मोगँबो - ८ ( अंतीम)
सारंग जे काही म्हणत होता ते किती प्रॅक्टीकल होते ते यावेळेस तरी त्याला माहीत नव्हते पण ते करायचे होते हा ठाम निर्धार त्याच्या बोलण्यातून सरांनाही जाणवला. ज्योतीने ज्योत पेटवावी तसा तोच निर्धार प्रत्येकाच्या मनात आला होता. आजचा आणि उद्याचा दिवस हे महत्वाचे आहेत प्रत्येकजण मनातल्या मनात स्वतःला सांगत होता. आयुष्याला कलाटणी देणारे दोन दिवस.मागील दुवा : http://misalpav.com/node/46438 आजचा दिवस कसा जाणार आहे याचा विचारच मनात यायला वेळ नव्हता. दिवसात फक्त चोवीस तासच का असतात. घड्याळाचा वेग थोडा कमी करता आला त्यासाठी पृथ्वीची गती करता आली तर हवीच होती. सकाळी फाईव्ह गार्डनच्या जॉगिंग ट्रॅकवर सुरूझालेला कालचा आख्खा दिवस कसा गेला तेच समजले नाही. पहाटे साडेतीन वाजता सगळ्याचे मोबाईल विसावले. पुन्हा नऊ वाजता कॉलेज मधे बाकीची तयारी पहाण्यासाठी गण्या हजर. दुपारचे साडेचार वाजले आहेत. कार्यक्रम सहा वाजता सुरू होतोय. गण्या पक्या मीना संध्या सगळे हजर आहेत. वेल ड्रेस्स्ड . आशा पण आहे. जितू गडबडीत धावत येतोय. तो सारंगला काहितरी सांगतो. सारंग मान डोलवतो. त्याला आता बाकी काही ऐकायचे नाहिय्ये. स्टेजवरची सगळी अॅरेंजमेंट चेक करायची आहे. माईक स्पीकर लाईट वाद्ये वाजवणारांच्या बसण्याच्या जागा. " ए कीबोर्ड त्या बाजूला ओक्टोपॅड त्याच्या शेजारी नको. दोघांचे मॉनिटर शेजारी शेजारी नकोत. नीट ऐकू येत नाही आपण काय वाजवतो आहोत ते. आणि तबला ढोलक वाले या बाजूला. मधली जागा रिकामी ठेव. हातातले माईक कुठे आहेत. ओ राजाभाऊ तुम्ही लावून घेतली का काळी चार मधे . काळी दोन ढोलक ला चालेल. ते तुम्ही आणि की बोर्ड वाले बोलून घ्या. वाडेकर सर पेटीवाले कुठे आहेत. हॅल हॅलो १ २ ३ ४ . माईक चेक माईक चेक.. हॅलो हॅलो….. " सारंग स्वतः सगळे चेक करतोय. कुठेतरी स्पीकर मधून माईकची व्हीसल कीर्र्र्र कीच्च्च्च करत वाजतेय." ए डॅनियल तीन नम्बरच्या माईकचा ट्रबल कमी करा बास वाढवा" " एकूण आपण तीस बॉक्सेस दिलेले आहेत. प्रत्येक जण किमान पन्नास जणांकडे जातील" इकडे गण्याची वेगळीच लगबग. कॉलेजचा जी. एस. अमर सोबत तो काहितरी बोलतोय. दोघेही हातवारे करताहेत. गण्या अमरला कसलीशी लीस्ट दाखवतोय. आजची संध्याकाळ ही महत्वाची. पावणे सहा. झाले. घड्याळ बहुतेक १०० मीटर स्प्रिंट च्या शर्यतीत उतरलय. सुपरफास्ट वेगाने धावतय. आता उरली पंधरा मिनिटे. प्राचार्य येताहेत. गण्या त्यांना काही कागद दाखवू पहातोय. त्यांचे त्याकडे लक्ष्य नाही. ते सारंग च्या खांद्यावर हात ठेवतात. सारंग त्यांच्या पाया पडतो. प्राचार्य त्याच्या खांदा थोपटतात. स्टेजच्या चारही बाजूने खुर्च्या लावल्या आहेत. कॉलेजचे ग्राउंड पूर्ण गच्च भरलय लोकांनी. मुंगी शिरायला जागा नाही. ढोलक पेटी तबला ऑक्टोपॅड की बोर्ड गिटार सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आहेत. कॉलेजचा जी एस अमर ने माईक हातात घेतलाय. " वेलकम एव्हरी वन टू अॅन्यूअल डे ऑफ अवर कॉलेज . अ गोल्डन डे ऑफ द ईयर . " अमर चे बोलणे संपताच " प म रे ग सा….." की बोर्ड वर ती परिचीत धून वाजली मुलांनी है.... ओरडत टाळ्या वाजवल्या. मीना ने गायला सुरू केलंय " दिल है छोटा सा, छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा चाँद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा दिल है छोटा सा, छोटी सी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा" सारंग संध्या मीना जितू गण्या पक्या आता कोणाच्याच मनात कसलाच विचार नाहिय्ये. कोणतीच शंका नाहिय्ये. सगळे लक्ष्य एकाच लक्ष्यावर आहे. ……………. " या रे. काय झाले. " प्रिंसिपॉल सरांनी मुलांना गेस्ट हाऊसच्या मीटिंग रूम मधे आत बोलावले " सर सगळा हिषेब केला. तीस बॉक्सेस मधे एकूण तीन लाख वीस हजार आठशे तीस झालेत." सारंगने थोड्याशा हताश पणेच सांगितले. " ग्रेट….. मला खात्री होती." " सर यात कुठे ग्रेट आहे. इतकी रक्कम जमली खरी पण ती हवी होती त्याच्या निम्मी सुद्धा नाहिय्ये" " अरे तुम्ही मुलांनी इतकी रक्कम जमवलीत हे ग्रेट नाही का" " हो पण" " जमवलीत हे महत्वाचे. सगळी अॅरेंज मेंट बीनचूक. " " सर यात अमरची खूप मदत झाली" गण्याने अमर कडे पाहिले. " तो नसता तर हे शक्यच झाले नसते ऐनवेळेला सगळे ठरवणे, सगळ्या सी आर ना बोलवून त्याना ही संकल्पना सांगणे, त्यांना कोऑर्डिनेट करणे. हे सगळे तो होता म्हणून झाले." मला कल्पना आहे त्याची. तो सगळे मला साम्गत होता. तुम्ही त्याला भेटलात त्याला अॅन्यूअल डेच्या विवीध गुणदर्शनच्या च्या कार्यक्रमातून आशाच्या भावाच्या ऑपरेशन साठी फंड जमवायची कल्पना दिलीत त्यावेळपासून. " " थँक्स अमर." " थँक कसले. आपले जी एस चे हे वर्ष काहितरी अचाट करायचे हे ठरवलेच होते. आयुष्यभर लक्षात राहील असे. उलट मीच तुम्हाला थँक्स म्हणायला हवे. तुम्ही त्या दिवशी आलात त्याच वेळेस विचार केला आपल्या कडे काय आहे. प्रत्येक क्लास चा एक असे तीस सी आर मदतीला होतेच. कॉलेजची पंधराशे मुले. तीस सी आर ची मिटींग घेऊन त्यांच्या पुढे ही संकल्पना मांडली. ते तयार झाले मदतीसाठी बॉक्सेस फिरवून मदत गोळा करायची . प्रत्येक सी आर कडे एक बॉक्स.त्यांनाही हे चॅलेंज आवडले. अरे प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणाला मदत करायची संधी काही सारखी येत नसते. अनायसे अॅन्यूअल डे चा कार्यक्रम होताच. तो थोड्या वेगळ्या प्रकारे करायचा. सारंगने स्टेज नेहमीप्रमाणे समोर न लावता मैदानाच्या मधोमध लावायची आयडीया दिली. त्यामुळे स्टेजवरच्या निवेदकाला अगदी जवळून ऐकता येत होते. गाण्यांवर मस्त नाचता येत होते. सगळे स्टेजच्या जवळ होते त्यामुळे निवेदकाचे म्हणणे त्यांच्या पर्यंत सहज पोहोचत होते. शिवाय निवेदक जणू आपल्याशी बोलतोय असेच वाटत होते. कार्यक्रम सुरू होण्या अगोदर सगळ्या सी आर ना त्यांच्या क्लासमधील मुलाम्पर्यंत एक व्हॉट्स अॅप मेसेज शेअर केला. त्या नुसार प्रत्येकाने आजच्या दिवसाचा पॉकेटमनीचे पैसे मदत म्हणून द्यावेत असे आवाहन केले. पण सर ही सगळी सारंगची आयडिया. त्याच्या कडे प्लॅन होता. आम्ही तो एक्झीक्यूट केला इतकेच." अमरच्या बोलण्यातून त्याची काहितरी अचाट करायची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान नुसते डोकावत नव्हते तर उसळून बाहेर येऊ पहात होते. "पण सर ही पूर्ण रक्कम नाहिय्ये" सारंग च्या मनात चॅलेंज अपूर्ण राहिल्याचे दु:ख जाणवत होते. " हे पन्नास हजार कॉलेजच्या सगळ्या स्टाफ ने दिलेत . तुमच्या प्रयत्नांना आमचीही थोडी मदत " सरांनी टेबलवर एक खाकी पाऊच ठेवली. अरे तुम्ही मुलांनी तुमच्याच वयाच्या एका मुलीला मदत करण्याचे हे चॅलेंज घेतले हेच कौतूकाचे आहे. " पण सर तरीही ही रक्कम अपुरी आहे" " हरकत नाही तुम्ही जमवलीत हे महत्वाचे." " पण सर याने काय होणार आशाच्या भावाच्या नुसत्या ऑपरेशन साठी साडेसहा लाख हवे आहेत. बाकी खर्च येतील ते वेगळेच. ही रक्कम अपूरी आहे" "मला कल्पना आहे. मी सकाळी बाँबे हॉस्पिटलच्या डॉ अभय कोतवालशी बोललो फोनवर. माझा स्टुडंट आहे तो. त्याने टाटा ट्रस्ट कडून काही मदत मिळवून द्यायचे कबूल केलय शिवाय तो स्वतः हे ऑपरेशन करणार आहे. तेही स्वत:ची फी मदत फंडात देऊन . तोही विदर्भातला च आहे. अन्नदात्या शेतकर्याच्या मुलीचे करीयर उभे रहात असेल तर हवेच आहे ना" पक्या गण्या सारंगचा यावर विश्वासच बसत नव्हता. एका अचानक आलेल्या एका प्रसंगातून किती काय घडत होते. चमत्कार घडताना ते पहात होते. " आणि विशेष म्हणजे आशाला ट्रस्टीनी एक स्पेशल केस म्हणून पुढच्या वर्षी सेकंड इयरला प्रवेश द्यायचे ठरवले आहे. आशाला कॉलेजच्या लायब्ररीत मदतनीस म्हणून काम द्यायचेही ठरवले आहे." मुलांना हे सगळे स्वप्नवत वाटत होते. आशाला तर काय म्हणावे हेच कळत नव्हते. गेल्या चारपाच दिवसात तीच्या जगाने अनेक धक्के दिले होते.अनेक कोलांट्या उड्या खाल्ल्या होत्या " सगळे स्तब्ध झाले होते. अचानक जितू खुर्चीवरून उठला त् पंजा ताठ करत पुढे केला मान तुकवून तो जोरात ओरडला " हेल मोगँबो…." सगळ्यांनी वर पाहिले. प्रिंसिपॉल सरही उभे राहीले. त्यानी ही पंजा ताठ करत हात पुढे केला आणि तेही तितक्याच जोरात ओरडले " मोगँबो खुश हुवा" * समाप्त *
💬 प्रतिसाद
(4)
व
विजुभाऊ
गुरुवार, 04/16/2020 - 09:01
नवीन
सर्व भागांचे दुवे.
मोगँबो -१ http://misalpav.com/node/46242
मोगँबो - २ http://misalpav.com/node/46262
मोगँबो -३ http://misalpav.com/node/46300
मोगँबो -४ http://misalpav.com/node/46304
मोगँबो- ५ http://misalpav.com/node/46314
मोगँबो -६ http://misalpav.com/node/46323
मोगँबो- ७ http://misalpav.com/node/46438
मोगँबो -८ http://misalpav.com/node/46463
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 04/16/2020 - 22:40
नवीन
विजुभाऊ,
कथा साधी सरळ आहे. पण आवडली.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 04/17/2020 - 05:47
नवीन
मस्त झाली ही मालिका, एकदम सुरेख.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Sun, 05/10/2020 - 14:09
नवीन
_/\_
- Log in or register to post comments