Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुखी झोपेचा साथी

ह
हेमंतकुमार यांनी
Tue, 01/21/2020 - 06:49  ·  लेख
लेख
शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin). मेलाटोनिनचे उत्पादन आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा). ok डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू. मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी ok “लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात. • जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते. • आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. • मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात ! प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात. मेलाटोनिनची अन्य कार्ये झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत: १. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य २. श्वसनयंत्रणा ३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे ४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य ५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो. ok निद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत: १. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे. २. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. ३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत : a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो. b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत. c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा ! ४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो. ५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे. मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो. याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे. गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे. शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते. सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम. ****************************************************

प्रतिक्रिया द्या
41442 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

च
चौकस२१२ Sun, 04/18/2021 - 13:29 नवीन
Melatonin वर बरीच वर्षे खूप बंधने होती ऑस्ट्र्रेलियात ..ज्या काळी उत्तर अमेरिकेत आणि सिंगापोर सारखया ठिकाणी सहज मिळत असे ! असे का असावे ! तिन्ही ठिकाणचे सरकार जागरूक आणि औषध प्रशासन कडक आहे !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 04/18/2021 - 14:16 नवीन
चौकस, एकंदरीत हे झोपेसाठी औषध म्हणून अजूनही वादाच्या भोवऱ्यात आहेच. अमेरीकेत सुद्धा AASM सारख्या निद्रा अभ्यास संघटना त्याला विरोध करतात. ऑस्ट्रेलियानेही परवानगी देताना विशिष्ट वयोगटाच्या वर वगैरे वगैरे अशा काही अटी व शर्ती घातलेल्या दिसतात.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 02/17/2022 - 16:48 नवीन
मेलाटोनिन संदर्भातील काही नवे संशोधन: गेल्या दशकात मेलाटोनिन औषधाचा खप प्रगत देशांमध्ये सुमारे पाचपट वाढला आहे (बऱ्याच ठिकाणी ते डॉक्टरांच्या चिट्ठीविना मिळत असल्यामुळे). हे औषध म्हणून घेणे सर्वांसाठी सुरक्षित नाही - विशेषता मधुमेही आणि मधुमेहपूर्व अवस्था असलेले लोक. मेलाटोनिनची शरीरातील पातळी वाढली असता ते इन्सुलिनला काही प्रमाणात विरोध करते. काही लोकांना रात्री उशिरा जेवायची सवय असते आणि त्यानंतर तर ते पुरेसे वेळाचे अंतर न ठेवता झोपी जातात. जसजशी रात्र वाढत जाते तसे मेलाटोनिनचे प्रमाण निसर्गता वाढते. खूप उशिराने जेवण केल्यास ग्लुकोजचा चयापचय बिघडतो. त्यातूनच ग्लुकोज- रक्तपातळी वाढण्याकडे कल होतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 03/24/2022 - 08:21 नवीन
अमेरिकेत गेली कित्येक वर्षे दोन भिन्न मोसमांत ‘डे-लाइट सेविंग टाइम (DST) ची संकल्पना राबवली जाते. यानुसार दरवर्षी Spring मध्ये घड्याळे एक तास पुढे नेली जातात, तर Autumn मध्ये ती पुन्हा पूर्ववत केली जातात. व्यवसाय आणि विरंगुळा या दोन्ही दृष्टीने त्याचे काही फायदे असल्याने ही कल्पना अस्तित्वात आली. नुकतेच अमेरिकेच्या संसदेने ‘कायमस्वरूपी डीएसटी’ हे विधेयक मंजूर केले आहे. परंतु या निर्णयाविरोधात निद्रातज्ञांच्या वैद्यकिय संघटनेने आवाज उठवला आहे. त्यांच्या मते असा कायमस्वरूपी बदल वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी चांगला नाही. आपल्या शरीराचे अंतर्गत जैविक घड्याळ सूर्यानुसार चालत असते. आपण जेव्हा कृत्रिमरीत्या घड्याळाच्या वेळा बदलतो त्यातून हृदय व मेंदूकार्यात बिघाड, काही मनोविकार आणि वाहनांचे अपघात या सर्व गोष्टींमध्ये वाढ होते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 05/03/2022 - 07:07 नवीन
दक्षिण कोरिया : निद्रानाशाची गंभीर समस्या *जागतिक अर्थव्यवस्थेत पहिल्या दहा क्रमांकात मोडणारा हा देश. कित्येक नागरिक दिवसाचे १४ तास किंवा अधिक काळ कार्यालयीन काम करतात. * मात्र इथे काही लाख नागरिकांना निद्रानाशाची समस्या भेडसावते आहे. त्यातील कित्येक जण झोपेच्या गोळ्यांचे व्यसनी झालेले आहेत. * काही लोकांच्या झोपेत चालत जाण्याच्या सवयीने अपघातही होत आहेत. * एकंदरीत इथला निद्रानाश-संबंधित उद्योग (औषधे, विशिष्ट गाद्या, उश्या, इ.) भरभराटीस आला आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 08/06/2022 - 17:55 नवीन
"मध्यरात्रीनंतरचे मन" या गृहीतकावर आधारित एक संशोधन वाचनात आले. मध्यरात्रीनंतर झोप न लागल्यामुळे जागे असणे हे तब्येतीस हानिकारक आहे. नैसर्गिक जैविक घड्याळाच्या विरुद्ध वागल्यास अशा समस्या उद्भवतात: १. नकारात्मक विचार २. निर्णयक्षमतेवर विपरीत परिणाम ३.मनात धोकादायक कल्पनांचा संचार
  • Log in or register to post comments
म
मनो Sat, 08/06/2022 - 20:01 नवीन
महिन्याभरापूर्वी meletonin चा वापर jet lag विरुद्ध करून पाहिला. मला पूर्वी jet lag असताना ४ तास झोप लागत असे, ती ७ तासांवर जाऊन, खूप फरक पडला. इथे सर्व तपशील दिलेले आहेत. https://www.frontiersin.org/articles/10.3389/fphys.2019.00927/full
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 08/07/2022 - 01:45 नवीन
सुमारे अडीच वर्षांपूर्वीचा हा लेख आणि सगळे प्रतिसाद पुन्हा वाचले. आत्ता आठवले की काही वर्षांपूर्वी मी ओशोंच्या पुस्तकात वाचून झोपताना मी 'जिबरिश' हा प्रकार करायचो. जिबरिश म्हणजे निरर्थक, असंबद्ध बडबड करणे. जिबरिश करताना संताप, राग, आनंद, दु:ख, कुरकुर, रडणे, जोरात हसणे, विनवणी करणे, उदासी, उत्साह वगैरे भाव स्वरांच्या चढ-उतारातून आणि शब्दांच्या फेकीतून व्यक्त करण्यातही खूप मजा येते. माझ्या अनुभवाप्रमाणे झोप लागण्यापूर्वी आणि झोप लागल्यावरही बराच काळ आपल्या मनात (त्या दिवसभरातले अनेक प्रसंग, शिवाय झोपण्यापूर्वी बघितलेले सिनेमे वा अन्य करमणुकीचे कार्यक्रम वगैरेंशी संबंधित) अनेक शब्दांच्या/विचारांच्या लड्याच्या लड्या सतत उलगडत जात असतात. शब्द आणि प्रतिमांचे अगदी काहूर माजलेले असते. (बहुधा त्यालाच आपण 'स्वप्न' म्हणतो). जिबरिश केल्याने त्या सर्व शब्द/प्रतिमा/भावना आदिंच्या कोलाहलाचा निचरा होऊन शांत, गाढ झोप लागते. कधीकधी आवडती जुनी गाणी मोठ्याने किंवा मनातल्या मनात म्हणत रहाण्याचाही प्रयोग करून बघितलेला आहे. झोपण्यापूर्वी अर्धा-तास आधी टीव्ही, मोबाईल इत्यादींचा वापर बंद करून घरात अगदी कमित कमी कमी प्रकाश ठेवणे, आणि अंगणात, घरातल्या घरात, बाहेर किंवा गच्चीवर वगैरे पायी चालत जिबरिश्/गाणी/स्तोत्रे वगैरेंचा प्रयोग नक्कीच लाभदायक असते. बाकी शारीरिक मेहनतीचे महत्व तर वादातीत आहेच.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 08/07/2022 - 06:05 नवीन
१.
महिन्याभरापूर्वी meletonin चा वापर jet lag विरुद्ध करून पाहिला.
>> छान. विशिष्ट कारणासाठी असा मर्यादित वापर आवडला. .... २.
झोपताना मी 'जिबरिश' हा प्रकार करायचो.
>> सुरेख !कल्पना आवडली मला घरी झोप लागण्यासाठी काही अडचण येत नाही. प्रवासात किंवा परगावी झोप लागण्यास अडचण येऊ शकते. तेव्हा मी पाठ असलेल्या 1-2 कविता लागोपाठ म्हणत बसतो
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 08/20/2022 - 17:16 नवीन
नेहमीप्रमाणे अत्युत्कृष्ट लेख, Meletonin म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हणायला हवा जैव अभियांत्रिकी. ह्याचा संबंध हा कित्येक बॉडी फंक्शन सोबत असतो हे वाचून नवल वाटले सर. केस गळती सोबत सुद्धा meletonin लिंक असते का ?? मला झोप ह्या विषयी पण खूप रस आहे, कच्ची झोप किंवा हलकी झोप, त्या दरम्यान दिसणाऱ्या ब्रेन वेव्ह किंवा अतिशय गाढ झोप, त्याला बहुतेक रॅपिड आय मुव्हमेंट REM SLEEP म्हणतात ना ? ह्या झोपेचा कालावधी हा म्हणे काही मिनिटे ते जास्तीत जास्त एखाद तास असू शकतो, ह्या झोपेत (टेक्निकली ही साखरझोेप) डोळ्याची बुबुळे वेगाने डावी उजवीकडे अन् वर खाली मुव्ह करतात हे खरे आहे का ? I mean if true, this is some creepy engineering nature has fitted into us sir !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 08/21/2022 - 06:15 नवीन
केस गळती सोबत सुद्धा melatonin लिंक असते का ?
>>> केसांचे आरोग्य व melatonin हे संशोधन अजून प्रायोगिक आहे. ठाम निष्कर्ष काढता येत नाही. ...
डोळ्याची बुबुळे वेगाने डावी उजवीकडे अन् वर खाली मुव्ह करतात हे खरे आहे का ?
होय, या झोपेत स्वप्ने पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Sat, 08/20/2022 - 17:26 नवीन
कित्येकदा झोपेत असताना (खासकरून पालथे झोपलेले असताना) आपण खूप उंचावरून फेकले गेले आहोत अन् कुठंतरी (एखाद टणक पृष्ठभागावर) आपण पालथेच Land झालो आहोत अशी फिलिंग येऊन एकदम झपकन जाग येते, अश्यावेळी श्वास स्लाईटली चढलेला असतो आणि लिटरली आपण खूप उंचावरून पडल्याचे फिलिंग येते. हा प्रकार अजून कोणासोबत झाला आहे का ? असे होणे नॉर्मल आहे का ? एक जण म्हणलं की हा एकच्युअली आपला ब्रेन हॉट बूट होण्याचा एक प्रकार असतो हॉट रिस्टार्ट सारखा, एक म्हणलं की ब्रेन असा रिस्टार्ट होऊ शकत नाही हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. अजून एक निरीक्षण म्हणजे हा प्रकार वय वर्षे १४-२६ भरपूर झाला, आधी नाही, २६ नंतर हा प्रकार थोडा कमी झाला अन् ३३ क्रॉस केल्यावर पूर्णच बंद झालं हे नेमकं काय असेल ??
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 08/21/2022 - 05:24 नवीन
#MeToo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
त
तुषार काळभोर Sun, 08/21/2022 - 07:55 नवीन
मला गाढ झोपेतही असं झालंय. बर्‍याचदा झोप लागत असताना एक थोडा वेगळा प्रकार होतो - पायरीवरून पाय घसरल्यावर, फुटपाथवरून पाय घसरून अचानक रस्त्यावर आल्यावर जसा एक सौम्य मानसिक धक्का बसतो, तसं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
ह
हेमंतकुमार Sun, 09/25/2022 - 12:54 नवीन
नारकोलेप्सी नावाचा एक दीर्घकालीन निद्राविकार असतो. यामध्ये दिवसा प्रचंड झोप वारंवार येत राहते परंतु रात्री ती लागण्यास खूप वेळ लागतो. अशा लोकांमध्ये स्नायू देखील एकदम शिथिल पडतात. या विकाराच्या कारण मीमांसेत orexin या रसायनाचा अभाव आढळून आला आहे. त्यासाठी काही जनुकीय घटक जबाबदार असतात. त्यांच्यावरील उपयुक्त संशोधन केल्याबद्दल शरीरविज्ञानातील ब्रेक थ्रू हा मानाचा पुरस्कार अमेरिका व जपानच्या प्रत्येकी एक संशोधकांना २०२३ साठी एकत्रित जाहीर झाला.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 03/17/2023 - 12:06 नवीन
आजच्या(शुक्रवार, 17 मार्च) जागतिक निद्रादिना निमित्त सर्वांना उत्तम झोप लागण्यासाठी शुभेच्छा ! या दिवसाचे एक वैशिष्ट्य आहे. दरवर्षी तो 17 मार्चलाच येत नाही. तो दिवस ठरवण्याचे एक शास्त्र आहे. एखाद्या वर्षी ज्या दिवशी मार्च- विषुवदिन असेल, त्याच्या आधीचा शुक्रवार हा निद्रादिन धरला जातो. 2008 ते 2023 या वर्षांचे निरीक्षण केले असता असे दिसेल, की हा दिन 14 ते 20 मार्च या दरम्यान बदलत राहिलेला आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 03/17/2023 - 14:24 नवीन
हमे मेलाटोनिन.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 05/20/2023 - 08:24 नवीन
शिफारस : झोपू आनंदे : घोरासुराचा वध! - डॉ. अभिजित देशपांडे
गेल्या पाच वर्षांत मात्र ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या प्रख्यात वैद्यकीय नियतकालिकात दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील आदिवासी एक लांबलचक असलेले, कर्ण्यासारखे ‘डिजीरिडू’ नावाचे वाद्य वापरतात. घनगंभीर आवाज करणारे हे ‘डिजीरीडू’ अनेकांनी आमीर खानच्या ‘दिल चाहता है’ या सिनेमात ‘जाने क्यूँ लोग प्यार करते है’ या गाण्यामध्ये ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा