अन्न खाता दुःखी भव..!!
मी सुरुवातीलाच कबूल करते की,मला खाण्यात इंटरेस्ट आहे. मी पक्की खवैय्यी आहे. माझं वजन वाढलेलं असल्यानं डाएटिशियन सांगेल तेच मी खाते. पण न राहवून, मोह न आवरल्यामुळे मी ते डाएट अनेकदा मोडतेही. ज्यामुळे वजन वाढतं ते सगळे पदार्थ मला अतिशय आवडतात. म्हणजे तळलेले आणि गोड पदार्थ. माझे फँमिली डॉक्टर मला आवडतात, कारण ते मला म्हणतात,"you are fat but fit.
your reports are normal.
"फॅट बट फिट!वा वा! तरीही वाढलेलं वजन माझं मलाच खुपतं आणि मी (वारंवार) डाएट करते.
कुणी जेवायला बोलावलं की मला फार आनंद होतो. वेगळ्या हाताचं, वेगळ्या चवीढवीचं खायला मिळावं अशी माझी अपेक्षा असते.(मीच केलेलं मी खातेसुद्धा) पण जेवायला बोलावून आपला विरस करणारे अनेक भेटतात.
एकदा एके ठिकाणी मी जेवायला गेले. आणि ताटावर बसून पहिला घास घेणार ,इतक्यात माझ्याबरोबर जेवायला बसलेला त्यांचा मुलगा म्हणाला," आई, मला बेतानंच वाढ हं! मला सारखं सारखं 'संडासला जावं' लागतंय. सकाळपासून चारदा गेलो. डहाळ होताहेत. दोनदा उलटीही झाली."
माझा हात जागीच थांबला.
ते ऐकून त्याची आई म्हणाली," अरे,काय सांगतोयस काय? तात्यांचं पण पोट बिघडलंय. पातळ होतंय. अर्धवट घट्ट अर्धवट पातळ असं चालू आहे. उलट्या, जुलाब, हैराण झालेत. बाहेरचं खाता आणि पोटं बिघडतात."
त्यापुढे संडास, बाथरुम, वॉशबेसीन ह्या आणि अशा विषयावर सचैल गप्पा झाल्या. मला वाढलेल्या ताटाला नमस्कार करुन उठावंसं वाटलं पण लाजेकाजेस्तव पहिलं वाढलेलं तेवढं खाऊन मी उठले.
आणखीही एक जरा वेगळा प्रकार सापडतो कधीकधी. एका ठिकाणी गेले जेवायला बोलावलं म्हणून. साग्रसंगीत बेत होता.
माझी आवडती पुरणपोळी होती. मी अगदी पोटभर खायचं ठरवून टाकलं (डाएट काय रोजचंच आहे). कटाची आमटीही मी ओरपणार होते. आम्ही जेवायला बसलो. मी प्रसन्न मनाने सुरुवात केली.
पण... तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या आत्याबाई म्हणाल्या,"मला पुरणपोळी वाढू नका हं! 'हे' गेल्यापासून मी सोडलीय.'ह्यांना' खूप आवडायची. त्यांची आठवण म्हणून सोडली." (उलट त्यांना आवडायची म्हणून त्यांच्या आठवणीत खावी ना पुरणपोळी-मी मनात म्हटलं.)
आत्याबाईंनी डोळ्यांना पदर लावला आणि त्या रडत रडत पतीच्या आठवणी सांगण्यात मग्न झाल्या. अजून पुरणपोळी वाढलीही नव्हती पण आम्ही सगळेच जेवायचे थांबलो. माझा मूडच गेला. आत्याबाईंचं रडणं थांबलं. त्यांनी जेवायला सुरुवात केल्यावर आम्हीही सुरुवात केली. पण या सर्वामध्ये पहिल्या वाफेचा गरम भात, वरण, तूप, लिंबू, कटाची आमटी, मागून येऊ घातलेली गरमगरम पुरणपोळी, त्यासोबत नारळाचं दूध.. सगळ्या अन्नाच्या गारगोट्या झाल्या. दुःखातून सावरलेल्या आत्याबाई नंतर चांगल्या चापून जेवल्या बरंका!
या आत्याबाईंवरुन आठवलं, आणखी एक कॅटेगरी. एके ठिकाणी जेवायला गेले तर सगळ्या आजारावरच्या गप्पा. कोण कसं 'गेलं' ह्याची वर्णनं. अकाली जाण्याबद्दल आणखी विशेष उत्साह.
जेवणात चांगली बासुंदी केलेली होती. मी बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि ऐकू आलं,"अहो, आमचे काका! गेल्याच वर्षी हार्ट अटॅकनं गेले. अशीच बासुंदी केली होती. बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि तिथंच ताटावरच कोसळून पडले. बासुंदीचा घोट शेवटचा घोट ठरला. मामला खतम. खेळ खलास. मी ओरडतेय काका काका म्हणून, आणि त्यांनी गर्रकन डोळे फिरवले"
मी दचकून तोंडाला लावलेली वाटी दूर केली. मी धीर एकवटून पुन्हा पुढची बासुंदी पिणार एवढ्यात शब्द ऐकू आले, "शालनमामींचा कँन्सर जास्त झालाय. सगळीकडे पसरलाय. अँडव्हान्स्ड स्टेज. कधीही बातमी येऊ शकते. मग कुणाला खोकला, कुणाला ताप, कुणाला सर्दी, चक्कर, डोकेदुखी आणि लोकप्रिय पित्त, उलट्या अशा सगळ्या आजारांवरच गप्पा झाल्या. आपण अशावेळी काहीच करु शकत नाही. मी दोनतीनदा विनोदी चुटके सांगून,आमच्या बागेत फुललेल्या सुगंधी फुलांबद्दल सांगून विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
काही ठिकाणी जेवणात नियमित केस सापडतात, की आपण पुढचं जेवण जेवूच शकत नाही. एकदा मला पानात वाढलेल्या फ्लॉवरच्या भाजीत अळी सापडली. मी ती भाजी खाणं कायमचं सोडलं. तर एकदा आमटीच्या वाटीच्या बुडाला चिकटलेली, काड्यापेटीतली विझलेली काडी सापडली. गॅस लायटर बिघडला होता म्हणून काड्यापेटी वापरली होती म्हणे!
खूप वर्षांपूर्वी एकदा एके ठिकाणी मी, माझा मुलगा आणि माझे 'हे' आम्ही जेवायला गेलो होतो. आम्ही आणि त्यांच्याकडचे मिळून सात माणसं होतो. मध्यभागी अगदी लहान लहान भांड्यांत डाव डाव भाजी आणि थेंब थेंब आमटी ठेवली होती. मोजक्याच पोळ्या, किंवा फुलकेच ते. आकाराने लहान. आम्ही प्रत्येकी जेमतेम एक पोळी, दीड चमचा भाजी आणि दोन ठिपके आमटी एवढंच खाल्लं. यजमानीणबाई म्हणाल्या,"आम्हांला शिळंपाकं,उरलेलं खायला अजिबात आवडत नाही. म्हणून मी मोजकंच करते. गोड मुद्दाम केलं नाही. काहींना डायबेटीस असतो ना! तळलेलं काही केलं नाही. वजन वाढतं. दुधातुपाचं पण मुद्दामच काही केलं नाही. कोलेस्टेरॉल वाढतं. आणि गळ्याशी येईपर्यंत जेवू नयेच. अपचन आणि गॅसेस होतात. भुकेपेक्षा चार घास कमी खावेत. आरोग्याला चांगलं. घ्या ना आणखी आमटी.."
आम्ही मान डोलावली, पण आमटी घेतली नाही. त्यांचं रात्रीचं जेवण कमी पडलं असतं.
जेवून (?) झाल्यावर आम्ही त्या घराबाहेर पडलो. मुलगा आणि हे म्हणाले,"चला आता आपण कुठेतरी जेवूया." मी सावधपणे म्हटलं,"त्यांच्या घरापासून दूरचं हॉटेल शोधूया. ते बाहेर आले तर? नाहीतर ते पण आपल्याच हॉटेलात यायचे"
अशा प्रकारची जेवणं जेवताना मला काय वाटतं सांगू? वाटतं की आपण एक करकोचा आहोत आणि आपल्यासमोर एका पसरट थाळीत बासुंदी वाढलीय.. आणि कोल्हा समोर बसून म्हणतोय, "पोटभर होऊ दे, संकोच नको हं.."
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Virgin Mojito - Sainee Raj | Hindi Storytelling | Tape A Tale