वक्तशीर..
मी अतिशय वक्तशीर आहे. नोकरी करत असताना ऑफिसला मी अगदी वेळेवर जायची. इतकी की सगळेजण"तू काय ऑफिस झाडायला येतेस का?"अशी माझी चेष्टा करायचे.
मी ऑफिसात पोहोचायची तेव्हा कुणीही आलेलं नसायचं. माझी केबीनही साफ केलेली नसायची. टेबल पुसलेलं नसायचं. इतरांवर अवलंबून असलेली माझी कामं खोळंबायची. कँटीनमध्ये कॉफी,खाणं तयार नसायचं. एकूण मीच भोटम ठरायची.
कुणी मला पाच वाजता एखाद्या ठिकाणी बोलावलं तर मी पाचच्या ठोक्याला,नव्हे पाच दहा मिनिटं आधीच तिथं जाऊन पोहोचते. त्यासाठी घरातून कितीला निघायचं त्याचा मी हिशेब करते. आवरायला वीस मिनिटे, रीक्षापर्यंत जायला पाच मिनिटे, रीक्षा मिळायला वीस मिनिटे, रीक्षाचा प्रवास अंतर जितकं असेल तितकी मिनिटे, त्यानंतर त्या जागी जाण्यासाठी पाच मिनिटे. याप्रमाणे हिशेब करुन, पाचला पोहोचायचे असेल तर मी साडेतीनलाच आवरायला उठते. मला कुठेही अगदी डॉट वेळेवर जायला आवडतं. हे अगदी लहानपणापासूनचे संस्कार.
पण माझ्यासारखे वक्तशीर सगळेच असतात असे नाही. त्याचा मला मनस्ताप होतो. संताप होतो. उशीरा आलेल्या माणसाशी मी मोकळेपणाने बोलू शकत नाही.
एकदा मला एका नगरवाचनालयात भाषण देण्यासाठी बोलावलं होतं. मी वेळेआधीच जाऊन पोहोचले. साडेचारचं भाषण होतं. अपेक्षेएवढे श्रोते जमायला सव्वापाच वाजले. मी आयोजकांना म्हटलं, "आता भाषण सुरु करुयात". तर आयोजक म्हणाले, "वक्त्यानं नेहमीच थोडं उशीरा जावं, थोडी वाट पाहायला लावावी, म्हणजे वक्त्याचं महत्व वाढतं." (मी मनात म्हटलं, डोंबल!आलेले श्रोतेही वाट पाहून निघून गेले म्हणजे?माझीच फजिती!) शेवटी मी माझं महत्त्व वगैरे न वाढवता कार्यक्रम सुरु करायला आयोजकांना भाग पाडलं.
मी ज्यावेळी आकाशवाणीवर नोकरीला नव्हते तेव्हाची गोष्ट. मला एकदा आकाशवाणीवर भाषण देण्यासाठी बोलावलं.रेकॉर्डिंगची वेळ तीनची होती. मी पावणेतीनला मला बोलावणाऱ्या ऑफिसरच्या केबीनमध्ये हजर होते.ऑफिसर जागेवर नव्हते. चहा प्यायला गेले होते. बहुधा आसाममध्ये. कारण तीन वाजले,साडेतीन वाजले, चार वाजले. ऑफिसरचा पत्ता नाही. शेवटी त्याच्या टेबलावर मी येऊन, वाट पाहून गेल्याची चिठ्ठी ठेवून मी सरळ घरी परतले.
पुढे मी स्वतः आकाशवाणीवर नोकरी करायला लागले. मी वक्ता रेकॉर्डिंगला येण्याआधीच टेप इरेज करुन, फास्टफॉरवर्ड करुन(त्यावेळी कॉंप्युटर रेकॉर्डिंग नहतं. टेपवर रेकॉर्डिंग असायचं), क्यूशीट तयार करुन, (ड्यूरेशन सोडून) स्टुडिओ बुक करुन वक्त्याची वाट बघत असायची. वक्ता उशीरा आला तरी त्याचं ध्वनिमुद्रण अर्थातच करावं लागे पण तो वक्ता माझ्या मनातून उतरलेला असे.मात्र आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम वेळेवरच सुरु होतात. आकाशवाणीवरुन लोक आपली घड्याळं लावतात.आकाशवाणीचे निमंत्रित श्रोत्यांसाठी असलेले रंगमंचीय कार्यक्रमही वेळेवर सुरु होतात.समोर कमी श्रोते असले तरी.
मी आमच्या सोसायटीच्या एका भिशीत आहे. तेवढीच चार बायकांची ओळख होते. मैत्री होते. एकदा काय झालं ,माझ्याचकडे भिशी होती. ती त्या वर्षीची पहिलीच भिशी होती.मी सगळ्यांना दोन दिवस आधी रिमाइंड केलं. तयारी केली. भिशी चार वाजता होती. पाच वाजले तरी एकही बाई आली नाही. शेवटी मी फोन केले. त्या म्हणाल्या, "अहो, आज अमावास्या आहे म्हणून आम्ही आलो नाही.आम्हांला वाटले तुमच्या लक्षात येईल."कपाळावर हात मारुन घेतला. मी म्हणजे प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तिथी सारखीच मानणारी. अमावास्या अशुभ न मानणारी. पण लोकेच्छेपुढे आपलं काही चालत नाही. मी अजूनही त्या भिशीत जाते बरं का!बायका माझ्या वक्तशीरपणाशी ऍडजस्ट झाल्यात. त्या दुर्लक्ष करतात.
एकदा मला एका कुटुंबात "संगीत" कार्यक्रमासाठी चार वाजता बोलावलं होतं. मी गेले. बरोब्बर चार वाजता. मी गेले तर कामवालीनं दार उघडलं. ती फरशी पुसत होती. जिनं बोलावलं ती घरमालकीण बाहेर गेली होती. मी गेले त्या खोलीत जिचं लग्न ठरलंय ती मुलगी मेंदी लावत बसली होती. ती बैठिये म्हणाली. मी बैठक ठोकली.साडेचारला घरमालकीण आली.
उशीर झाल्याबद्दल, मला वाट पाहायला लागल्याबद्दल सॉरी बिरी काही नाही. बाकीच्या कुणी बायकाही आल्या नव्हत्या. मी विचारलं," ग्रुपपर आपने मेसेज भेजा था इसलिए आयी हुँ। आज संगीत है ना?" तिनं होकार दिला. त्यानंतर पावणेसहाला संगीत वाजवणाऱ्या बायका आणि आमच्या ग्रुपमधल्या इतर बायका सहा वाजता आल्या. खूप नटूनथटून. मी अगदीच साधी दिसत होते. मी साडेसहापर्यंत थांबले आणि सगळ्यांची माफी मागून घरी निघून आले.
एकदा असंच झालं. माझ्या बॉसची बदली झाली म्हणून मी त्यांना सपत्निक घरी बोलावलं. संध्याकाळी पाच वाजता. छान बेत केला. ओल्या नारळाच्या करंज्या,सुरळीच्या वड्या वगैरे. गिफ्टस् आणल्या. मी स्वतः तयार होऊन पाच वाजल्यापासून त्यांची वाट बघत बसले. तुम्हांला आश्चर्य वाटेल. पण ते दोघे रात्री ९वाजता आले.तेही मी फोन केल्यावर. आणखी एके ठिकाणी गेले होते तिथे वेळ लागला म्हणे! मी मुकाट्याने भात, आमटी, पोळी भाजी केली आणि करंज्या आणि वड्यांबरोबर त्यांना जेवायलाही वाढलं.
मी आणि माझी मैत्रीण इंदूरला गेलो होतो. तिथे मैत्रिणीच्या ओळखीचे एक पतीपत्नी होते.त्यांच्याकडे आम्हांला बोलावलं होतं चहाला.ट्रँफीकमुळे आणि नवीन गावात रस्ता चुकल्यामुळे आम्हांला दीडतास उशीर झाला. आम्हांला शरमल्यासारखं झालं.गयावया करत आम्ही माफी मागायला लागलो. ते शांतपणे म्हणाले,"अजी होता है।इतना परेशान होनेकी जरुरत नहीं। आरामसे कल आते। कोई दिक्कत नहीं! शांत हो जाईये।"
कल आते? एवढा उशीरही एखाद्याला चालू शकतो?
अलिकडे वयपरत्वे मी ताठर राहायच्याऐवजी लवचिक व्हायचं ठरवलंय. कुणी उशीरा आलं तर मी फारसं मनाला लावून घेत नाही. म्हणते, "जाने भी दो यारों.. बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं!" उशीरा का होईना पण भेटायला येणारा माणूस महत्त्वाचा.
+१