Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोव्हीड माझा अनुभव

स
सुबोध खरे
गुरुवार, 09/10/2020 - 09:06
💬 70 प्रतिसाद
कोव्हीड माझा अनुभव करोनाची साथ आली तेंव्हापासून मी आणि माझी पत्नी दोन्ही वेळेस दवाखान्यात जातच होतो. हा रोग आपल्याला केंव्हा ना केंव्हा तरी होणार हे माहितीच होते. याचे कारण येणाऱ्या रुग्णांपैकी कोणी ना कोणी कोणतेही लक्षण नसणारा रोगवाहक( asymptomatic carrier) असणारच होता. त्याशिवाय इतरत्र म्हटल्याप्रमाणे आपण भारतीय लोक बेजबाबदार आहोत हे आपण परत परत सिद्ध करून दाखवत असतो. बायको गरोदर असताना सुद्धा दवाखान्यात मास्क न घालणे, मास्क नाकाच्या खाली ठेवणे, वाल्व्ह असलेला मास्क घालणे, बोलताना मास्क काढून बोलायला सुरुवात करणे, दोन खुर्च्यात ५ फुटाचे अंतर ठेवले तरी खुर्ची सरकवून जवळ येऊन बसणे. फोन आला तर मास्क काढून मोठ्या आवाजात गप्पा मारत राहणे असे करणारे अक्षरशः शेकड्यात रुग्ण पाहिले आहेत आणि आजही इतकी रुग्ण संख्या वाढत असतानाहि असेच वागत आहेत. असे करता करता साधारण १५ ऑगस्ट च्या सुमारास मला थोडी कणकण जाणवू लागली होती. माझ्या मुलीचे लग्न ऑक्टोबर मध्ये आहे. त्यामुळे त्याच्या खरेदीची दगदग होते आहे असे वाटले. मग तीन दिवसांनी ताप आला तो १०० " फॅ होता. माझ्याकडे अनेक गरोदर स्त्रिया सोनोग्राफी साठी येतात मग उगाच धोका कशाला? म्हणून मी दवाखान्यात जाणे बंद केले. बायकोने पण धोशा लावला होता कि तू कधीही सुटी घेत नाहीस आणि हि साथ आल्यावरसुद्धा पूर्ण वेळ काम करतो आहेस. दोन दिवस ताप होता म्हणून शेवटी बायकोच्याच आग्रहाखातर मी फुप्फुस रोग तज्ज्ञाला (डॉ सुब्रमण्यन नटराजन) फोन केला. हे डॉक्टर माझ्या चांगले परिचयाचे आहेत आणि वडिलांना NSIP हा फुप्फुसाचा आजार आहे म्हणून त्यांच्याकडे गेले दीड वर्षे उपचार चालू आहेत. त्यांनी चाचणी करून घ्या असा सल्ला दिला त्याप्रमाणे RTPCR हि चाचणी खाजगी लॅब मधून २१ ऑगस्टला करून घेतली. त्याचा लिखित निकाल मला आलाच नाही तर तो महापालिकेकडे गेला. परंतु तेथल्या तंत्रज्ञाने फोन करून तो पॉझिटिव्ह आहे असे दुसऱ्या दिवशी सांगितले. २२ ऑगस्ट ला महापालिकेच्या टी वॉर्ड ऑफिस मधून फोन आला कि तुमची कोव्हीड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि तुमचे वय ५५ आहे तेंव्हा तुम्हाला रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.( ५० वर्षावरील सर्व रुग्णांनी भरती होणे आवश्यक आहे असा फतवा अगोदर महापालिकेने काढला होता आणि दुसऱ्या दिवशी तो मागे घेतला होता) यावर मी त्या कर्मचाऱ्याला सांगितले कि हा फतवा मागे घेतलेला आहे. त्यावर ती कर्मचारी म्हणाली कि सर आम्हाला असे कोणतेही पत्रक आलेले नाही. मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि आपण वृत्तपत्र सुद्धा वाचत नाही का? त्यात सर्व सविस्तर आलेले आहे आणि आपण आपल्या विभागातून चौकशी करू शकता. तेंव्हा मी अजिबात भरती होणार नाही तर मी घरीच क्वारंटाईन होणार आहे आणि मी डॉ सुब्रमण्यन नटराजन यांच्या देखरेखीखाली असणार आहे. मी स्वतः एम डी डॉकटर आहे त्यामुळे रोग केव्हा बळावू शकतो आणि गुंतागुंत केंव्हा होते हे सर्व मला माहिती आहे. मला एकंदर चार पाच दिवस फक्त ताप आला त्यासाठी मी पॅरासिटामॉल ( क्रोसीन) ची एक गोळी घेत असे तेवढी एकच गोळी मला दिवसभर पुरत असे. ( याचा डोस दिवसात ३ ते ४ वेळेस आहे) कारण आपल्याला ताप नक्की केंव्हा येतो आणि त्याचा आकृतिबंध ( पॅटर्न) काय आहे हे पाहायचे होते.या बरोबर माझ्या तोंडाची चवही गेली होती आणि वास सुद्धा नीटसा जाणवत नसे. मला डॉक्टर सुब्रमण्यन यांनी फॅवीपिराव्हीर हैड्रोक्सी क्लोरोक्वीन आणि आयव्हरमेक्टीन हि तीन औषधे चालू केली. पहिल्या दिवशी २४ गोळ्या ( १२ सकाळी आणि १२ संध्याकाळी) घ्यायच्या होत्या आणि पुढचे चार दिवस दिवसभरात १२ (६ सकाळी आणि ६ संध्याकाळी) अशा घ्यायच्या होत्या. या २४ गोळ्या घेतल्यापासून पुढचे ५ दिवस माझे पोट डब्ब होत असे. थोडासा खाल्लं तरी पोटात ट्राफिक जॅम ची संवेदना येत असे. भूक लागत होती परंतु एक पोळी खाल्ली कि पोट भरल्याची संवेदना होत असे. प्रत्यक्ष कॉव्हिडचा नव्हता इतका परिणाम त्या गोळ्यांचा होत होता. परंतु आलीया भोगासी असावे सादर या नात्याने मी मानसिक दृष्ट्या तयार झालो. एक सुदैवाची गोष्ट म्हणजे मला गोड चव व्यवस्थित लागत होती त्यामुळे श्रीखंड गुलाबजाम सारख्या गोष्टींबरोबर मी पोळी खाऊ शकत होतो आणि फळं सुद्धा व्यवस्थित खाता येत होती. परंतु आंबट, तिखट आणि खारट चवी मात्र बदलून गेल्या होत्या. पावभाजीची चव मातकट येत होती. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणून मी डॉक्टर सुब्रमण्यन याना घरच्यांची चाचणी करावी का याबद्दल विचारले त्यावर ते म्हणाले इतके दिवस तुम्ही एकत्रच राहत आहेत तेंव्हा तुमच्या बायकोला आणि मुलांना झाला असणारच उगाच चाचणी वर पैसे खर्च कशाला करताय? त्यांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या बायकोची चव आणि वास दुसऱ्या दिवशी गेले. मुलीला बारीकसा ताप आला आणि मुलाला थोडासा घसा खराब झाला. दोन्ही मुले दुसऱ्या दिवशीच ठीक ठाक झाली. बायकोच्या तोंडाची गेलेली चव आणि वास मात्र परत यायला पाच सहा दिवस लागले. माझा आणि बायकोचा दवाखाना २१ दिवस पूर्ण बंदच होता. मुलाने वर्क फ्रॉम होम घेतले होते आणि मुलीचे काम तर फ्री लान्सिंगचा आहे. चार पाच दिवसांनी आम्ही सर्व व्यवस्थित झालो होतो. यानंतर घरी केवळ विश्रान्तीच घेत होतो. दिवसात १०-१२ वेळेस आम्ही दोघे पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही. मला कधीही श्वास घ्यायला त्रास झाला नाही.मला खोकला सर्दी हे सुद्धा झाले नाहीत. दोन वेळेस मी एक्स रे काढून घेतला तो व्यवस्थित होता. इतर चाचण्या सुद्धा ठीक होत्या( डी डायमर, सी रीएक्टिव्ह प्रोटीन, सी बी सी, क्रिऍटिनिन इ ). अशक्तपणा मात्र फार जाणवत असे म्हणजे घरात थोडेसे काम केले कि दमायला होत असे. असे झाल्यावर मी बऱ्याच वेळेस पल्स ऑक्सिमीटरने रक्तातील प्राणवायूची पातळी तपासत होतो ती कधीही ९५% च्या खाली आली नाही. कोण रुग्ण कधी सायटोकाइन स्टॉर्म मध्ये जाईल हे कधीच सांगता येत नाही.यामुळे त्यावर आम्ही डोळ्यात तेल घालून नजर ठेवत होतो. माझे असंख्य डॉक्टर मित्र, वैद्यकीय नियतकालिके, शोध निबंध यांच्यातून गेले ६ महिने मिळत असलेल्या विविध वैद्यकीय माहितीच्या आधारे आम्हाला एवढे माहिती होते कि साधारणपणे आपल्याला होणार आजार इतक्या पातळीवर बळावणार नाही. कारण आम्ही सडपातळ आहोत आम्हाला कोणालाही मधुमेह हृदयविकार रक्तदाब नाही. माझा रक्त गट ओ पॉझिटिव्ह आहे( ज्यात रोग गंभीर होण्याची शक्यता कमी असते.( ए पॉझिटिव्ह ला अशी शक्यता जास्त असते). आम्ही सर्व प्रतिबंधात्मक हैड्रोक्सी क्लोरोक्वीन घेत होतो. असे असले तरी "मन चिंती ते वैरी न चिंती" या न्यायाने सगळे गंभीर आजार आणि वाईटात वाईट गुंतागुंत याबद्दलचे विचार डोक्यात आले होते. मी दोन्ही मुलांना जवळ बोलावून माझा १ कोटी रुपयाचा टर्म विमा आहे. आमच्या सगळ्यांचा १५ लाखाचा आरोग्य विमा आहे त्या सगळ्याची कागदपत्रे दाखवून ठेवली. आपल्याला काही झाले तर आपल्याकडे किती पैसे आहेत ज्यावर आपल्यामागे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल कि नाही याचाही पूर्ण विचार करून झाला. एकदा आपल्या आयुष्याचा आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यावर माझे मनही शांत झाले. अर्थात बायकोजवळ मी हे काहीच बोललो नाही. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेऊन मी २१ दिवसांनी आपला दवाखाना परत चालू केला. सुरुवातीचे दोन तीन दिवस मला अशक्तपणा जाणवत असे. माझा दवाखाना २१ दिवस बंद होता तरीही बरेच रुग्ण माझ्यासाठी थांबून होते. त्यात काही कर्करोगाचे रुग्ण होते ज्यांची केमोथेरपी झालेली होती, कोणी हर्निया शल्यक्रियेसाठी साठी थांबला होता. अशा लोकांना पाहून मला भरून आले. १७ दिवस महापालिकेच्या कर्मचाऱयांनी दिवसात ३ वेळेस फोन करून अक्षरश:त्रास दिला कधी सकाळी ११ वाजता २ वाजता ३ वाजता ४ वाजता कधीही फोन येत असे. तुमची तब्येत कशी आहे तुमचे तापमान किती आहे हृदयाचे ठोके किती आहेत प्राणवायूची पातळी किती आहे असे विचारून कंटाळा आणला होता. अगदी मी स्वतः हे सर्व सांगितले आणि मला कोणताही त्रास नाही म्हणून सांगितले तरी परत परत केवळ रकाने भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेच तेच प्रश्न विचारून अगदी काव आणला होता. त्यांना कितीही सांगितले कि आता कोणताही त्रास नाही आणि तुमच्या फॉर्म मधील लक्षणांच्या सर्व रकान्यात काही नाही असे भरा असे सांगूनही काही कर्मचाऱ्यांच्या डॉक्त्यात शिरतच नसे. असो १७ दिवसांनी हा त्रास संपला. सरकारी रेमेडोकेपणा कसा असतो ते म्हणजे माझी चाचणी २१ तारखेला झाली आणि त्याचा निकाल २२ ला आला म्हणजे मला २१ तारखेला कोव्हीड झाला होता त्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन असणे आवश्यक आहे परंतु या लोकांनी आपल्या रेकॉर्डमध्ये २४ तारीख टाकली होती. त्यातील एका कर्मचाऱ्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणाच्याही डोक्यात ते शिरतच नव्हते. शेवटी मी कंटाळून तो प्रयत्न सोडून दिला. समाजाची वृत्ती-- कोव्हीडची साथ सुरु झाल्यापासून मार्च महिन्याच्या सुरुवातीला मी भाड्याने राहत असलेल्या सोसायटीच्या लोकांनी कुरबुर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सरकारी लॉक डाऊन होण्याच्या अगोदरच १० मार्च पासूनच यांनी सोसायटीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना इमारतीत येण्यास बंदी घातली होती. कचरेवाल्याला सुद्धा इमारतीत खालूनच कचरा घेऊन जायला सांगितले होते. मी सांगायचं प्रयत्न केला कि इमारतीतील २५ लोकांनी लिफ्टने खाली येण्यापेक्षा एकाच कचरे वाला ज्याला सॅनिटायझर वापरून सर्वांचा घराबाहेर ठेवलेले कचरा घेऊन जाऊ दे. पण नाही यावर मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता कि हीच स्थिती मोलकरणीची आहे यावर तुम्ही भाडेकरू आहात आम्ही तुम्हाला सोसायटीच्या बाहेर काढू म्हणून मला धमकी दिली गेली . मी तेंव्हा भांडण नको म्हणून गप्प राहिलो. नंतर १ जूनपासून सरकारने अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना( घरगुती कामगार प्लमबर इलक्ट्रिशियन इ) सोसायटीत परवानगी नाकारता येणार नाही असे परिपत्रक काढले तरी आमच्या सोसायटीत कामवाल्या कर्मचारुयाना परवानगी नाकारली होती. मधल्या काळात व्यवस्थापकीय समितीतील( मॅनेजिंग कमिटीतील) एका सदस्याला कोव्हीड झाला म्हणून तो रुग्णालयात भरती झाला त्याच्या बायको आणि दोन्ही मुलींना कोव्हीड झाला.त्याना मी फोन करून सर्व समजावले आणि काही मदत लागली तरी मला फोंन करा असेही सांगितले. हा माणूस रेशन चे दुकान चालवतो आणि ते सर्व पूर्ण बरे झाला तरी त्याचं घरात आजही कामवाल्या बाईला परवानगी नाही. अजून दुसऱ्या घरात दोन जणांना कोव्हीड झाला होता. म्हणजे मोलकरणीला इमारतीती परवानगी दिली तर कोव्हीड होईल या त्यांच्या दाव्याला कोणताही आधार नाही हे सिद्ध हि झाले. शेवटी २८जुलै रोजी मी सोसायटीला एक पत्र दिले कि सरकारच्या पत्रकाप्रमाणे तुम्हाला मोलकरणीला थांबवता येणार नाही. आम्ही दोघे अत्यावश्यक सेवा मध्ये गणले जातो आणि आमच्या मुलीचे ऑक्टोबर मध्ये लग्न आहे तर आमच्या घरी एका घरगुती कर्मचाऱ्यास परवानगी द्या. यावर त्यांनी परवानगी नाकारली. मी त्याना परत सांगितले कि जे काही सांगायचे ते मला लेखी द्या आणि अशी परवानगी नाकारली तर मी सोसायटी आयुक्तांकडे तक्रार करेन. त्यांना आमच्या भागाचे आमदार श्री मिहीर कोटेचा यांचा व्हिडीओ सुद्धा पाठवला ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते कि सोसायटीच्या अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना थांबवता येणार नाही असे केल्यास त्यांच्यावर सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल. यावर त्यांनी ताठर भूमिका घेतली आणि मला सांगितले कि तुम्ही "भाडेकरू" आहात आम्ही तुमच्याशी संपर्क ठेवणार नाही जो काही व्यवहार करायचा आहे तो घरमालकाशीच करू. मी दुसऱ्या दिवशी श्री मिहीर कोटेचा याना फोन केला त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीचा फोन घेतला आणि बहुधा सेक्रेटरीला "समजावले" असावे. कारण १ ऑगस्ट पासून आमच्या घरी एका घरगुती कर्मचाऱ्यास सोसायटीने परवानगी दिली. आम्ही दिलेले पत्र पाहून आमच्या मजल्यावरील इतर दोघांनी सुद्धा आम्च्या घरगुती कर्मचाऱ्याला परवानगी द्या म्हणून मागणी केली त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा घरगुती कर्मचारी येण्यास सुरुवात झाली. व्यवस्थापकीय समितीतील( मॅनेजिंग कमिटीतील) एक आपल्या वृद्ध आईला आजार आहे म्हणून आमच्या घरि दाखवायला आला. सेक्रेटरीच्या बायकोला ताप आला म्हणून त्याने रात्री साडे अकरावाजता दोन वेळेस फोन केले. एका सदस्याला कामावर रुजू होण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होते त्यासाठी आला होता. इमारती तील डॉकटर आहे त्याचा फायदा उठवण्यासाठी मात्र सर्व लोक पुढे आले होते. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एक भाडेकरूंच्या( हे भावनगरहुन आलेले होते) पत्नीचा गर्भपात झाला. त्यांची सर्व सोय आम्ही केली. यानंतर त्याने घरच खाली करून तो बायकोला घेऊन परत भावनगरला निघून गेला. आम्हाला कोव्हीड आजार झाला आहे हे महापालिकेकडून सोसायटीच्या सेक्रेटरीला कळवण्यात येते ते सोसायटीतील सर्व सदस्यांना कळवण्यात आले. परंतु एकही महाभागाने आम्हाला साधा फोन करण्याची तसदी घेतली नाही कि तुम्हाला काही हवे आहे का? औषध मागवून हवंय का? भाजी फळे किराणा इ पाहिजे का? एकही सदस्याने संबंध ठेवला नाही. घरात मोलकरीण नाही, आम्ही सर्व आजारी अशक्तपणा आलेला असल्यामुळे आम्ही जवळच असलेलय एका शेफ कडून पार्सल मागवणे चालू केले यामुळे भांडी घासणे आणि स्वयंपाक करणे त्यापासूनही सुटका झाली. बाकी झाडू मारणे कपडे वाळत घालणे हि कामे होतीच. एवढेच नव्हे तर सेक्रेटरीने आमच्या घरमालकांना असेही कळवले कि याना कोव्हीड झाला असूनही हे बाहेर फिरताना आढळले असे बेजवाबदार वर्तन सोसायटी खपवुन घेणार नाही त्यांना योग्य ती समज द्यावी. मी घरमालकाला कळवले कि मी एक्स रे काढण्यासाठी गेलो होतो. कारण घरी एक्स रे होत नाही बाकी सर्व रक्त चाचण्या कर्मचाऱ्याला घरी बोलावून केल्या गेल्या आहेत. आणि सेक्रेटरी आणि कंपनी केवळ आकसाने असे वर्तन करीत आहेत. हाच मेसेज मी सेक्रेटरीला सुद्धा पाठवला. आश्चर्य म्हणजे आमच्या आजाराबद्दल आम्हची साधी विचारपूस न करणाऱ्या एका सदस्याला परवा पासून ताप आहे तर त्याने आम्हाला फोनवरून काय करायचे याबद्दल सल्ला मसलत केली. आपण याना २० दिवसात काहीही विचारलं नाही याची थोडीशी लाज/ खंत असावी असेही नाही. असाच अनुभव माझ्या माहितीतील असंख्य डॉक्टरांना आला आहे.डॉक्टर कोव्हीड केंद्रात कामालाआहेत म्हणून त्यांनी बाहेरच राहावे अशी असून सूचना केली गेली. अत्यावश्यक सेवा असूनही बहुसंख्य स्त्री डॉक्टरांच्या घरी घरगुती कर्मचाऱ्याला बहुसंख्य सोसायटीत परवानगी नाही. गाझियाबाद येथे नीलकमल कॉम्प्लेक्स या सोसायटीने तेथे राहणाऱ्या पण दिल्लीत काम करणाऱया दोन डॉक्टरांना त्यांच्या मुळे सोसायटीत कोव्हीड येण्याची शक्यता आहे म्हणून सोसायटीत येण्यास मनाई करणारा हुकूम जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला. त्या आदेशात असे म्हटले होते कि दिल्लीत ळक्म करणाऱ्या डॉक्टरांनी तेथेच आपली राहण्याची सोया करावी. यावर इंडियन मेडिकल असोसिएशन ने जिल्हाधिकारी आणि सोसायटीच्या लोकांना नोटीस जारी केली कि जसे हे डॉक्टर दिल्लीत काम करत आहेत तसेच आमचे गाझियाबादचे सगळे डॉक्टर येथे कोव्हिडच्या रुग्णांसाठी काम करत आहेत. आमच्या डॉक्टरांच्या मुळे सुद्धा नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांना कोव्हीड होण्याची शक्यता आहे. तेंव्हा असा धोका टाळण्यासाठी त्यांना विनंती आहे कि यापुढे नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांनी वैद्यकीयसेवेसाठी गाझियाबाद सोडून इतर कोणत्याही शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा घ्यावी हि विनंती. त्यांनी जिल्हाधिकारी याना अशी बेकायदेशीर आणि अधिकाराच्या बाहेरचे ( out of jurisdiction) पत्रक काढल्याबद्दल न्यायालयात का खेचले जाऊ नये अशी नोटीस जारी केली. या नोटीशीनंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आणि नीलकमल कॉम्प्लेक्स च्या लोकांचे धाबे दणाणले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपले पत्रक मागे घेतले. समाजाची वृत्ती हि इतकी स्वार्थी झाली आहे. यामुळे माझ्या माहितीतील असंख्य डॉक्टर अक्षरशः आपला व्यवसाय बंद करावा काय या विचारात आहेत. अशाच तर्हेचे काही विचार आम्हाला झालेल्या या आजारापूर्वी लिहिलेल्या लेखात मी व्यक्त केले होते https://www.misalpav.com/node/46888 गरज सरो आणि वैद्य मरो हि म्हण किती योग्य आहे.

प्रतिक्रिया द्या
32312 वाचन

💬 प्रतिसाद (70)
र
राघव Sun, 09/13/2020 - 08:04 नवीन
डॉक, आपण आणि आपले कुटुंबीय सुखरूप बरे झालात ह्यापरती गोष्ट नाही. थकवा असणे ह्याशिवाय आणिक काही पोस्ट इफेक्ट्स आपल्याला जाणवले काय? बरेच जण हॉस्पिटलात जायला घाबरताहेत आणि ज्या तर्‍हेचे अनुभव लोकं सांगत असतात त्यावरून ते सहज समजण्यासारखेही आहे. खरेतर हॉस्पिटलात जागा नसतांना शक्यतो गंभीर होण्याची त्यातल्या त्यात शक्यता असणार्‍यांनाच दाखल करावे असे वाटते. असो. सोसायटीच्या अनुभवाबद्दल म्हणायचे तर आमच्या सोसायटीतला अनुभव तरी चांगला आहे. लोकं मदत करणारे आहेत. अगदी कोव्हीडचे रुग्ण सापडल्यावरही अतिशय समंजसपणे सगळ्यांनी परिस्थिती हाताळलीये. भाडेकरूंना होणार्‍या त्रासाबद्दल असं एक निरिक्षण आहे की शक्यतो बॅचलर्सना हा त्रास होतो. आपल्या इथे मात्र वेगळंच काम दिसतंय.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Sun, 09/13/2020 - 22:55 नवीन
डॉक्टर साहेब आणि त्यांचे कुटुंबीय यांचे अभिनंदन !!! डॉक्टरांनी तपशीलवार इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 09/14/2020 - 05:18 नवीन
डॉ खरे , आपले आणि कुटुंबाचे रोगातून मुक्त झाल्याबद्दल अभिनंदन... - सहकारी सदनिका कार्यकारणी कशी चालते ( बरोबर आहे ना शब्द) हे कार्यकारिणीतील फार थोड्यानं कळते हा अनुभव मला भारताबाहेर हि आला आहे ( येथे नियम स्पष्ट असून सुद्धा) भारतात तर इतके अनेक मुद्दे आणि गुंतागुंत असतील कि अरे बापरे.. विचार ना केलेले बरा... अर्थात हे हि खरे अश्या वेळी कार्यकारणी ची जबाबदारी काय आणि एवढया गर्दीच्या देशात धोक्यापासून वाचायचे कसे आणि काय कार्याचे हे कार्यकारिणीला सुद्धा हाताळणे सोप्पे नाही ...परंतु आपण वर्णन केलेलं त्याचे वर्तन हे चुकीचेच..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/14/2020 - 10:27 नवीन
अभिनंदन, तुमचा रोखठोकपणा नेहमीच आवडतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जोशी पुण्यात दन्गा Tue, 09/15/2020 - 00:51 नवीन
"कोण रुग्ण कधी सायटोकाइन स्टॉर्म मध्ये जाईल हे कधीच सांगता येत नाही.यामुळे त्यावर आम्ही डोळ्यात तेल घालून नजर ठेवत होतो." >> मला वाटते की बरेच मृत्यू हे न कळल्यामुळे झाले आहेत की नक्की हॉस्पिटलमध्ये कधी जायचे. सायटोकाइन स्टॉर्म आहे की नाही हे अनुमान तुम्ही कसे लावत होतात. सामान्य माणूस कसा ठरवणार की कधी हॉस्पिटलमध्ये मध्ये जायला हवे आणि नाही ते
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Wed, 09/16/2020 - 18:11 नवीन
डॉक्टर, आपण लिहिता, "कारण येणाऱ्या रुग्णांपैकी कोणी ना कोणी कोणतेही लक्षण नसणारा रोगवाहक (asymptomatic carrier) असणारच होता". माझी (बाळबोध) शंका अशी, की कोरोनाचे जंतू (virus) शरीरात प्रवेश करू शकतात ते फक्त तोंडावाटे आणि नाकाद्वारे. पेशंट आसपास असताना आपण योग्य तो मास्क वापरला असणारच. तरीही जर आपल्याला प्रादुर्भाव झाला तर त्याचा अर्थ मास्कचा काही उपयोगच नाही असा होतो का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/16/2020 - 22:35 नवीन
रविकिरण फडके, मुखवटा संरक्षण करतो की नाही, हे निश्चितपणे सिद्ध झालेलं नाही. असं जेनी हॅरीज या इंग्लंडच्या उपप्रमुख वैद्यकीय अधिकारिणीचं मत आहे. लेख : https://www.rt.com/uk/499429-evidence-masks-effective-not-strong/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
स
सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 05:49 नवीन
An N 95 mask or N95 respirator is a particulate-filtering facepiece respirator that meets the U.S. National Institute for Occupational Safety and Health (NIOSH) N 95 classification of air filtration, meaning that it filters at least 95% of airborne particles. आपण कितीही चांगला रेनकोट घातला तरी रोज पडणाऱ्या मुसळधार ( मुम्बईचा) पावसात कधी तरी भिजणारच आणि सर्दी होणारच हे एकदा गृहीत धरले कि मानसिक तयारी होतेच. आमचे अनेक दिग्गज वरिष्ठ नागरिक डॉक्टर/ मित्र चार पाच महिने दवाखाना बंद ठेवून घरी बसून अक्षरशः कंटाळले आणि शेवटी आता त्यांनी दवाखाने उघडले आहेत आणि पूर्ण काळजीनिशी आता रुग्ण सेवा करीत आहेत.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 09/17/2020 - 06:30 नवीन
लेख आता वाचला, या सर्वातुन बाहेर निघाल्याबद्दल आपले अभिनंदन, सोसायटी चे लोक सगळीकडे असेच असतात, त्याना अरे ला कारे म्हणाल्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत. माझ्या शेजार्‍याने त्याला कोविड आहे हे लपवून ठेवल्याबद्दल सोसायटीने त्याला भरपूर सुनावले, पण एक कमीटी मेम्बर कोवीड पोझिटीव्ह झाल्यावर मात्र सोयिस्कर रित्या लपवून ठेवले.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 09/22/2020 - 07:35 नवीन
आजच एका सहकार्‍याशी बोलणे झाले. तो स्वःत आणी त्याची बायको दोघेही करोना+ नीघाले. त्याला कफ आहे आणी बायकोला पण घशात त्रास जाणवत आहे. पण डॉक्टरनी त्यांना गेले ८ दीवसांपासुन घरातच विलगिकरण करायला सांगितले आहे. काहीही गोळ्या दील्या नाहीत की औषधही दीले नाही. २ आठवड्यांनी बरे वाटेल असे फोनवरच सांगितले आहे. पेशंटच्या लक्षणांवरुन त्याला करोनाच्या औषधांची गरज आहे की नाही ते समजते काय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/22/2020 - 17:16 नवीन
होय डॉक्टर असल्यामुळे मला एकंदर जास्त विषाणूंचा प्रादुर्भाव झाला असेल असे गृहीत धरावे लागेल. एक IL -६ हा रक्तातील घटक १६० पर्यंत गेला होता म्हणून मला औषधे दिली गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
न
नेत्रेश Fri, 09/25/2020 - 09:08 नवीन
कोव्हीडमधुन तुम्ही सुखरुप बाहेर आलात हे ऐकुन खुप बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अत्रन्गि पाउस Tue, 09/22/2020 - 13:48 नवीन
डॉक, सुखरूप आहात हे परवा बोललो तेव्हा कळलेच. पण त्यामागे हे इतकं घडलं हे आजच वाचलं तेव्हा कळलं. सांभाळून राहा
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 09/22/2020 - 14:54 नवीन
कोव्हिडच्या उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा इतका वापर होतो आहे अजूनही ?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 09/23/2020 - 21:00 नवीन
कोरोना झाल्यावर चाचणी पॉझिटिव्ह येते, कोरोना बरी झाल्याची चाचणी निगेटिव्ह येते का ? माझ्या काही फॅमिली मेम्बरना पॉझिटिव्ह नंतर 14 दिवस घरी सुरक्षित केले नंतर कोणतीही चाचणी ना करता बरे झालात म्हणून घोषित केले ( लक्षण नसलेले किंवा सौम्य लक्षण असलेले मेम्बर होते)
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 10/08/2020 - 11:44 नवीन
कोरोना झाल्यावर चाचणी पॉझिटिव्ह येते, कोरोना बरी झाल्याची चाचणी निगेटिव्ह येते का ?
होय. माझ्या मुलीला (वय वर्षे आठ) लक्षणे आल्याने ३ सप्टेंबरला कोव्हिड टेस्ट केली. ती पॉजिटीव्ह आली. मग तिला 'नरो वा कुंजरो वा' स्टाईलमध्ये 'तुला आणि मला फक्त लक्षणे असल्याने आपल्या दोघांना' वेगळं रहायचं आहे', असं सांगून मी आणि ती वरच्या मजल्यावर विलगीकरणात राहीलो. (तिने टिव्हीवर कोरोनाच्या अर्धवट, अतिरंजित बातम्या ऐकल्या होत्या, त्यामुळे तिला कोरोनाची अनाठायी भिती होती. त्यामुळे हा 'अर्धसत्य प्रयोग' करावा लागला. मी पॉजिटीव्ह नव्हतो.) बायको आणि लहान मुलगा खालच्या मजल्यावर घरातल्या होते. तिला फक्त तीन दिवस 'लो ग्रेड' ताप होता, त्यावर पॅरासिटॅमॉल दिलं. बाकी घरगुती काढा, हळदीचे दुध, च्यवनप्राश, वाफ घेणे इत्यादि सुरु होतंच, ज्याचा ती कंटाळा करुन झाल्यावर गपगुमान वापर करायची. ;) मला डायबिटीस आणि रक्तदाबाची अनुवांशिकता आहे, तसेच रक्तदाबही आहेच. गर्म खुन वगैरे.. पण ह्याची चिंता फाट्यावर मारुन पोरीसोबत खेळणे, मजा करणे हे शिकलो ह्या दिवसांत. संध्याकाळी 'सोशल डिस्ट्न्सिंग'युक्त चहा असायचा. असो. १४ सप्टेंबरला केलेल्या चाचणीत ती पुन्हा पॉजिटीव्ह आली, ज्याची आम्हांला बर्‍यापैकी कल्पना होतीच. तोपर्यंत कोरोनाची भिती आणि कौतूक दोन्ही ओसरलं होतं. १८ सप्टेंबरला केलेल्या चाचणीत मुलीची टेस्ट निगेटीव्ह आली. मी, बायको, मुलगा, घरातच राहणार्‍या व काम करणार्‍या दोन मुली हे सगळे लोक ह्यादरम्यानच्या पुर्ण काळात निगेटीव्ह/ लक्षणरहीतच होते. आम्हालाही त्याचे आश्चर्य वाटले, पण कोरोनाने तेव्हातरी आम्हाला 'खो' दिला नाही. काळजी घ्याच कोरोनाची, पण बाऊ टाळा. कोरोना सगळ्यांनाच कधी ना कधी होणारच आहे. काहींना तो कळेल, बहुतेकांना तो जाणवणारच नाही. झाला तर काळजी घ्या, आणि बरे व्हा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुबोध खरे गुरुवार, 09/24/2020 - 09:57 नवीन
आपल्या शरीरातून २८ दिवस पर्यंत विषाणूंची कलेवर बाहेर टाकली जात असतात यामुळे २८ दिवस पर्यंत( कधी कधी २ महिने पर्यंत) चाचणी पॉझिटिव्ह येत राहते. परंतु साधारण १० दिवसानंतर त्या रुग्णाकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य टक्के असते आणि साधारण १२ दिवसानंतर सायटोकाईन स्टॉर्म सारखी गुंतागुंत होण्याची शक्यता नगण्य असते म्हणून १४ दिवस रुग्णाला विलग करून ठेवतात आणि त्यानंतर चाचणी न करता रुग्णाला बरे झालात म्हणून घोषित केले जाते. यात रुग्णाला काही लक्षणे असतील तरी ( काही लोकांना नाक चोंदलेले राहते, अशक्तपणा असतो, छातीत धड धड होणे इ) त्याच्या पासून इतरांना रोग होण्याची शक्यता नसते आणि रुग्णाला स्वतःला काही गुंतागुंत होण्याची शक्यता नगण्य असते. यामुळे या कालावधी नंतर आपण रोगातून बरे झाला आहात असे समजले जाते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 09/24/2020 - 10:00 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/18/2020 - 08:06 नवीन
आपण सहीसलामत बाहेर आलात हे फारच चांगलं आहे .... समाजाची त्यातल्या त्यात एका भाडेकरूकडे बघण्याची समाजाची दृष्टी आमूलाग्र बदलणे गरजेचे आहे ....लोक फक्त फळं असलेल्या झाडालाच दगड मारतात आणि ऊन असेल तरच सावलीला बसतात ...एरवी झाड म्हणजे फक्त लाकूड !
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 03/10/2021 - 23:40 नवीन
डाँ दांपत्य आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन. चार ओळी देवाच्या दुतां करता. डाँक्टर हर फुल जो खीलता है। पहले तू देखता है। हर फुल जो मिटता है। पहले तु समझता है। फुलों की परवरीश । तेरे हवाले करके। प्रभू क्षीरसागर मे आराम से सोता है। तुझे देखके तेज धडकन भी धीमी होती है। जीदंगी खुशगवांर होने की हमी मीलती है। मरते हुये, तुझमें भगवान नजर आता है। चलाने वाला कोई और ही है। उसकी हर गलती तेरे ही नाम होती है। अफसोस है कुछ एहसान फरामोश भी है। पता चलेगा उनको जब उनकी बारी आयेगी। वो भी गिडगीडायेगें। तेरे पैरोंमे लेटेंगें जब यमदूत उनके पैर खिचेगें। कलजुग है ,यहाँ। ना भगवान ना भगत है। भीड भरी दुनीया मे सही ज्यादा कुछ ही गलत है। गुजारीश करता हूँ। भगवान ना समझे। इन्सान तो समझो। एहसान नही तो कमस कम कर्जदार तो समझो। हर वो डाँक्टर, नर्स और वैद्यकीय व्यवसाय मे अपना हर पल मानवता के भलाई के लिये बिताने वाले को समर्पित । 28-12-2020
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा