मराठी भाषेची भेट
व्याकरणशुध्द भाषा वापरणार्यांना आपण न्यायासनावर नाही, याची जाणीव असणे महत्वाचे. तसे संस्कार पुढच्या पिढीवर होणे हेही तितकेच आवश्यक आहे.
अन्यथा मराठी भाषेचा ऱ्हासच होईल.
मुख्य लेख -
मराठी भाषेची भेट
लेखक शेषाद्री नाईक
मराठी भाषा दिना निम्मित आपल्या मातृ भाषेविषयी ---
एखाद्या बेळगावी माणसाने दळणाला 'दळप' म्हटले किंवा मुंबईच्या माणसानें मंडईच्या मागे ऐवजी 'पाठी ' म्हटले तर आपण भाषेचे वैविध्य म्हणून ते सोडून देतो. पण तेच एखाद्याने 'पाणी’ ऐवजी 'पानी ' म्हटले, तर अशुद्ध म्हणून टीका करतो . त्याही पेक्षा वाईट म्हणजे त्या माणसाला आपण 'शिवराळ' किंवा तत्सम उपाधी देऊन हिणवतो. असे कां ? त्यात त्या माणसाचा कितपत दोष असतो ?
आपण या प्रश्नाच्या उत्तरासाठी जे आता ५० च्या वरच्या वयाच्या लोंकांपुरता आणि ज्यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले त्यांच्यापुरताच मर्यादित ठेवू . त्या माणसाने ६ वर्षांचा असतांना मराठी शाळेत प्रवेश केला, असे धरू. तोपर्यंत त्याची मराठी, निदान व्यावहारिक मराठी तरी घरात आणि समाजात शिकून पूर्ण होत आली होती! त्याच्या लेखी शब्द 'पानी ' असाच असतो ! मग तो शाळेत लिहायला शिकल्यावर 'पानी ' असाच लिहितो, मास्तर चूक देतात, फटका खातो आणि मग 'पाणी ' असा लिहितो. व्याकरण , शुद्ध लेखन या शब्दांची व्याप्ती ही मार्क , परीक्षेत पास होणे, एकंदरीत पुढे जाणे यापुरतीच मर्यादित असते. त्यामुळे 'पानी ' हे चुकीचे आहे यापेक्षा, तसे लिहिले तर मार्क कमी पडतात , असा त्याचा गृह असतो.
त्यामुळे बोली भाषा बदलण्याची तसदी तो घेत नाही! बरं , त्याच्या सभोवतीचे मित्र, परिवार काही वेळा शिक्षक सुद्धा तशीच भाषा वापरत असतात . त्यामुळे परीक्षेचे विश्व वेगळे आणि 'आपले ' विश्व वेगळे, असे नैसर्गिक पणे पृथ: करण तो मनोमन करतो. यात त्याला कितपत दोष देता येईल? मग हे आपण भाषा वैविध्य न समजता , ही भाषा उच्च आणि ती नीच , असे कां मानतो? किंबहुना त्यापुढे जाऊन समोरचा माणूस ‘माझी मराठी’ खराब करतो , अशी धारणा करतो ! अशा 'अशुद्ध ' बोलणाऱ्यां पैकी अनेक लोक इंग्रजी शिकताना त्या भाषेवर प्रभुत्व मिळवतात. त्यांच्या इंग्रजी ची आपण कदर करतो, पण मराठीच म्हणजे जरा ... अशी पुस्ती ही जोडतो !
बहीणाबाई चौधरी , मकरंद अनासपुरे अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांच्या तथा कथित ग्राम्य भाषेचा आदर होतो . मग या जनतेला कां वेगळे करतो ?
ब्रिटिशांनी आपली इंग्लिश , त्याचे व्याकरण , silent असणे , शैली यांचा शतकानू शतके उदो उदो केला !आज काय झाले त्याचे? अमेरिकन लोकांनी colour चे स्पेलिंग color करून सर्व नियम खुंटीवर बसवले !! आपण यातून काही शिकणार आहोत कां ? (इंग्रज आणि इंग्रजी यांची सध्या इतकी वाईट अवस्था आहे, की जर कोणी असे सांगितले की चीन मध्ये colour चे स्पेलिंग kolo करतात , तरी आश्चर्य वाटणार नाही)
भाषे ला नियम असावेत , पण जीवना प्रमाणे तेही प्रवाही हवेत. 'पानी ' ऐवजी 'पाणी ' असाच उच्चार खरोखरचं हवा असेल , तर संस्कार या पिढीवर नाही तर पुढल्या पिढीवर व्हायला हवेत . तो चूक करतोय त्यानेच सुधारणा करावी !! या दृष्टिकोनाने ऱ्हासच होईल. ही जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे . प्रत्येक आई वडिलांना शिक्षकांना ते समजून, पटवून दिले पाहिजे . विद्यार्थ्याने चूक केली तर त्याला केवळ मार्कांचा बडगा न दाखवता , त्याची चूक कोठे झाली , कां झाली , कशी सुधारता येईल , या साठी समाजातल्या प्रत्येक घटकाने वेळ दिला पाहिजे. आहे तशी तयारी ? अन्यथा त्याला चूक ना उमगता तो बंडखोर तरी बनेल किंवा दुर्लक्ष्य तरी करेल.
अंततः भाषा हे संवादाचे माध्यम आहे . जर आपण बोलणाऱ्याच्या त्रुटीच जर काढत बसलो , तर एकमेकांना समजून घेणे दुरापास्तच !! आपण दूरध्वनी ला 'फोन ' च म्हणणे बरे हे, जसे स्वीकारतो, तसे पाण्याला 'पानी ' असेही म्हणतात , असे कां नाही स्वीकारत ? असे करण्याने आपल्या भाषेचे वैविध्य , गोडी वाढेल आणि आपली भाषा समृद्ध असल्याचा अभिमान आपल्याला 'भेटेल '!!!
शेषाद्री
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments