कुस्तीत सुरक्षेचा विचार का होत नाही
गेल्या वर्षी पैलवान विकी साष्टे कुस्ती खेळताना जायबंदी झाला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला. मनाला प्रचंड वेदना झाल्या. या घटनेतून मन सावरत नाही तोच शाहूवाडीचा पैलवान नीलेश कुरुंदकरचं जाणं. जत्रेतल्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याने टाकलेल्या एकचाकी डावात नीलेश मानेवर पडला आणि मणक्यावर गंभीर मार बसला. मानेपासून संपूर्ण शरीराची हालचाल मंदावली. सहा दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर नीलेशची झुंज अपयशी ठरली आणि त्याने या जगाचा निरोप घेतला. विकी साष्टेही अशाच एका दुर्दैवी कुस्ती लढतीत जायबंदी झाला आणि नंतर त्याला आपले प्राण गमवावे लागले. काही जण जायबंदीही झाले. अर्थात, या अपवादात्मक घटना आहेत. त्यामुळे कुस्तीचे वैभव तसुभरही कमी झाले नाही. असं असलं तरी पैलवानांच्या सुरक्षेबद्दल कधीच ऊहापोह होत नाही किंवा त्यावर गांभीर्याने विचार होत नाही. मला कुस्तीची अन्य खेळांशी अजिबात तुलना करायची नाही, पण मर्दानी खेळांमध्ये सुरक्षेच्या पातळीवर अजिबात विचार होत नाही.
"जयाना वाटे भय मृत्यूचे..क्षात्रधर्म तयाने करू नये..काहीतरी करून उपाये पोट भरावे"
हे खरे असले तरी पूर्वी युद्ध लढतानाही चिलखत, ढालींचा सुरक्षेसाठी उपयोग व्हायचाच. सुरक्षा साधने जेथे उपयोगात येत नाही तेथे खबरदारी म्हणून नियम आले, तसेच उपचार आले. कुस्तीबाबत मात्र कोणीही गांभीर्याने विचार करीत नाही.
मल्लविद्याचे संस्थापक मिलिंद मानुगडे यांनी अतिशय चांगला मुद्दा व्यक्त केला होता. तो म्हणजे काटा कुस्त्या ठरवत असताना 108 क्रमांकाची मोफत रुग्णवाहिका असणे हा नियोजनाचा भाग असायला हवा. उलटी पुठ्ठी, बॅक थ्रोसारखे डाव मैदानी कुस्तीतून काढून टाकले पाहिजेत. तसेच माती व मॅट कुस्तीतला फरक समजून हे बदल काळाच्या ओघात बदलेले पाहिजे.
मानुगडेंचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावर कुस्ती संघटनेने खरोखर विचार करायला हवा. मुळात जत्रेतल्या कुस्त्यांवर संघटनेचा अंकुशच नाही.
म्हणूनच सुरक्षित कुस्तीबाबत मला काही मुद्दे सुचले म्हणून इथे नमूद करतो.
1. गावोगाव जत्रेतल्या कुस्त्या होतात. त्यावर कोणाचेही बंधन नसते. अशा कुस्त्यांमधील मल्लाच्या आरोग्यसेवेची कोणतीही खबरदारी घेतली जात नसते. ती अशा आयोजकांवर बंधनकारक करायला हवी. उदाहरणार्थ, वैद्यकीय पथक, तसेच मानुगडे यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णवाहिका आदी.
2. हौशी, तसेच जत्रेतल्या कुस्त्याच नव्हे, तर अन्य मान्यताप्राप्त कुस्त्याही नेहमी अद्ययावत रुग्णालयांजवळच घेण्याचे बंधनकारक करायला हवे. किमान एक किलोमीटरच्या आत रुग्णालय असलेच पाहिजे. (ही रुग्णालये अद्ययावत असणे आवश्यक आहे. थंडीतापाच्या दवाखान्याजवळ नव्हे हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे) म्हणजे काहीही दुखापत घडल्यास अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या आत पैलवानावर उपचाराची सोय होऊ शकेल.
3. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला हाताळायचे कसे याचे वैद्यकीय मार्गदर्शन शिबिर पैलवान, तसेच पंचांना (पंचांना तर अनिवार्यच करायला हवे) मिळायला हवे. बऱ्याचदा हाताळताना इतक्या घोडचुका होतात, की ती चूक आहे हेसुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे असे शिबिर हवेच. तसेच त्यादृष्टीने लागणारे वैद्यकीय साहित्यही मिळायला हवे. गळ्याचा वैद्यकीय पट्टा, तसेच नाकातून रक्त वाहत असेल तर नाकपुडीत मिळणारी जाळीदार पट्टी (प्रथमोपचारात याची सविस्तर माहिती मिळू शकेल) इ. साहित्याचा वापर केला तरी रुग्णाला हाताळताना त्याला इजा होत नाही.
4. कुस्तीचा आखाडा नेहमी प्रेक्षकांच्या कोंडाळ्यात असतो. त्यामुळे एखादी घटना घडली की गर्दी होते. त्यामुळे तातडीने मार्ग काढता येत नाही अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची माहिती आयोजकांना द्यावी.
याव्यतिरिक्त एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे संरक्षण विम्याचा. खेळाडूंसाठी स्वतंत्र विमा नाही, अशी तक्रार आहे. असे असले तरी सर्वांसाठी वैद्यकीय विमा, तसेच अपघाती विम्याची सोय आहे. त्याचा लाभ पैलवानांनाही मिळू शकेल. आयुर्विमा महामंडळाशी संपर्क साधल्यास तेथील अधिकारी अधिक चांगली माहिती देऊ शकतील. सरकार, क्रीडा संघटनांच्या मदतीने खेळाडूंचा विमा उतरवला जाणे महत्त्वाचे आहे. दुसरा मुद्दा नियमांचा नमूद केला आहे. या दोन्ही मुद्द्यांवर संघटनात्मक पातळीवर व्यापक चर्चा घडवून आणायला हवी.
आपल्याकडे सर्वच बाबतीत सुरक्षा, शिस्त, आणि खाजगी आयुष्य हे सगळ भ्रम आहे , या गोष्टी कोणीही गंभीरपणे घेत नाही.+१०० आणि तसे कोणी (विशेषतः सरकार) करू लागले तर, "आमच्या अधिकारात हिटलरशाही ढवळाजवळ होत आहे" अशी बोंब मारली जाते. :(