Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नारायण... लॉकडाऊन इफेक्ट!

च
चिनार
गुरुवार, 08/13/2020 - 06:21
💬 19 प्रतिसाद
दरवाज्यात उभं राहून वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर ओतणाऱ्या आधुनिक नारायणाची एक पोस्ट वाचली. त्याच कल्पनेचं आमचं एक व्हर्जन, "काय नारायणराव? पाहुण्यांच्या हातात अक्षता आणि बत्तासे वाटायची संस्कृती आहे आपली! सॅनिटायझर काय वाटताय?", एका पाहुण्याने खोचक सवाल केला. "बत्ताश्याचं काय घेऊन बसलात प्रभाकरराव? ढीगभर आणलेत मी स्वतः जाऊन. पण सरकारने साखर यंदा चीनवरून मागवली होती असं आजच्याच पेपरात आलंय. ठेऊन दिले गाठोड्यात बांधून बाजूला. देऊ का त्यातले दोन बत्तासे?" "नको नको", असं म्हणत पाहुणे पुढे गेले आता नारायणाला दरवाज्यात इतका वेळ उभं राहायला फुरसत असणं शक्यच नाही. त्याने सॅनिटायझरची बाटली दिली गण्याच्या हातात अन गण्याला बजावून सांगितलं "हे बघ गण्या, दोन थेंबाच्यावर कोणाच्याच हातावर टाकू नको सांगून ठेवतो! संध्याकाळपर्यंत हीच बाटली पुरवायची आहे लक्षात ठेव" "अहो पण चार बाटल्या आणल्यात ना नारायणभाऊ? "म्हणून काय लगेच संपवायच्या का? किती महाग झालंय सॅनिटायझर माहितीये का? जेवढं उरेल तेवढं संध्याकाळी वापस करायला येईल असं बजावून आलोय त्या मेडिकलवाल्याला मी! तो मला सांगत होता वापस नाही घेता येत म्हणून. मी म्हटलं, त्याला काय एक्स्पायरी असते होय रे? की सोडा असतो त्याच्यात झाकण उघडलं की उडून जायला. मला सांगतोय! तू जपून वापर" "बरं" "आणि हे बघ, शिंच्या अत्तर समजून लोकांच्या अंगावर सॅनिटायझर शिंपडू नको लक्षात ठेव." गण्याला उगाचच दम देऊन नारायण पुढे निघाला. पुढे दोन बायका एकमेकांना चिपकून सेल्फी घेत होत्या. दोघीही 'अफाट' असल्याकारणाने एका फ्रेममध्ये बसणं शक्य नव्हतं. नारायण लगेच खेकसला, "ए ए शकुताई! काय चाललंय? काय सोशल डिस्टंसिंग वगैरे काही आहे की नाही? जवळ उभं राहून काय सेल्फी काढताय. तू या कोपऱ्यात जा अन तू त्या कोपऱ्यात जा! अन लागेल तेवढे फोटो काढा जा" "ए असं काय रे नारायण? दूर उभा राहून कसं काय सेल्फी काढणार रे?" "हे बघ..लग्नात सोशल डिस्टंसिंग पाळणार अशी हमी तुझ्याच नवऱ्यानं दिलीये पोलीस स्टेशनमध्ये. त्याचा फोटो पोलीस स्टेशनमध्ये लावायचा नसेल तर सांगतो ते ऐक. नाहीतर तुझं तू बघ" नारायण पुढे निघाला, "नारबा, चहा-नाश्ता नाही आला अजून? व्याही पेटलाय तिकडं!" "सकाळपासून तीन वेळा मी चहा पाजलाय त्यांना! कप सॅनिटाइझ्ड आहेत का असं विचारात होते मला. मी म्हटलं कप,बशी, साखर,चहा पावडर इतकंच काय तर गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये. आता बोला !! तेव्हढ्यात नारायणाला मुलीच्या आईने आवाज दिला..तिच्यासोबत सात-आठ बायका होत्या. "नारायणा, अरे मुलाकडल्या बायकांना हळदी-कुंकू द्यायचंय. वाण म्हणून प्रत्येकीला एकेक मास्क देऊ म्हटलं. तर हे कसले सुती कापडाचे मास्क आणलेस रे. मुलाच्या आईला तरी किमान गर्भरेशमी मास्क आणायचास ना!" "काय करायचंय थेरडीला गर्भरेशमी? सुती कापड बरं पडतं त्यापेक्षा" सगळ्या बायका शत्रुपक्षाच्या पुढारी बाईला थेरडी म्हटल्यावर मनसोक्त हसल्या. "नारबा...मुलाचे मित्र परगावावरून आलेत. आता क्वारंटाईन केल्याशिवाय कसं काय सामील करून घेणार त्यांना?" "काका, काही काळजी करू नका. त्यांची 'सोय' मी वरच्या खोलीत केली आहे. संध्याकाळपर्यंत उठणार नाहीत" "अरे म्हणजे, दारू बिरू आणलीस की काय?" "कसली दारू? सॅनिटायझरमध्ये ८२ टक्के अल्कोहोल असते म्हणतात. तेच ठेवलंय ग्लासात भरून!!" असे एकानंतर एक हल्ले परतवत नारायण आपला डोकं गमावलेल्या मुरारबाजीसारखा कार्यालयात थैमान घालत असतो. नवरा-नवरी बोहोल्यावर उभे राहतात. मंगलाष्टक म्हणण्याची वेळ येते. आणि नेमका आंतरपाट सापडत नाही. "हे काय, साध्या आंतरपाटाची व्यवस्था करता येत नाही ह्यांना?", कोणतरी कुजबुजतं.. तेवढ्यात नारायण उत्तरतो, "कश्याला पाहिजे आंतरपाट गुरुजी? लग्न लागण्याआधी एकमेकांचे चेहरे पाहायचे नाही हाच उद्देश असतो ना आंतरपाटाचा? हो ना!! मग हे काय मास्क लावलेत ना त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? चला सुरु करा मंगलाष्टक...म्हणा रे सगळ्यांनी..तदैव लग्न सुदिनं...." आणि एकदाच लग्न लागतं.. नारायण डोक्यावर कफन बांधल्यासारखं चेहऱ्यावर मास्क बांधून पुढचा हल्ला परतवायला निघतो... समाप्त... चिनार

प्रतिक्रिया द्या
6442 वाचन

💬 प्रतिसाद (19)
च
चांदणे संदीप गुरुवार, 08/13/2020 - 06:29 नवीन
गर्भरेशमी मास्क!..... फुटलोच! =)) =)) सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 08/13/2020 - 06:59 नवीन
कडक हो कडक
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 08/13/2020 - 07:02 नवीन
जबरदस्त!!! सॉलिड आवडलाय.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 08/13/2020 - 07:39 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/13/2020 - 08:04 नवीन
भलताच तयारीचा दिसतोय हा नारायण, गवळ्याकडची म्हैससुद्धा सॅनिटाइझ करून घेतलीये. फारच आवडले... मस्त.. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/13/2020 - 08:10 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik गुरुवार, 08/13/2020 - 08:40 नवीन
कल्पनाशक्तीला काय अफाट सोडलय ...चालू द्या ..
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 08/13/2020 - 09:31 नवीन
मस्त.. पण अजुन बऱ्याच गोष्टी राहिल्या.. जेवण, आहेर आणि पाकिटे , DJ, नवरदेवाची मिरवणूक, सत्कार समारंभ, जावयाचे पाहुणचार, भावाकडूनची कानपिळी, बूट चोरी इ इ..
  • Log in or register to post comments
प
प्रमोद पानसे गुरुवार, 08/13/2020 - 09:50 नवीन
भन्नाट..
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 08/13/2020 - 12:21 नवीन
करोना काळातला नारायण लेख आवडला . आपल्या पराक्रमाची हकीकत रंगवुन सांगणारा नारायण डोळ्यासमोर आला . "परवाच त्या यमीच्या लग्नातली गोष्ट . नवरदेव आयत्या वेळी डेटॉलचाच सॅनिटायझर पाहिजे म्हणुन अडुन बसला . आधीच सोमवारचा दिवस . सगळ्या पेठा बंद . मग काय , कॅम्पापर्यंत सायकल हाणीत गेलो . आणले डझनभर डेटॉल सॅनिटायझरचे बॉक्स आणी आदळले त्या नवरदेवापुढे . म्हणलं धु लेका किती हात धुतोयस ते ."
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 08/14/2020 - 05:19 नवीन
एकच बदल सुचवतो - "धु लेका किती धुतोयस ते"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
व
वीणा३ गुरुवार, 08/13/2020 - 16:31 नवीन
ग हे काय मास्क लावलेत ना त्यांच्या चेहऱ्यावर ! कुठं दिसतोय चेहरा? - :))
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 08/13/2020 - 19:22 नवीन
छानय :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 08/13/2020 - 22:02 नवीन
लै म्हणजे लैच भारी....दिवसेंदिवस दर्जा वाढतोय....लगे रहो
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 08/14/2020 - 03:58 नवीन
खूप मस्त जमलाय लेख, चिनार भाऊ ! पण अगदी थोडक्यात आटोपला, भूक भागली नाही हो.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 08/14/2020 - 12:51 नवीन
वाचला रे मी पण लेख २ वेळा खुप आवडला हे तुला वेगळ सांगायला नको. आठवण करुन दिलीस. पुलप्रेमींना (मित्रमैत्रीणींना) पाठवतोय तुझ्या नावासकट.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 08/15/2020 - 08:55 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sat, 08/15/2020 - 10:23 नवीन
मस्तच जमलंय !! शेवटी नवरी पाठवणीच्या वेळी नारायणचं इंग्रजी पण हवं होतं .☺
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 08/18/2020 - 14:07 नवीन
जबरदस्त सध्याच्या काळात एकदम चपखल
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा