माझं कुणाला ओझं नको
मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये .... हल्ली ह्या एका विधानाने प्रचंड स्तोम माजवल आहे. आणि ह्या विधानाचा एका अजून दृष्टीकोनातून विचार. प्रचंड अहंकार आहे ह्या विधानात. ह्यात अनेक सुप्त विधानं अंतर्भूत आहेत --मी स्वयंभू आहे, --मी पैसे मिळवले, --मी कुणाला उत्तरदायी नाही, --मी अजूनही लोकांसाठी काही करू शकतो पण कुणाला एक छदाम मदत मागणार नाही. --मी इतरांची सेवा करतो तो माझा मोठेपणा पण इतरांनी माझी सेवा करायची वेळ आली तर ते माझं जणू मरणच ...नकोच ते अधिकार पदावरून (अधिकारपद किंवा कर्तेपण हे मी कौटुंबिक / सामाजिक/व्यवसायिक वगैरे सर्वत्र म्हणतोय) गेलो तरी मी आहे तो पर्यंत मी म्हणीन ती पूर्व, करीन तो कायदा, म्हणीन ते नियम आणि ह्यात कुणी विरोध केला कि मी आता ओझं झालोय हि भावना आणि ती नको म्हणून माझं कुणाला ओझं नको हा हट्ट
मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन
असा विचार का नको ?
ह्याच एक कारण, आयुष्यात आपल्या उमेदीत आपण कर्तेपणा सांभाळताना, मिरवताना, गाजवताना (प्रत्येक क्रियापद तेवढेच महत्वाचे) जे काही विपरीत केलय त्याची परतफेड मला मी कर्ता नसताना भोगावी लागू नये हा एक सुप्त भाव आहे ....आणि तो मुख्य आहे
माझे अधिकार पद गेल्यावर मला त्याच ठिकाणी तसाच मान मिळावा हि अपेक्षा म्हणून ठीक आहे परंतु ते तितके सोपे नाही. त्यासाठी आपल्या अधिकाराचा (इतरांना त्रासदायक असा ) आपण गैरवापर केलेला नाही ह्याची खात्री हवी. योग्य प्रकारे आपण जर माणसे (घरी दारी सगळी कडे) जोडून ठेवली असतील तर आपल ओझं तर कुणाला वाटणार नाहीच पण उलट एक हवेहवेसे घटक म्हणून आपण शेवटपर्यंत राहू शकतो.
आपण आपल्या आयुष्यात लोकांकडे गेल्यावर आपल्याला कशी वागणूक मिळते, आपण त्यांना कशी वागणूक देतो. ह्यात आपल्यावर पैशा मुळे मान देणारे कोण आणि आतड्याची जवळीक कुणाशी हे कळायला फार वेळ लागू नये.
आर्थिकदृष्ट्या सुस्थीर, मानसिक स्थैर्य असणार्या कुटुंबात बालपण घालवणार्या मुलाला आईबापाने आपल्या स्वत:च्या आकांक्षा, करीअरमधील संधी, वेळ खर्च करून जे दिलेले असते तयचा परतावा म्हणून काहीही मिळण्याची अपेक्षा करू नये हा आग्रह अतीरेकी नाही वाटत?मुलांकडे गुंतवणूक किंवा म्हातारपणाची काठी या भूमिकेतून बाहेर येऊन केवळ पालकांच्या भूमिकेत जगायला कधी शिकणार आपला समाज? हा तर निव्वळ देण्याघेण्याचा व्यवहार आहे ज्यात दुसऱअया बाजूचे कोणतेही मत विचारात घेतलेले नसते. एकतर स्वताची गरज म्हणून मुले जन्माला घालायची, स्वताचे स्टेटस व म्हातारपणाची तरतुद म्हणून त्यांना शिकवायचे व पायावर उभे करायचे. व नंतर म्हातारपणी सांभाळले नाही म्हणून रडत बसायचे. मुलांना जन्माला घातल्यानंतर त्यांना वाढवणे, शिकवणे व वेळ देणे पालकांचे कर्तव्यच आहे. मी नोकरी केली, खस्ता खाल्या, संधी वाया घालवल्या तडजोडी केल्या यासाठी स्वताच्या मर्जीने जन्माला घातलेल्या मुलांना कसे काय जबाबदार धरु शकता ?