माठाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं अर्थात गळक्या माठाची गळती कशी थांबवावी?
अती तातडीची चर्चा टेबलावर घेतली आहे. सर्वांनी प्रतिसाद देवून प्रतिवाद करावा अन यातून काय निष्पन्न होईल ते सांगावे.
तर मागच्या आठवड्यात उन्हाळ्यात पाणी थंड होण्यासाठी मातीचा एक माठ घेतला. ते पाणी पिण्याच्या उद्देशाने साठवले जाते. तर या माठातून पाणी गळते आहे. म्हणजे एकदम माठ रिकामा होवून "काय माठ आहे!? काहीच राहत नाही तुझ्या डोक्यात!" अशा अर्थाचे नाही तर थेंब थेंब तळे साचे याच्या उलट थेंब थेंब माठ गळे या अर्थाचे थेंब थेंब पाणी गळते आहे. सत्वर मला वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं असे न आठवता, माठाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं असे सुचू लागले. लगोलग मी बायकोस मी बोलीले की बये माठाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं. मंग ती म्हनं की चला जावा लई चावट हाईसा. आवं हतं माठ गळतूया अन तुमाला लय गानं आठवतयं व्हय. कायतरी करा आन त्ये पानी गळनं बंद करा.
तर आता तो गळका माठ गळ्यात पडला आहे. तो परत करणंही शक्य नाही कारण घेते वेळी तो तपासून पाणी वगैरे भरून पाहीलेला होता.
आणि नक्की पाणी कोठून (म्हणजे माठातूनच पाणी गळते आहे पण नक्की कोणत्या भागातून) ते समजत नाही. माठ जेथून वरच्या भागात छोटा होत जातो त्या भागापासून साधारणपणे खाली माठ गळत आहे. म्हणजे निम्मा माठच गळका की हो. अन तेथपासून खाली संपूर्ण गोलाई ओली झाल्यासारखे दिसत आहे. अर्थात किचन ओट्याला सहाजीकच एका बाजूला पाणी जाण्यासाठी उतार असतोच. तर त्या मुळे एका भागातून पाणी उतरून थेंब थेंब तेथूनच गळत आहे. त्या थेंबांना एकत्र करण्यासाठी स्पंज ठेवले आहे पण ते स्पंज संपृक्त होवून त्या स्पंजामधूनच पाणी गळायला सुरूवात होते. स्पंज वारंवार ठरावीक अंतराने पिळून काढणे हे अगदी पिळवणारे काम आहे.
तर मंडळी, अशा गळक्या माठाचा गळकेपणा नेमका कुठे आहे हे शोधण्याची काही पद्धत आहे काय?
मला एक कल्पना सुचली आहे. तशी ती इतर कुणालाही सुचली नसेल
असे मला अजिबात म्हणायचे नाही पण गळक्या माठातले पाणी शोधण्यासाठी तर नक्कीच सुचली नसेल. पण काही सांगता येत नाही जर एखाद्याने हि पद्धत गळकी टाकी किंवा गळके पाईप शोधण्यासाठी उपयोगातही आणली असू शकते. पण गळका माठ माझेच पेटंट असू दे बरं का!
तर मंडळी, (पुन्हा पुन्हा मंडळी म्हणणे म्हणजे रेडीओवर आपली माती अन त्यांची झालेली माती हे सदर चालू असल्यासारखे वाटते. असो.)
अशुद्ध पाण्यातले बॅक्टेरीआ, जंतू नष्ट करण्यासाठी पोटॅशिअम परमँगनेट (KMnO4) या द्रव्याचे खडे त्या पाण्यात टाकण्याची पद्धत आहे. पावसाळ्यात विहीरीचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी या पोटॅशिअम परमँगनेटचे खडे विहीरीत टाकलेले मी देखील पाहिलेले आहे. पोटॅशिअम परमँगनेट पाण्यात टाकले तर पाणी थोडे गुलाबी किंवा थोडे जास्त प्रमाण झाले तर जांभळे होते. असे पाणी आपण पिवू शकतो.
तर मंडळी, आपण पुन्हा आपल्या गळक्या माठाकडे वळू या. अशा या गळक्या माठात पाणी भरून जर या पोटॅशिअम परमँगनेट (KMnO4) द्रव्याचे खडे त्या पाण्यात टाकले तर ते पाणी गुलाबी किंवा जांभळे होईल अन मग तेच पाणी सछिद्र माठातून जेथे गळका भाग असेल तेथून गळेल. असेच झाले तर आपल्याला नक्की कोणत्या भागाकडून माठ गळतो आहे ते शोधता येईल. असे मला वाटते.
तर मंडळी, असे खरोखर होईल का? अशाने माठाची गळती शोधता येईल का?
अन आता पुढचा प्रश्न.
जर वरील पद्धतीने माठाची गळती शोधली तर ती थांबवायची कशी? काही ठिकाणी अशा गळक्या माठांना सर्रास सिमेंटचा लेप लावल्याचे पाहण्यात येते. अर्थातच या पद्धतीत माठ नक्की कुठून गळतो आहे हे तपासून पाहण्यात येत नाही अन अंधारात बाण मारल्यासारखे सार्या माठालाच सिमेंटचा लेप लावला जातो.
परंतू या सिमेंटच्या लेपनामुळे माठाची सछिद्रता कमी होवून पाणी थंड होण्याच्या क्षमतेवर परिणाम निश्चित होईल.
आणखी एक, असा हा गळका माठ कच्चा असतो काय? म्हणजे पक्का भाजला गेला नसावा काय? अशा कच्या माठाला जर गॅसवर उलटा करून तापवीले तर तो पक्का होईल काय?
आणखी एक. कोणताही मातीचा माठ (या ठिकाणी चांगला माठ घ्या हं. गळका नव्हे.) साधारण वर्ष, दोन वर्ष किंवा तिन चार वर्षे पाणी गार करतो. नंतर त्याची सछिद्रता कमी कमी होत जावून त्याचे पाणी थंड होण्याचे प्रमाण कमी कमी होते. असा माठ तापवला किंवा तारेने आतून घासला तर मग त्यातील बुजलेल्या छिद्रांचे गुणधर्म बदलतील काय? अन मग असे करण्याने तो माठ पाणी जास्त थंड करण्यासाठी वापरात येवू शकतो काय?
हे असे आपण माठ पुन्हा पुन्हा वापरणार नाही पण एक शक्यता लक्षात घेतली तर काय करता येवू शकते ते आजमावणे चालू आहे बाकी काही नाही.
तर मंडळी, अशा गळक्या माठाचा नेमका गकळेपणा शोधायचा अन तो गळकेपणा कसा थांबवायचा हा प्रश्न आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Zindagi Se Koi | The Kroonerz Project | Ft. Bhavya Pandit | Anurag Mishra