Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोइंग ७३७ मॅक्स - अपघात की मनुष्यवध?

स
स्वीट टॉकर यांनी
Tue, 12/24/2019 - 11:14  ·  लेख
लेख
अडीच वर्षांपूर्वी म्हणजे मे २०१७ मध्ये बोईंग ७३७-मॅक्स वापरात आलं. दीडच वर्षांत म्हणजे ऑक्टोबर २०१८ साली पहिला अपघात झाला आणि पाच महिन्यात म्हणजे मार्च २०१९ मध्ये दुसरा कॉपीकॅट अपघात झाला! साडेतीनशे जीव मृत्युमुखी पडले! जगातली सर्व ७३७ मॅक्स विमानं स्थानबद्ध केली गेली. सुदैवानी विमान अपघात क्वचित होतात. यात 'सुदैवानी' हा शब्दप्रयोग तितकासा योग्य नाही. विमान बांधणीत, त्यांचा मेंटेनन्स करण्यात, रनवे बांधण्यात आणि विमानं उडवण्याच्या वगैरे सर्व कामात दैवावर विसंबून राहता येत नाही. सुरक्षिततेला कायमच प्राथमिकता दिली जाते आणि द्यायलाच हवी. लायन एअरचा अपघात झाल्याबरोबर त्याची चौकशी सुरू झालीच होती आणि प्राथमिक चौकशीत विमानाच्या प्रणालीत काहीतरी दोष असणार असं दिसू लागलं होतं. बोईंग कंपनीने मात्र पायलटवर दोष टाकला होता. शिवाय तो अपघात इंडोनेशियात झाला असल्यामुळे 'या थर्ड वर्ल्ड देशांमध्ये safety culture तितकं भक्कम कुठे असतं?' वगैरे विधानं बोईंग कंपनीकडून केली गेली होती. मात्र अगदी तशाच पद्धतीने इथियोपियन एअरवेजचं विमान कोसळलं आणि आता बोइंगला जगाच्या डोळ्यात धूळ फेकणं अशक्य झालं. सॉफ्टवेअरधल्या काही तृटींमुळे हे अपघात झाले असं त्यांनी मान्य केलं. यातलं काही सॉफ्टवेअर भारतात बनलं असल्यामुळे इकडेदेखील संशयाची सुई वळली. बोइंग कंपनी अजूनही असंच दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे की ही एक तांत्रिक समस्या आहे. सत्य मात्र पूर्णपणे वेगळं आहे. लोभामुळे झालेल्या नैतिक अधःपतनाची ही क्लासिक केस आहे. सुरवात सुरवातीपासून करूया. बोइंग कंपनीची स्थापना होऊन शंभर वर्ष होऊन गेली. म्हणजे राइट बंधूंनी पहिलं विमान उडवून दाखवलं त्यानंतर काही वर्षांतच कंपनी सुरू झाली. जसजशी विमानं जास्त जास्त प्रगत होत गेली तसं त्यांचं डिझाइनही जास्त किचकट होत गेलं. मात्र बोइंग कंपनीची सुरक्षा संस्कृती (safety culture) इतकी भक्कम होती की त्यांनी कधीही शॉर्टकट घेतले नाहीत. औद्योगिक जगात त्यांच्या कार्यपद्धतीची तुलना एखाद्या दीपस्तंभाशी केली जायची. गुणवत्तेचा मापदंडच! त्या काळात बोइंगच्या दृष्टीने एक जमेची बाजू म्हणजे त्यांना म्हणावा तसा प्रतिस्पर्धी नव्हता. एक 'मॅक्डॉनेल डग्लस' नावाची कंपनी होती पण बोइंगच्या तुलनेत लहान. त्यामुळे बोइंग भरमसाठ किंमत लावायचे आणि उत्कृष्ठ गुणवत्तेची विमानं निर्माण करायचे. मोठ्या विमानांमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नसे. नागरी हवाई वाहतुकीत अमेरिका जगाच्या नेहमीच पुढे राहिलेली आहे. साठच्या दशकात प्रचंड प्रमाणात छोटे छोटे विमानतळ अमेरिकाभर बांधले गेले. त्यांवर यंत्रसामुग्री न वापरता पटापट माल चढवता उतरवता येईल अशा बसक्या पद्धतीची आणि साधारण दीडशे लोकांना घेऊन जाऊ शकतील अशा आकाराच्या विमानांची जरूर होती. त्यासाठी बोइंग ७३७ डिझाइन केलं गेलं आणि १९६७ साली वापरात आलं. ते थोड्याच काळात प्रचंड लोकप्रिय झालं. त्या मॉडेलची खूप variants आली आणि कंपनीला अमाप पैसा मिळवून दिला. आजपर्यंत ७३७ ची दहा हजारांवर विमानं बनवली गेली आहेत! जसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं तशी जास्त आधुनिकता त्यांत आली आणि सगळीच ७३७ variants लोकप्रिय झाली. सगळ्यांमध्ये थोडाथोडा फरक होता पण एकदा एखाद्या पायलटला ७३७ उडवण्याचा परवाना (याला Rating असं म्हणतात. License आणि Rating वेगवेगळी. License हा एक जनरल परवाना असतो. तो असल्याशिवाय विमान उडवताच येत नाही. Rating म्हणजे एक विशिष्ट मॉडेल उडवायला मिळालेली परवानगी. हा देखील वेळखाऊ आणि खर्चिक प्रकार आहे. माझ्या मुलीला पायलट बनायला म्हणजे License मिळवायला जितका खर्च आला जवळजवळ तितकाच खर्च नुसतं एअरबस ए-३२० विमानाचं Rating घ्यायला आला!) मिळाला की तो ही सर्व variants उडवू शकत असे. यूरोपमध्ये विमानं बनवण्याचं प्रगत तंत्रज्ञान होतंच. दुसर्‍या महायुद्धात इंग्लंड आणि जर्मनीने उत्तमोत्तम विमानं प्रचंड प्रमाणात बनवली होतीच. त्यांनी विचार केला की बोईंगच्या भरमसाठ किमती देण्यापेक्षा आपणच नागरी वाहतुकीची विमानं का बनवू नयेत? इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन या देशांनी मिळून 'एअरबस इन्डस्ट्री' नावाची कंपनी काढली. लवकरच त्यांनी बोइंगच्या तोडीची विमानं बनवायला सुरवात केली आणि कंपनीच्या इतिहासात प्रथमच बोइंगला नुसती गुणवत्ताच नव्हे तर 'रास्त किमतीत गुणवत्ता' हा नवा मंत्र घोकावा लागला. ७३७ची लोकप्रियता पाहून एअरबसने ए३२० हे मॉडेल काढलं. मात्र आतापर्यंत छोट्या विमानतळांवरदेखील सामान चढवायला आणि उतरवायला कन्व्हेयर वापरायला सुरवात झाली होती त्यामुळे विमानाचा ढाचा बुटका करण्याची जरूर नव्हती. ए ३२० चं पोट जमिनीपासून ७३७च्या तुलनेनी बरंच जास्त उंचावर आहे. त्या काळी जेट इंजिनं लांब आणि निमुळती असंत. त्यामुळे ती पंखांच्या खालच्या जागेत सहज मावू शकत होती. त्यात बदल होत गेले. जास्त fuel efficient इंजिनं बाजारात आली ती पहिल्या इंजिनांपेक्षा लांबीला कमी आणि व्यासाला जास्त होती. ७३७ च्या पंखांखालची जागा नवीन इंजिनांना अपुरी पडू लागली. विमानाचं डिझाइन ही अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. उंची वाढवायला नुसत्या चाकांच्या सपोर्ट्स् ची लांबी वाढवली किंवा पंख थोड्या उंचावर बसवले की झालं - असं करता येत नाही. बोइंगसमोर एकच उपाय होता. त्यांनी इंजिनांचं डिझाइन बदलून मागितलं. कोणत्याही ७३७ कडे समोरून बघितलं की आपल्याला इंजिन चपटं दिसतं. इंजिनाची उंची कमी करून रुंदी वाढवलेली आहे. महत्प्रयासानी इंजिन तिथे बसवलं गेलं. असं बरीच वर्षं चाललं. इंजिनांच्या डिझाइनमध्ये आणखी बदल झाले. ती पहिल्यापेक्षा जास्त फुगीर आणि लांबीला कमी झाली. आता मात्र ती ७३७च्या पंखांच्या खाली काही केल्या मावेनात. मात्र एअरबस ए ३२० ला अशी काही समस्या नव्हती कारण ती विमानं उंच होतीच. याच सुमारास 'अमेरिकन एअरलाइन्स' कंपनीने शेकडो विमानं विकत घ्यायचं ठरवलं. त्यांना दोन वर्षांनंतर ही विमानं लागणार होती. कमी इंधन पिणारी नवीन फुगीर इंजिनं वापरणं तर कुठल्याही कंपनीला जरूरच होतं. बोइंग कंपनीनं त्यांना आश्वासन दिलं की ही purely technical समस्या आम्ही सोडवूच आणि तुम्हाला वेळच्या वेळेला ७३७ विमानं देऊ! तुम्हाला एअरबस ३२० कडे वळावं लागणार नाही. झालं! या आश्वासनाच्या जोरावर त्यांनी ती ऑर्डर मिळवली आणि काम सुरू झालं. नवीन इंजिनं पंखांखाली लावणं अशक्य होतं. नाइलाजानी बोइंगनी ती पुढे सरकवली आणि वर उचलली. त्यामुळे इंजिनांचा सगळ्यात फुगीर भाग पंखांच्या खूपच पुढे आला. शिवाय एक गोष्ट झाली. विमानाचा सगळ्यात जड भाग म्हणजे इंजिन. दोन्ही इंजिनं पुढे सरकवल्यामुळे विमानाचा गुरुत्वमध्य पुढे सरकला! शिवाय पंखांमुळे विमानाला जो लिफ्ट मिळतो त्यातही फरक पडू लागला. त्याची काळजी घेण्यासाठी विमानाच्या शेपटीच्या भागामध्ये (Empannage मध्ये) बदल करावे लागले. मी मागे लिहिल्याप्रमाणे विमानाचं डिझाइन अतिशय गुंतागुंतीचं शास्त्र आहे. एक छोटासा बदल पचवण्यासाठी आणखी दहा छोटे बदल करावे लागतात आणि ते पचवण्यासाठी शंभर. मात्र कित्येक वर्षांच्या अफाट अनुभवामुळे हे सगळं करणं म्हणजे बोइंगसाठी रूटीन काम होतं. ते त्यांनी केलं आणि एक उत्तम गुणवत्तेचं विमान तयार झालं त्याला त्यांनी नाव दिलं 'बोइंग ७३७ मॅक्स'. आत्तापर्यंत सर्वकाही सुरळित चाललं होतं. कुठेही सुरक्षिततेला फाट दिलेली नव्हती. यापुढे मात्र ही हकीकत मार्ग बदलत जाते. तो मार्ग तीनशे सेहेचाळीस लोकांच्या मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचतो. यापुढची तकनीकी माहिती देखील गुंतागुंतीची आहे. ती मी शक्यतो सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करतो. कोठलंही विमान तयार झालं की त्याची पडताळणी त्या त्या देशाच्या सरकारच्या Aviation Authority करून घ्यावी लागते. तरच ती विमानं विकता येतात. मात्र आता विमानांच्या बांधणीला वापरलं जाणारं तंत्रज्ञान, नवनवीन मटेरियल्स, क्लिष्ट सॉफ्टवेअर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानांवर घातले निर्बंध यांची सांगड घालणं कल्पनातीत अवघड काम आहे. आज जर बोइंग (किंवा एअरबस) कंपनीने विमान बनवून पायलटसकट सरकारच्या ताब्यात दिलं आणि त्यांचे सर्व प्लॅन्स, रिपोर्ट्स वगैरे जरी सरकारकडे सुपूर्त केले तरी सरकारी यंत्रणेला त्यातून सत्य काय आहे त्याचा शोध घेता येणार नाही. त्यांना त्यातला कण अन् कण समजावून सांगायला पदोपदी उत्पादकाचे इंजिनिअर लागतातच. प्रत्येक खिळ्या-बटणाचा खोलवर जाऊन अभ्यास करायला सरकारकडे हाय-टेक यंत्रणा नसते. शिवाय पगारामधल्या फरकामुळे त्या त्या विषयांमधले सर्वोत्तम प्रतिभावंत (Best brains) सरकारी नोकरीत नसतात हे सर्वश्रुत आहे. याला अमेरिका देखील अपवाद नाही. तात्पर्य काय, तर उत्पादक आणि सरकारी यंत्रणा यांच्यातल्या सहकारामुळेच objectively चाचण्या करणं शक्य होतं. या सर्व चाचण्यांमध्ये बोइंग ७३७ मॅक्स तांत्रिक रीत्या पात्र ठरेल यात शंकाच नव्हती. मात्र यापुढे जो प्रश्न उभा राहिला तो तांत्रिक नसून commercial होता. त्या दिवसापर्यंत ७३७ ची कित्येक मॉडेल्स बाजारात उपलब्ध होती. ७३७ उडवायला पात्र असलेल्या पायलटला ती सगळी मॉडेल्स उडवण्याची परवानगी होती. याचा अर्थ सर्व मॉडेल्सचे सर्व कंट्रोल्स तर एकसारखे पाहिजेतच, पण तितकंच महत्वाचं म्हणजे त्यांचा 'feel' देखील एकसारखा पाहिजे. या 'feel' ची व्याख्या करणं तितकसं सोपं नाही, पण उदाहरणार्थ, जर आपण दुसर्‍याची कार चालवायला बसलो की चालवता तर येते, मात्र सफाई यायला जरा वेळ लागतो. हे विमानात घातक ठरू शकतं. ७३७ मॅक्स च्या चाचण्या केल्यावर असं लक्षात आलं की वेग, उंची, विमानाचं वजन आणि त्याचं distribution यांच्या काही combinations मध्ये विमानाचा 'feel' जाणवण्याइतपत बदलत होता. याचं सरळसोट solution म्हणजे हे विमान उडवायला वैमानिकांना खास प्रशिक्षण द्यायचं. पण हे अतिशय खर्चिक असतं. आधी पुस्तकी शिक्षण, त्यानंतर कित्येक तास simulator ट्रेनिंग, मग प्रत्यक्ष विमानात आणि सरतेशेवटी परीक्षा! हे प्रत्येक वैमानिकाला! या सगळ्यांचा खर्च विमानाच्या किमतीत मिळवल्यावर हे नवीन विमान घेण्यापेक्षा कुठल्याही कंपनीने एअरबस ३२० विकत घेणंच पसंत केलं असतं. आणि बोइंग कंपनी तर कित्येक विमानकंपन्यांना आपला शब्द देऊन बसली होती! करारांवर स्वाक्षर्‍या झालेल्या होत्या, आगाऊ पैसे घेतले होते, वेळापत्रक देखील दिलेलं होतं. त्यानुसार विमान कंपन्यांनी बँकांबरोबर आणि सरकारांबरोबर करार केलेले होते! नवे रूट्स आखले होते. सगळंच ओम् फस् झालं असतं! यावर उपाय म्हणून बोइंगने Manoeuvering Characteristics Augmentation System (MCAS) ही प्रणाली वापरली. (७५७ किंवा ७६७ ही विमानं अमेरिकन एअरफोर्सला टँकर्स म्हणून Mid Air Refuelling करण्यासाठी वापरायची होती तेव्हां वैमानिकांना मदत व्हावी म्हणून बोइंगनी ही प्रणाली विकसित केलेली होती.) वर उल्लेख केलेलं combination होतंय असं वाटलं की विमानाचा कॉम्प्यूटर ही स्थिती ओळखून स्वत:च थोडीशीच मदत वैमानिकाला करणार, जेणेकरून विमान उडवतानाचा 'feel' बदलणार नाही, तरीही वैमानिकाला आणि विमानाला धोकादायक परिस्थितीपासून दूर ठेवता येईल. यामध्ये कॉम्प्यूटर स्वतःच विमानाचं नाक खाली ढकलेल पण फक्त एक दीड सेकंदापुरतं अशी व्यवस्था होती. यामध्ये नाक साधारण दोन अंशानी खाली ढकललं जाणार होतं जे धोकादायक नव्हतं. याच सुमारास एक घटना घडली ज्याच्याबाबत बरेच तर्कवितर्क आहेत ज्यांचं समाधान मी करू शकणार नाही मात्र उल्लेख करतो. अमेरिकेच्या Federal Aviation Authority (FAA) चे जे दोन अनुभवी अधिकारी Certification Process मध्ये अग्रस्थानी होते त्यांनी FAA सोडली आणि खाजगी कंपन्यांमध्ये रुजू झाले. त्यांच्या जागी जरा कमी अनुभव असलेल्या दोन इंजिनिअरांची नेमणूक झाली आणि काम पुढे चालू राहिलं. जसजशा अधिकाधिक चाचण्या होत गेल्या तसतसं बोइंगच्या इंजिनिअर्सच्या लक्षात आलं की जर 'feel' तसाच ठेवायचा असेल तर वैमानिकाला 'थोडीशीच' मदत देऊन पुरणार नाही. कॉम्प्यूटरला जास्तच इनपुट्स द्यायला लागणार आहेत आणि एक दीड सेकंद नव्हे, तर तब्बल दहा बारा सेकंद! यात विमानाचं नाक वीस ते तीस अंशानी खाली जाऊ शकत होतं! ७३७च्या बाकीच्या वैमानिकांना हे विमान खास ट्रेनिंगविना उडवायला परवानगी मिळावी यासाठी बोइंग कंपनी desperate झालेली होती! त्यांनी हा बदल केला देखील! सगळ्यात धक्कादायक बाब तर यापुढेच आहे. त्यांनी हा बदल केला आहे हे वैमानिकांना सांगायचं नाही असं ठरवलं!! त्यांनी ते FAA ला सांगितलं की नाही, का सांगताना 'नरो वा कुंजरो वा' स्टाइलमध्ये सांगितलं हे आपल्याला नक्की माहीत नाही. बोइंगने इतका मोठा धोका का पत्करला याचं अधिकृत कारण पुढे आलेलं नाही पण अनधिकृत असं ऐकायला मिळतं की 'कॉम्प्यूटर कधीच चूक करंत नाही, आणि असलेल्या ताकदीचा दुरुपयोगही करीत नाही. त्यामुळे वैमानिकांना अति माहिती देऊन त्यांच्या डोक्यात गोंधळ निर्माण करून त्यांना ओव्हरलोड करू नये.' नीतिमत्तेच्या घसरणीचं असं नेहमीच दिसतं. एकदा ती सुरू झाली, की मग ती शेवाळी उतरण असते. स्वतःला थांबवणं अशक्य असतं! कॉम्प्यूटर योग्य निर्णय केव्हां घेऊ शकतो? जेव्हां त्याला मिळणारा data निर्भेळ असतो तेव्हां. या particular बाबतीत विमानाचा उडण्याचा अंश काय आहे (चढतंय, सरळ उडतंय का उतरतंय) हे समजायला Angle of attack indicator नावाचं यंत्र असतं. नॉर्मल पद्धत अशी की अशी दोन यंत्रं असतात. साधारण परिस्थितीत दोन्ही सारखाच अंश दाखवणार. या दोघांवर नजर ठेवायला तिसरा comparator असतो. जर दोघांच्या अंशात फरक पडायला लागला तर एक नीट चालत नाही हे स्पष्टच. पण कुठला नीट चालत नाहिये हे त्या comparator ला समजत नाही. तो एक अलार्म देऊन वैमानिकाला जागरूक करतो. पुढचं काम वैमानिकाचं. नियम काटेकोरपणे वाचल्यावर बोइंगच्या लक्षात आलं की अशी सिस्टिम जर MCAS ला वापरली तर नियमांप्रमाणे MCAS चे सर्व डीटेल्स आपल्याला विमानाच्या Training manual मध्ये घालावेच लागतील. आणि असं केलं की हे विमान बाकीच्या ७३७ विमानांपासून खूपच वेगळं आहे हे उघड होईल. मग नवं ट्रेनिंग करणं अपरिहार्य होईल! तेव्हां त्यांनी सगळ्यात horrible निर्णय घेतला! एकाच Angle of attack indicator चा आउटपुट या MCAS ला दिला गेला! विमानांना सर्टिफिकेट मिळालं, ती प्रवाशांना घेऊन उडू लागली. एकाच इंडिकेटरच्या इन्पुटवर FAA नी हरकत का घेतली नाही याची चौकशी चालू आहेच. लायन एअरच्या विमानात एका Angle of attack indicator मध्ये बिघाड झाल्याबरोबर कॉम्प्यूटरला वाटलं की विमानाचं नाक फारच वरच्या दिशेला झालेलं आहे. त्यानी नाक खाली दाबलं. वैमानिकांनी कसबसं एकदा नाक सरळ केलं. काही सेकंदातच कॉम्प्यूटरनी पुन्हा खाली दाबलं! आता ते सरळ करणं दोन्ही वैमानिकांच्या एकत्रित ताकदीच्याही पलीकडे होतं! हल्ली प्रत्येक विमानामध्ये Flight Data Recorder आणि Cockpit Voice Recorder असतात. त्यावर मिळालेली रेकॉर्डिंग्ज काळजाचं पाणी करणारी आहेत! वैमानिकांची काहीही चूक नव्हती. त्यांनी प्रचंड प्रयत्न केले! ही झटापट काही मिनिटे चालली होती! शत्रू कितीही बलवान असला तरी आपण जीव तोडून प्रतिकार तरी करू शकतो. पण एक घरभेदी आपल्याला घरात आहे हे माहीतच नसतं त्याच्याबरोबर दोन हात करणार तरी कसे? पहिला क्रॅश झाला तेव्हां लगेचच बोइंग कंपनीला काय झालं असणार याची कल्पना आलीच असणार! तरीही ते चूप!! दुसरा identical अपघात काही महिन्यातच झाल्यावर सगळ्या जगालाच सत्य उघड झालं! दुसर्‍या (Ethiopian Air) विमानाला झाला तो ‘अपघात’ न धरता ‘खून’ धरावा अशी तक्रार कित्येक प्रवाशांच्या आप्तांनी केली आहे. एकदा अमेरिकन सरकारनी नेमलेल्या समितीने त्यांचा अंतिम अहवाल सादर केला की एखादेवेळेस कोर्ट अशी केस दाखल करून घेईल देखील. तसं झालं तर बोइंग कंपनीच्या काही अधिकार्यांना मनुष्यवधासाठी दोषी धरून तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोइंग कंपनी औद्योगिक जगातली आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावून बसली आहे. ७३७ सोडाच, बाकी विमानांबद्दल यांनी कायकाय लपवलेलं असेल कुणास ठाऊक? असे प्रश्न विचारले जात आहेत. आज ना उद्या ७३७ मॅक्स आकाशात झेपावेल. झालेल्या नामुष्कीमुळे बहुदा त्याचं नाव बदललेलं असेल. आपल्याला त्यात बसण्याची वेळ येईल. तेव्हां आपण न घाबरता त्यात बसावं का? नक्कीच! ते विमान धोकादायक आहे का? अजिबात नाही! समस्या विमानाच्या डिझाइनमध्ये नाही. मनुष्याच्या लोभात आहे.

प्रतिक्रिया द्या
19334 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

इ
इरसाल Tue, 12/24/2019 - 13:26 नवीन
भयानकच आहे. गविंची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 12/24/2019 - 15:01 नवीन
गविंची आठवण झाली. ?? काय झालं ? आहेत की ते इकडे ऑनलाईन. ते पण अशा अपघातातून बचावलेत की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
श
शलभ Tue, 12/24/2019 - 14:54 नवीन
दोन्ही अपघात खूनच आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 12/24/2019 - 15:13 नवीन
अतिशय उत्तम आणि अचूक माहिती. मॅक्स हे एक भयंकर प्रकरण आहे. डेस्परेट होणारी इंडस्ट्री.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 12/24/2019 - 15:15 नवीन
तुमचे सर्व लेख जबरदस्त माहितीपूर्ण असतात. येवू दे अजून.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 12/24/2019 - 18:14 नवीन
समस्या विमानाच्या डिझाइनमध्ये नाही. मनुष्याच्या लोभात आहे.
थोडक्यात टाटा ने बोइंग विकत घेतले तरच बसावे म्हणूया की ;)
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Tue, 12/24/2019 - 20:15 नवीन
सर्वजण, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/25/2019 - 05:35 नवीन
बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या नैतिकतेचा कितीही डांगोरा पिटत असल्या तरी त्यांचेही पाय मातीचेच आहेत हे अनेक वेळेस सिद्ध होतं. यात हि पण एक भर. मागे फॉक्स वागेन यांनी पण डिझेल इंजिनाच्या धुराबद्दल आपली संगणक प्रणालीत बदल करून खोटेपणा केल्याबद्दल त्यांना सज्जड दंड झाला होता असे आठवते. एअर बस च्या A ३२० च्या प्रॅट अँड व्हीटनी निओ इंजिन बद्दल पण असेच ऐकिवात येत आहे. अगोदर इंडिगो आणि आता गो एअर या विमान संस्थेच्या विमानांचे रद्द होणे फार वाढले आहे. देव करो आणि हा प्रश्न कोणता तरी अपघात होण्यापूर्वी सुटो. अतिशय सोप्या भाषेत आपण हे समजावून दिलेत असेच जर एअर बस च्या A ३२० च्या प्रॅट अँड व्हीटनी निओ इंजिन बद्दल लिहिता आले तर आम्ही उपकृत होऊ __/\__
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 12/25/2019 - 11:02 नवीन
निओ ईंजिना संबंधी बातमी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 12/25/2019 - 05:47 नवीन
ज्या कंपन्या अनेक वर्षे मोनोपॉली (एकाधिकारशाही) उपभोगत असतात अशांवर स्पर्धा करायची वेळ आली की असे होउ शकते. अशा कंपन्यांची बाजारात विश्र्वासहार्यता इतकी असते की लोक डोळे झाकून त्यांची उत्पादने घेत असतात, म्हणूनच त्या मोनोपॉली मधे असतात. मोनोपॉली आहे म्हणून कंपनीने खर्च ही अव्वाच्या सव्वा वाढवलेले असतात. पण बाजारात स्पर्धा सूरु झाली की हा वाढलेला खर्च कमी करणे कठीण होउन बसते. कारण अशा परिस्थितीचा कंपनीने पूर्वी कधी विचारच केलेला नसतो. मग त्यांना अचानक खर्च कमी करणे अशक्य होउन बसते. शिवाय कंपनीच्या बाजारातिल प्रतिमेचीही त्यांना काळजी असतेच. मग बाजारातिल घसरता टक्का सावरण्यासाठी कंपनी असे निर्णय घेण्यास उद्युक्त होते. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेला फोक्सवॅगन प्रदूषण घोटाळा ही अशाच मानसिकतेमधून झाला आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/25/2019 - 06:45 नवीन
धन्यवाद. नेहमी प्रमाणेच तुमचा अजून एक उत्तम लेख.
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Wed, 12/25/2019 - 07:38 नवीन
@ खरेसाहेब - पुरेशी आणि विश्वसनीय माहिती प्रॅट अँड व्हिटनी इंजिनबद्दल मिळाली तर लिहिण्याचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 12/25/2019 - 20:29 नवीन
लेखाची वाट पाहत आहे. सदर लेखही उत्कृष्ट. अनेक बाबी नव्यानेच समजल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर
प
प्रदीप Wed, 12/25/2019 - 08:44 नवीन
ह्या गहन विषयावरील आपला लेख आवडला. गेल्याच आठवड्यात बोईंगने केलेली 'स्टारालाईनर' मधील कॅप्सुलही वेळेवर रॉकेटपासून अलग न झाल्याने बोईंगवरील दडपण अजून वाढले. शेवटी त्यांच्या सीईओ म्युलेनबर्ग ह्यांना दोनच दिवसांपूर्वी राजिनामा द्यावा लागला आहे. अर्थात त्यांचा बळीचा बकरा दिल्याने बोईंगच्या बोर्डास 'काहीतरी प्रेक्षणीय' केल्याचे दर्शवता आले ह्यापलिकडे त्याला काही किंमत नाही. ७३७ मॅक्सचा पहिला अपघात घडल्यानंतर अर्थात रीतिरिवाजाप्रमाणे, लायन एयरच्या सुरक्षिततेच्या तजवीजीविषयी पी. आर. कडून जाहीर संशय व्यक्त करण्यात आले. दुसरा अपघात झाल्यावर त्या कप्तानांचे ट्रेनिंग अपुरे होते वगैरे जाहीर बोलून झाले. ह्या प्रकरणात, दुर्दैवाने, FAA ची भूमिका मात्र धक्कादायक म्हणावी अशीच आहे. दुसर्‍या अपघातानंतर जगातील अनेक छोट्यामोठ्या देशांच्या एव्हिएशन एजन्सीजनी त्यांच्या हवाई क्षेत्रात ह्या प्रकारच्या विमानास उडण्यास बंदी जाहीर केली. तरीही FAA, ते विमान निर्दोष आहे, ह्याचीच ग्वाही अनेक दिवस देत राहिले. शेवटी व्हाईट हाऊसमधून दबाव आल्यानंतर त्यांनीही त्यांच्या हवाई क्षेत्रात ह्या मॉडेलवर बंदी आणली. आता, ह्या सर्व प्रकरणाचा फायदा घेऊन युरोपीयन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने, बोईंगच्या सर्वच नव्या विमानांची पडताळणी जागतिक एजन्सीस्तर्फे व्हावी, अशी मागणी केली आहे.
  • Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट गुरुवार, 12/26/2019 - 04:34 नवीन
Air crash investigation.. सुंदर माहितीपूर्ण लेख, खूप दिवसांनी मिपावर माहितीपूर्ण वाचायला मिळाले शतशः धन्यवाद
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 12/26/2019 - 04:56 नवीन
लेख उत्कृष्ठ १+ (परंतु रिसर्च मट्रेलमधे एक प्रकारचा युरोपियन बायस जाणवतोय का ? कदाचित माझा हा भ्रमही असू शकतो)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 12/26/2019 - 05:01 नवीन
छान. आवडला लेख. डिस्कव्हरी वरच्या एअर क्रॅश विषयावरील माहितीपट मालिकेची आठवण आली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 12/26/2019 - 11:22 नवीन
खूपच छान लेख. क्लिष्ट तांत्रिक माहिती सामान्यांना देखील समजेल अशा सुबोध भाषेत दिल्याबद्दल आभार्स. _/\_
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 12/26/2019 - 12:01 नवीन
दोन Angle of attack indicator असणे आणि त्यातली तफावत पायलटला दिसणे ही फिचर्स बोइंगने ऑफर केली होती. पण ती वॅल्यु अ‍ॅडेड टाईप, अधिक पैसे भरून अ‍ॅव्हेलेबल केली होती. या दोन विमानकंपन्यांनी विमाने विकत घेताना ही फिचर्स विकत घेतली नाहीत असही वाचलं आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/26/2019 - 12:06 नवीन
अशी फीचर्स असूनही ती व्हॅल्यू ऍडेड ठेवलेली असणं आणि कंपन्यांनी ती न घेणं हे दोन्ही केविलवाण्या करणाऱ्या आर्थिक ओढगस्तीचे (स्पर्धा, मार्जीन्स, संघर्ष) निदर्शक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गवि गुरुवार, 12/26/2019 - 12:15 नवीन
उद्या विमानात बाहेरचा प्रचंड गोंगाट इन्ट्रोड्यूस करून काही ठराविक सीट्स सायलेंट झोन म्हणून व्हॅल्यू ऍडेड म्हणून विकल्या गेल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. अधिक चांगली वागणूक : रु. ६९९ पासून पुढे फास्ट सिक्युरिटी चेक: (नशीब हा एअरलाइनच्या हातात नाही) रु. ७९९ लठ्ठ लोकांना सीट बेल्ट एक्सटेन्शन: रु. ९९ अनलिमिटेड टॉयलेट व्हिजिट्स: रु ५८९ शेपटीतली सुरक्षित सीट विथ एक्स्ट्रा प्रोटेक्शन: रु. १५९९ .. रेव्हेन्यू स्ट्रीम्सच रेव्हेन्यू स्ट्रीम्स..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अनुप ढेरे गुरुवार, 12/26/2019 - 12:18 नवीन
कारमध्ये प्यासेंजर एअर बॅग व्हॅल्यु अ‍ॅडेड फीचर असणे हेदेखील याचाच प्रकार म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुबोध खरे गुरुवार, 12/26/2019 - 14:50 नवीन
आता सुद्धा आपण "वेब चेक इन" केले तर फक्त "मधल्या" सीट फुकट असतात. खिडकीची सीट ६९९ रुपये आईल(isle), सीट ३९९ रुपये, पाय लांब करता येईल अशी सीट ५९९ रुपये असा चावट पणा चालू आहेच. यामुळे मी आताशा वाहतुकीच्या खोळंब्याच्या कारणास्तव विमानतळावर २ तास अगोदर जातो म्हणजे एक दमडी सुद्धा न भरता खिडकीची सीट मिळू शकते.( बहुतेक कोणी असे पैसे भरत नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पाषाणभेद Fri, 12/27/2019 - 18:07 नवीन
विमानात उभे राहून प्रवास का करू देत नाहीत? जे धडधाकट आहेत आणि पैसे वाचवण्याची ज्यांची इच्छा आहे ते उभे राहून (अर्थात विमानाच्या भिंतीत आपल्याला बांधून घ्यायची सोय हवी) प्रवास करू शकतात. सैनीक वाहतूक करणारे विमाने, कार्गो वाहतूक करणारे असा माल बांधून नेतातच ना. आणि हो, विमान अपघातामागील कारण मिमांसा समजली. गवि, आपण म्हणतात तसे विमान अपघात हा अपघातांची मालीका असते.
नीतिमत्तेच्या घसरणीचं असं नेहमीच दिसतं. एकदा ती सुरू झाली, की मग ती शेवाळी उतरण असते. स्वतःला थांबवणं अशक्य असतं!
एकदम झकास वाक्य. खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अनुप ढेरे गुरुवार, 12/26/2019 - 12:15 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चौकटराजा गुरुवार, 12/26/2019 - 15:55 नवीन
१९७३ च्या सुमारास " रोश विरुद्ध ऍडम " अशी सत्य घटनेवर आधारित कादंबरी वाचलेली आठवतेय .विश्वस्त संस्था ,कंपन्या व सरकारे यांचे साटेलोटे कसे असते याचे त्यात दर्शन झाले होते. विषय मात्र " औषधे " हा होता . हा विषय अगदीच निराळा . पण यात तसे कंगोरे दिसताहेत. एकूण विमान वहातुक ,क्राफ़्ट ई ई माझया उत्सुकतेचा विषय आहेच सबब अत्यंत आभारी आहे ! इंजिन पोझिशन मधील बदल एकाद्या फोटो ने समजावून दिले असते तर तुलनात्मक फरक समजला असता !असो, लेख ऊत्तम व धक्कादायक आहे !
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 12/26/2019 - 19:47 नवीन
'रोश विरुद्ध ऍडम' या विषयावर मिपावरही एक लेखमालिका मागे येऊन गेली होती. कुणाकडे लिंक असल्यास कृपया डकवण्याचे पुण्य पदरात पाडून घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
स्रुजा गुरुवार, 12/26/2019 - 23:31 नवीन
https://www.misalpav.com/node/17812 :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
त
तुषार काळभोर Sat, 12/28/2019 - 04:52 नवीन
बोईंग 737 मॅक्स आणि बोईंग 737- 800 या दोन मॉडेल्सच्या इंजिन आणि त्यांच्या जागेतील फरक दाखवणारे हे चित्र Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
त
तेजस आठवले गुरुवार, 12/26/2019 - 16:38 नवीन
ह्या धाग्याच्या निमित्ताने माझा एक बाळबोध प्रश्न : सीट अपग्रेड होते म्हणजे काय? आहे त्या तिकिटात वरच्या दर्जाच्या सुविधा मिळतात का? अपग्रेडची करणे काय ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/27/2019 - 15:32 नवीन
आपण जास्त पैसे भरले उदा. रुपये ९९९ भरले तर खिडकीची सीट मिळते. ६९९ भरले तर पहिल्या रांगेतील सीट मिळते जिथे आपल्या पुढे सीट नसल्याने पाय लांब करायला बरीच जागा असते. इ इ. त्याला प्रीमियम इकोनॉमि सीट म्हणायचं. कुठलीही गोष्ट फुकट देत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
ग
गणेशा गुरुवार, 12/26/2019 - 16:42 नवीन
मस्त लिखाण.. खिळवून ठेवले तुम्ही..
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 12/26/2019 - 20:52 नवीन
लेखाचे शिर्षक खटकले.. वध च्या ऐवजी हत्या ह शब्द योग्य होता. आणि तकनिकि = तांत्रिक
  • Log in or register to post comments
स
स्रुजा गुरुवार, 12/26/2019 - 23:32 नवीन
बरीच नवीन माहिती समजली. धन्यवाद या लेखा बद्दल
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 12/27/2019 - 03:02 नवीन
बरीच नवीन माहिती मिळाली
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Sun, 12/29/2019 - 07:35 नवीन
@mrcoolguynice - युरोपियन बायस मला नाही. मात्र या लेखात तसा दिसत असेल कारण कर्मधर्मसंयोगानी एअरबस ३२०ला मोठ्या इंजिनांचा त्रास जाणवला नाही. जेव्हां फ्लाय-बाय-वायर ही संकल्पना पहिल्यांदाच एअरबसनी नागरी विमानांसाठी वापरली तेव्हां बंगळूरच्या एअरपोर्टजवळ ए ३२० चा अपघात झाला होता. तेव्हां विमानाचे दोन तुकडे झाले आणि एका प्रवाशानी पळतापळता दर काही सेकंदांनी मागे वळून फोटो घेतले होते. त्यामुळे एक अफलातून सीक्वेन्स तयार झाला होता तो माझ्या डोक्यात घर करून आहे. @पैलवान - आउटलाइन स्केचबद्दल धन्यवाद! @रामपुरी - 'मनुष्यवध' हा माझा शब्द नाही. इंडियन पीनल कोडमध्ये एखाद्याची इच्छा किंवा तसा प्रयत्न नसताना जर त्याच्या हातून चुकून दुसर्‍याचा जीव गेला तर त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवत नाहीत. 'मनुष्यवधा'चा ठेवतात. इंग्रजीत 'मॅन्स्लॉटर'. 'तकनीकी' च्या बाबतीत बरोबर आहे तुमचं.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार गुरुवार, 01/02/2020 - 09:43 नवीन
फारच भीतीदायक...
  • Log in or register to post comments
स
स्वोर्डफिश गुरुवार, 01/02/2020 - 15:11 नवीन
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा