शब्द वेध
श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली.
अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच. माझ्याप्रमाणे जे इतरही शब्दप्रेमी इथे असतील त्यांना या धाग्याची ही एक हक्काची खुंटी मिळाल्यास आवडलेला रोचक शब्द टांगायला सोपे होइल असे मला वाटते. शब्द बरेचदा नविन भेटतात तेव्हा डोक्यात फिरत राहतात कधी अर्थ शोधले जातात कधी स्मृतीतुन निघुन जातात कधी एकदम वीज चमकल्यासारखा त्यांचा अर्थ दिसु लागतो कधी कोणी नेहमीच्या अतीपरीचीत शब्दांचा अनोखा वापर करतांना दिसतो. या सर्वांची मजा असते. एक एक शब्द आनंद देउन जातो समृद्ध करुन जातो, शब्दांना लगडलेले संदर्भ काळ त्यांचा उगम इतिहास नेहमी खुणावत राहतो कधी धागा सापडतो कधी काहीच गवसत नाही पण मागोवा घेण्यात त्यांच्च्याशी खेळण्यात भरपुर आनंद मिळतो इतके नक्की आणि इतकेच पुरेसे आहे.
असा धागा काढतांना शब्दवेध हा आवडलेला शब्द पहील्यांदा आठवला तो चंद्रकांत काळे यांच्या संचाच नाव शब्दवेध होत त्यामुळे. याच नावाच एक पुस्तक विद्युल्लेखा अकलुजकर यांनी लिहीलेलं आहे अस कुणीतरी सांगितल म्हणुन हे पुस्तक बुकगंगावर शोधतांना ( मी अजुन वाचलेले नाही ) याच्या पानावर फार सुंद र ओळ रेडीमेड सापडली जी माझ्या भावना अचुक व्यक्त करते. ती अशी.
शब्द-वेध म्हणजे शब्दांचा मागोवा. भाषेच्या घनदाट जंगलात घुसून केलेला नादाचा/शब्दांचा/अर्थांचा पाठपुरावा.
तर सुरुवात करतो व नंतर जमेल तसे प्रतिसादातुन एकेक शब्द घेत पुढे सरकतो
खस्ता
एक दिवस विदर्भातील कुठल्याशा गावातुन एस टी महामंडळाच्या बसने जात होतो. शेजारचा माणुस गप्प बसलेला. मला गप्पा मारायची सवय गप्प बसता येत नाही. मी हळु हळु काडी टाकत टाकत संवाद वाढवु लागलो. गडी खवय्या होता गप्पा खाण्यावर आल्या म्हणाला "अरे शेगाव कचोरी भुल जाएंगे आप ये ये यहॉ की कचोरी खाओ " मी सहज विचारलं कैसी है वो कचोरी ? तो म्हणाला " अरे बहोत बढीया एकदम खस्ता " खस्ता ??? कचोरी खस्ता ? माझ्या डोक्यात हा शब्द दोन ठिकाणी आदळलेला होता.
एक गालिब चा प्रसिद्ध शेर माहीत होता
'ग़ालिब"-ए-ख़स्ता के बग़ैर कौन से काम बन्द हैं
रोइये ज़ार-ज़ार क्या कीजिये हाय-हाय क्यूँ
यातला खस्ता हाल ट्रॅजीक गालिब माहीत होता. दुसरा " संसारासाठी मी इतक्या खस्ता (?) खाल्या आणि शेवटी हे नशिबी आलं " हे डायलॉग खुप वेळा ऐकलेले. पण खस्ता कचोरी पहील्यांदाच ऐकली ( खाल्ली नाही ) मग अर्थ शोधला खस्ता चा तिथे रीतसर पहीला अर्थ होता. दुर्दशाग्रस्त जो आपला वरील शेर मधला गालिब. पण हा खस्ता म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी खस्ताच्या विरोधी अर्थाने कडक कचोरी कोणाला आवडेल. तोंडात सहज तुडवली जाईल अशी खस्ता कचोरी किंवा असा कोणताही खाद्यपदार्थ जो ही क्वालिटी बाळगतो तो.
वि० [फा०खस्तः] १. बहुत थोड़ी दाब में टूट जानेवाला। भुरभुरा। २. जो कान में मुलायम तथा कुरकुरा हो। जैसे– खस्ता कचौड़ी, खस्ता पापड़। ३. टूटा-फूटा। भग्न। ४. दुर्दशा-ग्रस्त
कल्लोलिनी
श्री माधव ज्युलियन यांचे छंदोरचना हे सुंदर पुस्तक आहे. यात पहिल्यांदा हा शब्द माझ्या वाचनात आला. यात एके ठिकाणी ते म्हणतात " गद्यातही रमणीय आंदोलन असते. एखाद्या गद्यगंगाधराच्या ( हा पण रोचक शब्द आहे मराठीतले गद्यगंगाधर गाडगीळांचे नाव गंगाधर आहे हा योगायोग म्हणावा का ? ) भाषेत जेव्हा लेखन एकप्रकारच्या जेव्हा समाधीतच झाले असावे असे वाटते आणि भाषा ही कल्लोलिनीप्र्माणे भरपुर ओढाळ आणि नादवती होते तेव्हा तीत एक प्रकारचे श्रेष्ठ गुढ आंदोलन प्रत्ययास येते."
कल्लोलिनी म्हणजे अशी नदी ज्यात भरपुर लाटा तरंग उठतात किंवा अशा लाटा तरंगाचा कल्लोळ करत वाहणारी कल्लोलिनी नदी. नदी किंवा सरीता या नेहमीच्या गरीब शब्दांना किती सुंदर नादमय पर्यायी शब्द आहे हा. आणि हा असा प्रचाराबाहेर का गेला असावा ? माहीत नाही. मग हा शब्द जेव्हा अजुन शोधला तेव्हा श्री रुद्राष्टकम मध्ये सापडला तो असा
तुषाराद्रि संकाश गौरं गम्भीरं। मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरं।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गंगा। लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजंगा॥3॥
याचा दिलेला अर्थ खालील प्रमाणे होता
व्याख्या - जो हिमाचल समान गौरवर्ण व गम्भीर हैं, जिनके शरीर में करोड़ों कामदेवों की ज्योति एवं शोभा है, जिनके सर पर सुंदर नदी गंगा जी विराजमान हैं, जिनके ललाट पर द्वितीय का चंद्रमा और गले में सर्प सुशोभित है ॥3॥
इथे कल्लोलिनी शब्दावरुन हलकल्लोळ शब्द आठवुन माझ्या मनात विचारांचा कल्लोळ माजला. मला अजुन ऑनलाइन मराठी डिक्शनरी अजुन नीट शोधता येण्याची प्रॅक्टीस नाही. नबाच्या प्रतिसादावरुन आता दाते त शब्द थोडा थोडा शोधता येतो पण अजुन ते व्यवस्थित जमत नाही. म्हणजे मराठी टायपुन मग शोधावा की कसे म्हणुन सध्या गुगलुनच शोधतो तर इथे हिंदी अर्थात कल्लोलिनी चा अर्थ अधिक स्पष्ट करणारे विवरण असे आढळले
जल का वह प्राकृतिक प्रवाह जो किसी पर्वत से निकलकर निश्चित मार्ग से होता हुआ समुद्र या किसी दूसरे बड़े जल प्रवाह में गिरता है
तर मोठा सुंदर नादमय शब्द आहे मला खुप आवडला.
Mamihlapinatapai
एक गाणं आहे मनीषा कोइरालावर चित्रीत झालेलं जावेद अख्तर च गाणं आहे त्याच्या ओळी अशा आहे
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
आता यात दोन्ही प्रेमी जीवांना एकमेकांच्या ह्रद्यी फुललेला वसंत कळलेला आहे. एकमेकांच्या भावना क़ळलेल्या आहे. आणि त्या शब्दांनी व्यक्त करुन त्यातला आनंद त्यांना घालवण्यात अजिबातच रस नाही. तर मराठी ताणून आपण म्हणु शकतो की दोन प्रेमी मौनरागमग्न आहेत. ठिकाय बस्स पण Mamihlapinatapai हा एक शब्द आहे Yaghan भाषेतला. हा भाषांतर करण्यासाठी फार कठिण शब्द मानला जातो. ही भाषा मला माहीत नाही अजिबात पण शब्द त्याच्या अर्थामुळे भारी वाटला. याचा जो एक अर्थ दिलेला आहे तो खालीलप्रमाणे
"It is that look across the table when two people are sharing an unspoken but private moment. When each knows the other understands and is in agreement with what is being expressed. An expressive and meaningful silence."
दुसरा अर्थ असा
"A look that without words is shared by two people who want to initiate something, but neither start" or "looking at each other hoping that either will offer to do something which both parties desire but are unwilling to do
हा अर्थातच थोडासा चावट अनुभवाकडे निर्देश करतो
प्रत्येकाने कधीना कधी याचा अनुभव घेतलेला असावा
आता मराठीत याचा अनुवाद कसा करता येइल?
आणि त्यांची नजरानजर झाली मग पुढे काय झाल ? जुन्या अगदी जुन्या गरीब चित्रपटांत गरीब दिग्दर्शक दोन फुल दाखवायचे मग ती एकमेकांवर आदळायची बस झाल.
मराठी नेत्रपल्लवी या शब्दाच्या अर्थाच्या जवळ जातो पण वरील पहीला अर्थ हा कंटीन्युइटी दर्शवतो व नेत्रपल्लवी क्षणिक असते हा एक मुलभुत फरक आहे.
किसलय
महान कवि सुमित्रानंदन पंत यांच्या " पतझर" कवितेत हा शब्द येतो. या सुंदर कवितेच्या या ओळी बघा अगोदर्
झरो झरो झरो
जंगम जग प्रांगण मे, जीवन संघर्षण मे
नवयुग परीवर्तन मे , मन के पीले पत्तो
झरो झरो झरो
या ओळीत पण बघा " जंगम " शब्द जनरली आपण मराठीत् हा सरकारी शब्द "स्थावर व जंगम मालमत्ता " इतका रुक्ष वापरतो त्याचा असा काव्यात्मक वापर
क्वचितच आढळतो.
नंतर बघा
तुम पतझर तुम मधु....जय !
पीले दल , नव किसलय
तुम्ही सृजन, वर्धन, लय
आवागमनी पत्तो
सरो सरो सरो
किसलय चा अर्थ असा आढळतो [सं-पु.] - 1. पौधों में निकलने वाले नए पत्ते; कोंपल; नवपल्लव; कल्ला 2. अँखुआ; अंकुर।
इथे नव किसलय हा नव्या पालवी कडे निर्देश आहे.
याच्या अर्थात दिलेला अँखुआ हा ही बघा मस्त शब्द आहे जणु नवी पाने म्हणजे झाडाचे डोळे याचा ही अर्थ अंकुर च . पण नवी कोवळी पाने अशोक च्या झाडाची कोवळी मऊ मुलायम पाने आठवातात ? अजुन एक यात जो पतझड साठी मधु जय शब्द वापरला आहे तो बघा
हिन्दीत मधुमास म्हणजे वसंत ऋतु चैत्रमास इथे पतझड साठी वापरलेला आहे पण .इथे मी थोडा कन्फ्युज होतोय कारण मधु जय कसा ते काय कळत नाही.
रजनीश यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे " कोंपलें फिर फूट आँई"
फ़रहत शहज़ाद च्या या सुंदर ओळी बघा
कोंपलें फिर फूट आँई शाख पर कहना उसे
वो न समझा है न समझेगा मगर कहना उसे
वक़्त का तूफ़ान हर इक शय बहा के ले गया
कितनी तनहा हो गयी है रहगुज़र कहना उसे
प्रतिक्रिया