ओला, उबेर आणि खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या पन्क्चुअल / रिलायेबल आहेत का ?
काल पुण्यनगरीस जाणे झाले होते. एकटीच असल्यामुळे निवांत बसने जायचे ठरले. धनकवडीत मुलगा आहे. सकाळी अकरा वाजता त्याच्यासोबत नाष्टा झाल्यावर बारापर्यंत त्याच्यासह बावधनला बहिणीकडे जायचे होते. मुलाने उबेर टॅक्सी ऑनलाईन बघितली. ३०० रु. रेट आला. ओलाचा १८०. ओला कॉल केली असता ५ ते १० मिनिटात येईल असे समजले.
आम्ही भारती हॉस्पिटलच्या मागे चैतन्यनगर या भागात होतो. वीस मिनिटे झाली तरी टॅक्सीचा पत्ता नाही म्हणून ड्रायव्हरला कॉल लावला. तो याच भागात असून आम्ही होतो तो रस्ता त्याला सापडत नाही असे समजले. वास्तविक पाहता गूगल लोकेशन दिलेले असताना रस्ता सापडत नाही हे विचित्र आहे. पुन्हा पत्ता नीट सांगितला . आणखी दहा मिनिटे लागतील असे तो म्हणाला. आणखी पंधरा मिनिटे झाली तरी टॅक्सी आली नाही. पुन्हा फोन ट्राय केला तर एंगेज. पाच मिनिटांनी लावला तर त्याला आमचे काही ऐकू येईना. मग मुलाच्या मित्राने फोन लावला तर याला अजून आमचा ठिकाणा सापडत नव्हता असे समजले. मग भारती हॉस्पिटल माहिती आहे का तिथे याल का विचारले तर होय म्हणाला. मग पाचेक मिनिटे चालत भारती हॉस्पिटलला गेलो. तिथे दहा मिनिटे थांबूनही ओलावाला आलाच नाही. पुन्हा फोन केला तर या पठ्ठ्याने परस्परच ऑर्डर कॅन्सल केली असे म्हणाला. त्याला काय प्रॉब्लेम होता हे शेवटपर्यंत समजले नाही !
एव्हाना बारा वाजून गेले होते. पुन्हा उबेर पाहिली. रेट १८४ आला. त्याला बोलावले. तो मात्र दोन मिनिटात आला आणि अखेर बाराऐवजी एक वाजता बावधनला पोचलो.
परतीच्या वेळी पुणेकर नातेवाईक म्हणाले तुम्ही रिक्षाने जा. पुण्यात कंपल्सरी मीटर आहे. मीटरने व्यवस्थित भाडे होईल. रिक्षावाल्याला विचारले. मीटरने नाही म्हणाला. कात्रज बस स्टँडला जायचे होते. ३०० रु. म्हणाला.
परत टॅक्सी. यावेळी ओला न पाहता उबेरलाच बोलावले.. रेट १८० आला. टॅक्सी पाच मिनिटात आली. टॅक्सीत बसून अर्धा एक किलोमीटर पुढे गेल्यावर ड्रायव्हर महाशय म्हणाले कुठे जायचंय. मुलगा म्हणाला लोकेशन टाकलंय ना, कात्रज बस स्टँड. त्यावर तो म्हणाला मला आंबेगाव आलंय, तिथे सोडतो. मुलगा म्हणाला आम्ही कात्रज बस स्टँड बुक केलंय, तिथे सोडा. तो होय-नाही करू लागला. अखेर मी म्हटलं गाडी थांबवा आणि तुमच्या कंट्रोलला विचारून पहिले खुलासा करा, नाहीतर आम्ही दुसरी टॅक्सी घेतो. मग त्याने गाडी साईडला घेतली. वरती फोन लावला. दहाएक मिनिटे त्यांची बोलाचाली झाली मग हा सुरु झाला. मी म्हटले काय झाले ? तर म्हणे त्याचा मोबाईल रिस्टार्ट करून पाहायला सांगितले गेले रिस्टार्ट केल्यावर लोकेशन बरोबर आले.
काल बहुधा पनवतीच लागली होती.
बावधनवरून बहिणीच्या घरून निघून कोल्हापूरला यायचे होते. चौकशी केली असता समजले की चांदणी चौकातून काही ट्रॅव्हल कंपनीच्या बसेस कोल्हापूरला जातात. भाऊजींनी रेडबस च्या साईटवरून पाहिले तर नीता ट्रॅव्हल्सची एक कोल्हापूर बस दुपारी ४-३० वा. चांदणी चौकात येते व नऊ च्या दरम्यान कोल्हापूरला पोचते असे दिसले. भाऊजींनी मला विचारले चालेल का. चालेल म्हटल्यावर त्यांनीच त्यांच्या अकौंटमधून पेमेंट करून बुकिंग केले. काँटक्ट नंबर माझा दिला. तिकीट नंबर आणि गाडी नंबर इ. तपशिलाबरोबरच बस ट्रॅकरची लिंक पण मला मेसेजवर मिळाली. सव्वाचार वाजता चांदणी चौकात गेलो. ट्रॅव्हल्स बसेस थांबतात तिथे उभे राहून बसचा ट्रॅकर पाहिला. बस वेळेत सुटत असून ती आता पाषाण रोडवरून चांदणी चौकाकडे येत आहे असे दिसले. पाच पाच मिनिटांनी आम्ही ट्रॅकर चेकवत होतो. एका मिनिटाला बस २०० मीटरवर आली आहे असे दिसले. व दुसऱ्या मिनिटाला ती आता चांदणी चौक ओलांडून स्वारगेटकडे जात आहे, असे दिसू लागले !. प्रत्यक्षात नीता ट्रॅव्हल्सची कोणतीही बस चांदणी चौकातून गेलीच नव्हती. एव्हाना पावणेपाच वाजून गेले होते. मी भाऊजींना फोन केला. ते म्हणाले नीताच्या कस्टमर केअरला फोन करायला हवा. मुलग्याने कस्टमर केअरचा (एकमेव) नंबर जो संदेशात होता, तिथे फोन लावला असता ‘आपण चुकीचा नंबर डायल केला आहे’ असा आवाज येऊ लागला.
पाच वाजून गेले. आम्ही आता टॅक्सीने कात्रज बस स्टँडला जायचे ठरवले. वरती लिहिल्याप्रमाणे उबेर बोलावली आणि लोकेशनच्या गोंधळात दहा मिनिटे गेली. अखेर पुढे निघालो तोवर सव्वापाचला संदेश आला की नीता कोल्हापूर ही बस निर्धारित वेळेपेक्षा एक तास लेट असून पंधरा मिनिटात चांदणी चौकात येईल ! मुलगा म्हणाला काय करूया ? मला आता नीताचा भरोसा वाटेना. मी म्हटलं जाऊ कात्रजला आणि तिथे थांबून पाहू.
पुढे वडगाव पुलापाशी आलो तर अचानक रस्त्याच्या डावीकडे नीता ची एक बस उभी दिसली. नंबर पाहिला तर संदेशात लिहिलेलाच बस नंबर होता. आम्ही लगेच उबेर सोडली अन त्या बसकडे गेलो. तर ती पूर्ण रिकामी होती. ड्रायव्हर म्हणाला बस ब्रेकडाऊन आहे तुम्ही कस्टमर केअरशी बोला. झाले ! पुन्हा रिक्षा करून कात्रजला निघालो. रिक्षावाले २०० रु. मागू लागले. मग पुन्हा ओला बोलावली आणि वाट पहात बसलो.
एव्हाना सहा वाजत आले होते. इतक्यात वडगाव पुलाखालून एक कोंडुसकर ट्रॅव्हल्सची बस येताना दिसली. हात करून थांबवली आणि विचारले तर ती कोल्हापूरलाच निघाली होती. सिटाही बऱ्याच रिकाम्या होत्या. ‘हुश्श !’ म्हणून बसमध्ये चढले.
सातवाजता नीताकडून संदेश आला की तुम्हाला चुकीचा बस नंबर ‘चुकून’ पाठवला गेला असून करेक्ट बस नंबर अमुकतमुक आहे, व ही बस दहा मिनिटात चांदणी चौकात येत आहे. आता या संदेशात कस्टमर केअरऐवजी एक मोबाईल नंबर दिला होता. मी लगेच कॉल केला. नंबर चक्क खरा होता. त्याला झाप झाप झापले आणि माझे तिकीट कॅन्सल करुन रिफंड मागितला. त्याने सॉरी बिरी काही म्हणायच्या भानगडीत न पडता थंडपणे रिफंडचा प्रस्ताव ‘वरती’ पाठवतो असे सांगितले.
असे करत नऊच्या ऐवजी मी सव्वादहाला कोल्हापुरात पोचले. तोपर्यंत यष्टी महामंडळाच्या इचलकरंजी बसेस सगळ्या निघून गेल्या होत्या त्यामुळे शेवटची साडेअकराची बस मला मिळून साडेबाराला घरी पोचले. यापेक्षा बावधनमधून चारलाच उबेर करून स्वारगेटला गेले असते तर यष्टी महामंडळाच्या नॉनस्टॉप कोल्हापूर गाडीने साडेआठलाच कोल्हापुरात अन घरी साडेनऊला पोचले असते.
अखेरचा कहर म्हणजे रात्री साडेबारावाजता मला नीता वाल्यांकडून संदेश आला की आपले उतरण्याचे ठिकाण आता जवळ आले असून उतरण्याच्या तयारीत रहा !
पुढच्या वेळी पुण्याला जाताना स्वत:ची किंवा भाड्याची तरी गाडी घेतल्याशिवाय जायचे नाही, असे आता पक्के केले आहे !!
काय म्हणता ?
पुढच्या वेळी पुण्याला जाताना स्वत:ची किंवा भाड्याची तरी गाडी घेतल्याशिवाय जायचे नाही, असे आता पक्के केले आहेदोन किंवा जास्त लोक असल्यास हा पर्याय, अत्यंत सोईस्कर आहे (हवे तेव्हा, हवे तितका वेळ आरामशीर वाहन आणि चालक सेवेला तत्पर). तीनपेक्षा जास्त प्रवासी असल्यास, शहर ते शहर प्रवास आणि भेट दिलेल्या शहरांतील अंतर्गत प्रवास जमेस धरला तर, हा पर्याय आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकतो.चेक आऊटचा पेशंटही शेवटी पूर्ण बरा होण्याचा शिल्लक पेशंटच असतो.-- वरिल ओळीतील शब्दांचा नक्की अर्थ काय होतो ?