Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अहद-ए-वफ़ा… अहिस्ता...

स
सूक्ष्मजीव
गुरुवार, 06/11/2020 - 17:06
💬 14 प्रतिसाद
हरिहरन हे नाव गाण्याची थोडी देखील आवड असणाऱ्याला माहित नाही असे होऊ शकत नाही. पार्श्वगायन हा जरी त्यांचा प्रांत असला तरी त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक उत्तम गझल गायल्या आहेत. अर्थात हिंदी-उर्दू गझल चे नाव निघाले की ‘गुलाम अली, जगजीत सिंग किंवा नाही म्हणता पंकज उधास’ हेच ठळक गझल गायक म्हणून आपल्या समोर येतात. खऱ्या गझल प्रेमींमध्ये मग ‘अहमद आणि महमंद हुसेन’, सारखे किंवा ‘तलत अझीज भूपेंद्र सिंग, आणि चंदन दास’ सारखे गझल गायक आपले स्वतंत्र स्थान मिळवून आहेत. अगदीच कट्टर गझल पंथी ‘बेगम अख्तर, फरीदा खानुम, मेहदी हसन, आबिदा परवीन’ यांना हिमालया सारखे थोर समजतात. हे सर्व फक्त गझल गायकीला समर्पित दिग्गज गायक, आणि स्वतः पार्श्वगायक म्हणून उत्तुंग उंची गाठल्याने हरिहरन यांची गझल गायक म्हणून ओळख कुठेतरी मागे पडते. हरिहरन गझल गायक म्हणून संगीतप्रेमींमधे एकदम पुढे आले ते त्यांच्या झाकीर हुसेन यांच्यासोबत केलेल्या हाजीर या अल्बममुळे. हा अल्बम उत्तमच आहे, पण आज आपण त्याच्या सुरुवातीच्या काळातील एका गझलकडे पाहणार आहोत. गुल्फाम हा अल्बम १९९४ साली आला. याचे गायक आणि संगीतकार हरिहरन स्वतः आहेत. ही गझल, गायकीच्या अंगाने गझलपेक्षा नज्म या व्याखेकडे जास्त झुकणारी आहे. हळुवार आहे. सारंगी आणि सतार यांच्या सोबतच गिटारच्या स्वरमेळातून गझलची सुरुवात होते आणि हरिहरन गाऊ लागतात. उसने जब मुझसे किया अहद-ए-वफ़ा अहिस्ता... दिल के वीराने में एक फूल खिला अहिस्ता ........... शब्दाच्या अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीला व्याकरणात अभिधा, लक्षण आणि व्यंजन अशी नावे आहेत, आणि हिंदी-उर्दू मध्ये ही क्षमता अफाट आहे. साध्या शब्दामधून गहिरा अर्थ व्यक्त होतो. पहिल्या ओळीतील प्रश्न, जेंव्हा तिने तिचं प्रेम हळुवारपणे माझ्या समोर व्यक्त केलं, स्वीकारलं त्यावेळी काय घडलं? दुसऱ्या ओळीत त्याचे उत्तर, माझ्या हृदयाच्या उजाड माळरानावर हळुवार पणे एक फूल उमललं..... वाह! काय कल्पना आहे. साधी, सोपी, तरल आणि तरीही हृदयाला हात घालणारी. नक्कीच प्रत्येकाने हा क्षण अनुभवलेला आहे. स्त्री असो अथवा पुरुष, हे फूल अनेकांच्या हृदयात उमलले आहे. ज्याने त्याने ते फूल एका कप्यात आजही जपून देखील ठेवलेलं आहे. या शेरा मधील भावना ही अनेक वेळा प्रेम करून त्याची सवय झालेल्या साकी वाल्या आशिकाची नाही तर रुक्ष जमिनीवर पावसाचा शिडकावा व्हावा तसं प्रेम मिळालेल्या, प्रेमाची पूजा करणाऱ्या प्रियकराची आहे प्रेयसीची आहे. यामध्ये हरिहरन यांनी केलेला ‘आहिस्ता’ या शब्दाचा उच्चार हा त्याचा सही अर्थ आपल्या पर्यंत पोहोचवतो. आहिस्ता नंतर गिटारच्या स्वरावरील आंदोलन त्या ‘आहिस्ता’ ला थेट आपल्या हृदयातल्या फूलाशी जोडून देतो. मैंने माना तू मसीहा है, शिफ़ा बाँटेगा... मेरे जख्मों को मगर हाथ लगा आहिस्ता.......... मला समजलंय, तू तारणकर्ता आहेस, देवदूत आहेस आणि सर्वांचे दुःख दूर करशील तुझ्या स्पर्शाने सगळ्यांच्या वेदना दूर होतील. तशाच तू माझ्याही वेदना दूर करशील; पण तरीही, ... माझ्या जखमांना हळुवारपणे हात लाव. त्या अतिकोमल आहेत. पर्यायाने माझ्या भावना अतिकोमल आहेत! तुला खूप काळजी घ्यावी लागेल. या शेरामधला ‘शिफ़ा’ हा शब्द खूप सुरेख आहे. शिफ़ा म्हणजे उपचार नाही, तर बरे झालेल्या अवस्थेचे नाव आहे. साधारण वैदू काय, औषध देऊ शकतो; पण जर देवदूतच अवतरला तर तो उपचार थोडेच करत बसणार आहे तो थेट बरेच करून टाकणार. तू तशीच माझ्या जीवनात आलेली आहेस, माझ्या सर्व जखमावर तूच इलाज आहेस याची मला खात्री आहे पण तरी त्यांना हळुवारपणे स्पर्श कर........... ओरखडा राहणार नाही याची काळजी घे. मी खूप हळवा आहे. आजकी शब मैं परेशां हूँ, बहोत तनहा हूँ... ऐ सबा उसकी कोई, बात सुना आहिस्ता............. आजच्या रात्री मी खूप उदास आहे, एकटा आहे. तू नाहीस सोबत. मग काय, मी सकाळच्या हवेला विनंती करतो उजाडल्या बरोबर तिची एखादी आठवण, बातमी तुझ्यासोबत घेऊन ये. दिवस बदलेले आहेत. तू आणि मी सोबत नाही, पण तुझ्या आठवणी मला व्याकूळ करतात. तू दिसतेस कधी ऑनलाईन, कधी फेसबुक वर. पण आपण जास्त बोलत नाही.... बंधने अनेक आहेत; नीतीची, समाजाची, व्यवस्थेची. कदाचित वचनबद्धतेची सुद्धा. पण तुझी खबरबात, एखादा कटाक्ष मला पुरेसा आहे. तो मिळेल कोठून...? या शेरामधील ‘मैं परेशां’ आणि ‘तनहा’ ची फेक लाजवाब आहे. जरी मी एकटा आणि उदास असलो तरी निराश मात्र नक्कीच नाही कारण मला तुझी काही ना काही खबर मिळेल हा आशावाद चालीमधून व्यक्त होतो. तो ऐकणाऱ्याने अनुभवल्याशिवाय कळणार नाही. तीरगी है मेरी किस्मत तो बुझा दे आँखे... छोड़ना है तो मुझे छोड़के जा आहिस्ता........... माझ्या नशीबात जर अंधारच असेल तर मला डोळ्यांची गरज ती काय? तू जर माझ्या कडे पुन्हा कधीच येणार नसशील तर खोटी आशा कशाला? जर मला तू सोडणार असशील तर खुशाल सोडून जा. पण कशी जाशील? ‘आहिस्ता’ म्हणजेच हळुवारपणे. आता मला स्पष्ट झालेले आहे की तू माझी होऊ शकत नाही. पण दोघेही वेडे आहोत. माझी तुझ्याबद्दलची ओढ कमी होत नाही. हा खेळ किती दिवस खेळणार आपण? प्रेम करणारे पुन्हा मित्र कधीच बनू शकत नाहीत. ते प्रेमीच राहतात. मग हा आभास कशासाठी....? म्हणून निर्वाणीचं सांगतो, आपण एक होत नसू तर मला तू सोडून जा............ प्रत्येक शेर आधीच्या शेरा पेक्षा जास्त तीव्र होत जातो, गहिरा होतो आणि आपल्याला पण सामावून घेत राहतो. शेवटच्या शेरात त्याचा कळस झाला आहे. वास्तवाची जाणीव झाली आहे आणि ‘आहिस्ता’ हा काफ़िया संपूर्ण गझलेला एकजिनसी बनवतो. हरिहरन यांनी खूप सयंत पणे ही गझल गायली आहे. कुठेही आलाप, ताना, किंवा चमत्कृती नाही. प्रभावी शब्दयोजना आणि समर्पक अर्थानुरूप चाल ही या गझलेची बलस्थाने आहेत. ही रचना ऐकताना जर दोन महत्वाच्या शब्दांमधील जे अंतर आहे त्या अवकाशाकडे जर पाहता आले तर ही गझल ऐकण्याचा आनंद द्विगुणीत होईल हे नक्की. हरिहरन यांनी ही गझल गाताना स्वतःचा खराखुरा आवाज लावला आहे. बऱ्याचदा ते अतिगोड आवाज काढून गातात. एखाद्या सायंकाळी, कातरवेळी चहा-कॉफीचा मग भरून घ्या, बैठकीतून सगळ्यांना बाहेर घालवा, हेडफोन्स किंवा उत्तम म्युजिक सिस्टीम वर लूप मध्ये ही गझल लावा. खिडकीतून सुर्यास्त पाहताना ही रचना अनुभवा. ही रचना इथे ऐका अवांतर - या गझलेचे लाइव्ह विडीओ युट्यूब वर आहेत पण मला ते फार प्रभावी वाटले नाहीत तरीही आपल्यासाठी - इथे पहा

प्रतिक्रिया द्या
6598 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 06/11/2020 - 18:57 नवीन
सुरेख रसग्रहण. लगे रहो.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 06/12/2020 - 03:49 नवीन
रसग्रहण अगदी नज्म सारखी जमली आहे. सुंदर.
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Fri, 06/12/2020 - 05:26 नवीन
वाहवा! वाहवा!
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 06/12/2020 - 05:43 नवीन
अप्रतिम लेख! मेहदी हसन यांच्यासारख्या दिग्गज गायकाने अजरामर केलेली गझल आपल्या ढंगात सादर करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. हरिहरन यांनी ते पेलून दाखवले आहे. हरिहरन आणि उ. झाकिर हुसेन यांचा 'हाजिर' हा अल्बम, हरिहरन यांनी उ. अब्दुल सत्तार तारी खान यांच्या ढंगदार तबला साथीचा पुरेपूर फायदा उचलत गायलेल्या "कैसे छुपाऊँ राज़-ए-ग़म दीदा-ए-तर को क्या करूँ" किंवा चंद्रकंस रागाचे वेगळेच स्वरूप दाखवणारी 'अपने आईने मे उतार मुझे' या सारख्या गझल्सचा समावेश 'ऑल टाईम ग्रेट्स' मधे सहज होईल.
  • Log in or register to post comments
स
सूक्ष्मजीव Fri, 06/12/2020 - 11:22 नवीन
प्रस्थापित दिग्गजांची रचना वेगळ्या अंगाने मांडणे हे शिवधनुष्य पेलण्या सारखेच आहे. अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
प
पुजारी Fri, 06/12/2020 - 08:12 नवीन
सूक्ष्मजीव , याच अल्बम मधील मुझे फिर वोही याद आने लगे है .. याबाबत पण एक चार शब्द लिहा !! मुद्द्तो गम पे गम उठाये है.. पासूनच हि नज्म काळजात घुसायला सुरु होते ओ
  • Log in or register to post comments
स
सूक्ष्मजीव Fri, 06/12/2020 - 11:20 नवीन
मुद्द्तो गम पे गम उठाये है.. पासूनच हि नज्म काळजात घुसायला सुरु होते हे १०० टक्के खरे आहे. नक्की प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुजारी
स
सूक्ष्मजीव Fri, 06/12/2020 - 11:18 नवीन
संजय क्षीरसागर, अर्धवटराव, मूकवाचक, शेखरमोघे, पुजारी आपल्या सर्वाचे मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 06/19/2020 - 05:08 नवीन
मी ऐकली नाहीये ही, रसग्रहण ऐकून हातातली कामं बाजूला टाकून ऐकायला बसणार आता
  • Log in or register to post comments
स
सूक्ष्मजीव Sun, 06/21/2020 - 07:01 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. जर ऐकली असेल तर कशी वाटली ते नक्की लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ म्हादया......
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/19/2020 - 11:32 नवीन
मन:सौख्यदायी. अप्रतीम.
  • Log in or register to post comments
स
सूक्ष्मजीव Sun, 06/21/2020 - 07:01 नवीन
खूप खूप आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
वीणा३ Fri, 06/19/2020 - 23:49 नवीन
रसग्रहण छान जमलंय, एकदम हलकं फुलकं, मोठं मोठे शब्द नाहीत. वाचूनच गझल ऐकावी असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
स
सूक्ष्मजीव Sun, 06/21/2020 - 07:03 नवीन
धन्यवाद! नक्की ऐका व आपला अनुभव लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा