पाककृती

मसाला मिर्च-मकई

Primary tabs

- एक मोठं मक्याचं कणीस (मधुमका/ स्वीट कॉर्न)
- २ मोठ्या शिमला मिरच्या (साधारणपणे २५० ग्रॅम)
- २ मध्यम टोमॅटो
- २ मध्यम कांदे
- ४/६ लसणीच्या पाकळ्या
- धणेपूड + जिरेपूड + हळद + लाल तिखट मिळून १ ते १.५ टेबलस्पून
- मीठ, चवीला जराशी साखर
- फोडणीकरता तेल आणि जिरं

अशीच कुठेतरी पाहीलेली रेस्पी पण एकंदरीत प्रकरण चवीला फार जमलंय म्हणून शेअर करतोय इथे.
- सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. सिमला जरा मध्यम आकारात चिरावी.
- तेलाची फोडणी करून जिरं फुलवावं आणि त्यात कांदा जरा सोनसळू द्यावा; तो तसा झाला की मगच टोमॅटो घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतावं
- यात आता कोरडे मसाले घालून मिनिटभर होऊ द्यावं. त्याचा कचवट वास निवला की मक्याचे दाणे घालावे आणि जरा परतावं
- मसाला दाण्यांना नीट माखला की यात पाव वाटी पाणी घालून वर झाकण घालावं आणि मक्याचे दाणे जरा शिजू द्यावे; लागेल तसं पाणी घालावं पण नंतर अजिबात पाणी राहाता कामा नये.
- मका ऑलमोस्ट शिजला की यात चिरलेली मिरची, मीठ आणि अगदी हवीच असेल तरच चिमटीभर साखर घालावी (मी साखर वापरली नव्हती); सगळं नीट हलवून झाकण घालून भाजी पूर्ण शिजवून घ्यावी.
- शेवटी जरा मोठ्या आचेवर ठेवून खरपूस करावी सारखी परतत राहून
- गरमागरम भाजी फुलक्यांसोबत सुरेख लागते.

- भाजीप्रमाणे वाढणी प्रमाण; २ लोकांना पुरेल

- कांदा टोमॅटो ची वेगवेगळी पेस्ट करूनही वापरता येइल. पण पेस्ट वेगवेगळी करणं आणि वेगवेगळी परतणं आवश्यक आहे
- तिखट जरा चढं हवं कारण कॉर्न ची गोडी
- हिंग; आलं आणि कसूरीमेथी, आपले हे ते; ते हे आणि इतर मसाले वापरायचे नाहीत

श्वेता२४

तिन्ही रेसिपी साठी फोटो दिल्याबद्दल कंजूस काकांचे आभार आणि योकू आपण अजून पाककृती टाकत राहा. छान असतात

जेडी

नक्की करेन, मक्याची भाजी कधीच केली नाही