चोखाळली. हळूहळू त्यांना मानणारा वर्ग वाढू लागला. सरंजामशाहीच्या जाचाची जाणीव लोकांना होऊ लागली. आर्थिक आणि सामाजिक डावे विचार रुजू लागले. त्यातच पंजाब, बंगाल मध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचा एक कडवा डावा गट फोफावला. गांधींनी या अति जहाल डाव्यांशी युक्तीने छुपा पंगा घेतला तरी या गटाची दलितोद्धाराची भूमिका हिरिरीने स्वीकारली. अशा रीतीने समाजवाद भारतात वाढू लागला. डांगे यांचा गिरणी कामगारसंप, गांधींचा निळीचा सत्याग्रह अशा घटनांद्वारे तो प्रकट होऊ लागला. पुढे फेबियन समाजवादाने प्रभावित अशी एक विद्वत्फळी तयार झाली आणि तिला लोकमान्यतेबरोबर विद्वन्मान्यताही मिळाली. कॉंग्रेसमध्ये समाजवाद्यांची एक मोठी आघाडी तयार झाली. हा गट साधारण गांधीविरोधात होता आणि पुढे जयप्रकाश इत्यादींच्या नेतृत्वाखाली तो कॉंग्रेसमधून फुटलाही. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत कॉंग्रेसचे गांधींसह सर्व बडे नेते तुरुंगात असताना प्रामुख्याने याच लोकांनी ही चळवळ लढवली. तेव्हा डावा विचार जनमानसात रुजलेलाच होता, पण जहाल डाव्यांपेक्षा कॉंग्रेसचा नेमस्त डावेपणा लोकांना भावला आणि त्याला भक्कम जनाधार मिळाला. पुढे संयुक्त महाराष्ट्राची संपूर्ण चळवळ समाजवाद्यांनी कॉंग्रेस विरोधात असूनही यशस्वीपणे लढवली. ती कम्यूनिस्टांनी हाय्जॅक केली ही गोष्ट वेगळी. साठीच्या दशकात उजव्या विचारसरणीचा महाराष्ट्रात आणि देशात संपूर्ण पाडाव झाला. आ. अत्र्यांची मुलुखमैदान तोफ दै. मराठातून धडाडू लागली आणि वल्लभभाईंचा उजवा हात आणि वल्लभभाईंनंतर काही काळ देशात दोन क्रमांकाचे सत्ताकेंद्र असलेले स. का. पाटील. जॉर्ज फर्नॅंडीससारख्या नवशिक्याकडून सपशेल आपटले. तोपर्यंत देशात खास उजव्या विचारांची, संस्थानिकांची आणि भांडवलदारांची म्हणून स्वतंत्र पार्टीची स्थापना मिनू मसानी आदींच्या पुढाकाराने झाली खरी पण तिने कधीच बाळसे धरले नाही. लोकमत आपल्याकडे ती वळवू शकली नाही. इकडे फाळणीनंतर उपखंडातील वर्चस्वासाठी अमेरिका आणि रशिया यात रस्सीखेच सुरू झाली होतीच. ब्रिटिश हे फोडा आणि झोडा नीती आचरणारे म्हणून मुळात पाकिस्तानधार्जिणे होते अशी एक थिअरी आहे. अमेरिकेला या भूमीवर लष्करी तळ हवा होता जो भारताने दिला नाही आणि पाकिस्तानने दिला. पाकिस्तानवर त्यांची मेहेरनजर राहिली. मध्य- दक्षिण आशियात अमेरिका आणि रशिया दोघांच्याही गुप्त हालचाली सुरू होत्या. त्यातून अफ्घानिस्तान वाचवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तान ताब्यात राहील अशी तजवीज केली. १९५४ मध्ये पाकिस्तानने अमेरिकेशी संरक्षणमदतीचा म्युचुअल करार केला आणि ते राष्ट्र पुढे लगेचच सिॲटो, सेंटो सारख्या लष्करी करारांत सामील होऊन अमेरिकेचे अंकित बनले. तिथल्या तथाकथित सरकारांनी अमेरिकेची बाहुली बनून राहाण्यात धन्यता मानली. भारताने मात्र डावीकडे झुकलेला मध्यममार्ग पत्करून लोकशाही बऱ्यापैकी रुजवली. आणखी म्हणजे पाकिस्तानच्या बाजूने भारत हा त्यांचा जाहीर शत्रू होता आणि भारताने तसे काही जाहीर केलेले नसले तरी जनमत तसेच होते. तेव्हा भारतपाकिस्तानच्या ग्रोथलाइन्स सुरुवातीला तरी एकदिक असणे शक्य नव्हतेच. असो. या विषयावर बरेच काही लिहिण्यासारखे आहे. आणीबाणीपूर्वी भारतात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली होती. लोकांनी कर भरू नयेत, पोलिसांनी आज्ञापालन करू नये, अशा तऱ्हेचे आदेश जयप्रकाशजींकडून निघत होते. सिविल डिसओबीडिअन्स जो ब्रिटिशांविरुद्ध उपयोगी ठरला तो स्वकीयांविरुद्ध राबवण्याची असमंजस योजना होती. सो, आणिबाणी कदाचित एक अटळ अरिष्ट होते. त्यातूनही आणिबाणीचे पहिले पाऊणवर्ष अतिशय शिस्तीचे ' अनुशासनपर्व' होते. नंतर पुरुषनसबंदीच्या अंमलबजावणीतल्या घोडचुकांमुळे लोक खवळले. नोटबंदी, जीएसटी सारख्या कित्येक योजनांना वाईट अंमलबजावणी, घिसाडघाई आणि हडेलहप्पीमुळे गालबोट लागलेले आपण आजही पाहातो. कुटुंबनियोजनासाठी बाईवर शस्त्रक्रिया खर्चिक, वेळखाऊ आणि बाईला खूप त्रासाची होती हे इंदिरेसारखी एक महिलाच समजू शकली. पुरूषनसबंदी नगण्य त्रासाची. तेव्हा तीच निवडली गेली. पण उत्तरप्रदेशबिहारसारख्या कट्टऱ पुरूषप्रधान आणि लिंगकलुषित (जेंडरबायस्ड) समाजात याला तीव्र विरोध झाला. हिंदूमुसलमानांनी कधी नव्हे ते कॉमन कॉज धरून इंदिरा गांधींना कडवा विरोध केला. तुर्कमान गेट झोपडपट्टी हटावमुळे ( झोपडपट्टीहटाव ही चांगलीच योजना पण अत्यंत चुकीची अंमलबजावणी) मुसलमान आधीच धुमसत होते. उप्र आणि बिहार ही जास्तीत जास्त खासदार देणारी राज्ये. आणीबाणी उठवल्यावरच्या निवडणुकीत दोन्हीमध्ये इंदिरा कॉंग्रेस भुईसपाट झाली. दक्षिणी राज्यांमध्ये मिळालेले बऱ्यापैकी यश या महापुरात वाहून गेले. असो. जमल्यास उरलेले पुन्हा कधीतरी.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 11/21/2017 - 06:13 नवीन
आणीबाणी अपरिहार्य होती या मुद्द्याला 'पलिकडे' अरविंद कोल्हटकर यांनी खालील उत्तर दिले होते. http://www.aisiakshare.com/comment/105786#comment-105786
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/21/2017 - 07:14 नवीन
सहमत आहे. आणीबाणी अपरिहार्य होती असे म्हणणे हा केतकरी स्टाईल प्रचाराचा भाग वाटतो. जयप्रकाश नारायण आणि सहकार्‍यांनी बेजबाबदार वर्तन केले होते याच अजिबात शंका नाही. तरीही ते आणीबाणी लादायचे कारण होते असे वाटत नाही. किंबहुना आणीबाणी लादायची कल्पना इंदिरांच्या डोक्यात प्रत्यक्ष आणीबाणीची घोषणा होण्यापूर्वी काही तास सिध्दार्थ शंकर रेंनी भरवली होती. त्यामुळे जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामुळे आणीबाणी हे समर्थन कसे काय होऊ शकते हे समजत नाही. जयप्रकाश नारायण यांनी २५ जूनच्या दिल्लीतील रामलीला मैदानातील सभेत सरकारचे नियम पाळू नका असे आवाहन सैन्यदलाला केले होते असे नेहमी म्हटले जाते. पण जयप्रकाश प्रत्यक्षात काय म्हणाले होते हे प्रधानमंत्रीच्या पुढील भागात बघायला मिळेल (साधारण ४४ मिनिटे ३० सेकंदांच्या आसपास). जयप्रकाश नारायण यांनी लष्कराला आणि पोलिसांना सरकारचे आदेश मानू नका असे 'ब्लॅन्केट' आवाहन केले नव्हते तर ते नक्की काय म्हणाले होते हे त्या व्हिडिओमध्ये कळेलच. जर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हांनी इंदिरांची लोकसभेवर झालेली निवडणुक रद्द ठरवली (कितीही पुचाट कारणांमुळे असली तरी) तर विरोधी पक्षांकडून इंदिरांच्या राजीनाम्याची मागणी होणे अपरिहार्य होते. आणि तशी मागणी करण्यात विरोधी पक्षांची काही चूक होती असे वाटतही नाही. अन्य एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे अशावेळी राजीनामा देऊन आपल्या विश्वासातल्या कोणालातरी पंतप्रधान म्हणून नेमणे आणि सर्वोच्च न्यायालयात आपल्याला अनुकूल निकाल लागल्यानंतर परत पंतप्रधान होणे हा सर्वात योग्य पर्याय ठरला असता. जयललितांनी असे तामिळनाडूमध्ये एकदा नाही तर दोनदा केले होते. पण संशयी स्वभावामुळे इंदिरांचा कोणावरही विश्वास राहिला नव्हता. त्यामुळे आणीबाणी ही इंदिरांनी स्वतःची खुर्ची वाचवायलाच लादली होती असे म्हणता येईल. स्वतःची खुर्ची वाचवायला इंदिरांनी अशी आणीबाणी लादता येईल याची कल्पना येण्यापूर्वीही कसे प्रयत्न केले होते याविषयी फार बोलले जात नाही. या न्या. जगमोहनलाल सिन्हांना श्रध्दांजली वाहणार्‍या लेखात राजनारायण यांचे वकिल शांतीभूषण यांच्या हवाल्याने एक गोष्ट लिहिली आहे. (इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये रायबरेलीमधून संयुक्त समाजवादी पक्षाच्या राजनारायण यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजनारायण यांनी इंदिरांनी प्रचारात बेकायदा गोष्टी केल्या आणि गैरव्यवहार केले यावरून इंदिरांच्या लोकसभेवर झालेल्या निवडणुकीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रशांत भूषण यांचे वडिल शांतीभूषण हे राजनारायण यांचे वकिल होते). १२ जून १९७५ रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी काही काळ अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एस.माथूर (हे माथूर इंदिरांच्या डॉक्टरचे नातेवाईक होते) यांनी न्या.जगमोहनलाल सिन्हांना इंदिरा गांधींच्या केसचा निकाल आल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळेल अशी माहिती दिली. याचा अर्थ एका प्रकारे इंदिरांनी न्या.जगमोहनलाल सिन्हांना आपल्याला अनुकूल निकाल देण्यासाठी प्रलोभन दाखविणे हा होऊ शकेल का? मला माहित नाही. हाच प्रकार वर दिलेल्या व्हिडिओमध्ये ३८ मिनिटे ३०-३२ सेकंदांनंतर बघता येईल. इतकेच नव्हे तर इंदिरांनी स्वतःची खुर्ची वाचवायला इतरही अनेक प्रकार केले होते. २५ जून १९७५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आर.कृष्ण अय्यर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरांची लोकसभेवर झालेली निवड रद्दबादल करायच्या निकालाला हंगामी स्थगिती दिली. त्यावेळी कृष्ण अय्यर यांनी निकालपत्रात म्हटले होते की न्यायालय त्यावेळी असलेल्या कायद्यांच्या आधारेच निकाल देऊ शकते. त्यानंतर इंदिरांच्या सरकारने १० ऑगस्ट १९७५ रोजी पंतप्रधानांच्या लोकसभेवरील निवडीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी ३९ वी घटनादुरूस्ती केली. या घटनादुरूस्ती किती वेगाने केली आणि का केली याचे कारण शोधून काढणे कठिण नव्हते. एकतर लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसला बहुमत होतेच आणि विरोधी पक्षांचे खासदार तुरूंगात होते. त्यामुळे संसदेत या घटनादुरूस्तीचे विधेयक पास होणे अगदीच अपेक्षित होते. आठवड्याभरात सर्व विधानसभांचे विशेष अधिवेशन बोलावून या घटनादुरूस्तीला मान्यता देण्यात आली. लगोलग त्यावर राष्ट्रपतींची सही झाली आणि घटनादुरूस्ती लागू झाली. त्यानंतर दोन दिवसातच सर्वोच्च न्यायालयात इंदिरांच्या रायबरेलीमधील निवडीसंदर्भातील केसची सुनावणी होती. त्यापूर्वीच घटनादुरूस्ती करण्यात आली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने इंदिरांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. केसची सुनावणी सुरू झाल्यानंतर इंदिरा सरकारने ही घटनादुरूस्ती केली होती याला फुटबॉल मॅच सुरू झाल्यानंतर गोलपोस्ट बदलणे असेच म्हणता येईल. इंदिरा सरकारने ३९ वी घटनादुरूस्ती केली त्याला स्वतःची खुर्ची वाचवायचा प्रयत्न सोडून दुसरे काय म्हणता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
र
राही Fri, 11/24/2017 - 22:55 नवीन
श्री ढेरे, आपण दिलेल्या दुव्यावरचा श्री कोल्हटकर यांचा लेख वाचला होता आणि तेव्हाही पूर्ण सहमत होता आले नव्हते. ऑफेंसचा प्रश्नच नाही. उलट समंजस वैचारिक विरोधाचे स्वागतच आहे १९७२ - ७४ दरम्यान परिस्थिती गंभीर होती असे माझे मत आहे. उद्यापरवा सविस्तर लिहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Tue, 11/21/2017 - 05:48 नवीन

If Indira Gandhi had been around, she would have made sure no govt or film was held hostage by any Sena, however loudly they shouted #Padmavatirow

— Sagarika Ghose (@sagarikaghose) November 20, 2017
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/21/2017 - 05:50 नवीन
खरं की काय? आंधीचे काय झाले? किस्सा कुर्सीका चे काय झाले? किशोरकुमारांची गाणी आकाशवाणीवर ऐकवणे का बंद झाले होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Tue, 11/21/2017 - 06:04 नवीन
सगळ्या वाईट गोष्टी संजय गांधींनी केल्या. इंदिराजींनी नाही. तुम्हा संघी लोकांना इंदिराजींची बदनामी करण्यावाचून काहीही काम नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विकास Tue, 11/21/2017 - 13:42 नवीन
सागरिकाताईंनी अत्यंत स्पष्ट लिहीले आहे की, इंदीराजींनी सेनेचे असले चाळे मान्य केले नसते... स्वतःचे केले नसते असे थोडेच म्हणले आहे? आणि हो त्यात सेटानिक व्हर्सेस पण आहे! ज्याला बंदी घाले पर्यंत इस्लामी जगतात काही कल्पना नव्हती. किंबहुना खोमेनींचा रश्दी हा आवडता लेखक होता. पण नंतर नावडता झाला आणि आजही (मला वाटते) फतव्याच्या सावलीत राहत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Wed, 11/22/2017 - 14:25 नवीन
थत्तेंच्या बहुमूल्य मताच्या प्रतिक्षेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
रमेश आठवले गुरुवार, 11/23/2017 - 02:26 नवीन
या सागरिका बाईंच्या ट्विट वर असा एक प्रतिसाद वाचनात आला होता. If Sagarika had moustache then Rajdeep would have addressed her as uncle.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मराठी_माणूस Tue, 11/21/2017 - 06:15 नवीन
या वर्षीच्या एका दिवाळी अंकात त्यांच्या समकालीन लोकांनी लिहलेले लेख आलेले आहेत. त्यात त्यांचे अंतरंग उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/21/2017 - 17:58 नवीन
छान चर्चा. ( अजूनतरी) प्रतिसाद चाळले, पण वेळेअभावी सहभागी होता येत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले गुरुवार, 11/23/2017 - 02:42 नवीन
१९७१ च्या बंगलादेशच्या विजयानन्तर पाकिस्तानचे ९३००० सैनिक भारताला शरण आले होते. १९७२ च्या सिमला करारा नंतर बाईंनी त्यांना नुसते सोडून दिले. भारताचे सर्वात अवघड दुखणे म्हणजे काश्मीर. या ओलीस सैनिकांना त्या समस्येचे निराकरण करावयास उपयोगात आणणे शक्य होते.यूएन च्या निवाड्या प्रमाणे पाकिस्तानला त्यांच्या ताब्यातील काश्मीर लष्करासह सोडावयास सांगितले होते. या निवाड्याची अंमलबजावणी पाकिस्तान ने केली नव्हती. ती करा आणि मग तुमच्या शरणांगताना आम्ही सोडू असे साकडे इंदिराबाई घालू शकत होत्या.
  • Log in or register to post comments
B
babu b गुरुवार, 11/23/2017 - 08:03 नवीन
तसे केले असते तर फुकट १ लाख लोक पोसत बसलेत , अशीही टीका विरोधकानी केली असती. विरोधी पक्षाला ( तेंव्हाच्या ) आता गादी मिळाली आहेच , तर त्यानी पाकिस्तानचे ९४००० सैनिक पकडून तुरुंगात घालून टाकावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/23/2017 - 08:21 नवीन
चला आज संध्याकाळीच पानाच्या टपरीवर भेटूया तंबाखु मळता मळता प्लॅन करु आणि उद्याच १० लाख पाकड्यांना अटक करुन टाकू (खांग्रेसने ९३ हजार पकडले काय मग आमचे १० लाख) हाय काय अन नाय काय पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
म
मोदक Sat, 11/25/2017 - 05:44 नवीन
२० लाख तरी म्हणा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
B
babu b Sat, 11/25/2017 - 06:14 नवीन
२००० पुरतील. नंतर व्हाट्सपवर , फेसबुकवर , ट्विटरवर त्याचे २० लाख आपोआपच होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
B
babu b Sat, 11/25/2017 - 06:23 नवीन
२००० पुरतील. नंतर व्हाट्सपवर , फेसबुकवर , ट्विटरवर त्याचे २० लाख आपोआपच होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sat, 11/25/2017 - 07:26 नवीन
भाजपा सरकारविरूद्ध खोटे बोलण्याचा आणखी एक कबुलीजबाब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
म
महेश हतोळकर गुरुवार, 11/23/2017 - 09:24 नवीन
http://www.misalpav.com/comment/970781#comment-970781 http://www.misalpav.com/comment/970814#comment-970814 http://www.misalpav.com/comment/971439#comment-971439 http://www.misalpav.com/comment/971774#comment-971774 http://www.misalpav.com/comment/971411#comment-971411 जाणून बुजून करताहात की नैसर्गिक मर्यादा आहे काहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
म
मोदक Sat, 11/25/2017 - 05:46 नवीन
तसे केले असते तर फुकट १ लाख लोक पोसत बसलेत , अशीही टीका विरोधकानी केली असती. तेंव्हाचे विरोधक आत्ताच्या विरोधकांसारखे बिन्डोक नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
श
श्रीगुरुजी Sat, 11/25/2017 - 09:47 नवीन
बांगलादेशचे युद्ध हा एकमेव प्रसंग सोडला तर इंदिरा गांधींची १६ वर्षांची कारकीर्द अतिशय वाईट आहे. आणिबाणी हा त्यातील सर्वाधिक काळाकुट्ट कालखंड. वर अनेक प्रतिसादातून त्यांच्या कारकीर्दिविषयी माहिती मिळाली आहे. त्यामुळे यावर जास्त लिहिण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 11/25/2017 - 18:24 नवीन
बाबुराव,
तसे केले असते तर फुकट १ लाख लोक पोसत बसलेत , अशीही टीका विरोधकानी केली असती
मैमुनाबाईंनी फुकटंच पोसलं होतं ९३००० डुकरांना. अगदी बिर्याणी खायला मिळायची हो त्यांना. परत पाठवल्यावर त्यांच्याच भाईबंदांनी जहाल अपमान करून त्यांची बरोब्बर किंमत केली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा