कोव्हीड आणि फसवणूक
कोव्हीड आणि फसवणूक
तीन दिवसापूर्वी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब करोना विषाणूच्या आजारातून मुक्त झालो. या वेळी सामाजिक विलगीकरणामुळे माझी डोमिनार मोटार सायकल २१ दिवस बंद होती. ती सुरु करण्याच्या प्रयत्न केला असता त्याची बॅटरी उतरली असल्याचे लक्षात आले.
डोमिनार या ४०० सीसी ३४ हॉर्स पॉवर च्या मोटार सायकलला किक नाहीच. त्यामुळे बॅटरी नसेल तर ती चालू होतच नाही. यासाठी मी मुलुंड पूर्व ९० फूट रस्ता येथे असलेल्या बजाजच्या सर्व्हिस सेंटर मध्यें फोन केला त्यांनी आपला एक माणूस पाठवला आणि माझ्या मोटर सायकलमधली बॅटरी काढून चार्जिंग साठी नेली.
चार तासांनी मी त्यांना फोन केला तेंव्हा ते म्हणाले कि बॅटरी खराब झाली आहे त्यामुळे चार्ज पकडत नाही तेंव्हा तुम्हाला नवीन बॅटरी टाकावी लागेल. त्यासाठी अँमरॉन या कंपनीची ४ वर्षे पूर्ण वारंटी असलेली बॅटरी रुपये ४८०० ला आहे. मी त्यांना विचारले कि एवढी महाग बॅटरी तर कारची असते त्यावर तेथील प्रमुख मला म्हणाले कि ४ वर्षात बॅटरी गेली तर पूर्ण नवीन बॅटरी मिळेल. मी थोडा नाखूष आहे पाहून ते म्हणाले एक्साईडची बॅटरी २८०० रुपयाला मिळेल पण त्याची वारंटी १८ महिनेच आहे.
मी त्यांना विचारले कि माझ्या जुन्या बॅटरीचे किती रुपये परत मिळतील? त्यावर ते म्हणाले कि काहीतरी १००-१५० मिळतील.
मला थोडासा संशय आला म्हणून मी माझ्या भावाला फोन केला. तो म्हणाला जुन्या बॅटरीचे ३००-४०० तरी मिळायला पाहिजेत. तू एक काम करा माझ्या माहितीचा एक बॅटरीचा डीलर आहे श्री पाटील त्यांच्याशी बोल. त्यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले ती बॅटरी घेऊनिया आपण पाहू.
यावर मी बजाजच्या डिलरला म्हणालो कि माझ्या भावाच्या कारखान्यात मला बॅटरी चार्ज करून पाहायची आहे.
हे महाराज म्हणाले कि अहो असे इलेक्ट्रिशियन बरेच असतात. त्यावर मी कडक शब्दात म्हणालो माझा भाऊ इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे इलेक्ट्रिशियन नाही.
त्यावर ते साळसुदपणे ते म्हणाले कि तुम्ही बॅटरी कुठेही घेऊन जा. ती चार्ज पकडणार नाही.
मी त्यांना म्हणालो कि माझ्या भावाकडे स्लो चार्जर आहे त्याने चार्ज केली कि बॅटरी जास्त टिकते. त्यावर थोडा गुळमुळीतपणे ते म्हणाले तुम्ही बॅटरी घेऊन जा.
मी ती बॅटरी घेऊन भावाच्या माहितीतील त्या डीलर कडे घेऊन गेलो तर त्याच्याकडे तपासली असता ती बॅटरी पूर्ण पणे चार्ज झाली होती आणि लोड घेतल्यावर हि चार्ज दाखवत होती. मग मी त्या डिलरला म्हणालो कि तुमच्याच माणसाला माझ्या मोटार सायकल मध्ये बॅटरी फिट करून द्यायला सांगा. त्याने त्याच्या तंत्रज्ञाला माझ्या घरी पाठवले आणि बॅटरी फिट केली आणि स्टार्ट केली तर मोटार सायकल व्यवस्थितपणे चालू झाली. मी त्या तंत्रज्ञाला त्याने सांगितल्याप्रमाणे १०० रुपये दिले आणि पाठवून दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत चालू केली तर पहिल्या फटक्यात मोटार सायकल व्यवस्थित चालू झाली. तरी मी दोन दिवस थांबलोपरंतु २ दिवसात बॅटरी व्यवस्थित पणे चालू आहे
दुसऱ्या दिवशी बजाज च्या डीलर कडून एका माणसाचा फोन आला. कि बॅटरी बसवायची आहे का? मी त्याला कडक शब्दात समज दिली कि तुम्ही मला थुका लावायला बघत होता. त्यावर त्या माणसाने बोलणे फिरवाफिरव करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी कडकपणे बोलतो आहे म्हटल्यावर त्याला लक्षात आले कि या माणसाला शेंडी लावणे जमणार नाही.
एक म्हणजे मी गरज नसताना नवीन बॅटरी विकत घेतली असती
शिवाय माझी जुनी बॅटरी या माणसाने कुणाला,तरी सेकंड हॅन्ड म्हणून हजार पंधराशे ला विकली असती.
आता मी बजाज कंपनीला पत्र पाठवून त्या डीलर विरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवणार आहे.
तात्पर्य-- आपली मोटार, स्कुटर, कार बरेच दिवस बंद असेल तर सध्या काम कमी असल्यामुळे असे डीलर आपल्याला गंडवण्याची शक्यता आहे.
सर्वानी सावधान राहणे आवश्यक आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #TwoBinsLifeWins [ मेरा बाबा देश चलाता है ]