महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख
महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

नमस्कार मंडळी, सस्नेह जय महाराष्ट्र. मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।। - गोविंदाग्रज सर्वप्रथम मिपाकरांस, वाचकांस, हितचिंतकांस व मराठीवर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांस महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! शतशब्दकथा स्पर्धा ही काही आता आपल्याला आता नवीन राहिलेली नाही. पण मिपावरचा हा अत्यंत लोकप्रिय महोत्सव आहे यात शंका नाही. या वेळची महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर घेतलेली ही स्पर्धा विशेष होती, कारण या स्पर्धेला लॉकडाऊनची पार्श्वभूमी आहे. यातील बहुतांश कथांवर लॉकडाऊनचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. विशेष म्हणजे 'लॉकडाऊन' याच नावाची कथा पहिल्या क्रमांकाने विजयी झाली आहे यावरून सध्याचा काळ आपल्यावर किती परिणामकारक आहे याची जाणीव होते. शतशब्दकथा स्पर्धेनिमित्त आपल्याला अनेक नवीन लेखक मिळत असतात असा अनुभव आहे. या वेळच्या स्पर्धकांची नावे बघितल्यास आपल्या ते सहज लक्षात येईल. काही सदस्यांनी तर मिपावर ऐन वेळी खाते खोलून आपल्या कथा पाठवल्या आहेत. आणि काही सदस्यांच्या लिखाणात खंड पडला होता, ते या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा लिहिते झाले. या वेळेस स्पर्धेत एकूण ८४ कथा आल्या. तसेच १३००+ एवढे तुडुंब प्रतिसाद आले. मेनबोर्डाची पहिली तीन पाने कित्येक दिवस शशकनेच भरून गेली होती, इतके घवघवीत यश या वेळी स्पर्धेला लाभले. कदाचित या लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या प्रतिभेला बहर आला. मिपाचे व्यासपीठ नेहमीच अशा प्रतिभावान लेखकांना खुणावत राहते आणि त्यांचे जोरदार स्वागतही करते. यानिमित्ताने सर्व स्पर्धक, प्रतिसादक आणि वाचक यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. विजेत्या कथा आपणच मतदान करून निवडलेल्या आहेत व त्या कोणत्या असतील याचा आपल्याला अंदाज आलाच असावा. पण आपणा सर्वांना उत्सुकता आहे ते या कथांचे लेखक कोण असावेत याची. केवळ विजेतेच नाही, तर सर्वच कथांचे लेखक कोण आहेत हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असेल. कदाचित लेखकांची नावे कळल्यावर आपल्याला एखादी कथा पुन्हा नव्याने कळेल. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या तीन विजेत्यांमध्ये केवळ एकाच गुणाचे अंतर आहे. शिवाय पाचव्या क्रमांकाच्या दोन्ही कथांचे गुण समान आहेत, म्हणून पाचवा क्रमांक विभागून देत आहोत. पहिल्या तीन विजेत्यांना ठरल्याप्रमाणे मिपा दिवाळी अंक २०१९ची छापील प्रत भेट देण्यात येईल. यासाठी व्यवस्थापनाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल व लॉकडाऊन संपल्यानंतर ही बक्षिसे वितरित करण्यात येतील. विजेत्या कथा पुढीलप्रमाणे :
| महाराष्ट्र दिन २०२० - शतशब्दकथा स्पर्धा : निकाल | ||
| स्थान | शीर्षक | लेखक |
| प्रथम | लॉकडाऊन | माझीही शॅम्पेन |
| द्वितीय | हेवा | ज्योति अळवणी |
| तृतीय | प्रसाद | मायमराठी |
| चतुर्थ | चानस | सिरुसेरि |
| पंचम | छंद | स्मिताके |
| वनवास | चांदणे संदीप | |
धन्यवाद प्रशांत आणि जव्हेरगंज साहेब.