कौतुक? चुकून कधीतरी !
मानवी मन हा फार गूढ प्रकार आहे. कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा थांगपत्ता लागणे कठीणच. त्याचे अनेक पैलू आपल्याला समाजव्यवहारात दिसून येतात. अनेकांबरोबरच्या संवादातून आपल्याला अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिसतात तसेच स्वतःच्या वैशिष्टयांची देखील जाणीव होते. अशा एका वैशिष्ट्याकडे या लेखात लक्ष वेधत आहे. शीर्षकात लिहिल्याप्रमाणे ते आहे -
‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’ किंवा अगदी केलेच तर ते हात राखून करणे.प्रथम हे लक्षात घेऊ की ही अगदी मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ती आपल्या सर्वांत अस्तित्वात आहे. फक्त तिचे दृश्य परिणाम मात्र कमीअधिक स्वरूपात व्यक्त होतात.
आता या गुणधर्माची बीजे लहान वयातच कशी रोवली जातात याचा एक अनुभव सांगतो. मराठी माध्यमात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले होते. या घटनेवर त्यांच्याच संकुलात राहणाऱ्या, इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आणि ते यश प्राप्त न करू शकलेल्या एका मुलाची प्रतिक्रिया होती, ’’मराठीतून काय सोपं असतं रे’’. अभिनंदनाच्या चार शब्दांऐवजी त्याने दिलेल्या या कडवट प्रतिक्रियेतून कौतुक न करण्याची रोगट मनोवृत्ती किती स्पष्ट दिसते. मग जसे आपले वय वाढते तशी ही वृत्ती आपल्यात घट्ट मुरत जाते.
अशा या कौतुक न करण्याच्या गुणधर्माने अनेकांना अनेक पातळ्यांवर पछाडलेले आहे . जरा त्यांची यादी करूयात का? विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, पती-पत्नी, जवळचे नातेवाईक, एका संकुलातील रहिवासी, साहित्यिक, खेळाडू, नेते, अभिनेते ....बास! यादी तशी संपणारच नाही. एखाद्याने त्याच्या क्षेत्रात छोटे-मोठे यश संपादले असल्यास त्याबद्दल चार कौतुकाचे शब्द मनापासून बोलायला आपल्याला किती जड जाते!
मनापासून कौतुक न करण्याची कला दोन प्रकारे प्रकट होते. पहिल्या प्रकारात संबंधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीत किंचित कौतुकाचा औपचारिकपणा उरकला जातो पण, त्या व्यक्तीच्या पाठीमागे मात्र तिच्याबद्दल चांगले बोलणे हे जाणीवपूर्वक टाळले जाते. तर, दुसऱ्या प्रकारात त्या व्यक्तीच्या पाठीमागे तिच्यातील कौतुकपात्र गुणांची नाईलाजाने कबुली दिली जाते पण, तिच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र कौतुकाचा विषय टाळून निव्वळ हवापाण्यावर बोलले जाते. अर्थातच खोटे कौतुक करावे असे बिलकूल नाही. विधायक टीकाही योग्यच. पण, एखाद्याच्या छोट्यामोठ्या यशाला निदान 'अरे वा' अशी सहज दाद द्यायला हरकत नसावी.
परीक्षा व स्पर्धांतील यश, कलाकौशल्य, नोकरीतील बढती, व्यवसायातील थक्क करणारी प्रगती, सार्वजनिक जीवनातील सन्मान अशा कितीतरी प्रसंगी यशस्वीतांवर कौतुकाचा वर्षाव ( निदान दखल घेणे) संबंधितांकडून अपेक्षित असते. त्यासाठी प्रत्यक्ष भेट, फोन वा संदेशवहनाची आधुनिक साधने अशी माध्यमे उपलब्ध असतात. प्रश्न असतो तो आपल्या अंतरंगातून दिलखुलास दाद देण्याचा. पण, तिथेच तर गाडे अडते.
आता हा एक अनुभव सामाजिक पातळीवरील.
भारताच्या एका पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात पुढच्या रांगेत बसलेले एक माजी पंतप्रधान ( बाकी सारे टाळ्या वाजवत असताना) हाताची घडी घालून व मख्ख चेहरा करून बसल्याचे दृश्य आपण दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी पाहिले. एवढ्या उच्च पातळीवर देखील कौतुकाचा कंजूषपणा आणि शिष्टाचाराचा अभाव प्रदर्शित व्हावा याचे सखेद आश्चर्य वाटते.
दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक केल्याने आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही. उलट, त्या कृतीतून आपण निरोगी मनोवृत्ती दाखवतो आणि कौतुकाच्या परतफेडीची संधीही निर्माण करून ठेवतो. कौतुक केल्याने आपल्याच मनाचा मोठेपणा सिद्ध होत असतो. तरीसुद्धा आपल्या अंतरंगातून प्रशंसेचे उद्गार पटकन बाहेर येत नाहीत खरे. याउलट एखाद्याची छोटीशी चूक सुद्धा आपण किती तत्परतेने दाखवून देतो!
वर म्हटल्याप्रमाणे आपणा सर्वांच्याच अंगी असलेला हा गुणधर्म आहे. जरा प्रयत्नपूर्वक त्याच्यावर मात करूयात का? हळूहळू जमायला हरकत नसावी.
रच्याकने.............
आपल्या या संस्थळावर मात्र आपण एकमेकाचे बरेच कौतुक करतो बुवा !! ☺️
महाराष्ट्रात शहरे जरी अनेक असली तरी ज्यांच्यापुढे कर जोडावेत अशी मात्र ही तीनच…"अर्धबरी>>> हे ' अर्धांगिनी' असे हवे ना ? या नात्यातील संवाद हा एक वेगळाच प्रांत आहे राव ! ☺️ राजेश, + १