Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाचून झाल्यानंतर …..

ह
हेमंतकुमार
Wed, 11/13/2019 - 03:55
🗣 70 प्रतिसाद
नुकताच जालावर अन्यत्र एक धागा निघाला होता की वाचून झालेल्या छापील दिवाळी अंकांचे काय करावे? चर्चेचा रोख हा अंकांचा संग्रह करावा की देऊन टाकावेत, याभोवती होता. अनेकांच्या त्यात सूचना आल्या. त्यातून या धाग्याची कल्पना मनात आली. हाच मुद्दा आपण पुस्तकांना लावून पाहू. साहित्यविश्वात अजूनही बरेच दर्जेदार साहित्य छापील स्वरूपात प्रकाशित होत आहे. ते आवडीने वाचणारे बरेच वाचकही आहेत. हे साहित्य पुस्तक, मासिक अथवा वार्षिक नियतकालिक या स्वरूपात प्रकाशित होते. नियतकालिकांचे आयुष्य तसे मर्यादित असते. त्या तुलनेत पुस्तके दीर्घकाळ साठवली जातात. या लेखात फक्त पुस्तकांचा विचार करू. छापील पुस्तके वाचणारे वाचक ते खालील प्रकारे मिळवू शकतात: १. नवीन विकत घेणे २. वाचनालयातून ३. रद्दीच्या दुकानातून ४. दुसऱ्याचे उधार घेणे ! वरीलपैकी पहिल्या ३ प्रकारातली निवड मुख्यतः एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार केली जाते. तर चौथा प्रकार हा पूर्णपणे मनोवृत्तीशी निगडित आहे. काही चोखंदळ वाचक पहिले तीनही पर्याय पुस्तकानुसार निवडणारे असू शकतात. वरच्या पर्याय २ किंवा ४ ची जे निवड करतात त्यांना त्या पुस्तकाच्या साठवणीचा प्रश्न नसतो; वाचून झाले की ते परतच करायचे असते. आता नवीन पुस्तक विकत घेणाऱ्यांबद्दल बघू. हे खरे पुस्तक शौकीन असतात. पूर्ण विचारांती ते पुस्तक विकत घेतात. त्याचे मनसोक्त वाचन करतात. पुढे त्यावर चर्चा वगैरे केली जाते. मग या नव्याचे नवेपण ओसरते आणि ते पुस्तक घरच्या कपाटात जाते. वाचनाची आवड म्हणून नियमित पुस्तके घेतली जातात. स्वतःचा संग्रह वाढत जातो. त्यासाठी अर्थातच घरातली जागा व्यापली जाते. एका मर्यादेपर्यंत या संग्रहाचे एखाद्याला कौतुक वाटते. मात्र पुस्तकांच्या अशा दीर्घकाळ साठवणुकीतून काही समस्या निर्माण होतात. जसे की त्यांत धूळ साठणे, वाळवी लागणे. एखाद्या सदनिकेत किती पुस्तके साठवावीत याला अखेर मर्यादा येते. दर्शनी भागात राहतील आणि मनात आले की पुस्तक पटकन काढता येईल असे भाग्य मोजक्या पुस्तकांना लाभते. बाकीची मग बॅगेत बंद होतात तर इतर काही माळा, पलंगाखालचा कप्पा अशा ठिकाणी बंदिस्त होतात. या पुस्तक संग्राहकांचा एक बाणा असतो, " मी ते पुस्तक विकत घेतलंय ना, मग रद्दीत अजिबात देणार नाही". उगाचच कुणाला भेट देण्यात अर्थ नसतो, कारण फुकट मिळालेल्या वस्तूची घेणाऱ्याला सहसा किंमत नसते. त्यामुळे हा घरचा साठा वाढतच राहतो. कालांतराने असे होते की या साठ्यातील कित्येक पुस्तकांना १० वर्षांत हात सुद्धा लावला जात नाही. आता माझा याबाबतीतला अनुभव लिहितो. जोपर्यंत स्वतः कमवत नव्हतो,तोपर्यंत वाचनाची आवड ही वाचनालायवर भागवावी लागली. जेव्हा कमावता झालो तसे हळूहळू पुस्तक खरेदी सुरू झाली. सुरवातीच्या आर्थिक परिस्थितीत ती मर्यादित होती. तेव्हा २-३ मित्रांमध्ये मिळून एकमेकांची पुस्तके फिरवली जात. त्यामुळे वैयक्तिक साठा कमी होता. पुस्तकाची निगा चांगली राखली जाई. तेव्हा विकत घेतलेले पुस्तक घरी आयुष्यभर ठेवायचे आहे हाच विचार होता. जणूकाही ती एक संपत्तीच होती. हळूहळू वाढत्या कमाईनुसार पुस्तक खरेदी वाढू लागली. जसा घरचा साठा वाढू लागला तसा पुस्तके जपण्यात हयगय होऊ लागली. आता ती वेगवेगळ्या ठिकाणी पसरू लागली. एखादे जुने पुस्तक पुन्हा काढून वाचणेही कमी झाले. तसेच संग्रहात नक्की कुठली पुस्तके आहेत याचेही विस्मरण होऊ लागले. दरम्यान काही वर्षे परदेशात वास्तव्य झाले. तेव्हा दर सहा महिन्यांनी भारतभेट होई. परदेशात मराठी साहित्य मिळणार नव्हते. तेव्हा ऑनलाइन मागवणे हाही प्रकार सुरू झाला नव्हता. मग दर भेटीत इथल्या पुस्तकप्रदर्शनात जाई आणि अधाशासारखी पुस्तके विकत घेई. परतीच्या प्रवासात बरोबर पुस्तकांची एक वेगळी बॅग असे. या खरेदीत एक प्रकार झाला. प्रदर्शनात जी उपलब्ध असंत त्यातलीच घाईने उचलली गेली. त्यामुळे ती सर्वच कायम संग्रही ठेवावी अशी नव्हती. जेव्हा परदेशातील मुक्काम संपला तेव्हा ती सर्व घेऊन भारतात परतलो. आता मात्र साठा काहीसा आवाक्याबाहेर गेला होता. मग शांतपणे विचार केला. संग्रहातील बरीच पुस्तके ही 'एकदा वाचायला ठीक' या प्रकारातील होती. अजून एक जाणवले. आपल्या वयाच्या प्रत्येक दशकानंतर आपली वाचनाची अभिरुची बदलत राहते. कॉलेजच्या वयात भयंकर आवडलेले एखादे पुस्तक २० वर्षांनी हातात सुद्धा घेवत नाही. आता माझ्याकडची जेमतेम १० पुस्तके अशी वाटली की जी कायम जवळ बाळगावीत. मग उरलेल्यांचे काय करावे ? प्रथम रद्दीचा विचार देखील नकोसा वाटला. मग जवळच्या वाचनालयात गेलो. त्याचे सभासदत्व घेतलेच होते. तिथे काही दिवस निरीक्षण केले. माझ्याकडे असलेली आणि तिथे नसलेली अशी फारच थोडी पुस्तके होती. मग हळूच तिथल्या ग्रंथपालांना विचारले की अशी काही पुस्तके त्यांना भेट देऊ का ? त्यांचा प्रतिसाद तसा थंड होता. 'बघू, ठरवू', या प्रकारचा. मग मी तो नाद सोडला. मग काही वाचनप्रेमी मित्रांना घरी बोलावले आणि माझा संग्रह दाखविला. त्यांनी न वाचलेली अशी मोजकी ३-४ पुस्तके निघाली. ते ती नेण्यास उत्सुक होते. मग ती मला बिलकूल परत न करण्याचा अटीवर त्यांना देऊन टाकली ! अर्थात उरलेला साठा अजूनही बराच होता. एका लहान गावातील वाचनालयाचे वृत्तपत्रात निवेदन आले होते. त्यांना वाचून झालेली पुस्तके भेट चालणार होती. त्यासाठी पोस्टाच्या रांगेत उभे राहायची माझी तयारी नव्हती. म्हणून एक कुरियर गाठले. लहान गावी पाठवाल का म्हणून विचारले. ते प्रयत्न करतो म्हणाले. मग मी ५ पुस्तके त्यांना दिली. मात्र ती इच्छित ठिकाणी काही पोचली नाहीत. मी पण त्यांचेकडे पोच मागण्याचा नाद सोडला. ज्या कोणाच्या हाती पडतील त्याला जर वाटले तर तो ती वाचेल, असा विचार करून विषय सोडून दिला. या दरम्यान दोन साहित्यिकांचे या संदर्भात लेख वाचण्यात आले. एक होता विजय तेंडुलकरांचा. त्या लेखातील प्रसंगातला एक माणूस विचित्र आहे. तो मुंबईच्या बसने प्रवास करतो आहे आणि एकीकडे पुस्तक वाचतो आहे. एकेक पान वाचून झाले की तो ते फाडून काढतो, त्याचा बोळा करतो आणि खिडकीतून तो चक्क फेकून देतो ! या प्रकाराने चकित होऊन लेखक त्याला याचे स्पष्टीकरण विचारतो. तो सांगतो की त्याचे बरेच ओळखीचे लोक फुकटे वाचक आहेत. ते त्याच्याकडचे एखादे पुस्तक निःसंकोचपणे मागतात आणि नंतर परत करायचे जाम विसरून जातात. अशा प्रकारे त्याची बरीच पुस्तके गायब झाली होती. त्यानंतर तो सध्याच्या निष्कर्षावर आला होता. वाचून झाले की फाडुनच टाकायचे, म्हणजे घरी संग्रह नको आणि कुणी फुकट मागायला पण नको ! पुढे जाऊन तो लेखकाला बजावतो, " मुला, अरे जगातील कित्येक मौल्यवान गोष्टी कालौघात नष्ट होतात, तिथे एका पुस्तकाचे काय घेऊन बसलास?" तें नी रचलेला हा प्रसंग नक्कीच बाळबोध नाही. ( मात्र तो माणूस बोळे रस्त्यात फेकून अस्वच्छता का करतोय हा प्रश्न आपण तूर्त सोडून देऊ !). त्याच्या गाभ्यातील अर्थ काढायचे त्यांनी आपल्यावर सोडून दिले आहे. माझ्यापुरता मी असा अर्थ काढला. पुस्तक एकदा वाचून झाले की बास, त्याचे जतन करायची खरंच गरज असते? हा मुद्दा वादग्रस्त आहे हे कबूल. पण माझ्या बदलत्या विचार आणि परिस्थितीत मी माझ्यापुरता हा अर्थ काढला. त्यामुळे, एखादे वाचलेले पुस्तक जर कायम ठेवावेसे वाटत नसेल तर रद्दीत विकायला काय हरकत आहे, अशी ठिणगी मनात पडली. दुसरा लेख वाचला तो रवींद्र पिंगेंचा. त्यात सुरवातीस साहित्यिकांचे अहंकार वगैरेचे चर्वितचर्वण होते. पुढे लेखाला एकदम कलाटणी दिली होती. त्यांनी असे म्हटले होते. ज्ञानेश्वर असोत की शेक्सपिअर, पिंगे असोत की एखादा नवोदित लेखक, या सर्वांत एक गोष्ट समान असते. ती म्हणजे, या सर्वांची पुस्तके कधीनाकधी पदपथावर विक्रीस येतात. म्हणजेच पदपथ ही अशी 'साहित्यिक' जागा आहे की जी जगातल्या सर्व लेखकांना एकाच पातळीवर आणते ! ( इथे मला ' Death is the greatest equaliser' या वचनाची सहज आठवण झाली). या लेखातील मिश्किलपणा भावला पण त्याचबरोबर विचारांना एक वेगळी दिशा मिळाली. लहानपणापासून मी पदपथावरचे पुस्तक विक्रेते पाहत आलो आहे. तिथून कधी एखादे पुस्तकही विकत घेतले आहे. किंबहुना काही दुर्मिळ पुस्तकांसाठी असे पदपथ धुंडाळणारे शौकीन असतात. तर मुळात एखादे पुस्तक पदपथावर येतेच कसे? अर्थातच कुणीतरी आपल्या संग्रहातील पुस्तक रद्दीत विकल्यामुळेच ! अशा जुन्या पुस्तकांची विक्री करून कुणीतरी आपला चरितार्थ करत आहेच ना. तेव्हा आपल्याकडील पुस्तक रद्दीत विकताना फार अपराधी का वाटावे? शेवटी त्या मार्गे ते कुठल्यातरी वाचकांपर्यंतच पोचते. अशी वैचारिक घुसळण झाल्यानंतर आता मी माझ्याकडची काही पुस्तके नियमितपणे रद्दीत देऊ लागलो. असे करताना त्या पुस्तकांबद्दलचा आदर मनात ठेवतो. भावनेला मध्ये येऊ देत नाही. आता कपाटातील जागा रिकामी होऊन तिथे नव्याने घेतलेल्या पुस्तकासाठी जागा उपलब्ध होते. या प्रकारची पुस्तकी-उलाढाल आनंददायी आहे. पुस्तके रद्दीत देण्याचा निर्णय पटकन घेता येतो आणि ते दुकान घराजवळ असल्याने अंमलबजावणीही झटकन होते. याउलट पुस्तके दान करण्याचा निर्णय खूप वेळकाढू ठरतो. त्यासाठी योग्य व्यक्ती/संस्था शोधा, त्यांचे कार्यालयीन सोपस्कार हे सर्व आपल्याला बघावे लागते. अजून एक मुद्दा. आपण बहुतेकांनी आपल्या पदवी शिक्षणा दरम्यान घेतलेली अभ्यासाची पुस्तके (एखादा अपवाद वगळता) यथावकाश रद्दीत दिलीच होती ना. त्या पुस्तकांवर तर आपले आयुष्यभराचे पोटपाणी अवलंबून आहे. तिथे जर आपण रद्दीचा निर्णय सहज घेतो तर मग साहित्यिक पुस्तकांबद्दलच आपण फार भावनिक का असतो ? गेल्या काही वर्षांत काही पुस्तकवेड्या संग्राहकांबद्दल लेख वाचनात आले. या मंडळींनी घरी प्रचंड पुस्तके साठवली आहेत. त्यांचा संग्रह बघून असा प्रश्न पडतो की त्यांच्या घरात पुस्तके आहेत, की तेच पुस्तकांच्या घरात राहताहेत ! या व्यासंगी लोकांबद्दल मला आदर वाटतो. मी मात्र त्यांच्यासारखे व्हायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले. आपण वाचनातले 'मध्यमवर्गीय' असल्याने आपला संग्रह हा आटोपशीर असलेलाच बरा, हा माझा निर्णय. खूप मोठा संग्रह जर आयुष्यभर बाळगायचा असेल तर कालानुरूप आता बदलावे लागेल. छापीलच स्वरूपात सर्व साठवायचा हट्ट धरून चालणार नाही. फार जुन्या आणि जीर्ण पुस्तकांची इ फोटो-आवृत्ती करून घेणे हितावह आहे. तसे प्रयत्न काही लोक करीत आहेत हे नक्कीच स्तुत्य आहे. मराठीत जशी इ पुस्तकांची बाजारपेठ वाढेल तसे छापीलच्या साठवणुकीचा प्रश्न कमी होईल. पुस्तकसंग्रहाबद्दलचे हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही अनुभव जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक. *********************
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
38909 वाचन

💬 प्रतिसाद (70)
च
चौथा कोनाडा Fri, 01/15/2021 - 13:32 नवीन
लेख आवडला. पुस्तकांचा असो वा इतर कोणताही छंद जोपासताना शेवटी सारासार विचार करुन त्याची दिशा ठरवावी लागते आणि वेळेत आवर घालावा लागतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/15/2021 - 16:15 नवीन
1. तुम्ही आणि तुमची मुलं 2. सावर रे 3. बोर्डरुम 4. राजा शिवछत्रपती 5. हा तेल नावाचा इतिहास आहे 6. एका तेलियाने 7. बाराला दहा कमी 8. छळछावणीतले दिवस 9. हॅरी पाॅटर 10. कौटिल्याचे अर्थशास्त्र
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 01/16/2021 - 18:44 नवीन
वाचनाच्या आवडीमुळे पुस्तके जमवून संग्रह करण्याचा नव्हे ती पुन्हापुन्हा वाचण्याचा मला छंद आहे. पुलंची काही पुस्तके पुन्हापुन्हा वाचताना हसू कसं काय येतं म्हणजे ते सगळे विनोद आधी वाचून त्यावर मनसोक्त हसलेलो असताना, हे मला अजूनही कळालेलं नाही. एकेकाळी दर पगाराला किमान पाचशे रूपयाची पुस्तके घ्यायची असा माझा प्रयत्न होता तो नंतर व्यस्ततेमुळे रोडावला व आता बंदच आहे. पण जेव्हा कधी पुस्तके दिसतात तेव्हा मला पाण्याचा भरलेला तलाव दिसलाय आणि ज्यात आत्ता जाऊन सूर मारावा असं काहीसं होतं. योगायोग म्हणजे डिसेंबरात दोन ऐतिहासिक पुस्तके हातात पडली, पैकी एक मी बरीच वर्षे शोधत होतो. दिवाळी अंकाचं म्हणालं तर आजवर संग्रही करण्याजोगा एकच दिवाळी अंक माझ्या वाचनात आला तो म्हणजे लोकमतचा दुसरा दिवाळी अंक ज्याचे संपादक होते गुलजार! सं - दी - प
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/17/2021 - 00:39 नवीन
सर्व नवीन वाचकांचे अनुभव आवडले. तुमचे संग्रह पण छान आहेत. रच्याकने… पुस्तक वाचायचे नसले तरी देखील संग्रह करणारे असतात. त्यांच्याबद्दल इथे लिहिले आहे: https://www.misalpav.com/node/48054
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/17/2021 - 10:03 नवीन
मार्क ट्वेन यांचा छान विनोद: "दुसऱ्याला दिलेले पुस्तक कधी परत येत नाही. म्हणून तसे देऊच नका. मी हे स्वानुभवातून सांगतोय. माझे स्वतःचे ग्रंथालय अशाच (उधार) पुस्तकांतून उभे राहिले आहे !"
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/21/2021 - 09:07 नवीन
बुकगंगा वरून ऑनलाइन पुस्तक मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का ? माझा पहिलाच प्रयत्न फसला. पुस्तकाची ऑर्डर नोंदली गेली पण पैसे स्वीकारले गेले नाहीत (declined). दोनदा प्रयत्न करून मी नाद सोडून दिला आहे. नुसती ऑर्डर स्वीकारली जाऊन पुस्तक घरपोच दिल्यावर पैसे द्यायचे, असं काही त्यात असतं काय ?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 07/21/2021 - 11:16 नवीन
व आपला अनुभव कळवून कलेरिफिकेशन घ्या इतर कोणीच खात्रीने काही सांगू शकणार नाही. नंबर जस्ट डायल वर मिळून जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
स
सौंदाळा Wed, 07/21/2021 - 11:23 नवीन
मी ४ वर्षांपुर्वी 'सारे प्रवासी घडीचे' हे पुस्तक बुकगंगा वरुन मागवले होते (चिंचवड, पुणे). पैसे आधीच ऑनलाईन भरले होते. खूप दिवस पुस्तक आलेच नाही (सात दिवसात येणे अपेक्षित होते). मग त्यांना ई-मेल पाठवला, त्यांचा फोन आला आणि काही दिवसात पुस्तक मिळेल असे त्यांनी कळवले. त्यानंतर पुस्तक व्यवस्थित मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ट
टवाळ कार्टा Wed, 07/21/2021 - 11:09 नवीन
GO DIGITAL :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/21/2021 - 11:24 नवीन
दोघांनाही सल्ल्याबद्दल धन्यवाद ! मी अशा पेचात पडलो आहे की पुन्हा प्रयत्न करेन आणि पुन्हा पैसे स्वीकारले गेले नाहीत, तर नुसतीच ऑर्डर तीन वेळा नोंदली जाईल का ? नक्की कळत नाही
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 07/21/2021 - 15:14 नवीन
त्यांना परिस्थिती व्यवस्थित सांगा इतर ऑर्डर कॅन्सल होतील आणि पैसेच दिले नसतील तर मग काहीच रिस्क नाही तरी कृपया आधीच्या ऑर्डरचे काय झाले dispatch jhali ki naahi hi चौकशी तोंडी करून मगच ऑर्डर नोंदवा. माझ्या मित्राने एक पुस्तक बुकगंगा मधून प्रत्यक्ष जाऊन विकत घेतले, घरी परतल्यावर त्याच्या भावाने हे पुस्तक त्याच्याकडे आहे तू कशाला विकत घेतले आल्यापावली परत जा असे सूनावल्यावर तो स्टोअरमधे परत जाऊन त्याने वस्तुस्थिती विशद केली. त्यांनीही संवेदनशील पुणेकर या उक्तीला जागून त्याची ऑर्डर कॅन्सल केली पुस्तकं परत घेतले व त्या किमतीचे व्हाउचर त्याला बनवून दिले जे वापरून तो ओनलाईल अथवा स्टोअर मधून दुसरे कोणतेही पुस्तक पुढे कधीही केंव्हाही दुसरे पुस्तक विकत घेऊ शकतो :) त्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम असेल तो असेल बुकगंगा चे लोकं चांगले आहेत असा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
व
वामन देशमुख Wed, 07/21/2021 - 13:11 नवीन
बुकगंगा वरून ऑनलाइन पुस्तक मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का ?
✋ मी मागची अनेक वर्षे बुकगंगावरून मराठी पुस्तके आणि विशेषकरून दिवाळी अंक (हैदराबादला) मागवतो आहे. तुमच्या ऑर्डरच्या पेमेंट मध्ये काही एरर आली असेल. पुन्हा प्रयत्न करून पाहू शकता. +91 88883 00300 हा त्यांचा व्हत्सप्प नंबर आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/21/2021 - 13:27 नवीन
नंबर दिल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ह
हेमंतकुमार Sat, 07/24/2021 - 10:43 नवीन
वरील बुकगंगाचा विषय आता पूर्ण करतो. तुमच्याप्रमाणेच मलाही बुकगंगाचा पहिला अनुभव खूप चांगला आलेला आहे ! मागवल्या पासून तीन दिवसात पुस्तक घरपोच मिळाले. सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ह
हेमंतकुमार Wed, 07/21/2021 - 13:39 नवीन
शेवटी यूपीआयचा नाद सोडून नेट बँकिंग केले आणि जमले. आता पुस्तकाची वाट बघतो !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 07/21/2021 - 15:17 नवीन
शेवटी यूपीआयचा नाद सोडून नेट बँकिंग केले आणि जमले. आता पुस्तकाची वाट बघतो !
आपण डेस्कटॉप वापरून ऑर्डर केली होती की मोबाईलवर ? डेस्कटॉप असेल तर सर्व ब्राउझरवर upi व्यवस्थित कामं करतेच असे नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Wed, 07/21/2021 - 15:58 नवीन
लॅपटॉपवरुन केली होती. यू पी आय गंडते काही वेळेस, बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
क
कंजूस Wed, 07/21/2021 - 14:44 नवीन
दुसरीपासून चांदोबा पाहणे. चौघे भावंड . तो विकत आणायचे बाबा. एकदा एक छोटी परीक्षा झाल्यावर दप्तरात चांदोबे भरून नेले शाळेत. गुरुजींना दाखवले. पहिली ते चौथी एका वर्गास एकच बाई/गुरुजी दिवसभर असतात आणि तेच भाषा,गणित शिकवतात. त्यांनी त्या दिवशी त्यातल्या गोष्टी वाचून दाखवल्या. आणि शेवटी "पुन्हा असे आणू नको हं" म्हणाले. पण मुलं खुश झाली होती माझ्यावर. मराठी शाळेत इंग्रजी पाचवीपासून सुरू होतं कखगघ... त्यामुळे मराठी पुस्तकंच सुरुवातीपासून. वर्गातला एक मुलगा त्याच्याकडे फ्यान्टम ऊर्फ वेताळ ( मराठीत) कॉमिक्स येत ती तो जुनी झाल्यावर देत असे वाचायला. सहावीत जरा वाचायला येऊ लागलं भराभर. बाबा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे (दादर) सभासद होते आणि ते कामाच्या जागेसमोरच ( कोहिनूर मिल्स नं १) होते. त्यामुळे तिथून पुस्तके येत. पण आमची आवड दक्षता मासिकापुरतीच होती. कादंबऱ्या, शिवाजी, लढाया, यांंत रस नव्हता. जवळच्या खेळाच्या मैदानाजवळच गुजराती शेटचे मोफत वाचनालय होते. तिथे बसून काकाचौधरी,लोटपोट ,चंदामामा हिंदी वाचायला सुरुवात झाली सहावीत. ती वाचून झाली की गुजराती चंदामामा रटपरटप करून वाचता येऊ लागल्यावर गुजराती चित्रलेखा मासिकाचाही फडशा पडू लागला. शाळेच्या वाचनालयात कानेटकर,गाडगीळ, आपटे,फडके,यांची पुस्तके होती पण ती आठवीत गेल्यावरच नावावर घरी नेण्यास मिळू लागली. ती वाचली. पुढे बाबांनी मुं म ग्रं सं सोडून दादर सार्वजनिक वाचनालय सुरु केले. तरीही मराठी कादंबऱ्या दूरच होत्या. म्हणजे वाचाव्याश्या वाटल्या नाहीत. अजूनही वाटत नाहीत. संसारिक दळण कोण वाचणार? इंग्रजी पहिली कादंबरी पर्ल बकची 'द गुड अर्थ' ती शब्दकोश काढून वाचून काढली. नववीत. कॉलेजात असताना काही वाचन झालं नाही. पण नोकरीवर लागल्यावर सर्वात प्रथम ब्रिटीश काउन्सिल लाइब्रीचा सभासद झालो. बरीच पुस्तकं आणि लेखक वाचले ( लिट्रेचर, हिस्ट्री, छंद) पेपर ब्याक्स रहस्य कादंबऱ्या नाहीच. इंग्रजी भाषेचे संदर्भ ग्रंथ मात्र विकत घेतले. ते टाकता येणार नाहीत. थोडक्यात कथा कादंबऱ्या कधीच विकत घेतल्या नाहीत आणि घेणारही नाही. वाचनालयात न येणारी इंग्रजी पुस्तकं एक महिना बोलीवर स्वस्तात मिळतात काही ठिकाणी. उदाहरणार्थ स्टीव जॉब्ज'चे चरित्र. प्रकाशन किंमत सहाशे रुपये. मुंबईत फुटपाथवर एका महिन्याने ढीग आले. शंभर रुपयाला घ्यायचं, एका महिन्यात परत केल्यास पन्नास रुपये परत. अशी काही पुस्तके ( कलाम,सुधा मूर्ती,टाटा वगैरे)वाचली. एका मित्राकडून इंग्रजीतल्या बेस्ट पेपर ब्याक्सची यादी (२५ नावाजलेले लेखकांची )घेतली. त्याने एकटाकी लिहून दिली. त्यांचे एकेक वाचून पाहिले. पर्यटनाची आवड असल्याने प्रदर्शनांतून फुकट मिळणारी पत्रकं, नकाशे,पुस्तकं मिळाली ती आहेत (तीसेक किलो.). ती ठेवणार. लोनली प्लानेटची जुन्या आवृत्ती शंभर रुपयांत फुटपाथवर घेतल्या. त्यातली माहिती नेटवरच्या साईटवर नाही. आतापर्यंत विकत घेतलेले सर्वोत्तम पुस्तक 'राजस्थान' - everyman's guide. फुटपाथवरच्या विकणाऱ्याने ते हातावर तोलून वजन बघून "शंभर रुपये" म्हणाला. म्हणजे शंभरसुद्धा त्याला जास्तीच किंमत सांगतोय असं वाटलेलं. रत्न आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/21/2021 - 14:56 नवीन
छान अनुभव व संग्रह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ह
हेमंतकुमार Sat, 08/28/2021 - 15:08 नवीन
‘हंस ‘ , ‘ मोहिनी ‘ व ‘ नवल ‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे, शनिवार( २८ ऑगस्ट) रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा