बोली बोली बायका बोली
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या !
चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....
लिपीबिपीचे बंधन नाही
व्याकरणबिकरण... हे काय असते?
आम्ही बोलतो अनंत बोलीतून ....
कुजबुज जितकी थरथरणारी
तितके भांडण कडकडणारे
कठोरतेचा शीण आम्हाला
मवाळतेचा शाप तसाही
पण बोली आमची जपून ठेवतो....
अर्थाचा पण अनर्थ करू....
खिल्ली तुमची सहज उडवू
निरर्थाला अर्थ देऊ...
पण तुटका संसार नेटका करू....
आमच्यातलीच एखादी बोली
बोलता बोलता मग लिहिती होते,
प्रमाण होऊन पुस्तकात जाते
लिपीत बद्ध होते, ग्रंथात कैद होते
राजकारणात बटिक होते,
माध्यमात वारांगना होते
शिक्षणात डाकिन होऊन मानगुटीवर बसते
बघता बघता तिचे काटेरी कुंपण होते...
आमची एक बोली हरवते
आम्ही तिचा शोध घेत राहतो....
तिच्या शोधात आम्ही बोलत राहतो...
बोलता बोलता पुन्हा नव्या बोली प्रसवत राहतो...
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा....
-शिवकन्या
💬 प्रतिसाद
(3)
व
विवेकपटाईत
Fri, 09/21/2018 - 07:27
नवीन
कविता आवडली
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/21/2018 - 15:24
नवीन
कविता आवडली.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 10/21/2018 - 15:37
नवीन
कविता आवडली!
- Log in or register to post comments