Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(नदीम-) श्रवणभक्ती

क
कुमार जावडेकर
Wed, 07/01/2020 - 09:00
💬 16 प्रतिसाद
आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे. ... अर्थात नदीम-श्रवणच्या संगीताचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे! साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.) पण प्रत्येक काळ वेगळा असतो. आमचे आई-वडील शंकर-जयकिशनच्या लाखेच्या तबकड्या ग्रामोफोनवर लावायचे (…त्यांना त्या लाखमोलाच्या वाटायच्या!). ज्ये. बंधूंच्या काळात घरात रेकॉर्ड-प्लेअर आला. मग त्यावर आमचे बंधू आर. डी. ची एल. पी. लावायला लागले. त्यांना एल. पी. पसंत नव्हते. आम्ही एल. पी. लावूया का असं हट्टानं म्हटलं तरी ते हटकून आर. डी. लावायचे. म्हणजे, आम्ही 'सावन का महिना' लावूया म्हणून शोर करायला लागलो की ते 'मेरे नैना सावन भादो' लावून आमच्या डोळ्यांत पाणी आणावायचे, आमचे डोळे 'सोर' होईपर्यंत. वास्तविक, 'नदीम-श्रवण यांनी शंकर-जयकिशन किंवा आर. डी. यांचीच परंपरा पुढे चालवली' असं वाक्य सुरुवातीला टाकून एक वाद आपण सुरू करायला हरकत नसावी. तसा नव्वदीत 'परंपरा' नावाचा एक चित्रपटही आला होता; पण त्याचं संगीत शिव-हरी यांचं होतं. त्यानंतर त्यांनी (अनुक्रमे) 'शिव शिव' आणि 'हरी हरी' करत 'आधी रात को' चित्रपट-संगीत-सन्यास घेतला. आपणच पूर्वी संगीतबद्ध केलेल्या 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' या गीताची प्रचीती त्यांना जवळ-जवळ पंधरा-वीस वर्षांनी आली! याचं श्रेय नदीम-श्रवण यांना प्रामुख्यानं द्यायला हवं. 'शंकर-जयकिशन यांचं संगीत, नेहरूंची भाषणं आणि रेशनचं किडकं धान्य यावर आमचं बालपण गेलं', असं एकदा शिरीष कणेकरांनी म्हटलं होतं. त्यावर 'तुमचा शंकर-जयकिशनवरचा आकस यातून दिसून येतो', अशी कुणीतरी टीका केली. त्याला कणेकरांनी असं उत्तर दिलं की 'आमचं सगळं बालपण वाईटच गेलं असं का तुम्हांला वाटतं? ' आमचं बालपण 'नदीम-श्रवणचं संगीत, ठाकऱ्यांची भाषणं आणि हॉस्टेलचं जेवण (याला विशेषण सापडत नाहीये)' यांवर गेलं. ठाकऱ्यांनी 'आम्हांला नथुरामाचा अभिमान आहे' असं सांगून अजून एक निवडणूक शिवसेनेला हरवून दिली होती, तोच हा काळ! पण परंपरा कुठली? शंकर-जयकिशन आणि आर. डी. यांनी इतर भाषांमधलं संगीत भारतात आणलं (त्याला नक्कल म्हणू नका नाहीतर जुने आणि त्यापेक्षा जाणते लोक आमची पंचाईत करतील). 'कौन हे जो सपनों में' हे गाणं आलं म्हणून आम्हांला एल्विस प्रिस्टली कळला. आर. डीं. च्या 'मिल गया हम को साथी' या गाण्यामुळे 'आब्बा'चं सुगम संगीत आमच्यापर्यंत आलं. (आता हे आम्हांला तेव्हा माहिती नव्हतं हा काय आमचा दोष?) नदीम-श्रवण यांनीही 'बॅचलर बॉय'चं 'ओ मेरे सपनों के सौदागर' करून आपला सौदा खरा केला आणि आपलं संगीत कसं अगदी पारंपरिक आहे हे सिद्ध केलं! असो. हा असली-नकली वाद बॉलिवूडच्या बाबतीत दूरच ठेवायला हवा. संगीतकाराची प्रतिभा एकदा समजून घेतली आणि हा म्हणजे महानच हे शिक्कामोर्तब केलं की बाकी गाणी 'रतीब घालण्यासाठी असं करावं लागतं' या स्पष्टीकरणात दडपता येतात. आमच्या बारकाईच्या अभ्यासाचा हाच मुख्य विषय आहे. 'आशिकी' या पहिल्याच गाजलेल्या चित्रपटावरून आम्हांला त्यांच्या क्षमतेचा अंदाज आला. (त्या आधी ते अकरा वर्षं कार्यरत होते हे नंतर कळलं.... 'त्यांनी तेच कार्य का नाही चालू ठेवलं? ' असा आमच्या बंधूंचा प्रश्न आहे.) त्या चित्रपटातली सगळीच गाणी आम्हांला आवडली आणि अपेक्षा अतिशय वाढल्या. 'अब तेरे बिन' हे गाणं आम्ही आधी ऐकलं नव्हतं. प्रत्यक्ष चित्रपट बघताना ते प्रथम कानी पडलं. असाच प्रसंग 'बाजीराव-मस्तानी'तली सगळी गाणी ऐकली आहेत असं वाटलं आणि आयत्या वेळी 'मल्हारी' 'याचि देही याचि डोळा' बघावं लागलं तेव्हाही आमच्यावर आला होता. फरक इतकाच पहिल्यावेळी आम्ही थक्क झालो होतो, तर दुसऱ्या वेळी धक्का बसला होता! पण रात्री चित्रपट बघतानाही त्या अहिर भैरव या सकाळच्या रागातले सूर, अन् गिटार आणि व्हायोलिनचा वापर अंगावर रोमांच आणून गेले होते. ('नुसतं नदीम-श्रवण नाव काढलं की आमच्या अंगावर काटा येतो' हे आमच्या बंधूंचं वाक्य उगाचच इथे आम्हांला आठवतंय.) 'सनम तोड दे, ता मुहब्ब्त के वादे' ही एवढी शब्दांची तोड सोडली तर त्या गाण्याला तोड नाही. (पण तशी ही तोडफोडही परंपरागतच आहे - 'एहसान तेरा हो, गा मुझपर' किंवा 'गम और खुशी में फर्क न महसू, स हो जहां' अशा सुंदर गाण्यांमध्ये रफीसाहेबांनीही सम कशी दाखवून दिली आहे ते पाहा. जाऊ द्या, पुन: आपण दुसऱ्यांशी तुलना करण्याचा मोह टाळू आणि 'वेगळेपणा' शोधू. 'दिल है के मानता नहीं' हे रात्रीच्या वेळी रात्रीच्याच रागातलं (झिंझोटी) गाणं (चित्रपट यायच्या आधीच) एकदा ऐकलं. त्यातली सुरावट, तिच्यात मूळ रागाच्या चलनापेक्षा (प ध सा रे म ग ऐवजी प नि सा रे ग म ग) केलेला परिणामकारक बदल आणि सतारीचे बोल हे खरंच (नदीम-)श्रवणीय वाटले बुवा. नदीम-श्रवणचा कालखंड इथेच संपला असं म्हणायला आमची हरकत नाही. पण जसं संजय मांजरेकरबद्दल लिहिताना सुरुवातीचा वेस्ट-इंडिज आणि पाकिस्तानविरुद्धचा तंत्रशुद्धपणा संपला की पुढची ओढाताण सांगणं भाग पडतं तसंच काहीसं इथे होईल. पूर्वीचा मांजरेकर कधी दिसेल असंच त्याचा खेळ बघताना सारखं वाटायचं, तसंच नदीम-श्रवणचं झालं. फक्त नदीम-श्रवणची वाटचाल 'कोंफिडंट' होती असं आमच्या एका गुजराथी मित्राचं मत आहे. (गुजराथी लोक खरे संगीतज्ञ! - जयकिशन गुजराथी होता, तसेच कल्याणजी- आनंदजी 'शहा'ही होते आणि अगदी हिमेश रेश... जाऊ द्या, आपण मूळ मुद्द्याकडे वळू.) मांजरेकर जसा प्रत्येक चेंडूवर स्वीप मारू लागला तसंच नदीम-श्रवण प्रत्येक गाण्याला तीच चाल देऊ लागले. (कुमार सानूंनाही याच सुमारास सर्दीची लागण झाली.) मात्र 'साजन'चं संगीत 'कोंफिडंट' होतं यात शंकाच नाही. 'दोन ठोकळे आणि एक सुंदरी' असं त्या चित्रपटाचं वर्णन कमलाकर नाडकर्णींनी म. टा. त केलं होतं. पण नदीम-श्रवणनी त्या चित्रपटात काय काय केलं हे खरं बघण्यासारखं आहे. 'देखा है पहली बार' मध्ये अलका याज्ञिकला आणून अनुराधा पौडवालच्या गाण्यांची संख्या कमी केली हे काय कमी कौतुकास्पद आहे? (ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं बहुधा कणेकरांनी म्हटलं होतं तिच्याबद्दल.) एस. पी. बालसुब्रमण्यम सारख्या चांगल्या गायकालाही किती कमाल रडवता येतं हेही त्यांनी दाखवून दिलं (उदा. 'पहली बार मिले हैं' किंवा 'देख के वो मुझे तेरा'). मात्र त्यांचं खरं वेगळेपण दिसतं ते 'बहोत प्यार करते है तुमको सनम' या गाण्यातून. मुखडा शब्दांसकट 'बहोत खूबसूरत है मेरा सनम' या मेहदी हसनसाहेबांच्या गाण्याची आठवण करून देतो. फक्त मेहदी हसनसाहेबांच्या गाण्यात वापरलेला शुद्ध निषाद दरबारीत बसत नसल्यामुळे नदीम-श्रवणनी वगळला! केवढी ही जाणकारी! .... पण, थांबा. पुढे अंतरा ऐकताना तर - 'सागर की बाहों में मौजे हैं जितनी' आणि 'ये क्या बात है आज की चांदनी में' या ओळींमधलं साम्य बघा. अनुकरण करतानाही राग (मिश्र किरवाणीचा दरबारी) आणि ताल (दादऱ्याचा केरवा) दोन्ही कसे बदलता येतात याचा हा एक उत्तम धडा आहे असं आम्हांला वाटतं. शिवाय, शुद्ध गंधार वापरून 'आम्हांलाही मिश्र दरबारी करता येतो' (टुक टुक!) हे त्यांनी दाखवून दिलं. केवढी ही प्रतिभा! केवढं हे वेगळेपण! आणि ह्या सगळ्यांच्या वरताण एकमेव 'ओरिजिनॅलिटी' - जी अभ्यास केल्याशिवाय सहजासहजी दिसत नाही ती - म्हणजे समीर यांच्या शब्दांतल्या अंतऱ्यांतल्या शेवटच्या ओळी 'के ये बेकरारी ना अब होगी कम'! अर्थात, ही प्रतिभा त्यांनी 'तू मेरी जिंदगी है' या गाण्याच्या मुखड्यातही दाखवली होती. मूळ मेहदी हसनसाहेबांच्या याच गाण्यातला 'बंदगी' हा शब्द बदलून तिथे 'आशिकी' घालून त्यांनी पूर्ण गाण्याचा कायापालट केला. आपलं कुणी अनुकरण करायला लागलं की आपण महान आहोत हे समजावं. अन्नू मलिक यांना यांच गाण्यांमधून प्रेरणा मिळाली असावी. त्यांनी देशाची सीमा ओलांडण्याचेही कष्ट घेतले नाहीत. आपल्याच जगजीतसिंग साहेबांची 'देर लगी आने में तुमको' ही गझल त्यांनी आपल्या गीतावळ्यात (अशा शब्द आहे की नाही माहिती नाही; पण ही आमची ओरिजिनॅलिटी आहे) समाविष्ट केली! 'तेरी उम्मीद तेरा इंतजार' मधला परमेश्वरी, 'सोचेंगे तुम्हे प्यार' मधला मारूबिहाग असे नंतर काही तुषार अंगावर आले खरे; पण तोपर्यंत कुमार सानूंची सर्दीही फारच वाढली होती आणि गाण्यांमधलं 'सामिर्य' देखील (हा साम्य आणि साधर्म्य यांच्यामधला शब्द आहे - पुनः एकदा आमची ओरिजिनॅलिटी). आमच्या बंधूंचं मत प्रत्ययकारी होऊ लागलं. मग नदीम-श्रवण यांनी 'परदेस' हा प्रयोग केला. सोनू निगमसारख्या चांगल्या गायकालाही किती कमाल रडवता येतं हे त्यांनी (पुनः एकदा) दाखवून दिलं. अर्थात, आमच्या मते या चित्रपटातलं एकच 'दो दिल' हे कुमार सानुनासिक (अभ्यासूंना हा समास सोडवायची संधी आहे) गीत वगळता बाकी संगीत हे घईंचं असावं. कारण त्यातून नदीम-श्रवणच दिसत नाहीत. याउलट 'तेरी पनाह में हमें रखना' या भजनातूनही ते कसे स्पष्ट दिसतात! 'साजन चले ससुराल' या चित्रपटातल्या 'दिल-जान-जिगर तुझपे निसार किया है' या गाण्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. असंबद्धता (असा शब्द बहुधा मराठीत असावा) हा या गाण्याचा स्थायीभाव आहे. पण ते गोविंदावर चित्रित झाल्यामुळे सगळं कसं अगदी सुसंबद्ध वाटतं! यानंतर काही काळ त्यांना उदित नारायण हा चांगला गायक आहे हा साक्षात्कार झाला असावा. कारण 'परदेसी' पासून ते 'धडकन' पर्यंत त्यांनी आपली प्रमुख गाणी उदित नारायण यांना दिली. श्री. नारायण हे रडू शकत नाहीत किंवा त्यांना सर्दीही फारशी होत नाही, हे बहुधा त्यांच्या लक्षात आलं असावं. मधल्या काळात त्यांनी विनोद राठोड (हे श्रवणचे बंधू) आणि अभिजीत (हे नदीमचे कुणी नाहीत) यांनाही संधी दिली होती. तसंच, जरी प्रत्येक आल्बमवर स्वतःची छबी छापून घेत असले तरी, आशा भोसलेकडून 'चेहेरा क्या देखते हो' हे गाणंही गाऊन घेतलं होतं! अलीकडेच नदीम यांनी 'इश्क फॉरेव्हर' या चित्रपटाला संगीत दिलं....कुणाचंच संगीत फॉरेव्हर राहत नाही हे यातून 'बिलकुल' सिद्ध होतं. मात्र हल्लीच स्टॅफोर्डला (इंग्लंड) एका बांग्लादेशी इंडियन(!) रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. त्याचं नाव 'मेला'. जेवण चांगलं होतं आणि आम्ही अजून जिवंत आहोत हेही जाता जाता सांगायला हरकत नाही. त्यांनी बहुधा 'उदित नारायण सिंग्स फॉर नदीम-श्रवण' अशी प्ले-लिस्टच लावली असावी. वास्तविक 'मेला' या खाद्यगृहात अन्नू मलिकची गाणी जास्त शोभली असती. असो. पहिलंच गाणं 'दिल का रिश्ता बडा ही प्यारा है' हे 'दिल में इक लहर' आणून गेलं. (अक्षरशः - कारण चाल जवळ-जवळ तशीच होती. फक्त तिचं पूर्णतः नदीम-श्रवणायझेशन झालं होतं आणि शिवाय तिच्यावर समीरच्या शब्दांचे संस्कार झालेले होते.) 'प्यारा' ऐकूनच आम्ही मनात 'सारा', 'हमारा', 'पुकारा' अशा भेंड्या लावून टाकल्या. ('मेला'मध्ये भेंडी मसाला चांगला मिळतो; तोच खात होतो.) मोक्ष मोक्ष म्हणजे तरी दुसरं काय असतं? असाच समीर 'जो मेरी रुहको चैन दे प्यार दे' या गाण्यात 'मैने तनहा कभी जो लिखी थी वही शायरी बन गए हो तुम, जिंदगी बन गए हो तुम' हे लिहून जातो... आपणच वाढवलेल्या आणि न पूर्ण झालेल्या अपेक्षांबद्दल आपल्यालाच वाईट वाटत राहतं... जाऊ द्या. नदीम-श्रवणच्या संगीतातलं थोडं संगीत 'श्रवणीय' आहे आणि बाकींत नुसताच 'नदीमी कावा' आहे असं आपण समजूया. आता त्यांच्या या गाण्यांनी चित्रपट-संगीतात एक वेगळा कालखंड तयार केला की त्याचा काल खंडित केला हे ज्याचं त्यानं ठरवावं! काय? - कुमार जावडेकर

प्रतिक्रिया द्या
7857 वाचन

💬 प्रतिसाद (16)
म
महासंग्राम Wed, 07/01/2020 - 10:27 नवीन
भारी लिहिलंय कुमारजी, अमोल मंगेश उदगीरकरांनी एका ब्लॉग मध्ये म्हटलंय तसं कुमार सानू एका दशकाचा आवाज होता, नाईंटीज मधले कित्येक जण कुमार सानू, नदीम श्रावण च्या संगीतावर पोसले आहेत. काळ कितीही पुढे गेला तरी, खेड्यापाड्यात कालीपिली आणि नांगरणीच्या ट्रॅक्टरवर याचंच साम्राज्य आहे. आजही नव्वदीतला तरुण एखाद्य उधाणलेल्या विकांताच्या संध्याकाळी सोनेरी द्रव्य घेऊन निवांत बसला कि त्याच्या मोबाईल मध्ये आपसूकच यांची प्लेलिस्ट लागते. नव्वदीच्या दशकाचा गाळीव अर्क काढायचा झाला ( असं एखादं पल्लेदार वाक्य टाकावं लागतं ) तर नदीम श्रावण आणि कुमार सानू यांचं स्थान अग्रक्रमाने येईल.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 07/01/2020 - 10:39 नवीन
खुसखुशीत लेख. 'जमाने के देखे है रंग हजार' सारखे अजरामर आणि अभिजात संगीत देणाऱ्या नदीम श्रवणच्या 'कामगिरीचा' घेतलेला आढावा मस्तच
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 07/01/2020 - 11:47 नवीन
+१. ट्रक ड्रायव्हर , टॅक्सी ड्रायव्हर बरेचदा हिच गाणी वाजवतात ( सातो जनम मै तेरे साथ रहुंगा , इक ऐसी लडकी थी ) .
  • Log in or register to post comments
M
Marathi_Mulgi Wed, 07/01/2020 - 12:17 नवीन
बरोब्बर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
M
Marathi_Mulgi Wed, 07/01/2020 - 12:16 नवीन
'एहसान तेरा हो, गा मुझपर' किंवा 'गम और खुशी में फर्क न महसू, स हो जहां' अशा सुंदर गाण्यांमध्ये रफीसाहेबांनीही सम कशी दाखवून दिली आहे ते पाहा. >>> रफीच्या अप्रतिम आवाज आणि एकंदर गाण्याच्या रेंडीशनमुळे हे ग्वाड लागतंच. पण सही पकडे है. 'सागर की बाहों में मौजे हैं जितनी' आणि 'ये क्या बात है आज की चांदनी में' या ओळींमधलं साम्य बघा. >>>>> फार छान निरीक्षण. ठाकऱ्यांनी 'आम्हांला नथुरामाचा अभिमान आहे' असं सांगून अजून एक निवडणूक शिवसेनेला हरवून दिली होती, तोच हा काळ! 'प्यारा' ऐकूनच आम्ही मनात 'सारा', 'हमारा', 'पुकारा' अशा भेंड्या लावून टाकल्या. ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं बहुधा कणेकरांनी म्हटलं होतं तिच्याबद्दल. >>> हसूनहसून पुरेवाट. लगे रहो.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Wed, 07/01/2020 - 12:45 नवीन
जब्रा चिरफाड. येवुदे अजुन. आमचे ते कॉलेजचे (फुलपाखरी)दिवस होते आणि वर म्हंटल्या प्रमाणे उदित, सानु, अलका, साधाना या जोडगोळींनी आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्या गाण्यांनी धुमाकुळ घातला होता. आणी सालं गाणी कोणासाठी म्हाणावीत तर आम्ही या बाबतीत करंटे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/01/2020 - 13:28 नवीन
अजुनही त्यांची बरीच गाणी लक्षात आहेत, सहज आठवणारी काही ये अक्खा इंडिया जनता है हम तुमपे मरता है, दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है, पुछो जरा पुछो मुझे क्या हुवा है रहेने को घर नही, सोने को बिस्तर नही तुम्हे अपना बनाने की कसम खायी है, कितना मुश्कील है तौबा इस दुनियामे दिल लगाना दिल है के मानता नही घुंगट के आडसे दिलबर का दिलबर दिलबर कभी भुला कभी याद किया भारी जोडी होती एकदम, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Wed, 07/01/2020 - 13:39 नवीन
नदीम श्रवणचे ठोकळेबाज संगीत आणि समीरचे शाब्दिक सुतारकाम यापैकी अधिक वैतागवाणे काय होते हे ठरवणे महाकठीण आहे. (या दोहोंपेक्षाही राहुल रॉय, अविनाश वधावन, पृथ्वी, दीपक तिजोरी, विवेक मुशरान, सुनील शेट्टी प्रभृतींचे अभिनयतांडव जास्त यातना देई). तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'आशिकी' व 'दिल है कि मानता नही' या दोन चित्रपटांत नश्रचे कलाकौशल्य संपते. उरते ती फक्त धंदेवाईक नोटछपाई. नाही म्हणायला 'दिव्यशक्ती'मधले 'आप को देखकर' थोडेफार आवडते. 'परदेस' आणि 'दिवाना'ची प्रत्येकी एकदोन गाणीही ऐकणेबल आहेत. पण हे केवळ अपवाद. आनंद मिलिंदची कथाही तीच. काहीही फरक नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 07/01/2020 - 13:59 नवीन
भारी लेख !
आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)
मस्तच ! ह्ये पण नश्र आणि कुमार सानूचं गाणं, आमचा आख्खा लॉकडाऊन या गाण्याचे टिक्टॉक ऐकण्यात गेला :-)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 07/01/2020 - 15:22 नवीन
कणेकरांसारखे भारी विनोद, विषयाचा सखोल अभ्यास आणि तोही श्लेषात्मक पद्धतीनं मांडण्याची शैली आवडली ! एक मात्र वाटून गेलं की इतकं खोलात गेल्यावर गाण्याची मजा घेता येते का ?
  • Log in or register to post comments
क
कुमार जावडेकर Wed, 07/01/2020 - 19:58 नवीन
नक्कीच, मला तरी आली :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कुमार जावडेकर Wed, 07/01/2020 - 19:58 नवीन
मनः पूर्वक धन्यवाद प्रतिसादांबद्दल मंडळी.... मलाही ऐकताना, लिहिताना आणि वाचताना वेगवेगळ्या प्रकारची मजा आली होती / येत आहे :) - कुमार
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 07/01/2020 - 21:47 नवीन
नदीम श्रवणपुराण आवडले.
ती कायम रेफ्रिजिरेटरमधे बसून गायची असं बहुधा कणेकरांनी म्हटलं होतं तिच्याबद्दल.
ती म्हणजे कोण? अलका कि अनुराधा?
  • Log in or register to post comments
क
कुमार जावडेकर गुरुवार, 07/02/2020 - 09:00 नवीन
अनुराधा पौडवाल... तिच्या आवाजात (तलत महमूदसारखीच) थरथर आहे म्हणून. :) - कुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
ट
टर्मीनेटर गुरुवार, 07/02/2020 - 09:05 नवीन
झकास खुसखुशीत लेख! राग, ताल, सूर, बोल, मुखडा, अंतरा असल्या गोष्टींच्या तपशिलात न शिरता केवळ संगीताचा आस्वाद घेणाऱ्या माझ्यासारख्या कानसेनाला अगदी 'कुंदन लाल सैगल' ते 'बाबा सैगल' 'मोहम्मद रफी' ते 'मोहम्मद इरफान' 'किशोर कुमार' ते 'कुमार सानू', एस.डी, आर.डी., मोहम्मद अजीझ, अमित कुमार, सोनू निगम, विनोद राठोड, पंकज उधास, शान ते हिमेश रेशमिया, के.के. आणि लता, आशा, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उषा उत्थप, अलका याद्निक, पूर्णिमा, ईला अरुण, श्रेया घोशाल अशा पर्यंत सर्वच पिढ्यांमधल्या गायक/गायिकांनी गायलेली आणि एस.डी, आर.डी., लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-जयकिशन पासून अन्नुमालिक, बप्पी लहिरी, राकेश रोशन, नदीम श्रवण ते राजू सिंग अशा सर्वच संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकायला आवडतात. लता मंगेशकर आणि अनुराधा पौडवाल ह्या दोघी कित्येकदा कर्कश्य वाटतात तो भाग वेगळा 😜 असो, मजा आली आपले अभ्यासपूर्ण लेखन वाचायला.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/05/2023 - 10:27 नवीन
जबरदस्त अभ्यासपूर्ण लेख!! ईतक्या सगळ्या गाण्यांचे बारकावे ऐकायचे , लक्षात ठेवायचे आणि अशा सोप्या पद्ध्तीने खुसखुशीतपणे मांडायचे यातच तुमचा अभ्यास दिसुन येतो. दंडवत _/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा