Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जवळून अनुभवलेले क्वारंटाईन - COVID-19

म
मोदक
Fri, 05/15/2020 - 21:26
💬 85 प्रतिसाद
फारच निराशा वाटतेय आज आमच्या इथे नवग्रह मंदिरापाशी सापडले तसेच २ बिल्डिंग सोडून च्या बिल्डिंग मध्ये सापडले आत्ता किराणा आणि दूध वाल्यांचा पण संशय यायला लागलाय चांगली गोष्ट म्हणजे सगळे बंद आहे सामान संपत चालले आहे सामान कसे आणावे दूध तर जास्त साठवू शकत नाही ना ऑनलाईन आमच्या भागात उपलब्ध नाही अजूनही इथे औषध फवारणी झाली नाहीये आणि घरपोच देण्याची व्यवस्था पण नाही नुसतेच बंद करून ठेवलेय सदाशिव पेठेत पण मेडिकल दुकानात सापडले त्यामुळे मेडिकल पण ३ दिवस बंद आहेत काय होणार कळत नाही ****************************** प्राजक्ता २१ यांचा हा प्रतिसाद वाचून बरेच दिवस टंकाळा करत असलेला अनुभव शब्दबद्ध करूयाच असा विचार केला. लॉकडाऊनच्या दुसर्‍याच आठवड्यात आमच्या सोसायटीमध्ये एक पेशंट सापडला. मी जिथे राहत आहे तेथील अनेक रहिवासी "अत्यावश्यक सेवा" गटातील असल्याने सोसायटीमध्ये लवकरच करोना पेशंट सापडेल याची शक्यता वाटत होतीच. त्याप्रमाणे एक दिवस संध्याकाळी बातमी आली की अमुक अमुक फ्लॅटमधील तमुक तमुक सरांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. नंतर एकच धांदल उडाली आणि सोसायटीचे सर्वच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप खर्‍याखोट्या माहितीने भरून वाहू लागले. "नक्की काय झाले आहे" ही माहिती खूप कमी लोकांना होती आणि बहुदा त्यांना या कठीण परिस्थितीत "सबसे तेज" वगैरे व्हायचे असावे.. करोना पॉझिटिव्ह असलेल्या सरांचा मेडिकल रिपोर्टच कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मात्र या मेसेजकडे लोकांनी दुर्लक्ष केले असावे कारण थोड्यावेळाने चर्चा सुरू झाली, की ज्या सरांना करोना झाला आहे त्यांचे नांव गुप्त ठेवायला हवे वगैरे वगैरे.. मी या सगळ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ऑफिसचे काम करण्यात गुंतवून घेतले. यथावकाश कॉर्पोरेशनचे लोक गेटवर पहार्‍यासाठी येऊन बसले आणि सोसायटीच्या सगळ्या वाटा रोखल्या गेल्या. एक फ्लेक्सही आणून लावला. त्यावर "या परिसरातील एक रहिवासी करोनाबाधीत आढळल्याने या भागातील प्रवेशावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्बंध घालण्यात आले आहेत" अशी सूचना आणि "उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल" असा लाल रंगात आदेशही रंगवला होता. सोबत आपत्कालीन विभाग, तक्रार निवारण अधिकारी यांचे फोन नंबर आणि एक ट्विटर हँडल अशी सर्व माहिती होती. सोसायटीमधील कांही लोकांनी पुढाकार घेऊन एक टास्क फोर्स स्थापन केला आणि पुढील पद्धतीने क्वारंटाईन / आयसोलेशनची काळजी घेतली. १) प्रत्येक बिल्डिंगचे लिडर ठरवले. सोसायटीत १५ बिल्डिंग आहेत. त्या १५ लिडर्सनी मिळून आपआपल्या बिल्डींगमध्ये फ्लोअर लिडर ठरवले. सोसायटीच्या ग्रुपवर सूचना देऊन सामुदायिक गोंधळ व प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देण्याऐवजी; सर्व महत्वाच्या सूचना त्या त्या लिडर्सना दिल्या गेल्या आणि बिल्डिंगनुसार त्या पुढे सरकवल्या गेल्या. २) भाजी, दूध यांची सोय सोसायटी / कॉर्पोरेशनने मिळून केली आणि शक्य आहे त्या सर्व प्रकारच्या भाज्या, रोजचे दूध, दही, ताक वगैरे सोसायटीच्या गेटवर मिळेल याची व्यवस्था केली. अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट आणि सुपर डेली वगैरे सर्व डिलिव्हरी एजंट्सना गेटपाशीच थांबवले गेले. याची सुरूवात खरेतर लॉकडाऊन नंतर लगेच झाली होती, त्यावेळी मेन गेट उघडे असायचे. पॉझिटिव्ह पेशंट सापडल्यानंतर गेट बंद झाले व वस्तूंची डिलिव्हरी गेटवरून होऊ लागली. ३) सोसायटीमध्ये राहणार्‍या वय वर्षे ६० च्या वरच्या सर्व ज्येष्ठ लोकांची एक यादी करण्यात आली आणि त्यांना असलेले आजार विस्तृतपणे नोंदवून त्याचा एक डेटाबेस तयार केला. यानंतरच्या आठवड्यात आंम्ही राहतो त्या बिल्डिंगमध्येच आणखी एक पॉझिटिव्ह केस सापडली. मग आमच्यासाठी नियम आणखी कडक झाले. पूर्वी बिल्डिंग ते मेन गेट असे जाऊ शकत होतो; ते ही बंद झाले. लोकांना घरातून बाहेर पडायचे नाही याच्या सक्त सूचना दिल्या गेल्या. लिफ्ट बंद करण्यात आली आणि जिन्याच्या प्रवेशद्वाजवळ बॅरीकेट रचून जिना बंद करण्यात आला. यानंतर जे सामान आंम्हाला गेटपर्यंत जाऊन घ्यावे लागत असे ते सामान घरात कसे मिळेल याची आखणी करण्यात आली आणि बिल्डिंग लिडर्सनी सिक्युरीटी गार्डच्या मदतीने रोज आमच्या बिल्डिंगचे सामान गेटपासून तळमजल्यापर्यंत आणले जाईल याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने फ्लोअर लिडर तळमजल्यावर येत आणि आपल्या मजल्यावरचे सामान घेऊन जात. साधारणपणे अशी व्यवस्था होती.. १) संपूर्ण सोसायटीसाठी, भल्यापहाटे दुधाच्या पिशव्या तर दुपारी कधीतरी भाजीच्या पिशव्या सोसायटी गेटवर पोहोचत असत. (भाजी व फळांची लिस्ट एक दिवस आधी गोळा केली जाई) २) त्यातल्या आमच्या व पहिला पेशंट सापडलेल्या बिल्डिंगच्या पिशव्या वेगळ्या करून सिक्युरिटी गार्ड त्या त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पोहोचवत असत. ३) सिक्युरिटी गार्ड कडून हिरवा झेंडा मिळाला की बिल्डिंग लिडर पहिल्या मजल्यावरच्या फ्लोअर लिडरला सूचना देई की तळमजल्यावरून सामान घेऊन जाणे. पहिल्या मजल्याचा लिडर सामान घेऊन घरात पोहोचला की मग दुसर्‍या मजल्यावरचा लिडर बाहेर पडून तळमजल्यावरून सामान घेऊन जाई.. अशा प्रकारे एका मजल्यावरच्या लोकांचा दुसर्‍या मजल्यावरील लोकांशी १००% संपर्क टाळला गेला. हे सर्व कम्युनिकेशन वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवून केले गेले. (सोसायटी लिडर्स, बिल्डिंग लिडर्स आणि फ्लोअर लिडर्स) यथावकाश सोसायटीवर आलेले निर्बंध आणखी कोणत्याही पॉझिटिव्ह केस शिवाय हटवले गेले.
नंतरची चांगली बातमी म्हणजे आमच्या सोसायटीमधील दोन्ही पॉझिटिव्ह पेशंट बरे होऊन घरी परतले. त्यावेळी त्यांचे स्वागत घंटा / थाळ्या वाजवून आणि रोषणाई करून करण्यात आले.
*********************************************************** आता हे झाले सोसायटीच्या पातळीवर.. आपल्या घरामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार केला आणि पुढील गोष्टी ठरवल्या. तुम्हाला त्या उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. घरी महत्वाच्या वस्तूंची साठवणूक, घरकामाची विभागणी वगैरे मुद्दे सोडून देऊ.. आत्तापर्यंत सर्वांना याचा अंदाज आला असेलच. १) सोसायटीमध्ये जे लोकं पुढाकार घेऊन सर्व गोष्टी मॅनेज करत आहेत त्यांना सहकार्य करा. त्यांना सर्व गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल त्यामुळे लगेच त्यांच्या कामावर टीकाटिप्पणी करण्याऐवजी थोडा वेळ द्या. २) जगभरात कशी वाईट परिस्थिती आहे आणि भारतात / महाराष्ट्रात / पुण्यात / गल्लीत किती रूग्ण सापडले वगैरे अनावश्यक ब्रेकिंग न्युजचा ताण येत असेल तर सरळ टीव्ही बंद करा आणि दुसरे एखादे हलके फुलके चॅनेल किंवा पुस्तकं यांच्याकडे मोर्चा वळवा. ३) सतत टीका करणारे, फेसबुकवर वचावचा भांडणारे आणि नेहमी निगेटिव्ह राहणार्‍या लोकांना फाट्यावर मारा. आपली मनस्थिती उत्तम ठेवा. ४) होम वर्कआऊट सारखे एखादे अ‍ॅप मिळवा आणि शक्य तितका व्यायाम करा. मला या अ‍ॅपबद्दल सायकल सायकल ग्रुप / निनाद आचार्य कडून कळाले. ५) आपल्या आजुबाजूच्या मेडिकल / किराणा दुकानदारांचे नंबर हाताशी ठेवा. क्वारंटाईन असताना ते आपल्याला आवश्यक त्या वस्तू सोसायटी गेटवर पोहोचवू शकतात. ६) हात धुवत राहणे आणि बाहेरून घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे / आंघोळ व सर्व कपडे धुणे यांत कोणताही आळस करू नका. ७) क्वारंटाईन दरम्यान झोपेचे शेड्युल सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. मी सुरूवातीला पहाटे ४ पर्यंत जागे राहून वेब सिरीज बघणे, पुस्तके वाचणे वगैरे उद्योग केले पण आता ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. ****************************************************** एकूण काय.. थोडे दिवस क्वारंटाईन मध्ये काय होणार हा प्रश्न पडला, पण सोसायटीमधील दक्ष नागरिकांच्या मदतीने कोणाचीही कोणतीही गैरसोय झाली नाही. सर्वांनी आपआपल्या परीने प्रश्नांवर मार्ग शोधले व सर्वांनी शक्य तितके सहकार्य केले. हा झाला माझा अनुभव.. तुमचेही अनुभव लिहा आणि आपल्या सर्वांच्या उपयोगी कांही सूचना असतील तर नक्की सांगा. ******************************************************

प्रतिक्रिया द्या
62091 वाचन

💬 प्रतिसाद (85)
ग
गामा पैलवान Wed, 05/20/2020 - 22:46 नवीन
लोकहो, आंतरराज्य प्रवासास आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार : https://twitter.com/navimumpolice/status/1256640942494240769 भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही. तर मग अशा प्रवासपत्राची सक्ती करणे हे घटना धाब्यावर बसवणे नाही का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 05/21/2020 - 12:35 नवीन
भारताच्या नागरिकांना संचारस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यावर बंधन घालण्यासाठी आणीबाणी जाहीर करायची आवश्यकता असते. तशी आणीबाणी जाहीर झालेली नाही
संचारस्वातंत्र्याचा संकोच झाला आहे हे खरं पण आणीबाणी जाहीर झाली तर इंटरनेट व फोनवरही बंधने येवू शकतील... बाकी या लॉकडाऊनविषयी काही याचिका दाखल झाल्या आहेत किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक गुरुवार, 05/21/2020 - 13:02 नवीन
विषयांतर होत आहे. गापै जी धूळ उडवत आहेत ते सगळे या धाग्याचा विषय नक्कीच नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/21/2020 - 15:18 नवीन
मोदक, विषयांतराबद्दल क्षमा असावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 05/21/2020 - 15:23 नवीन
विषयांतर होत आहे.
खरंय.. पण गापैंचा एक धागा उखडला गेला आणि आता तो साईड इफेक्टवाला धागाही वाचनमात्र केला आहे. मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 05/21/2020 - 18:55 नवीन
मिपावरील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे हे मात्रं खरं. एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे. तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला.. तुम्ही ते सदस्य आणि अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी त्यावर काहीही उपाय केला नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे. बघा विचार करा. इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
आ
आयर्नमॅन गुरुवार, 05/21/2020 - 18:59 नवीन
एक सदस्य म्हणून सुचवू का..? एखाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.
बरोबर आहे उगा धोरणे निष्पक्ष की लवचिक याचा ऊहापोह आजिबात करू नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 05/21/2020 - 20:12 नवीन
खाद्याच्या खाजगी जागेत जाऊन मग तिथे त्या मालकाची धोरणे पटत नसतील; तर सरळ चपला घालाव्यात आणि निघून जावे.
ते माझं मी बघेन. तुमचा धागा आहे , मी तुमच्याशी चांगल्याप्रकारे चर्चा करत होतो. पण तुम्हाला वाकड्यात घुसायची हौस आहे का ? मी आणि मालक काय ते बघून घेईन. तुमच्या मालकीची नाही ना वेबसाईट ?
थोडक्यात तुम्हाला फाट्यावर मारले गेले आहे.
उगाच वाईट भाषा वापरुन तुम्ही स्वतःची पातळी दाखवत आहात. अपमान मलाही करता येतो.
इतका अपमान सहन करत राहणे व्यर्थ आहे का..?
तुमचा धागा आहे आणि मी तुमची खोडी काढली नव्हती. फालतूत वाद करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गामा पैलवान Wed, 05/20/2020 - 22:58 नवीन
चौकस२१२,
- हजारो मेले ते कोविद मुले नाही
अमेरिकेत दोन महिन्यांत जर खरोखंच ८८०००+ मेले असते तर काय हाहाकार उडाला असता! विदर्भात मोवाड नावाचं एक गाव वर्धा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. तिथे जुलै १९९१ मध्ये भयानक महापूर आला होता व आख्खं गाव पाण्याखाली गाडलं गेलं होतं. परिस्थिती इतकी वाईट होती की प्रेतांची मोजदाद करणंही अशक्यं बनलं होतं. मृतांचा अधिकृत आकडा ५०० होता तर अनधिकृत आकडा २०००+. लक्षांत घ्या, २४ तासांत फक्त २००० लोकं मेल्याने भीषण रोगराई माजली होती. तर चिमुकल्या UK मध्ये ६० दिवसांत ३५०००+ लोकं मेल्याने काय हाहाकार माजायला हवा होता बरं? संदर्भ : २० मार्च ते २० मे या कालांतराचा तक्ता - https://www.worldometers.info/coronavirus/country/uk/ करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/21/2020 - 02:59 नवीन
हि कसली विचित्र तुलना ! भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ? आणि पुरातून होणारी रोगराई आणि आशय फुफुसाच्या आजारातून प्रसार होणारी रोगराई यात काही फारकत नाही? पूर इंडोनेशियात पण येतो आणि हजारो मरतात आणि पूर ऑस्ट्रेलियात पण येतो आणि काही थोडे मरतात .. दोन्ही ची तुलना कशी होईल भूकंप इंडोनेशियात पण होतो आणि नू झीलंड मध्ये पण दोन्ही ची तुलना कशी होईल तुम्हाला पण आपलेच घोडे पुढे दामटवायचे असेल आणि हे थोतांड म्हणून चालू ठेवायचे असेल तर बसा उगाळत ( जरा नो १० ला जाऊन बोरिस काकांना पण सांगा कि ते आजारी पडलेच नवहते )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक गुरुवार, 05/21/2020 - 09:10 नवीन
करोना हे थोतांड आहे आणि टाळेबंदी हे महाथोतांड. ओके गापै. आंम्ही वेगळ्या जगात रहात आहोत आणि तुम्ही वेगळ्या. तुमच्या जगात प्रॉब्लेम नसल्याने तुम्ही सुखी आणि निवांत आहात. मग आमच्या जगात प्रॉब्लेम आहेत तर आंम्हाला आमचे प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवूद्या. तुमच्या जगात प्रश्न नाहीत हा तुमचा मुद्दा कळाला आहे - आता त्या मुद्दयाचा जप प्रत्येक धाग्यावर करून नक्की काय साध्य करीत आहात..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/21/2020 - 09:15 नवीन
अजून काही लोकांचं जग वेगळं आहे, जे तुमच्या सोसायटीत असलेले नसलेले प्रॉब्लेम शोधून तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/21/2020 - 03:14 नवीन
इथे एकजण स्वतःचा अनुभव सांगतोय की लॉक डाऊन मध्ये कशी व्यवस्था केली गेली, अडचणी कशा हाताळल्या गेल्या, त्रास कमीत कामी कसा करता येईल त्याचे काय प्रयत्न केले गेले, दुसरा त्याला पटवून देतोय की काहीतरी त्रास झालाच असेल. तुला नाहीतर दुसऱ्याला झाला असेल. कुणालाच नाही तर सिक्युरिटी गार्ड ला तरी झालाच असेल. जर गार्ड ला सुद्धा झाला नसेल तर तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. जो झालाय तो त्रासच आहे, पण ते तुम्हाला समजत नाहीये. म्हणजे तुमच्यातच प्रॉब्लेम आहे! दुसरीकडे जगातील आर्थिक ताकद म्हणून ओळखले जाणारे देश गुडघ्यावर येऊन काही ना काही प्रयत्न करताहेत. युरोप पासून चीन पर्यंत अन् अमेरिकेपासून भारतापर्यंत सगळे देश, तिथली सरकारे, प्रशासन, वैद्यकीय व्यवस्था, डॉक्टर, उद्योगधंदे, उद्योगपती, सगळे एकतर मूर्ख आहेत किंवा सगळे जण एकत्र येऊन इतरांना मूर्ख बनवताहेत कारण जे चाललंय ते थोतांड आहे. फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/21/2020 - 10:59 नवीन
चौकस२१२,
भारतात , निम शहरी भागात पूर येऊन प्रेत पडलेली आणि त्यातून रोगराई प्रसरण्याची कारणे कुठे आणि इंग्लड सारख्य देशात रोग प्रसरण्याची कारणे कुठे ?
इंग्लंडचं जाऊ द्या. तो भारतापेक्षा बराच प्रगत आहे असं गृहीत धरूया. इटलीतला लोम्बार्डी तर भारतासारखाच आहे ना? गर्दी, धूर, धूळ, प्रदूषण, इत्यादि भारतीय महानगराइतकं नसलं तरी बाकीच्या युरोपपेक्षा जास्त आहे. तिथे म्हणे प्रेतं पुरायला जागा अपुरी पडू लागली. मग उघड्यावर सडलेल्या किंवा नुसतं पडलेल्या प्रेताचा एखादा फोटो कुठेतरी मिळेल काय? नुसते मोठमोठे आकडे टाकल्याने ती विश्वासार्ह बातमी होत नसते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/21/2020 - 15:27 नवीन
पैलवान,
फक्त मलाच काय ते सत्य माहिती आहे, बाकीचे एकतर मूर्ख बनवणारे आहेत किंवा मूर्ख बनणारे आहेत. आहे की नाही मी हुश्शार!!
थोतांड उकलणं हे सत्य शोधण्यापेक्षा फारंच सोपं असतं. मी संपूर्ण सत्य माहीत असल्याचा दावा केला कुठेही नाहीये. माझ्या कथनात त्रुटी आहेत हे मान्य. पण आपण सगळ्यांचे अनुभव जर एकत्र मांडले तर त्यातून सत्याच्या अधिक जवळ जाता येईल. जनज्ञान किंवा Crowdsourcing the Truth असंही म्हणता येईल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन गुरुवार, 05/21/2020 - 15:45 नवीन
म्हणजे तुम्ही खरे बोलताय त्याची शहाणीशा होऊन जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
आ
आयर्नमॅन गुरुवार, 05/21/2020 - 15:47 नवीन
सकृत दर्शनी आपण चीनची व त्याचा पोपट WHO यांची वकिली करत आहात असा भास होतोय. शत्रू देशाची री ओढल्याबद्दल आपण समस्त भारतीयांची माफी मागितली पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयर्नमॅन
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/21/2020 - 18:53 नवीन
असं सगळे म्हणत होते. आमच्या गणपती मंडळाच्या अध्यक्षा पासून ते चौकातल्या दुकानदाराला पर्यंत सगळे जण म्हणत होते पूर्ण आभाळ काळवंडल आहे. मी म्हणत होतो, छे. तो अध्यक्ष अन् दुकानदार तुम्हाला मूर्ख बनवून खोटं सांगताहेत की ढगाळ वातावरण आहे. आणि तुम्ही मूर्ख बनत आहात. डोळे उघडे ठेऊन बघा, स्वच्छ उन पडलय. मग पाऊस पडू लागला, मी सांगत होतो सगळ्यांना. हा पाऊस पडत नाहीये, कडक ऊन पडले आहे. पाऊस वगैरे थोतांड आहे. हवामान विभागाची वेबसाईट दाखवत होती पुणे शहराच्या पूर्व भागात पावसाची सुरुवात झालीय आणि पूर्ण शहरात ढगाळ वातावरण आहे. पूर्ण पुण्यात सुद्धा लवकरच पाऊस पडेल. गुगल वर पुणे वेदर सर्च केलं तर पाऊस चालू असल्याचं चिन्ह दिसत होतं. पुढचे दोन अडीच तास आकाश ढगाळ असल्याचं फोरकास्त दाखवत होतं. मग पाऊस पडत नाही, कडक ऊन पडले आहे, हे सिद्ध करायची जबाबदारी माझी ना? की लोकांनी पाऊस पडतोय , हे सिद्ध करावं? की गुगल, हवामान विभाग, यांनी ऊन नाही पडलेलं , हे सिद्ध करावं? आणि सगळ्यांनी दाखवून दिलं की बाबा पाऊस पडतोय, तरी मी पाऊस वगैरे काही नसतो, हे तर कडक ऊन पडलं आहे, असं सांगत राहिलो तर मी सर्वात जास्त ज्ञानी आहे, जे भारी तज्ञांना कळत नाही, ते मला समजलंय, हे सिद्ध होईल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/21/2020 - 21:55 नवीन
पैलवान, बाहेर पावसात जाऊन उभं राहिलं तर माणूस ओला होईल. माणूस ओला होणे हा वस्तुनिष्ठ अनुभव आहे. करोनाच्या बाबतीत असा वस्तुनिष्ठ निकष काय लावायचा? किंबहुना असा काही निकष नाही, हा माझा आक्षेप आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
न
नेत्रेश गुरुवार, 05/21/2020 - 21:45 नवीन
लॉस एंजेलीसमध्ये रुग्णालयांनी कोव्हीडले मेलेल्या लोकांची प्रेते जागा नसल्यामुळे वातानुकुलीत कंटेनरमध्ये ठेवली आहेत. त्यांचे दफन करायला २ ते ३ महीन्यांचा वेट ताईम आहे. त्यातल्या एका रुग्णालयांने (बहुधा चुकीने) वातानुकुलीत नसलेल्या कंटेनरमध्ये बॉडीज ठेवला होत्या. त्या कंटेनरमधुन वास येउ लागल्यावर प्रशासनाला समजले, व त्यांनी चुक सुधारली. हे सर्व टीव्ही वा बातम्यांमधे दाखवत होते. केवळ अमेरीकेत मृतांचा आकडा अत ९६००० झाला आहे. सर्व मोठी शहरे लॉकडाउन आहेत / होती. ट्रीलियनस डॉलर्सची हेल्प सरकारने अगोदरच दीली आहे. सरकारने सर्व टॅक्सपेअर्सच्या खात्यात १५०० ते ३००० डॉलर्स जमा केले आहेत. छोट्या मोठ्या उद्योगांना हजारों लाखों डॉलर्सची मदत मीळाली आहे. लाखो छोटे उद्योग बंद पडुन कोट्यावधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. ३ कोटीच्या वर लोकांनी अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी अर्ज केला आहे. आणखी लाखों / कदाचीत करोडो लोक अनएंप्लॉयमेंट बेनीफीट साठी पात्र नाहीत, पण त्यांनी रोजगार गमावला आहे. सरकार आणी स्वयंसेवी संस्था रोज कोट्यावधी लोकांना फुकट जेवण पुरवत आहेत. आता आणखी काय हाहाकार उडायचा बाकी राहीला आहे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 05/22/2020 - 03:08 नवीन
ते लॉस एंजेलिस चे हॉस्पिटल - ती बातमी खोटी आहे. ९६००० - आकडा खोटा आहे. ती मिलियन बिलियन डॉलर्स ची पॅकेज - थोतांड आहे. त्या नोटा नकली असतील. अमेरिकन सरकार अमेरिकन लोकांना मूर्ख बनवतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
ग
गामा पैलवान Fri, 05/22/2020 - 15:09 नवीन
पैलवान, तुम्ही seasonal flu नावाची संज्ञा ऐकली असेल. युरोप व अमेरिकेत फ्लूचा मौसम असतो. इंग्लंडमधल्या मौसमी फ्लू चं वर्तन चमत्कारिक राहिलं आहे. हा मौसम डिसेंबर ते मार्च धरला जातो. त्यावर इथे एक लेख आहे (इंग्रजी दुवा) : https://fullfact.org/health/coronavirus-compare-influenza/ इंग्लंडात २०१४-१५ साली या फ्लू पायी २८०००+ मृत्यू झालेले. तर २०१८-१९ साली फक्त १७०० होते. सरासरी १७००० आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचे ३६००० मृत्यू अवाढव्य नाहीत. मौसमी फ्लू बरोबर करोना नामे नवा भिडू मैदानात दाखल झालाय. हा नवा भिडू जरा जास्त खतरनाक आहे. पण इतकी पळापळ व टाळेबंदी करायची गरज नाहीये. करोना व मौसमी फ्लू यावर इथे एक तौलनिक लेख आहे : https://www.itv.com/news/2020-02-06/how-does-the-wuhan-coronavirus-compare-to-seasonal-flu/ या लेखानुसार सार्स चा मृत्यूदर १०% आहे, करोनाचा २% आहे तर मौसमी फ्लूचा १% आहे. करोनातनं पुढे सार्स उत्पन्न झाला तर आणि तरंच करोना घातक ठरतो. अंगात करोना सापडला म्हणून बोंबलंत सुटून काहीही फायदा नाही. ज्यांना त्रास होतोय अशांवर आणि फक्त अशांवरच दृष्टी ( = फोकस) हवी. कारण की करोनातून पुढे गंभीर गुंतागुंत उत्पन्न होते. मरायला टेकण्याची शक्यता आहे त्यांना सोडून इतरांवर फोकस जातोय जो अनावश्यक असून करोनाप्रवण लोकांसाठी प्राणघातक आहे. इंग्लंड मधील करोनाचा मृत्यूदर घटून हिवाळ्याच्या सर्वसाधारण मृत्यूदरावर आला आहे : https://www.theguardian.com/society/2020/may/21/english-death-rate-now-at-normal-winter-levels-as-coronavirus-deaths-fall या लेखातही Daily hospital deaths of patients with Covid-19 in England peaked at 891, असंच म्हंटलं आहे. with याचा अर्थ 'करोनासंगे मृत' असा घ्यायचा असून 'करोनामुळे मृत' असा घ्यायचा नसतो. तात्पर्य : करोनामृतांचे आकडे जसेच्या तसे घ्यायचे नसून अतिरिक्त मृत्यूदर पाहायला हवा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
माहितगार Sat, 05/23/2020 - 04:21 नवीन
१) गापैंनी इंग्लंडाचे उदाहरण दिले आहे १७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत. मागील अधिकतम मृत्यू दराचा आकडा २८००० घेतला तरी ३० टक्क्याच्या आसपास अधिक मृत्यू होताना दिसतात. (मागच्या महिन्याभरात बातमी वाचली तेव्हा ईटलीत ४९ टक्के मृत्यूदर अधिक राहीला होता) . घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ? २) टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे. हाँगकाँग चे लोक शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी स्वतःहून घेतात टाळेबंदीची गरज पडत नाही. जिथे लोक स्वतःहून काळजी घेत नाहीत ईतरांमध्ये रोग प्रसारणा बाबत बिनधास्त असतात तिथे टाळेबंदीची गरज भासते. ३) शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ? ४) गापै इन्फुएन्झाचे उदाहरण देतात १७०० ते १७००० मृत्यू . एका अतिरेक्याने १० माणसे मारली एक विमान कोसळून १०० गेले तर हळहळ होते १७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ? श्वसन विषयक आजारांना एवढे किरकोळीत काढत गेल्यानेच शारिरीक अंतर मास्कचे वापर बारकाईने स्वच्छता या गोश्टी टळ्त आल्या आहेत औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 05/26/2020 - 22:19 नवीन
माहितगार, माझा प्रतिसाद सांगतो. १.
१७००० च्या सरासरी मृत्यू दरावर कोविड १९ कालीन ३६००० मृत्यू चक्क दुपटीपेक्षा अधिक आहेत.
जर मृत्यूदर १७०० ते २८००० असा दीर्घ हेलकावे घेणारा असेल तर १७००० ही सरासरी निरर्थक ठरते. अशा वेळेस विस्तारकला ( = ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ) विचारात घ्यावी असं माझं मत आहे. २८००० च्या पार्श्वभूमीवर ४०००० हा आकडा अतिरिक्त नाही. २.
घरातला एक माणूस मेला तर कुटूंबे कासाविस होतात किमान ३०% ते दुप्पट मृत्यूदर वाढत असेल ....
भावना व गणित यांची गल्लत होऊ नये असं माझं मत आहे. भावना महत्त्वाच्या आहेत, पण सध्या मुद्दा सांख्यिकीचा आहे. ३.
शिवाय शारिरीक अंतर मास्क व स्वच्च्छता सवयीत बदल न केल्याने फैलावाचा वेग जबरदस्त असेल तर बाब गंभीर आणि अवाढव्य नाही ?
बाब गंभीर आहे, पण अवाढव्य नाही. ४.
टाळेबंदीची गरज शारिरीक अंतर मास्क न राखणे व अती बारकाइने स्वच्छता न राखली जाण्याने पडते आहे
तैवान व व्हियेतनाम हे अपवाद धरावेत का? तैवानमध्ये टाळेबंदी नाही ( पण कडक नियम आहेत ) : https://www.taipeitimes.com/News/taiwan/archives/2020/04/23/2003735146 व्हियेतनाममध्ये करोना मृत नाहीत : Remarkably, for a country that shares a 870-mile porous border with China and is far less wealthy than other Asian nations such as South Korea and Taiwan, Vietnam has suffered no deaths from the pandemic. संदर्भ : https://www.telegraph.co.uk/news/2020/05/02/life-lockdownvietnam-reopens-tentatively-zero-deaths/ तैवान व व्हियेतनाम यांच्या एकत्रित उदाहरणांवरून दिसतं की सरसकट टाळेबंदी न करताही करोनाशी लढत देता येते. ५.
शारिरीक अंतर मास्क राखणे व अती बारकाइने स्वच्छता काळजी न घेतल्याने वीषाणू फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो मृत्यूदर दुपटीपेक्षा अधिकने वाढण्य्च्ची शक्यता निर्माण होते तेव्हा पळापळ होणे स्वाभाविक नाही किंवा कसे ?
फैलाव उपलब्ध आरोग्यसेवा क्षमतेपेक्षा वेगाने होतो हे मान्य. पण मृत्यूदरही त्याच वेगाने वाढतो हे अमान्य. मृत्यूदर नक्कीच आटोक्यात ठेवता येतो, पण केव्हा? जर गंभीर रोगी वेगळे केले तर आणि तरंच. जर सरसकट टाळेबंदी व लोकं सरसकट रुग्णालयात भरती केले तर आरोग्यव्यवस्थेवर अविरत ताण येतो. त्यामळे ज्या करोनाग्रस्तांची स्थिती गंभीर आहे अशांना उपचार मिळंत नाहीत. ६.
१७००० मृत्यू किंवा १७०० हा आकडा सुद्धा गंभीर नाहीत ?
हे मृत्यू फ्लू या आजारांमुळे झालेले नसून आधीच असलेल्या व्याधी अधिक वेगाने पसरून झालेले मृत्यू आहेत. फ्लू हे केवळ तात्कालिक कारण आहे. ७.
औषधी लसिकरण संशोधने कमी होत राहीली आहेत हे खरे नाही किंवा कसे ?
माझ्या माहितीप्रमाणे फ्लू वर लस नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
P
palambar Fri, 05/22/2020 - 21:39 नवीन
मोदक तुमच्या सोसायटित कोरोना संसर्ग झालेल्यांना अंदाजे कशामुळे झाला हे कळाले का?
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 05/23/2020 - 10:37 नवीन
अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने दिवसभरात अनेक वेगवेगळ्या लोकांमध्ये मिसळावे लागते. त्यातून कुठूनतरी विषाणूबाधा झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 05/23/2020 - 11:10 नवीन
प्रांजळ लेख आवडला... काही प्रतिसादही वाचनिय आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Tue, 05/26/2020 - 22:36 नवीन
लेख आणि उपाययोजना आवडल्या, तुम्हाला आणि तुमच्या सोसायटीवाल्याना शुभेच्छा. बाकी २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार हे नक्की. 
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ गुरुवार, 05/28/2020 - 21:50 नवीन
लॉक डाउनच असाही परिणाम -माझ्या चुलतभावाने बाहेरुन कुलूप लावलेय ऑफिसच्या WFH च्या गडबडीत (२ मॉनिटर,cpu आणि सामान घेऊन यायच्या घाईत )मी आमच्या जुन्या घरी आले (तिथे range पण चांगली मिळते म्हणून पण ) माझे घर दुसरीकडे आहे जिथे माझे पेरेंट्स आणि बहीण राहते पण त्या वेळेस कामाच्या घाईत हे जवळ म्हणून इकडे आले इकडे माझे काकाकाकू (ज्ये ना ) आणि मी'दोन वेगवेगळ्या घरात पण एक कॉमन दार आणि एंट्रन्स असे राहतो माझा चुलत भाऊ थोडे जवळच दोन बिल्डिंग सोडून वाहिनी भाच्यासोबत राहतो काका काकूंची जेवण्याची सोय तो करतो (तीन वेळेला डबे आणून देतो ) आणि इकडे machine मध्ये त्या सर्वांचे कपडे काका धुतात (mutual अडजस्टमेन्ट ) आमचे स्वैपाकपाणी वेगळे आहे (माझे मी करते त्यांचा डबा येतो) आमच्या घराला मागून एक जिना आहे पण तिथून ये जा करणे सुरक्षित नाहीये (त्याला लागून असलेलया चाळीतले मागे सांगितल्याप्रमाणे खोकत,शिंकत असतात म्हणून आणि इतरही कारणांनी ) सुरक्षिततेच्या दृष्टीने मागचे दार कुलूपबंद केले आहे त्यामुळे मला काकांच्या घरातून ये जा करावी लागते तसेही इतके वर्ष एक कॉमन एंट्रन्स म्हणूनच सगळे वापरायचे सध्या लॉक डाऊन च्या काळात त्याचे आणि काका काकूंचे वाजत असते सारखे म्हणजे तोच दटावत असतो आणि ते निमूटपणे ऐकत असतात असो तो त्यांचा वैयक्तिक विषय माझे काका ज्ये ना असून त्यांना घरी बसवत नाही म्हणून ते सारखे बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबायचे त्यांना दम्याचा त्रास आहे ते या बाबतीत त्याचे ऐकत नव्हते आणि त्याची नजर चुकवून खाली जाऊन इतरांशी गप्पाटप्पा करायचे तर त्यांना रोखण्यासाठी माझ्या भावाने घराला बाहेरून कुलुप घातले आहे आणि माझी अडचण केली मी ३-५ दिवस किन्वा आठवड्याने सामान आणण्यासाठी बाहेर पडते (काका रोजच थोडा वेळ खाली जायचे आत्ता आम्ही तिघे कुलूपबंद आहोत) आणि हे पण मला रविवारी सामान आणण्याच्या वेळेस त्यांनी सांगितले मला जर बाहेर जायचे असेल तर त्याला फोन करून बोलवायचे आणि नंतर मी जायचे काकांसाठी त्याने हे केले म्हणून मी काही बोलले नाही पण काल आणि आज एकंदर असे वाटले कि त्याने हे मुद्दामून माझी अडचण करण्यासाठी केले कि काय काकांचे नाव पुढे करून काल त्याने माझ्या भाच्याला (वय-७वर्षे )एकट्यालाच इकडे दुपारी असेच पाठवले होते तसेच रोज तो सकाळी ८-८. ३० दरम्यान येतो तेव्हा मी पर्वा दूध आणि इतर सामान घेऊन यायला वेळ लागला तर ओरडत होता आज तो सकाळी ६. ४५ लाच आला जेव्हा मला दुकाने उघडी नसल्याने आणि कचरा गाडी देखील अली नसल्याने बाहेर जाताच आले नाही दुपारी किराणावल्याने काही सामान खालच्या एका काकूंकडे ठेवले तो डबा घेऊन आल्यावर ते आणता येईल ह्या बेताने मी तयार होऊन बसले तर तो मुद्दाम उशिरा आला आणि किल्लीच आणली नाही शेवटी त्यांचा डबा खिडकीतून येईना आणि मलाही जायचे म्हणल्यार परत त्याने जाऊन किल्ली आणली आणि मग मी सामान घेऊन आले तेव्हा तो म्हणाला कि मी सारखे फोन केल्यावर येणार नाही त्याच्या यायच्या वेळेस च मी जायचे आणि आदल्या दिवशी त्याला फोन करून सांगायचे काही असले तर मी बर म्हटले (अडला नारायण गाढवाचे पाय धरी करणार काय शेवटी ?) नंतर मी माझ्या घरात आले असता काकू त्याला बहुतेक माझ्याबद्दलच सांगत होती कि ती ३-४ दिवसात जाते किंवा तिला सामान द्यायचे का तर तो म्हणाला कि आपला काही संबंध नाही तिलाच अड्जस्ट करावे लागेल लॉक डाऊन सुरु व्हायच्या काळात पण त्याने असाच त्रास दिला होता तेव्हा बाबांनी त्याला मलापण डबा देण्यास सांगितले असता तेव्हाही त्याने तिचे ती करेल/बघेल असे सांगितले होते आणि मुद्दामून इकडच्या दाराने ये जा करण्यास सांगितले होते पण आम्ही सुरक्षिततेचे कारण सांगून आणि मी तशीही रोज बाहेर पडतच नाही म्हणून कॉमन एंट्रन्स चालू ठेवला होता पण आत्ता काकांचे कारण पुढं करून तो मुद्दामून त्रास देत आहे आणि काका ऐकत नव्हते म्हणून काही बोलताही येत नाहीये लॉक डाऊन उठून माझ्या घरी जायला मिळेल म्हणून वाट बघतीये तर आमचा भाग containment झोन आणि रे झोन असल्यामुळे कठीणच होतेय आणि WFH चा पसारा घेऊन जाणे अवघडच आहे नाहीतर नोकरीवरून सुट्टी घ्यावी सरळ आज ह्या सगळ्यामुळे फार ताण येऊन शेवटी मी कामावरून सुट्टी घेतली घरी आई बाबांना फोन करून सांगत असते पण त्यांना ताण यायला नको बाबा त्याला फोनवरून झापतात पण त्याने परिस्थिती अजूनच बिघडते लहानपणी एकत्र कुटुंब असताना माझ्या आईने त्याला असेच कशावरून तरी थोडेसे मारलं (पूर्वी एकत्र कुटुंबात ह्या गोष्टी कॉमन होत्या) आणि माझी आई नोकरी करणारी आणि काकू गृहिणी त्यामुळे मिळणाऱ्या सोयी सवलतीत फरक ह्या सगळ्याचा सूड तो आत्ता उगवतोय असे वाटतेय काय करावे क्या परिस्थितीत? लोकडाऊनचा असाही फायदा उचलणारी मानसिकता बघायला मिळाली
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Sun, 05/31/2020 - 21:09 नवीन
संपादक मंडळ , वेगळा धागा काढल्याने वरील प्रतिसाद डिलिट करावा हि विनंती धन्यवाद
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Sun, 05/31/2020 - 21:15 नवीन
https://www.esakal.com/global/vietnam-does-not-have-single-coronavirus-death-reported-300121 ह्या वरील लिंकमध्ये व्हिएतनाम या छोट्या पण गरीब देशाने काय उपाययोजना केल्या याची चांगली माहिती दिली आहे WHO वर मुळीच विसंबून ना राहता वेळीच उपाययोजना केल्या हे उल्लेखनीय एकंदरीतच ह्या प्रकारात (कोरोनाच्या साथीत ) WHO खूप संशयास्पद आहे WHO ला वेळीच फाट्यावर मारून आपण उपाययोजना चालू करायला हव्यात आधीही WHO चे ऐकले नसते तर बरे झाले असते असे वरील बातमीवरून वाटले
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 06/01/2020 - 02:01 नवीन
WHO ला फाट्यावर ना मारता , त्यांचे आणि स्वतःचे आणि इतर सामान जडण घडण असणाऱ्या देशांचे काय चालले आहे , आपल्याला काय जमेल इत्यादी विचार करून माझ्य देशाने पाऊले उचलली त्यात लोकडवून हे होतेच.. भारताशी तुलना नाही होऊ शकत मान्य मग भारताची तुलना चीन शी किंवा इंडोनेशिया शी करा विएतनाम किंवा स्वीडन शी नाही चीन मध्ये सुद्धा अघोरी लोकडवून झाले मग भारताचेच का चुकले ? आज जर काँग्रेस चे सरकार असते तर त्यांनी काय केले नसते?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/02/2020 - 15:36 नवीन
लोकहो, मागील आठवड्यात करोनाचे दोन मध्यमवयीन मृत्यू ऐकले. मृत्यू १. नाव : दिलीप (बदललेले ) वय वर्षे : ५९ रुग्णालय : नाणावटी (मुंबई विलेपारले) ऐकीव कथा : व्यक्ती राहायला मुंबईत दादरला. घरीच असतांना खोकला सर्दी वगैरे किरकोळ लक्षणांना सुरुवात झाली. लक्षणं जरा लांबल्याने करोना तपासणी केली. तर करोना सापडला. ताबडतोब पारल्याच्या नाणावटीत अतिदक्षता विभागात दाखल केलं. प्रकृती सुधरेना. पण लक्ष द्यायला कोणी नाही कारण रुग्णालयात रुग्णांची (?!) अभूतपूर्व गर्दी उसळली होती. अधून मधून बातम्या यायच्या की रक्तशोधनी ( = डायालिसीस) लावली आहे. एके दिवशी फोन आला की बॉडी घेऊन जा. नशीब जोरावर म्हणून देह मिळाला. नाहीतर महापालिकेने परस्पर विल्हेवाट लावलीही असती. करोना गंभीर असून मूत्रपिंडाच्या कार्यात प्राणघातक हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. प्रस्तुत प्रसंगी केवळ दुर्लक्षामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू २. नाव : माहीत नाही. वय वर्षे : ५५ रुग्णालय : मुंबई (पण कोणतं ते माहीत नाही) व्यवसाय : डॉक्टर कार्य : करोना रुग्णसेवा ऐकीव कथा : करोना रुग्णालयात सतत काम केल्याने संसर्ग झाला. हे त्या डॉक्टरला माहीत होतं. प्रकृतीस उतार पडेना म्हणून त्याला अतिदक्षता विभागात हलवलं. तिथे तीव्र हृत्शूल ( = हार्ट अॅटॅक) झाला. करोनामुळे मृत असा छाप लागला. फ्लू गंभीर असून संसर्ग वाढल्यास हृदयाच्या कार्यात हस्तक्षेप करतो. ही बातमी जुनी आहे. मला स्वत:ला २०१९ साली फ्लू झालेला असतांना हृदयाच्या पिशावीस सूज आली. ही सूज पुढे हृदयापर्यंत पोहोचल्याने एक विस्फारजाळी ( = स्टेंट ) टाकावी लागली होती. करोना फ्लू सारखाच विकार असल्याने जर वेळीच रुग्णाच्या प्रकृतीस उतार पडला नाही तर गंभीर परिस्थिती उद्भवते. पण लक्षात कोण घेतो. असो. वरील दोन्ही मृत्यू सहज टाळता येण्याजोगे होते. वेळीच लक्ष द्यायला पाहिजे. पण इथे तर सगळे महत्त्वाचे लोकं करोनाच्या नावाने उर बडवण्यात मग्न झालेत. बहुतांश वैद्यकीय सामुग्री करोनाचं भयावडंबर, विलगीकरण आणि टाळेबंदी यासारख्या निरर्थक बाबींत खर्ची पडते आहे. ज्यांना खरीखुरी गरज आहे त्यांना धत्तुरा मिळतोय. कोणाच्या पायांत कुणाचा पायपोस आहे, ओळखा पाहू ! गणेश लोखंडेचे आजी व मामा उपचार नाकारल्याने मेले. बातमी : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/two-members-of-the-family-die-due-to-hospital-rejection/articleshow/75900774.cms हे दोन्ही मृत्यू करोनाच्या थोतांडामुळेच झालेत. दिसला करोना, मारला छाप आन बशीवला आडोश्याला हास्पिटलात. याला उपचार म्हणंत नाहीत. अशाने रुग्णालय हे संसर्गाचं केंद्र बनण्याचा धोका असतो. पण लक्षात कोण घेतो. करोना + मूत्रपिंडविकार = प्राणाघात करोना + हृदयविकार = प्राणाघात ही समीकरणं सरकारच्या कधी लक्षांत येणार? सरसकट छाप मारणं कधी बंद होणार? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 08/25/2020 - 01:15 नवीन
हा लेख आज वाचला. खूपच छान रितीने तुमच्या सोसायटीत एकंदरित नियोजन आणि त्याची अम्मलबजावणी केली गेली. तुम्ही दिलेले सल्ले खूपच कामाचे आहेत. आता सोसायटीत आणि परिसरात कसे काय आहे ? आम्ही जवळपास महिनाभराच्या करोना अनुभवातून पार पडून आता ठीक झालो आहोत. त्याबद्दल 'कोविडः एक इष्टापत्ती ?? ' हा लेख लिहीला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 04/23/2021 - 01:00 नवीन
हा लेख आज पुन्हा वाचायला मिळाला. बरोबर एक वर्षाने आपण पुन्हा तिथेच आहोत हे बघून थोडीशी गम्मत पण वाटली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा