Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अप्रिय आठवणींपासून सुटका

श
शाम भागवत
Mon, 07/06/2020 - 05:55
💬 145 प्रतिसाद
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो. मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या. मी ही अचंबित झालो. असा विचार करणे बरोबर नाही असे एकीकडे वाटत होते. जपाचा जोरही अचानक वाढला होता. पण त्याच बरोबर सूडाचे मानसिक समाधानही मिळत होते. विशेष म्हणजे जप चालू असल्याने ह्या सगळ्याकडे त्रयस्थ नजरेने पाहणेही चालू होते. खरे तर आदला सगळा दिवस चांगला गेला होता. झोप पण चांगली लागली होती. त्रास देणाऱ्या माणसाची सावलीसुद्धा बरेच दिवस शिवली नव्हती. पण आज पहाटे त्या माणसाच्या विचाराने माझा कब्जा घेतला होता. मी सोडून आजूबाजूचे जग शांतपणे झोपले होते. मनात असा विचार आला की, तो माणूसही आता स्वस्थ झोपला असेल आणि मी मात्र इकडे तळमळतोय. रागाने तडफडतोय. सद्गुरू पैंच्या तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामुळे, सकारात्मक विचाराचे महत्त्व माझ्या लक्षात आलेले होते. तसेच नकारात्मक विचारांनी नुकसान होते हेही लक्षात आले होते. तसेच यासगळ्यासाठी मनात येणाऱ्या विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवायची आवश्यकता नव्याने कळली होती. अप्रिय घटना किंवा आठवणी नव्याने मनात साठणार नाहीत याची काळजी घेणे हा फक्त निम्माच भाग समजला पाहिजे. कारण भूतकाळातील आठवणी अजून त्रास देऊ शकतात हे आज लक्षात आले होते. त्या आठवणींचा बीमोड हा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे याची आज खात्रीच पटली होती. कारण ह्या आठवणींवर माझा काहीही ताबा नाही, उलट त्याच माझा ताबा घेताहेत याचा नुकताच अनुभव आला होता. त्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे होता. विचार चालू झाला. आणि वर उल्लेखलेल्या ग्रंथातील एका वाक्याची आठवण झाली. जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील. अंघोळ व पूजा झाल्यावर शांतपणे बसलो. वर दिलेल्या वाक्याच्या आधारे उपाययोजना करायचे निश्चित केले आणि तो माणूस समोर आहे असे समजून, त्याचे भले व्हावे, कल्याण व्हावे वगैरे कल्पना करायला लागलो. पण अजिबातच जमेना. उलट संताप वाढायला लागला. तरीही प्रयत्न वाढवत राहिलो. तरीही मला ते जमत नव्हते. एकवेळ अशी आली की, माझ्या मुठी घट्ट वळल्या गेल्या, सर्वांगाला घाम फुटला. तरीही मला त्या माणसाचे शुभचिंतन करता येईना. भले किंवा कल्याण हे शब्द सुद्धा आठवेनात. तरीही जे शब्द सुचतील ते वापरून मी पुढची पाच मिनिटे प्रयत्न करत राहिलो. गंजीफ्रॉक घामाने ओला झाला होता. शरीरपण थोडेसे थरथरत होते. पण शेवटी कसेबसे शुभचिंतन करायला जमले होते. त्यावेळी एक लक्षात आले की, मनावरचा ताण हलका झाला आहे. मोकळे मोकळे वाटत आहे. शांतपणे डोळे मिटून बसलो. तर थोड्या वेळाने आणखी एका अप्रिय माणसाची आठवण आली. ही जरा जुन्या काळातील आठवण होती. परत वरील प्रमाणे त्याच्यासाठीही शुभचिंतन केले. त्रास झाला पण फारसा झाला नाही. विचार करता असे लक्षात आले की, ही आठवण पहिल्या आठवणी इतकी त्रासदायक नव्हती त्यामुळे शुभचिंतन करणे त्यामानाने सोपे झाले. पुढचे अनेक तास थांबून थांबून अशाच जुन्या जुन्या आठवणी एकामागोमाग येत होत्या व मी शुभचिंतन करायचा प्रयत्न करत होतो. मात्र शुभचिंतन करायला त्रास फारसा होत नव्हता, कारण या आठवणींत तेवढा कडवटपणा भरलेला नव्हता. एव्हाना भावासहित शुभचिंतन करण्यासाठी विश्वप्रार्थना ही खूप उपयोगी पडते आहे हे लक्षात आल्याने तिचाच वापर करू लागलो होतो. यासगळ्या प्रकारात शब्द महत्त्वाचे नसतात तर भाव महत्त्वाचा असतो. अन्यथा मनापासून शुभचिंतन करणे शक्य होत नाही. शुभचिंतनामध्ये आपल्याला जे हवेहवेसे वाटते तेच समोरच्या व्यक्तीला मिळते आहे ही भावना धरायची असते. त्या दृष्टीनेही विश्वप्रार्थना उत्कृष्ट आहे. या जुन्या जुन्या आठवणी मनांत येत असताना, मधूनच पहिल्या माणसाची परत आठवण यायची. पण ती प्रत्येक वेळेस आणखीनच सौम्य झालेली जाणवत असे. त्यामुळे शुभचिंतन करण्यांस सहज जमत असे. दातओठ खाऊन किंवा मुठी वळायची कधीच आवश्यकता भासत नव्हती. मलाच माझे आश्चर्य वाटत होते. असे हळूहळू सगळ्याच अप्रिय आठवणींबद्दल व्हायला लागले होते. माझा हा प्रयत्न ३ दिवस चालू होता. आता कुठलीच आठवण त्रासदायक वाटत नव्हती. एकदाच शुभचिंतन करूनही किंवा शुभचिंतन करायच्या नुसत्या विचारासरशी त्या आठवणीतून आरामात मुक्त होतो येत होते! काही दिवसांनी मला त्रास देणारा त्या माणसाला मी लांबून पाहिले. पूर्वी माझ्या मनांत या माणसाच्या फक्त दर्शनाने तात्काळ तिडीक उठत असे. पण यावेळी असे काही झाले नाही. मी शांतपणे माझ्या मनातल्या प्रतिक्रियांकडे पाहत होतो. मन खूपच शांत होते. अगदी त्रयस्थपणे त्या माणसाकडे पाहत होते. आपल्याला कोणत्याही प्रकारचे अशुभ चिंतन करायचे नाहीये हे मन स्वत:लाच शांतपणे समजावत होते!!. मी त्या माणसाच्या त्रासातून मुक्त झालो होतो. खूप हायसे वाटत होते. यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता. असेच अनुभव इतर बऱ्याच जणांबद्दल आल्याने हा योगायोग नाही हे स्पष्ट झाले. वर दिलेले व ठळक केलेल्या वाक्याने त्याची सत्यता पटवली होती. त्यानंतर नकोशा वाटणाऱ्या आठवणींवर हाच उपाय मी वापरू लागलो व आजपर्यंत निर्भेळ यश मिळाले आहे. ज्यांना ज्यांना मी हा उपाय सुचवला व ज्यांनी ज्यांनी तो वापरला त्यांना फायदा झाला. अर्थात ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनाच मी हे सांगितले आहे. त्यामुळे "शंकाविरहित वापराचा परिणाम", हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. याबाबतीत माझ्या मनांत जे विचार वेळोवेळी आले ते, मी मांडतोय. मी आजपर्यंत कोणतेही मानसशास्त्राचे पुस्तक वाचलेले नसल्याने मी शास्त्रीय पद्धतीने या सगळ्याचे विवेचन करू शकणार नाही. हे जे मी लिहितोय ते सर्व अप्रिय, त्रासदायक अथवा नकारात्मक गोष्टींबद्दलच्या आपल्यातल्या साठवणीबाबत लिहीत आहे. त्याला फक्त स्वानुभवाचा आधार आहे.
१. आपल्या आयुष्यात जे काही घडत असते त्या सर्वांची नोंद होत असते. घडलेली घटना, काळ, वेळ त्यावेळच्या भाव व भावना, याचबरोबर या सगळ्याची तीव्रता पण नोंदवली जात असते. त्यामुळे ती आठवण होताच आपले मन परत सर्वार्थाने ती घटना जशीच्या तशी परत अनुभवू शकते. साधारणत: आपण कसे बरोबर व दुसरा कसा चुकीचा हाच उहापोह आपले मन यावेळी करते. तसेच काही जमलेली नवीन माहिती किंवा मुद्दे यांचा उहापोह होऊन, ही नवीन माहिती पण मग जुन्या माहितीच्या शेजारी साठवली जाते. मूळ माहितीत भर घातले जाणारे हे नवीन मुद्दे साधारणत: रिव्हर्स इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असण्याची शक्यताच जास्त असते. थोडक्यांत जुन्या आठवणींवर आणखीन एक घट्ट व भक्कम वीण घातली जाते. ती आठवण आणखीन धष्टपुष्ट होते. २. घडलेल्या घटनेची कोणतीही नोंद पुसली जाऊ नये किंवा ती आमूलाग्र बदलली जाऊ नये यासाठी काही एक यंत्रणा काम करत असते. याच कारणामुळे आठवणीतला कडवटपणा निघून जाईल असे (शुभचिंतन) जर आपण काही करायला लागलो तर त्याला सुरवातीला विरोध होतो. मात्र हा विरोध मावळेपर्यंत जर आपण प्रयत्न चालू ठेवले तर मात्र हे शुभचिंतनही स्वीकारले जाते व या आठवणींच्या जवळ साठवले जाते. पुन्हा जेव्हा ही आठवण होते, तेव्हा त्या आठवणीतील कडवटपणा बरोबरच हे शुभचिंतनही अंतर्भूत असल्याने ही आठवण सौम्य झालेली असते. तसेच नव्याने शुभचिंतन केले गेल्यास त्याला फारसा विरोध होत नाही. ते कुठे साठवायचे हा प्रश्न मागच्या वेळेसच निकालात निघालेला असतो. ३. सर्व नोंदींची प्रतवारी केलेली असते व सर्वात जास्त वेटेज असलेली आठवण सर्वात वर व त्याचपध्दतीने बाकीच्या आठवणी त्याखाली साठवलेल्या असतात. याच कारणामुळे एखादी सर्वोच्च अप्रिय घटना त्यात मिसळलेल्या शुभचिंतनाने जेव्हा सौम्य होते तेव्हा तिची प्रतवारी तात्काळ घसरते. थोड्यावेळाने त्या खाली असलेली दुसऱ्या क्रमांकाची अप्रिय घटना आपोआप वर येते. अशा रीतीने आपण आणखी आणखी भूतकाळात शिरायला लागतो. अशा रितीने भूतकाळातील जुन्या जुन्या आठवणी हळूहळू वर यायला लागतात. ४. वर सांगितलेला क्रम सदैव अद्ययावत केला जात असतो. एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर तिचा वापर वारंवार होणे साहजिकच असते. पण ; एखाद्या अप्रिय घटनेची जर बराच काळ उजळणी झाली नाही तर त्याची फेरप्रतवारी करण्याची गरज भासायला लागते. त्यामुळे ती आठवण परत स्मृतीतून किंवा जिथे कुठे साठवलेली असेल तिथून मनांत प्रक्षेपित केली जाते. या आठवणीबाबत, मनाच्या मिळालेल्या नवीन प्रतिक्रियेवरून मग तिचे फेरमुल्यांकन केले जाते व त्याप्रमाणे ती योग्य क्रमाने परत साठवली जाते. ५. या फेरप्रतवारी करण्याच्या अंतर्गत आवश्यकतेमुळे, एखादी जुनी आठवण अचानक आठवते व काही कारण नसताना आपल्याला हे मध्येच कसं काय आठवतंय? याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते. प्रत्यक्षात हीच वेळ असते या अप्रिय आठवणीवर हल्ला करण्याची. ६. कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते. त्यासाठी जिथे ही आठवण साठवलेली आहे तिथेच शुभचिंतन साठवले जावे हा आपला हेतू असायला लागतो. पण कोणती अप्रिय गोष्ट नक्की कुठे साठवलेली असते हेच आपल्याला नीट माहीत नसते. ७. त्यामुळेच अचानकपणे मनांत येणारी ही आठवण, म्हणजे जणू आपला एखादा लपलेला शत्रू बिळातून अचानक बाहेर आलेला असतो व तो परत बिळात लपायच्या आत त्याच्यावर हल्ला करायची संधी असते. इथे आपले शस्त्र असते शुभचिंतनाचे. आपल्या या शस्त्राचा वार झाल्यावर, हा शत्रू गोंधळून जातो व हा घाव अंगावर वागवत, जखमी होऊन परत मूळ जागी परततो. काही काळाने हा शत्रू आपली ओली जखम घेऊन परत मनात अवतीर्ण होतो. त्याची अपेक्षा असते, अशुभ चिंतनाच्या औषधाने आपण बरे होऊ. गमावलेली ताकद परत मिळवू. पण परत शुभचिंतनाचा हल्ला झाल्यास तो आणखीनच नाउमेद होतो. त्यांचा क्रमांक आणखीनच घसरतो व अप्रिय आठवणींच्या साठ्यामध्ये गलितगात्र व क्षीण होऊन आणखीनच तळाशी जातो. ८. या सर्व नोंदी आपल्यातच होत असतात. मग त्याला अंतर्मन म्हणा किंवा चित्त म्हणा किंवा अंतरंग म्हणा किंवा स्मृती म्हणा. कोणी त्याला मेंदू म्हणेल. साठवणीच्या जागेचे नाव काहीही असले तरी, ती जागा आपल्या शरीरातच कुढेतरी असते. थोडक्यांत कोणत्यातरी पेशींद्वारेच सगळे कार्य चालू असते. आपल्या शरीरातील पेशी म्हटल्यावर, त्या पेशींची भरणपोषणाची जबाबदारी आपण उचलत असतो हे मान्यच करायला लागते. त्यामुळे आपलेच नुकसान करणाऱ्या अशा अप्रिय गोष्टी व त्यांचा कडवटपणा टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रसंगी तो कडवटपणा वाढवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करणे हा किती आतबट्ट्याचा व्यवहार आहे याची कल्पना येईल. ९. पण जर या अप्रिय गोष्टींमधील कडवटपणा आपण सौम्य करू शकलो तर या साठ्याची वाढ होण्याचे ताबडतोब थांबते. अप्रिय व्यक्तींची मनातल्या मनात उजळणी करणे, त्यांना शिव्याशाप देणे, म्हणजे आपल्याच शरीरातील काही पेशी त्या अप्रिय व्यक्तीला आंदण देणे होय. इतकेच नव्हे तर त्यांची पालनपोषणाची जबाबदारी उचलणे व भविष्यांत त्यांना जागा पुरेनाशी झाली तर आणखी जागा उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यासारखे आहे. १०. जर घटना एकदा घडली व नोंदही एकदाच झाली तर सगळं ठीक चालले आहे असे म्हणता येईल. जी घटना प्रिय अथवा अप्रिय नाही अशा गोष्टीच्या बाबतीत असेच घडते. मात्र प्रिय व अप्रिय गोष्टी याला अपवाद असतात. ११. असे म्हटले जाते की, आपला केला गेलेला मान, सन्मान फार काळ लक्षात राहत नाही, पण आपला झालेला छोटासा अपमान शेवट पर्यंत लक्षात राहतो. आपली झालेली फसवणूक आपल्याला कायम त्रास देते. विशेष करून ज्याच्यावर आपण उपकार केलेले आहेत, त्याने जर त्या उपकाराची परतफेड अपकाराने केली असेल तर मात्र अशा घटना फार खोलवर घर करून राहतात. साधारणत: अशा घटना सात्त्विक संताप निर्माण करतात. तिथे फार फार जपायला लागते. अशा प्रसंगात या कडवट आठवणी किंवा त्यातील अप्रिय व्यक्ती अत्यंत वेगाने आपल्या शरीरातील जागा बळकावत असतात. स्मृती साठवणाऱ्या पेशी या खूप महत्त्वाच्या व दुर्मिळ समजल्या पाहिजेत. नेमक्या त्याच पेशी आपल्या शत्रूला देणे हा आपणच आपल्यासाठी केलेला घोर अपराध समजला पाहिजे. १२. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अप्रिय घटनेतील अप्रिय व्यक्ती आपल्याशी अयोग्य रितीने वागून आपल्या अंतर्मनात प्रथम जागा व्यापते. त्यानंतर मात्र त्या घटनेच्या प्रत्येक उजळणी बरोबर ह्या व्यापलेल्या जागेवर ही अप्रिय व्यक्ती इमारत बांधायला लागते. आपण जितक्या वेळेस उजळणी करू तितकी ही इमारत आणखी भक्कम व मोठी व्हायला लागते. साधारणत: प्रत्येक उजळणीत, आपण कसे बरोबर होतो व ती व्यक्ती कशी चूक होती हेच आपण आपल्यालाच समजावून सांगत असतो व वाढत्या श्रेणीत त्या व्यक्तीला शिव्याशाप देत असतो. आपल्याला असे वाटत असते की आपण देत असलेले हे सर्व शिव्याशाप कोठेतरी बाहेर जात आहेत. वास्तविक हे सर्व शिव्याशाप आपण आपल्याच शक्तीने आपल्यातच नोंदवून ठेवत असतो व आपले चित्त दूषित करत असतो. १३. आपण आपल्या जीवनात जे काही निर्णय घेत असतो, ते नेहमी आपण आपल्यात साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून घेत असतो. त्यामुळे आपण आपल्यात साठवत असलेली माहिती ही नेहमी सकारात्मक राहील याची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. १४. अप्रिय घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतच असतात. त्याची नोंद होणे अपरिहार्य असते. पण या नव्याने घडणाऱ्या अप्रिय घटनांची काही कारण नसताना उजळणी केली जाऊन या नोंदीची वाढ होणार नाही एवढेच आपल्या हातात असते. ते जर जमू शकले तर आपले चित्त नव्याने मलिन होऊ शकणार नाही. तसेच शुभचिंतनाचे हत्यार वापरून भूतकाळातील नकोशा किंवा नकारात्मक आठवणी सौम्य करून, तीही साफसफाई आपण करू शकतो. १५. नामस्मरणासारख्या किंवा इतर कोणत्याही अंतरंग शुद्ध करणाऱ्या पद्धतींमुळे मनाला सूक्ष्मता येते. त्यामुळे मन खूप संवेदनशील बनते. पण म्हणून विकार संपलेले नसतात. त्यामुळे त्यांचे उद्दीपन लवकर होते. त्यामुळे या जुन्या आठवणी जेव्हा जागृत होतात तेव्हा त्या मनाला पूर्वीपेक्षा खूपच जास्त ताकदीने व्यापतात. यामुळे बऱ्याच दिवसांची साधना खर्ची पडते. यासाठी साधनी माणसाने नेहमी या जुन्या आठवणींच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे. १६. प्रत्येक माणसात गुण व दोष दोन्हीही असतात. पण अप्रिय माणसांत फक्त दोषच आहेत अशी आपली भावना असते. ह्या अप्रिय माणसांबद्दल कलुषित झालेले आपले मन त्या माणसातील चांगले गुण टिपायलाही नकार देते. कोणी दाखवायचा प्रयत्न केला तरी त्यातही आपण नकळत खुसपटच काढत बसतो. पण हा नकारात्मक भाव गेल्यावर मात्र त्या माणसातले गुणही हळूहळू दिसायला लागतात. १७. माणूस जितका सज्जन असेल त्याप्रमाणात त्याने याबाबतीत सावध राहायला लागते. आपण सज्जन असल्याचा त्याने अभिमान बाळगला तर मात्र त्याच्या हातून नकोश्या घटनांची उजळणी फार मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता बळावते. त्यामुळे सज्जन माणसाला सर्वात जास्त दु:ख भोगायला लागते असे दिसून येते. यास्तव सज्जन माणसाने अशा आठवणीतून मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणावेसे वाटते.

प्रतिक्रिया द्या
75851 वाचन

💬 प्रतिसाद (145)
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/07/2020 - 14:51 नवीन
ते वाळवंटी धर्म वगैरे राहु दे.
अहो राहु दे कसं , तीच तर तुमची मुळ वृत्ती आहे, मी म्हणतो तेच एकमेव सत्य बाकीचे सगळं जहीयत ! होय की नै ?
णजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा.
हे म्हणजे साखर खल्ल्याने तोंडात गोड चव कशी निर्माण होते सांगा असला टाईपचा प्रश्न आहे . सर्वात पहिलं म्हणजे मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये. समजा मी दिलेच तुम्हाला पटवुन तर तुम्ही सुरु करणार आहात का गांजा ? नाही ना , मग कशाला आल्यात नसत्या चौकशा . मी फुकट सल्ला दिलाय की गांजा प्या , हवा अस्ल्यास घ्या नाही तर सोडा. ( सोडा म्हणजे लीव्ह बरं का, कार्बोनेटेड वॉटर नव्हे ) . तुम्हाला खरेच मनापासुन अगदीच उत्सुकता आहे तर सरळ गुगल वर सर्च करुन पहा ना सीबीडी चे उपयोग ! मी काही आयुर्वेदीक पुतकांचे आणि कॅनाबनॉईड्स्च्या वरील सायंटिफिक संशोधनाचे पुरावे देऊ शकतो, अर्थात सारे नेट वर आहेच !
शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ?
तुम्हाला लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का संक्षी सरांनी ? मी केवळ एक उपाय सुचवला आहे , आता तो श्यामजींना पटला तर ते पहाटे चार काय तर केव्हाही गांजा आणतील शोधुन किंव्वा सरळ मलाना मध्ये जाऊन रहातील किंव्वा कॅनडा मध्ये जाऊन सरळ घरातच शेती करतील गांजाची . त्यांचे ते बघतील ना ? तुम्ही का येवढा लोड घेताय ? आणि त्यांना घ्यायचाच नसेल तर ?? परत तेच . मी आधीच लिहिलंय की मी कोणावरही सक्ती केली आहे का ? ज्याला घ्यायचाय तो घेईल , नाही घ्यायचा तो नाही घेणार !
नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर
नाही हे अवांतर मुळीच नाही . एकदा स्वतःच्या एककल्ली " मी म्हणतो तेच खरे" ह्या वृत्तीचे वृत्तीची चिकित्सा करुन पहा . ते अध्यात्म अध्यात्म म्हणाता ना ते सगळं नंतर येते. आधी बालवाडी पास करा , पी.एच. डी चे नंतर बघु. कारण कसं आहे की एकदा "मी म्हणतो तेच खरे" ही टोकाची वृत्ती स्विकारली तर वाळवंटी धर्म तुम्हाला नक्कीच सोयीचे पडतील निराकार की काय व्हायला . कारण सोप्पं आहे, डोकं वापरायचंच नाही , अन गुगलही नाही अभ्यास करायचा नाही अन चिकित्साही नाही ! नुसतं मी म्हणतो तेच खरे हा हेका धरत रहायचा सतत ! की झालीच सर्वज्ञता प्राप्त. हाकानाका =)))) (आम्हीही निराकार गुर्देवांच्याकडुनच शिकलो आहे ही डॉक्टराईन . ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी अन त्याच गावाचा गांजा ;) )
इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल
अभ्यास वाढवा हो अभ्यास वाढवा ! कॅनडा अमेरिका सोडा भारतातील हिमाचल उत्तराखंड , पंजाब , गुजरात मध्यप्रदेश वगैरे भागात अगदी लीगल आहे सगळं. नॉर्थ ईस्ट मधील सेव्हन सिस्टर्स, बंगाल पंजाब मध्ये पोलिसही दुर्लक्ष करतात . उज्जैन मध्ये महाकालमंदिरासमोर अप्रतिम भांगेचे दुकान आहे. सगळं लीगल ! गोव्यामध्ये मेन्युकार्ड सोबत वेटर आमच्यापुढे गांजाचे पाकिटही घेऊन आलेला की साहेब काय हवे का वगैरे! बाकीच्या राज्यातही ही बंदी अन इन्फोर्स्ड आहे . ( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) इच्छा तिथे मार्ग हे लक्षात ठेवा ... जमलं तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 15:02 नवीन
:)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
संजय क्षीरसागर Tue, 07/07/2020 - 15:20 नवीन
करणार का तो उपाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 15:26 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 15:31 नवीन
ॐ शां ती ॐ धागा खूपच उजवीकडे गेला तर कसं दिसेल ते तपासत होतो. चांगलं दिसतंय की. :) देव्यपराधक्षमापन स्तोत्राच्या धाग्याप्रमाणे ह्या धाग्याची पण प्रशासकांना स्वच्छता करायला लागणार असं दिसायला लागलंय. म्हणून हा प्रयोग करून पाहिला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 07/07/2020 - 16:39 नवीन
तुम्ही गांजा हा मेडिकली घ्यायला सांगताय का ? >>लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;) >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! -- याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय. कारण समबुद्धी आपणच आणली कि झालं असं तुम्हीच म्हटलंय, म्हणून तर मी पहिल्याच प्रतिसादात सरळ विचारलं होतं कि गांजा मारल्याने किंवा मेडिकली वापरल्याने ही समबुद्धी डेवलप होते का ? त्याचं हो किंवा नाही असं उत्तर नाहीच. >> मी केवळ एक उपाय सुचवला आहे >>मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. -- याचा अर्थ तुमच्या ऑनलाइन स्टडीतून तुम्हाला कळलेलं आहे कि गांजामुळे असे अचानक होणारे त्रास कमी होतात आणि माणुस स्टेबल आणि स्टेडी बनतो. पहिल्या प्रतिसादात किंवा शोध निबंधात तर असं एकही वाक्य दिसलं नाही हो कि कसा उपयोगी आहे, किती प्रमाणात किती वेळा सेवन करावा. तो फक्त बॅन कसा आहे आणि भांग कशी बनवली होती एवढच काय ते आहे. >>( अर्थात चिरीमिरी घेऊन पोलीस तुम्हाला सोडुन देतात.) काय ईल्लीगल अन इम्प्रॅक्टीकल च्या गफ्फा मरताय =)))) ज्यांना तुम्ही सल्ला देताय ते महराष्ट्रात राहतात आणि ते गांजा पीत नाहीत असं मी गृहीत धरतो, त्यांच्यासाठी ते इम्प्रॅक्टिकल नाही का ? आणि नसेलही तरी मग तुमचा आता सल्ला ऐकुन गांजा सुरु करतील का ते विचारा त्यांनाच, नाहीतर शुभचिंतन वगैरे कशाला केलं असतं त्यांनी ? ज्याचा त्यांना ऑलरेडी फायदा झालाय आणि त्यांनी आता मी काय करु असं विचारलेलं नसतानाही तुम्ही फक्त आणि फक्त गांजाला कुठून तरी असंबद्ध पणे मधे आणलेलं आहे एवढंच. पोलिस चिरिमिरी घेउन दुर्लक्ष करतात असं एक बेजबाबदार वाक्य सार्वजनीक ठिकाणी लिहिलंय आणि इतकीही समज नाही कि म्हणून बॅन्ड गोष्ट लिगल होत नाही ते? कधीतरी पोलिसांसमोर ट्राय करा गांजा जिथे बॅन आहे तिथे आणि मग मारू आपण प्रॅक्टीकॅलिटीच्या गफ्फा. >>लॉजिकल अ‍र्ग्युमेन्ट्स चे धडे दिले नाहीत का जसे तुम्ही माझ्या मानगुटीवर बसला नाहीत ना कि गांजा पी मार कश, तसे ते ही म्हणाले नाहीत कि माझ्याकडून धडे घे. जिथून घ्यायचे तिथून ते मी घेतोच. याचा अर्थ तुम्ही मान्य केलंय कि संक्षी कायम लॉजिकली एकदम करेक्ट बोलतात आणि जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/07/2020 - 17:31 नवीन
जिथे जिथे तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स केल्यात तिथे तिथे तुमचं लॉजीक गंडलंय
>>> खतरनाक ! मग काय आता , जितं मया जितं मया का ? =)))) माझेच काय , अहो अख्ख्या दुनियेने जिथे जिथे संक्षी सरांशी अर्ग्युमेन्ट्स केलीत तिथे तिथे अख्खी दुनियेचे लॉजिक गंडले आहे , कुठल्या जगात जगताय ? =)))) मी अप्रिय आठवणी घालवण्यासाठी/ शमवण्यासाठी गांजा सुचवला होता, ह्याचाच अर्थ तो मेडीकल युज साठी होती .
याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त गांजा रिक्रिएशनली ट्राय करून पाहा एवढेच सांगताय, त्याचा अप्रिय आठवणीं कमी होण्याशी बादरायण संबंध जोडताय.
हा तर्क तुम्ही कसा काढला ? तुमचे तर्कशास्त्र फार अगाध आहे हो !! शिवाय गांजा वापरल्याने समबुध्धी निर्माण होते असा तर्क जो तुम्ही काढताय तोही अनाकलनीय आहे . आता नीट शांत चित्ताने वाचा खाली काय लिहितोय ते : जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, >>> सो त्या आठवणी बोथट करायला गांजा चा वापर करता येतो. जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! >>> ही समबुध्धी आणायला अनेक उपाय आहेत, गांजा हा समबुध्दी आणायचा उपाय आहे असे मी कोठेही म्हणलेले नाहीये. समबुध्दी आणण्यासाठी तुम्ही आणि संक्षी धि:कारता तो नामस्मरण हा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे ! ( एकमेव आणि अंतीम नव्हे बरं का!) आणि त्यातही एक विशिष्ठ पातळी आली की काहीच करावयाची आवष्यकता रहात नाही . एकदम सारेच सहजस्थिती होऊन जाते ! संगत्याग आणी निवेदन | विदेहस्थिती अलिप्तपण | सहजस्थिती उन्मनी विज्ञान | हे सप्तही येकरूप ||८|| त्यानंतर नामस्मरण थांबवले तरीही फरक पडत नाही !! तुम्ही तुमचा एककल्ली मेंदुची कवाडे बंद करुन घेतली आहेत म्हणुन तुम्हाला हे नामस्मरण कळत नाही , शिवाय ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्यातही "मला ह्याचा अनुभव नाही" असे प्रांजळपणे म्हणायचे सोडुन माझीच लाल असा कायम हेकेखोरपणा असल्याने तुम्ही जिथे तिथे वितंडवाद करत रहाता. ही वस्तुस्थीती आहे ह्याची बेशर्त स्वीकृती करा =)))) बाकी जिथे नामस्मरणासारखी सोप्पी गोष्ट तुम्हाला कळत नाही तिथे गांजाचा अन त्यावरील बंदीचा इतिहास, त्यातील अर्थकारण , त्याचे मेदीसिनल आणि रिक्रियेशनल उपयोग वगैरे तुमच्या बंदिस्त विचारसरणीच्या आवाक्यात येईल का ह्याबद्दल शंकाच आहे ! गांजाचे मेडीकल आणि रिकरियेशनल दोन्हीही उपयोग कॅनडा , अमेरिका , युरोपातील अनेक देशात लोकांना कळुन चुकले आहेत. गांजा हळु हळु एकेक स्टेट मध्ये लीगल होतोय . एकेदिवशी युनाईटेड नेशन्स त्याला शेडुल्ड १ लिस्ट मधुन काढेल अन अख्ख्या जगात लीगल होईल . तोवर गुलामगिरीच्या मानसिकतेतुन बाहेर न पडल्यामुळे तुम्ही इल्लीगल इल्लीगल असे म्हणत वाट पहात रहा ! सॉरी सॉरी , जितं मया जितं मया असे म्हणत वाट पहात रहा ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 07/08/2020 - 11:08 नवीन
मी नामस्मरण धिक्कारले वगैरे निष्कर्ष तुम्ही कुठून काढला ? गांजा एखादा मारत नसेल तर त्याने तो धिक्कारला असं होतं का ? वन सिंपली युजेस इट ऑर नॉट. असो, गुलामगिरी मानसिकता वगैरेला पास. आता थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/08/2020 - 11:56 नवीन
वन सिंपली युजेस इट ऑर नॉट.
परफेक्ट ! मला हेच म्हणायचे होते. ज्याचा त्याचा चॉईस आहे ! आपण संक्षींचे विद्यार्थी असुनही इतरांच्या मतस्वातंत्र्याचा आदर करताय हे पाहुन धक्कच बसलाय जरासा पण ते असो. आता थांबतो मीही. बम बम भोले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
स
संजय क्षीरसागर Tue, 07/07/2020 - 05:39 नवीन
सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास ! _______________________________ जबरदस्त कन्क्लुजन आहे. यू हॅव मेड माय डे. जिओ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:41 नवीन
शाम काका, मी वापरलेला साधा उपाय सांगतो.. एक तर मला दीर्घ द्वेष करता येत नाही, मी पटकन विसरून जातो. तरीदेखील काहीतरी आठवणी विसरता येत नाहीत. अश्या वेळेस मी खालील गोष्टी करतो १. समोरच्या स्वभावाची आऊटलाइन आखून घेतो, आणि त्याने त्याची स्वभावतः असलेली मर्यादा सोडली आहे का हे ठरवतो.. सामान्यपणे माणसाचे संस्कार आणि जडणघडण या मर्यादा ठरवते.. जसे की, विंचु म्हटले की चावणारच. मग विंचू जर चावणारच असेल तर तो चावला म्हणून आपण राग करून काय उपयोग? आपण बेसावध राहिलो ही आपली चुकी आहे. त्यामुळे यापुढी काय सावधगिरी घ्याअयची हे ठरवले की मी त्या ओझयातून मोकळा होतो. २. माणूस हा स्वभावतः स्वार्थी आहे. लहान मुले बघा - त्यांच्याकडे निरागसपणा असतो, पण स्वार्थ म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर लहान मुलांचा अभ्यास करावा. त्यामुळे एखादा स्वार्थी वागला म्हणून आपण त्रास करून घ्यायचे काहीच कारण नाहे. तो त्याचा हक्क आहे असे मी समजतो.,. आपण कसे वागावे हे आपल्या हातात आहे, पण समोरच्याने कसे वागावे हे आपल्या हातात नाही. ३. समोर जी परिस्थिती आलेली आहे ती प्रथम 'accept` करावी, ती मान्य केली की आपले मन शांत होते, आणि मग आपण उपाय शोधू शकतो, ज्याने आपले कमीत कमी नुकसान होइल. ४. अतिशय महत्वाचे, कोणालाही शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही. तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:41 नवीन
माझे २ पैसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 13:00 नवीन
येऊ देत की. तेही महत्वाचे आहे. कोणाला तरी नक्की उपयोग होऊ शकतो. माणसांत इतकी विविधता आहे. त्यानुसार धेय्य गाठायचे विविध मार्ग असणाारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
संजय क्षीरसागर Mon, 07/06/2020 - 13:02 नवीन
> तो केवळ नियतीला आहे. आपण शिक्षा देण्याने फक्त क्रियमाण वाढते. शिक्षा होण्याची काहीही हमी नसते. मग पोलिस आणि न्यायालंय कशासाठी आहेत ? का तुमच्या दृष्टीनं ती व्यवस्थाच बोगस आहे ? > एक पापभीरू माणूस म्हणून मी हे सगळे पाळतो.. मात्र नेता म्हणून निवडायच्या वेळेस मला याच्या नेमका उलट गुण असलेला माणूस मला हवा असतो हा भाग वेगळा :) काय भारी विचारसरणी आहे ! अशा नेभळट वृतीच्या लोकांनी बनलेल्या समाजातली व्यक्तीच नेता होते, इतकी समज सुजाण मतदाराला असायला हवी. जितका नागरिक आपल्या हक्कांप्रती सजग आणि सक्षम तितका नेता श्रेष्ठ हे लोकशाहीचं मूलतत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 14:44 नवीन
तुमच्याशी वाद घालण्याइतकी पात्रता नसल्यामुळे या बाबतीत तुमचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे मान्य करत आहे.. रत्नगिरीच्या भाषेत सांगायचे तर, तुमचा मोठा. (आवाका म्हणायचे आहे मला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Mon, 07/06/2020 - 15:34 नवीन
संरक्षण हि सजीवाची आदीम, आणि कदाचीत सर्वात तगडी प्रेरणा आहे. कदाचीत त्यामुळेच या कडवट आठवणी जास्त स्मृतीपेशी व्यापुन असतात. स्मृती आणि कल्पनेच्या सहाय्याने मानवी मन/मेन्दु तसंही सतत सिम्युलेशन करत असतं. हा देखील त्या संरक्षण प्रणालीचाच एक भाग आहे. त्यामुळे, लेखात म्हटलय तसं, या दु:खदायक स्मृतींची उजळणी होत असते, ति आणखी मजबुत होत असते. अनावष्यक स्मृतींनी व्यापलेलं हे हार्डड्राइइव्ह क्लीअर करणं हा आपलीच सिस्टीम रिफॉर्म करण्याचा, जास्त एफीशियण्ट करण्याचा उत्तम मार्ग इथे मांडला आहे. धन्यवाद शामराव. हे एखाद्या प्रसंगाला सामोरे कसं जावं याचं विवेचन नसुन सीस्टीम क्लीअर कशी करावी याचा उहापोह आहे. हे भान ठेवायलाच हवं. बर्‍या-वाईट प्रसंगांना आपण तसंही शक्ती, बुद्धी, प्रेरणा, विवेक वगैरे वापरुन हॅण्डल करत असतो. तो वेगळा विषय आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 16:51 नवीन
सीस्टीम क्लीअर कशी करावी याचा उहापोह आहे.
व्वा!! पूर्णराव! व्वा!!! एका वाक्यात सगळं सांगितलत बघा. _/\_
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 07/06/2020 - 19:13 नवीन
हा लेख सर्वांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल भागवतसरांचे अनेकानेक आभार. भागवतसरांच्या सल्याचा मला उपयोग होतो आहे. सरांबद्दल आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनीही मान्य केले कि ते ही ह्या समस्येतुन गेले आहेत. त्यामुळे एकसारखी समस्या अनुभवलेली असल्याने आणि त्यांनी जर त्यातुन यशस्वी मार्ग काढला असेल तर ते मांडत असलेला उपाय नक्कीच अनुकरणीय ठरतो. एखाद्या चेनस्मोकर ने एखाद्या कधीही सिगारेट न पिलेल्याकडे सिगारेट कशी सोडावी ह्याचा सल्ला मागायला जावा आणि त्या निर्व्यसनी मनुष्याने " तु हा विचार पहिली सिगारेट हातात धरली तेव्हाच करायला हवा होतास कि रे शिंच्या?" असे काहीसे म्हणुन त्याची बोळवण करावी ह्यापेक्षा भागवतसरांचे मार्गदर्शन खूप वेगळे ठरते. त्यांच्या ह्या प्रामाणिकपणाबद्दल मला प्रचंड आदर आहे.
> थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे.
@संक्षीसर We should forgive but not forget हे वाक्य तुम्ही वाचले असेल. सद्गुरुंनी एका मुलाखतीत ह्याचा पुनुरुच्चार केला. इंग्रजांविषयी आपली काय मते आहेत असे विचारले असता. इंग्रजांना आपण माफ करायला हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत. कारण मग इतिहास पुन्हा एकदा रिपिट होईल. वर अर्धवटरावांनीही योग्य लिहिले आहे. असे अनुभव डिफेन्स यंत्रणेसारखे काम करतात. माझ्या त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? ह्या धाग्यात लिहिण्याप्रमाणे एकदा गोड बोलुन नंतर स्वतःचा फायदा उपटणार्या घरमालकाचा अनुभव घेतल्यानंतर गोड बोलणार्या अनोळखी/ओळखीच्या लोकांशी बोलताना आता जरा सावधच असतो.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 07/07/2020 - 05:07 नवीन
> हवे पण त्यांची दुष्कृत्ये विसरता कामा नयेत ? प्रश्र विचारणारे विनोदी आणि जग्गी त्यांच्यापेक्षा विनोदी ! इंग्रजांची राजवट विचारणाऱ्यानी पाहिली तरी आहे का ? स्वतः जग्गीला इंग्रजांनी किती छळलंय ? ज्याच्या स्मृतीच व्यक्तीगत जीवनात नाहीत त्यांचा काय त्रास होणारे ? जग्गीचं इंग्रजी बरं आहे आणि थोडा फार श्लेष जमतो यापलिकडे असल्या प्रश्नोत्तरांचा काही उपयोग नाही. ____________________ पूर्वग्रह करुन जगणं आणि सजगता यात कमालीचा फरक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या पोस्टवर दिलं आहे _______________________ चेनस्मोकरनी पहिल्यांदा आत्ता हातात असलेली सिग्रेट खाली ठेवली तर त्याला शुद्ध हवा आणि धूर यांच्या आनंदातला फरक कळण्याची शक्यता आहे. तो पूर्वस्मृतींशी डील करत बसला तर नामस्मरणानंतर मिळालेल्या फुर्सतीत पुन्हा नवी सिग्रेट पेटवेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 05:25 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
M
mrcoolguynice Tue, 07/07/2020 - 06:01 नवीन
लेख चांगला आहे. आवडला लेख. या लेखातील मानसिक माईल्सस्टोन ची चेकलिस्ट/टेम्प्लेट करून द्याल का इथे ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 08:38 नवीन
प्रश्न नीट कळला नाही. त्यामागचा रोख किंवा हेतूही लक्षात येत नाहीये. त्यामुळे गोंधळलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice Tue, 07/07/2020 - 10:02 नवीन
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सतिश गावडे Tue, 07/07/2020 - 06:49 नवीन
स्वानुभवावर आधारीत लेखन आवडले. एक एक मुद्दा छान मांडला आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 07/07/2020 - 10:00 नवीन
उदा. ३ प्रश्नांचे टेम्प्लेट In ancient Greece, Socrates (the famous philosopher) was visited by an acquaintance of his. Eager to share some juicy gossip, the man asked if Socrates would like to know the story he’d just heard about a friend of theirs. Socrates replied that before the man spoke, he needed to pass the “Triple-Filter” test. The first filter, he explained, is Truth. “Have you made absolutely sure that what you are about to say is true?” The man shook his head.“No, I actually just heard about it, and … Socrates cut him off. “You don’t know for certain that it is true, then. Is what you want to say something good or kind?” Again, the man shook his head.“No! Actually, just the opposite. You see …” Socrates lifted his hand to stop the man speaking. “So you are not certain that what you want to say is true, and it isn’t good or kind. One filter still remains, though, so you may yet still tell me. That is Usefulness or Necessity. Is this information useful or necessary to me?” A little defeated, the man replied,“No, not really.” “Well, then,”Socrates said, turning on his heel.“If what you want to say is neither true, nor good or kind, nor useful or necessary, please don’t say anything at all.” रेफ : आन्तर्जालिय माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 11:13 नवीन
छान. पण यावरून प्रश्नांची मालिका सुरू होणार असेल तर मात्र मी भाग घेणार नाहीये ;) मला जे सांगायचं ते सांगून झालंय. विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा हे ठरवण्या इतपत वाचक सूज्ञ आहेत. ;) १. मला अनुभव आले म्हणून मी जे काही सागतोय ते मला सगळं खर वाटतंय. इतकच नव्हे तर माझ्या जवळच्या काही लोकांना फायदा झालाय. म्हणजे हे फक्त वैयक्तिक अनुभव आहेत असंही म्हणता येत नाहिये. माझं अगोदरच मन व नंतरचे मन यातला फरक मला जाणवतोय. नविन कोणतीही अप्रिय आठवण निर्माण होता कामा नये, हे सहज जमायला लागलंय. ही एक नवीच उपलब्धी आहे. अन्यथा जुनं निस्तरत बसायचं व दुसरीकडे नवीन अप्रिय आठवणी निर्माण करत बसायचं, याला काही अर्थच राहिला नसता. थोडक्यात मी जे काही लिहीलंय ते ऐकीव नाहीये. २. यात कुणाचा राग,द्वेष, नकारात्मक भावना नसल्याने, स्वत:च्या भल्यासाठी कुणालाही दु:ख द्यायला लागत नसल्याने, तसेच कोणाकडून काही ओरबाडून घ्यायला लागत नसल्याने तसेच या उपायात, जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, प्रांत, वय, शरिरस्वाथ्य वगैरे कशाचाच अडथळा येत नसल्याने तसेच हे कोणाचे काहीतरी चांगले करायच्या बाबतीत असल्याने, हे चांगले आहे असेच मला वाटतेय. ३. ह्याचा उपयोग लोकांना होऊ शकतो अशी माझी धारणा बनली आहे कारण; जगी सर्वसुखी असा कोण आहे? खरे तर मला काही काळ निवांत जगायच असल्याने काहीकाळ सगळ्या संकेतस्थळापासून लांब राहायचं आहे. पण रमण महर्षी लेखमाला, चीनशी युध्द होतय की काय? अशी एक धाकधूक व त्या अनुषंगाने होणारी चर्चा व योगश यांचा अप्रिय आठवणींच्या धाग्यामुळे २००७ च्या अनुभवाबद्दल लिहावेसे वाटू लागल्याने अडकतच गेलो. असो. सर्व प्रतिसादकांना नमस्कार, धन्यवाद व शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
आ
आनन्दा Tue, 07/07/2020 - 13:11 नवीन
नाही, त्यांना असे म्हणायचे नाहीये. त्यांचा हेतू या वेळेस सरळ आहे, जेव्हढे मला समजतेय तितके.. त्यांना असे म्हणायचे आहे, की या तुमच्या अनुभवावरून तुम्हाला अशी एखादी प्रश्नमालिका तयार करता येईल का जी माणसाला त्या कटू अनुभवाच्या मुळापर्यंत जायला मदत करेल.. उदा - तुम्हाला त्या माणसाचा राग का येत आहे? ------ त्या माणसाने जी क्रुती केली ती जाणीवपूर्वक केली असे तुम्हाला वाटते का? ----- त्या कृतीमधून त्याने जाणीवपूर्वक स्वतःचा स्वार्थ आणि तुमचे नुकसान पाहिले का? ------ तुमचे नुकसान नेमके किती झाले? ------ त्याची आजची किंमत किती? ----- तुमच्या झालेल्या नुकसानाचे दीर्घकालीन फायदे कोणते झाले का? झाले असतील तर कोणते? ----- आणि ही यादी कितीही वाढू शकते, पण साधारण असे काहीतरी यांना अपेक्षित असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 13:24 नवीन
इतके प्रश्न????? खरेच जरूरी आहे इतक्या प्रश्नांची? खरेच कळले नाहीये. जगदंब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
M
mrcoolguynice Tue, 07/07/2020 - 13:27 नवीन
पण साधारण असे काहीतरी यांना अपेक्षित असावे.
१++
त्यांचा हेतू या वेळेस सरळ आहे
१--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 13:36 नवीन
१-- ??? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 13:38 नवीन
मग मात्र ओम शांती ओम. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 13:34 नवीन
दोनच प्रश्न विचारायचे आहेत. १.येणारी आठवण अप्रिय आहे का? उत्तर "नाही" असेल तर पुढे जायची गरजच नाही. २. त्या आठवणीमुळे एखाद्या व्यक्तिचा (भले मत ती बिनचेहर्‍याची असेल) राग येतो आहे का? उत्तर "हो" येतय? मग त्या माणसासाठी शुभ चिंतन करायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
संजय क्षीरसागर Tue, 07/07/2020 - 14:13 नवीन
एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा, समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही. खेळ खलास ! लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 14:21 नवीन
माहितेय ते मला. असो. ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 07/07/2020 - 14:33 नवीन
काय बोल्ता ? मग हा लेख कशापायी लिहिला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 14:36 नवीन
:) ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 07/07/2020 - 14:45 नवीन
हे घरच्या घरी डायरीत लिहिलं तरी लेख लिहायचा आणि प्रतिसाद देण्याचा त्रास वाचेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 15:01 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
आ
आजी Tue, 07/07/2020 - 13:47 नवीन
शाम भागवत-तुमचे लिखाण आवडले.पटले.मी पण हा 'शुभचिंतनाचा' प्रयोग करुन बघेन. मला वामनराव पैंचं तत्त्वज्ञान पटतं. मी त्यांची काही पुस्तकं वाचली आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 14:07 नवीन
व्वा!!! मग तर तुम्हाला खूपच फायदा होईल. मुख्य म्हणजे त्यांची मराठीतील विश्वप्रार्थना उत्कृष्ट व शास्त्रीय आहे. विश्वप्रार्थनेचे महत्व मी त्यांच्या फोरमवर मांडले होते. ते तिथल्या सगळ्यांना आवडले होते. तसेच हा प्रयोगही मी तिथे लिहिला होता. नंतरचे विवेचन (१ ते १७) मात्र केले नव्हते. तेही तिथल्या बुजुर्गांना आवडले व पटले होते. तिथल्या काहींनी मग स्वत:वर प्रयोग करून फायदा होत असल्याचे कळवले होते. सर्वात गमतीशीर प्रयोग म्हणजे सुनेला सासूचा सतत राग यायचा. सासूबाई तशा चांगल्या आहेत असंही एकीकडे म्हणायच्या. सूनेने प्रयोग सुरू केले आणि त्यांचे संबंध सुधारले असं कळवलं होतं. जीवनविद्याची ती फोरम सध्या बंद आहे. पण तो सगळा विदा तिथे नक्की असेल. २००७ च्या गोष्टी आहेत सगळ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजी
श
शाम भागवत Tue, 07/07/2020 - 14:09 नवीन
ते लेख प्रल्हादांनीपण वाचले होते. ते त्यावेळेस फोरमचे प्रशासक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सतीशम२७ Wed, 07/08/2020 - 14:24 नवीन
खूपच उपयोगी !!!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/08/2020 - 16:40 नवीन
भागवत साहेब आपण जे लिहिले आहे ते प्रामाणिक आहे त्याचा आपल्याला फायदा झाला हे ऐकून छान वाटले. तुम्ही लिहीत चला त्याचा आमच्या सारख्या सामान्य माणसांना झाला तर फायदाच होईल. बाकी ते जडजंबाल अध्यात्म वगैरे मला काही झेपत नाही, माझे कोणीही सद्गुरू वगैरे नाहीत किंवा मी नामस्मरण, जप, प्राणायाम, ब्रम्हविद्या वगैरे करत नाही. परंतु भारतीय लष्कराशी साडे तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात लढा दिल्यावर माणसांचे अनेक वाईट अनुभव आले. ज्यात मला देशद्रोही म्हणण्यापासून भ्रष्ट मार्गाने मी बाहेर पडलो असे निखालस असत्य जालावर टाकणाऱ्या माणसांपर्यंत अनुभव आहेत. शक्य असेल तेथे मी सरळ स्पष्ट प्रतिवाद केला अन्यथा सरळ तुमची लायकी नाही म्हणून दुर्लक्ष केले. पण बाहेर पडल्यावर एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळली ती म्हणजे स्वतःची मनोवृत्ती आणि व्यक्तिमत्व नकारात्मक होऊ द्यायचे नाही हा विचार सतत मनात ठेवला. यामुळे आजही माझ्या मनात केवळ अशा माणसांबद्दलच नव्हे तर एकंदर जगातील माणसांबद्दल कोणतीही कटुता नसून त्याचा माझ्या मनावर कोणताही दुष्परिणाम नाही. सध्याच्या कोव्हीडच्या वातावरणात मी आणि माझी पत्नी काम करीत आहोत रुग्ण आम्हाला ताप नाही म्हणून स्पष्टपणे खोटे बोलतात. साडे तीन महिन्यातील टेलिफोनिक कन्सल्टेशनचे पैसे किती झाले हे विचारण्याचे सौजन्य एकही महाभागाने दाखवलेले नाही.मग रात्री साडे अकरा वाजता आपल्या बायकोला ताप आहे आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतो यासाठी चार फोन करण्यात अनमान न करणाऱ्या माणसाने नंतर ती बरी झाली याचा एक साधा फोन करण्याचे सौजन्य दाखवले नाही. पैसे विचारणे नाहीच मग दवाखान्यात येऊन देणे तर दूरच. असे अनेक किस्से आहेत. हे सर्व ओझे जर घेऊन जगात राहिलो तर जगणे अशक्य होईल. तेंव्हा अशा माणसांना आपल्या मनात किती जागा अडवू द्यायची हे आपणच ठरवावे लागते. एकदा तुम्ही ठरवलेत कि आपल्या मनात त्याच्याबद्दल ५ मिनिटे विचार करण्याची तरी या माणसाची लायकी आहे का? कि मग त्याला मनातून काढून टाकणे सोपे होते. मग आपले आयुष्य जास्त सोपे होते. यामुळे मी सुखात दुपारी आणि रात्री झोपतो. तेंव्हा आपण लिहीत राहा आपण का लिहिले हे विचारणाऱ्या माणसांना आपण आपल्या मनात जागाच दिली नाही तर त्यांचा जळफळाट होईल ते सुद्धा अलिप्त पणे पाहण्यात फार मजा येते. मिपा आणि मायबोलीवर अशा काही डू आय दि आहेत उदा. झम्प्या दामले अशाना मी खेटराने विचारत नाही त्यामुळे ते जळफळाट होऊन जिथे तिथे माझ्या प्रतिसादावर गरळ टाकत राहतात आणि मला अलिप्त पणे पाहण्यात फार मजा येते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/08/2020 - 17:05 नवीन
मला अलिप्त पणे पाहण्यात फार मजा येते.
हेच तर साधायचे असते. त्यासाठी “नामस्मरण“ हाच एकमेव मार्ग आहे असे काही नाही. तुम्ही निरपेक्ष बुध्दीने जी वैद्यकीय सेवा देताय, ती सुध्दा उपासनाच आहे. तुम्हाला येणारे कटू अनुभव, ही तर तुमची परिक्षचा घेतली जात आहे असे मला वाटते. असे अनुभव येऊनही तुमच्या कार्यात खंड पडत नाही हे विशेष. नियती कडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या या परिक्षांमधे सतत उत्तिर्ण होण्याबद्दल अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 05:30 नवीन
@ शाम भागवत : स्मृतींची ती काय मिजास भागवत ? एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा, समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही. खेळ खलास ! लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
इतकी साधी गोष्ट नुसतं मराठी वाचता आलं तरी समजेल. कुठे आहे यात जडजंबाल अध्यात्म ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
शाम भागवत गुरुवार, 07/09/2020 - 05:54 नवीन
ॐ शांती ॐ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 07/10/2020 - 17:36 नवीन
अशी १३ वर्षांची साधना केवळ १/३ मिनीटात निरुपयोगी ठरली ! पुन्हा वाचा : @ शाम भागवत : स्मृतींची ती काय मिजास भागवत ? एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा, समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही. खेळ खलास ! लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शा वि कु Fri, 07/10/2020 - 17:44 नवीन
लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय. फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
हि दोन वाक्ये फारच खटकण्यासारखी आहेत. पुनः पुनः अधोरेखित करण्यासारखी वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शाम भागवत Fri, 07/10/2020 - 17:52 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Sat, 07/11/2020 - 08:42 नवीन

मी म्हणजे मी म्हणजे मीच

असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा