बेचव बकवास
सगळ्यात आधी मिसळ-पाव हॉटेलामध्ये आमच्या सारख्या पामरास आपला ठेला लावू दिल्याबद्दल हॉटेल मालकांचे आभार. या हॉटेलात आमचे हे तिसरे पुष्प. पुष्प ते पण हॉटेलात, sounds weird, म्हणून आपण ह्याला तिसरा गार-बकवास-बेचव-वडा म्हणूया. आता या हॉटेलामध्ये जी बरीच गर्दी असते, आणि ती दर्दी पण असते, अस म्हणतात.
आम्ही पहिल्यापासूनच बरेच उपदव्यापी. एकदा फिरता फिरता एका “उद्योगी मराठी माणसांच्या उत्थानासाठी आयोजित” होऊ घातलेल्या खाद्य-महोत्सवात गेलो होतो. तिथे आयोजक दादांपैकी एक दादा आमचा मित्र निघाला. त्याने विचारले तुम्ही घेणार का एखादा Food Stall चालवायला? तिथे आमच्या Madam नी आम्हाला लगेच spot-approval दिल. तसही Food Stall वर जे काय बनवायचं ते आमच्या Madam बनवणार होत्या, त्यामुळे लगेच पूर्ण भाडं भरून Food Stall book करून घेतला.
आता अडचण फक्त अशी होती कि आम्ही राहतो Central Line ला आणि खाद्य-महोत्सव होता Western Line ला, त्यात परत तिथली वेळ होती संध्याकाळची. आधी आम्हाला वाटलं होत कि संध्याकाळी JVLR मार्गे अंधेरीकडे जाणारा रस्ता एकदम रिकामाच मिळेल. पण यात आमच्याकडून सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट दुर्लक्षिली गेली ती म्हणजे आपण ज्या मुंबईत राहतो, तिथे हल्ली अनेक प्रेमी जीवांना आपलं प्रेम उधळायला हवा तसा एकांतच मिळत नाही. याचा बराच गाढा अभ्यास JV लिंकरोडवरच्या सगळ्या लोकप्रिय नगर-सेवकांनी केला असावा, आणि मग आपल्या प्रभागातील तमाम प्रेमळ लोकांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हक्काचा एकांत मिळावा आणि तो त्यांच्या घराजवळच असावा, या उदात्त हेतूने त्यांनी आधी जिथे-जिथे रस्ता दुभाजक दिसले तिथे–तिथे Sky–walk बांधले असावेत. अर्थात हे करताना त्यांनी जवळच असणाऱ्या पवई तलावावर प्रेमळ लोकांचा दिवसभर पडणारा ताण पण लक्षात घेतला असणारच. आणि नंतर जेव्हा त्यांना अस आढळलं असेल कि इतर (म्हातारी) जनता Sky–walk चे जिने चढून या प्रेमी युगुलांच्या एकांतात खंड पाडते आहे, तेव्हा पुन्हा एकदा याच प्रेमी जीवांच्या कल्याणासाठी, आणि इतर (म्हातार्या) जनतेची Sky–walk चे जिने चढून होणार्या गुडघेदुखीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांनी थेट Sky – walk खाली zebra-crossing बनवून त्यावर Signals लावले असावेत. याचा परिणाम मात्र असा होता कि आम्ही कधीच सूर्याला बरोबर घेऊन महोत्सवात पोहचू शकलो नाही. त्यात संध्याकाळी आपल्या प्रेमपात्राला घेऊन निघलेले Bikers आणि Signals म्हणजे सुज्ञास सांगणे न लगे.
असो, आता मूळ विषयाकडे, तर एकदा खाद्य महोत्सवात भाग घ्यायचे ठरवल्यावर खाद्य महोत्सवाचा Menu ठरवणे आले. Veg. मध्ये मिसळ-पाव, पाणी-पुरी आणि Non-Veg. मध्ये कोलमी-लोणच, सागोती-पाव ठेवायचा अस ठरवलं. रंगीत-तालीम करण्यासाठी सगळे पदार्थ चांगले चार चारदा चाखून पाहीले (बनविले मात्र तिनेच). मजाक मजाकमध्ये एक Data-Analysis साठी App. पण बनवलं. शेवटी एक Cash – Drawer घेतला. (येणारे प्रचंड पैसे ठेवायला)
आणि मग तो दिवस आला, खाद्य महोत्सव सुरू झाला आणि बघतो तो काय पहिल्याच दिवशी ही तोबा गर्दी, पण शेजारच्या Stall वर.
पण थोड्या वेळाने थोडी सुरुवात झाली खरी पण त्या दिवसाचा शेवट मात्र आम्ही कोलमी-लोणच आणि सागोती; यांची पावाबरोबर पोटात मिसळ करून केला. नंतर अस लक्षात आल कि बऱ्याच Food Stall वरची गर्दी त्यांच्या Local Friend Circle ची होती. मग दुसर्या दिवशी आम्हीपण लगेच आमच्या Friend Circle ला आवतान धाडल, यात एक गोष्ट मात्र चांगली झाली कि आमचे सगळे पदार्थ त्या दिवशी संपले. (तेव्हढाच आमच्या पोटाला आराम). नंतर जेव्हा प्रत्यक्ष खाद्य-महोत्सवात फिरून अंदाज घेतला कि बाबा आपलं नक्की चुकतंय तरी काय, तेव्हा अस आढळले कि खाद्य-महोत्सवात चायनीजला खूप मागणी होती मग ती चायनीजला भेळ असो कि चायनीज लाल पकोडे, कारण ते स्वस्त आणि भरपूर मिळत होते. मग मात्र आम्ही आमचा Menu परत Re – define करायचा ठरवलं. ह्या वेळेस Veg. team मध्ये वडा-पाव, भजी-पाव आणि उकडीचे मोदक उतरवले. आणि Non-Veg. team मध्ये एकटा तंदूर चिकन लोलीपोप उतरला. परत Veg. आणि Non-Veg. लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून सगळ्यांना दिसावे अशा पद्धतीने दर्शनी भागात आम्ही Veg. आणि Non-Veg. साठी स्वतंत्र चुली मांडल्या.
पण त्यातही काही लोकांनी तुम्ही एकाच तेलात वडे आणि भजी तळता म्हणून आम्हाला नको अस म्हणत नाक मुरडून घेतली. उकडीच्या मोदकाला Sweet Indian Momo पण म्हणतात अस आम्हाला तिथे कळलं. या वेळी मात्र एकूण १५७ गरमा गरम उकडीचे मोदक उकडून आणि गरमा गरम १९९ भजी आणि वडे तळून आमच्या Re – defined मेनुने आमचा चांगलाच जीव काढला. (आकडेमोड आमच्या App ची बर का!!) विशेष म्हणजे Non-Veg. team, ने पण कधी नाही ते Sold out झळकवले. शेवटी त्या दिवशी आम्हाला मात्र रात्रीच्या जेवणासाठी दुसरे हॉटेल जवळ करावे लागले.
एकूण काय या वेळेस, अगदी Merit मध्ये नाही तरी First class मध्ये Pass झालो.
या अनुभवानंतर एक हॉटेल काढायचा आमचा मनसुबा आहे!! (मराठी गोलमाल मधला भरत जाधव) पण हॉटेल काढायला महानगरपालिकेच्या, राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या कुठल्या आणि किती परवान्यांची गरज आहे या बाबत बराच गोंधळ आहे. जाणकारांना मदतीचे जाहीर आवाहन करून आमची बेचव बकवास थांबवतो.
- कागदावर प्रकल्प आराखडा बनवला आहे का? (तुम्ही कुणाला तरी पैसे देणार आहात आणि ते येण्याची तुम्हाला खात्री हवी आहे, असे समजून बनवावा)
- पैसे कसे येणार कसे जाणार याचा काही अंदाजीत ताळेबंद बनवला आहे का?
- हॉटेल उत्तम चालले तर खूप छान पण समजा काहीच चालले नाही तर किती दिवस सस्टेन करणार? प्लान बी काय?
- हॉटेल साठी लागणारे मनुष्यबळ ही फार तिढ्याची गोष्ट असते. जसे हॉटेल चालेल तसे त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे ऑपरेशनल प्लान हाताशी हवा.
- मार्केट अॅनॅलिसिस रिपोर्ट तयार आहे का? हॉटेल हे 'कुठे आहे' म्हणजे लोकेशन काय आहे त्यावर किती आणि कसे चालेल याचा विचार केला जातो असे वाटते.
एखाद्या हॉटेल मध्ये काही दिवस अनुभव घेण्यासाठी काम केले तर? नवीन हॉटेलसाठी खूप शुभेच्छा! भरपूर चालू देत आणि भारतभर काय जगभर शाखा निघू देत!!