सत्यमेव जयते.
सत्यमेव जयते.
प्राध्यापक जगदीश कदमांना एकदम दचकून जाग आली . कोणी तरी त्यांचे पाय हलवत होते ..
“ ओ ..साहेब .. जरा उठा ..आम्हाला जरा बसायला जागा द्या…”
एक क्षण भर त्यांना आपण कुठे आहोत हेच आठवेना ..मग हळू हळू त्यांच्या मेंदूवरचा झोपेचा पडदा अलगद सरकला ,आणि त्यांना आठवले कि आपण कोल्हापूरला जाणाऱ्या एक्सप्रेस मध्ये आहोत आणि कुणी तरी आपल्याला अगदी माजोर पणे उठवत आहे. त्यांनी नीट डोळे उघडून पाहिले . मग उशाशी असलेला चष्मा आपल्या डोळ्यांना लावला. त्यांना आता नीट दिसले तीन चार जण ते झोपले होते त्या बर्थ पाशी उभे होते. समोरच्या बर्थ वरील माणसाला तसेच उठवून तिथे तीन चार जण असेच बसले होते आणि ती बर्थ ज्याची होती तो सुद्धा एका कोपऱ्यात अंग चोरून बसला होता. त्यांच्या वरच्या आणि समोरच्या बाजूला वरच्या बर्थ वर दोन स्त्रिया झोपलेल्या होत्या ...त्यांना मात्र अजून तरी या लोकांनी उठवले नव्हते.
“ साहेब ..जरा उठून बसा ..म्हणजे आम्हाला बसता येईल ..” त्यांना त्यांचे पाय हलवून उठवणारा माणूस त्यांना पुन्हा म्हणाला . या माणसाला उठायला इतका उशीर झाल्यामुळे तो आधीच वैतागला होता. थोराड बांधा आणि मिचमिचे डोळे ...त्यांना खूपशी तांबडी झाक होती. दारू मुळे किवा कमी झोप झाल्यामुळे. अंगात निळा फुल शर्ट आणि कसल्यातरी अगम्य रंगाची विजार.
“ अहो ही २ टियर बोगी आहे. झोपण्यासाठीच आम्ही तिकीट काढले आहे. तुम्ही असे मधेच या बोगीत कसे आलात ? आणि आलात ते आलात आणि आमच्या आरक्षित जागेवरूनच आम्हालाच उठायला सांगताय ? “प्राध्यापक कदम म्हणाले.
त्या माणसाबरोबर असणारे ते तीन चार जण आता एकदम पुढे आले. त्यांना हे सगळे जणू काही दररोजचे होते.
“ ओ ..साहेब ..आम्हाला शहाणपणा शिकवू नका ...एक तासाची तर गोष्ट आहे ..आम्ही सांगलीला उतरून जाऊ ..मग झोपा कि तुम्ही ढाराढूर…” असे म्हणत तो खदखदून हसला . कदमांचे पाय धसमुसळेपणे सरकवून तो माणूस जवळ जवळ त्यांच्या पायावरच बसला . कदमांनी आपले पाय जरा मागे घेतले आणि ते उठून बसले ...ते बसताच बाकीचे दोघे तिघे त्यांच्या बर्थ वर बसले. कदमांनी खाली पसरलेल्या आणि काल रात्री रेल्वे च्या अटेंडंटने दिलेल्या बेडशीट आणि पाघरूणा वरच त्यांनी बसकण मारली होती.
कदम आता खिडकी जवळ अंग चोरून बसले होते. आपण हा अन्याय सहन करतोय याची त्यांना शरम वाटत होती.
“ आता कसे झाक झाले … अहो जरा समजुतीने घेतले कि तुमचीही सोय आणि आमची सुद्धा ...काय एक तासाभरात आम्ही सांगली ला उतरून जाऊ ..” त्यातील एक जण कदमांची समजूत काढत म्हणाला.
“ अहो पण तुम्ही आत आलात कसे ? तो तिकीट तपासनीस काय करतोय ? मी त्याला बोलवून आणतो आत्ता ..” असे म्हणत प्राध्यापक कदम उठले …
त्यांनी सगळा डबा हुडकून पहिला पण त्या तपासनीसाचा पत्ता नव्हता ..ते परत आपल्या जागी येऊन बसले खरे ...पण त्यांचा राग अजून शांत झाला नव्हता .
“ काही उपयोग नाही साहेब त्या तपासनीसाला हुडकून ...आमच्या कडून पैसे घेऊनच त्याने आम्हाला आत घेतले आहे. . आम्हाला हे दररोजच करावे लागते . .” त्या चौघा पैकी एक जण म्हणाला.
“ अहो साहेब ..जाऊ द्या ना ! एक तास तर आम्ही बसणार .. रात्र संपतच आली आहे. “ त्यातील एक जण जरा समजुतीच्या सुरात म्हणाला .
“ तुम्ही सगळे चांगले शिकलेले आणि चांगल्या घरातील दिसता … असे दुसऱ्याला त्रास देऊन ..तुम्हाला काय मिळते ? “ कदम जरा चिडलेल्या आवाजात म्हणाले.
“ अहो सगळी गाडी भरलेली असते ...आम्हाला दररोज कामा साठी सांगलीला जायला लागते ...आमच्या कडे पास आहे. आम्ही सुद्धा पैसे भरतो. इथे लोकांना उभे राहायला जागा नाही ..आणि तुम्ही झोपता? ..एका तासाचा तर प्रश्न आहे ...बसा गप गुमाने ...उगीच सकाळी सकाळी डोक्याला ताप देऊ नका …” तो आडदांड आणि लाल डोळ्याचा माणूस म्हणाला. तो बराच गरम डोक्याचा असावा. तो बहुदा या सगळ्यांचा म्होरक्या असावा . कदमांनी मनातल्या मनात त्या माणसाचे नाव चिडक्या असे ठेवले.
हे सगळे जवळ जवळ १० जण होते. उगीच यांच्या नादाला लागायला नको , असा एक विचार कदमांच्या मनात आला . मग त्यांना आपलीच लाज वाटली . आपण आपल्या विद्यार्थ्यांना किती वेळा सांगतो . अन्याय सहन करणे हे त्या अन्यायाला पाठींबा देण्यासारखे आहे. मग आपण काय करतो आहे. ?
मग त्यांना कुठे तरी वाचलेले आणि त्यांना खूप आवडलेले एक वाक्य आठवले ..
“ दुर्जनांची सगळी ताकद .. ते संख्येने कमी असून सुद्धा ...आपल्या विरुद्ध सज्जन काहीही करणार नाहीत ..ते शेपूट घालून गप्प बसतील या एकमेव विश्वासात असते.”
त्यांना परत नेहमी पडतो तो प्रश्न पडला दुर्जन जेव्हडे पटकन एकत्र येतात तेव्हडे सज्जन का येत नाहीत ?
तरी सुद्धा प्रोफेसर कदम गप्प बसले . विवेक बुद्धी म्हणा ,किवा सज्जन माणसाचा पुचाट पणा म्हणा ...पण ते गप्प बसले. मनातल्या मनात स्वतःचा धिक्कार करत बसले. थोडा वेळ मग शांततेत गेला. मग त्या आक्रमक कंपू च्या ( म्हणजे हे नाव मनातल्या मनात प्राध्यापक कदम यांनीच ठेवले होते. ) गप्पा आणि हास्यविनोद सुरु झाले. प्राध्यापक कदम आता डोळे मिटून परत झोपेची आराधना करू लागले. त्याच्या मनात आले ,आपल्या मुळे ह्या डब्यातील लोकांची अगोदरच झोप मोड झाली आहे आपण जरा शांत बसावे किवा अगदी हळू आवाजात बोलावे असे विचार त्या आक्रमक कंपू च्या मनात सुद्धा आले नसणार . प्राध्यापक कदम इतिहास शिकवत असत. त्यांच्या अगदी आवडीचा विषय. आपण ब्रिटिशांच्या कडून स्वातंत्र मिळवले ..लोकशाही इतकी वर्षे राबवतो आहोत ..पण लोकशाही आणि झुंडशाही यातील फरक आम्हाला केव्हा समजणार ? या आक्रमक कंपूचे शिक्षक कोण होते ? त्यांनी यांना काहीच शिकवले नाही ? का शिकवूनही यानी काहीच ग्रहण केले नाही ? असे काही तरी विचार प्राध्यापक कदम करत होते. त्यांच्या लक्षात हि आले कि आपण आपल्या रागाला कृती मध्ये बदलू शकत नाही पण नुसते षंडपणे विचारात बदलू शकतो . तेवढ्यात त्यांना एकदम ठसका लागला ...त्यांनी डोळे उघडून पहिले तर त्या आक्रमक कपू पैकी तीन चार जणांनी आता सिगारेट शिलगावली होती . त्याचा धूर सगळीकडे भरून राहिला होता. आता प्राध्यापक कदमांना शांत बसणे अशक्य झाले. सिगारेट ओढणे त्यांना अजिबात आवडत नसे. तो धूर ..तो तंबाखूचा वास सारे काही त्यांना तिरस्करणीय होते.
“ अहो ..तुम्ही सिगारेट काय ओढताय ? असे डब्यात सिगरेट ओढणे हे बेकायदेशीर आहे ..हे तुम्हाला माहित नाही का ?” ते त्या कंपूतील सिगरेट ओढणाऱ्या एकाला उद्देशून म्हणाले. त्या डब्यातील दुसऱ्या कुणीही याला विरोध केला नव्हता ..याचे त्यांना आश्चर्य वाटले.
“ ओ ..साहेब ..आम्हाला कायदा शिकवू नका ..इथे आम्ही करतो तो कायदा ...तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दुसरी कडे जाऊन बसा .. काय मगापासून कटकट लावलीय ? इथे बाकी कुणाला त्रास होत नाही ..होतोय का काका ? “ तो चिडक्याने आपले डोळे मोठे करून समोरच्या सीट वर बसलेल्या एका प्रवाश्याला प्रश्न केला …
त्या बिचाऱ्या काकांनी उगीचच मान हलवली. नरो वा कुन्जारोवा ...हो पण नाही आणि नाही सुद्धा नाही .
“ बघा या कुणाला त्रास होत नाही …” तो चिडक्या म्हणाला आणि एकदम मोठा विनोद केल्यासारखा तो जोरात हसला ..बाकीचा कंपू मग तसेच जोरात हसले.
“ अहो दुसरी कडे काय जाऊन बसा ? हा बर्थ मी राखीव केला आहे ..तुम्हीच येथे घुसलेले आहात ...तुम्हीच बाहेर जा ..तुम्हाला सिगरेट ओढायची असेल तर …” प्राध्यापक कदम आता जरा चिडले होते. या सिगारेट च्या धुराचा त्यांना जरा जास्तच त्रास होत असे ..वरच्या बर्थ वरील बायका सुद्धा आता आपला पदर तोंडावर घेऊन बसल्या होत्या. पण कोणीही या लोकांना विरोध करत नव्हते.
“ तुम्हाला सांगून समजत नाही का ? आम्ही सिगारेट ओढणार ...ए रम्या ..ते डब्याचे बाहेरचे दार जरा उघड रे ...धूर जरा बाहेर जाऊ दे ...या साहेबांनी फारच तमाशा लावलाय …” चिडक्या म्हणाला. तो जो कोणी रम्या होता त्याने एक दोन रांगा पलीकडे असलेले दार उघडले ...जोरदार वारा भसकन आत आला ...तसेच गाडीचा खड खड ...खड खड असा लयबद्ध आवाज.
“ आता खूष ? साहेब ...आता गप्प पडा आणि आम्हालाही शांत पणे सिगरेट ओढू द्या. “ एखाद्या शिवी सारखा “साहेब “ याचा उच्चार करत तो चिडक्या म्हणाला .
प्राध्यापक कदम आता उठले ..दोन बाकांच्या मध्ये ते उभे राहिले ..त्या कंपू कडे आणि त्यातल्या त्यात त्या चिडक्या कडे पहात ते म्हणाले …
“ मी या सगळ्याबद्दल तक्रार करणार आहे … तुमचा उद्दाम पण मी चालवून घेईन असे समजू नका ..ही सरकारी गाडी आहे ...कायदे कानून काही आहेत कि नाहीत ?.”
“ करा ...अगदी अवश्य तक्रार करा ...आमचे फोटो सुद्धा काढा ..मोबाईल आहे ना ? काढा आमचे फोटो ...ए रम्या ..आणि तुम्ही सगळे नीट लाईन मध्ये उभे रहा ...काढा आमचा फोटो ...चांगला आला पाहिजे बर का ? “ तो म्हणाला आणि तो आता उभा राहिला होता ..बाकीचे पण उभे राहिले होते.
“ ओ ,साहेब ..जाऊ दे ..उगीच यांच्या नादाला लागू नका ..” समोरच्या बाकावर अंग चोरून बसलेला एक प्रवासी म्हणाला .
“ अहो ..गप्प बसून कसे चालेल. आपली बाजू सत्याची आहे ..आपण सगळे घाबरून गप्प बसतो त्या मुळे यांचे फावते. आपण संघटीत झालो तर ..हे काही करू शकत नाहीत …” प्राध्यापक कदम आपला फोन खिशातून काढत म्हणाले …
“ बरोबर आहे त्यांचे. पण सत्य आता आमच्या बाजूचे हाये बरका ! बघा आम्ही धा ..आणि हे एकटेच …” त्या कंपूतील तो रम्या असे नाव असलेला जरा बेरकीपणे म्हणाला. प्राध्यापक कदम नी फोटो काढला आणि ते आपला फोन आपल्या खिशात ठेवणार ...तेव्हढ्यात तो चिडक्या पुढे झेपावला आणि त्यांच्या हातातून फोन त्याने हिसकावून घेतला आणि थोडा पुढे होत दारातून बाहेर भिरकावून दिला ...प्राध्यापक कदम एकदम स्तंभित झाले त्यांचा चेहरा बघून तो आक्रमक कंपू एकदम खदाखदा हसायला लागला …
“ आमचे फोटो काढतो ? आता गप्प बसा जागे वर ...नाही तर आत्ता फोन टाकला ..तसा तुला पण बाहेर टाकीन ..” चिडक्या आता खरेच खवळला होता. इतका वेळ साहेब साहेब म्हणणारा चिडक्या आता प्राध्यापक कदमांना अरे तुरे ..म्हणायला लागला होता.
प्राध्यापक कदम एक दोन क्षण गोंधळून गेले ..बाकीचे सगळे सगळे सुद्धा आता पुढे काय होणार या कडे उत्सुकतेने पहात होते.
प्राध्यापक कदम एकदम पुढे झाले आणि हात उंच करून त्यांनी संकटकाळी गाडी थांबवण्यासाठी असलेली चेन ओढली.
“ मी तुमच्या विरुद्ध तक्रार करणारच ...सत्याचा शेवटी विजय होतो हे तुम्हाला कळेल ..” प्राध्यापक कदम काय बोलत होते हे त्यांचे त्यांना सुद्धा समजत नव्हते. चेन ओढलेली पाहताच चिडक्या एकदम बेफान झाला. तो एकदम ओरडला.
“ xxxx … चेन ओढतो ..? तुला दाखवतोच माझा इंगा … धरा रे याला आणि द्या खाली टाकून …” असे म्हणत त्याने कदमांचे पाय धरले . दुसऱ्या दोघानी त्यांना त्यांच्या काखेत हात घालून उचलले आणि ते उघड्या दाराकडे निघाले. प्राध्यापक कदम आता जीवाच्या आकांताने हात पाय झटकू लागले आणि ओरडू लागले
“ वाचवा ..वाचवा …”
डब्यात एक भयाण शांतता पसरली . कोणी ही विरोध केला नाही .. डब्यातील काही लोक “ अरे सोडा त्याला ..सोडा “ असे ओरडू लागले पण चिडक्या आणि त्याच्या तीन चार साथीदारांनी प्राध्यापक कदमांना उचलून आता दारापर्यंत आणले होते आणि काही कळायच्या आत उघड्या दारातून त्यांना बाहेर भिरकावून दिले. नुकतेच तांबडे फुटत होते पण अंधार अजून पूर्णपणे सरला नव्हता.
प्राध्यापक कदमांना सगळ्यात पहिल्यांदा जाणवला तो अंगावर भसकन आलेला गार वारा आणि अजूनही भोवती दाटून असलेला अंधार .. एकदम त्यांच्या बायकोचा आणि गोड मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि मग एकदम कशावर तरी त्यांचे डोके आपटले . त्यांना शेवटची जाणवली ती एक जीवघेणी कळ …आणि शेवटी पसरला .. एक गडद , न संपणारा आणि त्यांना गिळून टाकणारा अंधार.
“ सत्याचा विजय असो….” तो चिडक्या,रम्या आणि त्याचे दोन तीन मित्र ओरडले आणि त्यांनी दरवाजा लाऊन घेतला. त्या दुर्दैवी डब्यात मग एक भयाण शांतता किती तरी वेळ रेंगाळत राहिली. त्या डब्यातील काहीही न करता शांत बसलेल्या लोकांना लोकशाहीचा अनुभव होता. नेहमी सत्याचाच विजय होतो ...पण कुणाची बाजू सत्याची आहे हे बहुमताने ठरते. आत्ता इथे दहा विरुद्ध शून्य मतांनी असे निसंदेह ठरले होते ..शंकेला वावच नव्हता. चिडक्या आणि त्याच्या मित्रांची बाजूच सत्याची होती. सत्याचा नेहमी सारखा विजय झाला होता. तो वेडा माणूस हकनाक आपल्या कर्माने बळी गेला होता. सत्याला केलेला विरोध केव्हाही खपवून घेतला जात नसतो . असा विरोध जागच्या जागीच उखडून टाकायचा असतो ..नाहीतर तो वाढत जातो.
गाडीचा वेग आता कमी होत होता. थोड्याच वेळात रेल्वेचे अधिकारी चेन कोणी खेचली हे पाहायला येणार होते.
“ माणूस खाली पडला म्हणून चेन ओढली ..असे सगळ्यांनी सांगायचे ...नाही तर माझ्याशी गाठ आहे …” चिडक्या सगळ्या प्रवाश्यांकडे रोखून बघत म्हणाला. त्याच्या सगळ्या मित्रानी त्याला होकार दिला . सगळे प्रवासी घाबरून गेले होते आणि कुणीही काहीही बोलायच्या मनःस्थितीत नव्हते. नाहीतरी अतीव भिती माणसाला बधीर, मुका आणि आंधळा करून टाकते.
त्या डब्यातील काही सुजाण प्रवाशांच्या मनात बाहेरचा सरता अंधार ,त्यांच्या नकळत उतरत होता. आता तो बरेच दिवस त्यांच्या बरोबर राहणार होता ...त्यांच्या षंडपणाचा पुरावा म्हणून. पण मग हळू हळू तो सुद्धा नाहीसा होणार होता .जगाचे रहाट गाडगे पुन्हा तसेच सुरु राहणार होते.
(टीप. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण हिंदुस्थानात असे कधी घडले नसेल किवा असे कधी घडणारच नाही याची खात्री मला तरी नाही. )
**************************************************************************************
जयंत नाईक .
💬 प्रतिसाद
(58)
J
Jayant Naik
Tue, 11/03/2020 - 06:55
नवीन
आभारी आहे.
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 11/04/2020 - 06:29
नवीन
पचायला जड जातंय. :)
टिसीने अस्खलित शिव्या दिल्या नि पोलिसांनी 'ऐकून घेतल्या?"
"पुलिस से ना दोस्ती अच्छी ना दुष्मनी"
- सिंघम
#मोलाचा संदेश
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Wed, 11/04/2020 - 08:46
नवीन
सर्व पोलिस विनातीकीट होते, कायद्याचे उल्लंघन करुन तीकीट असलेल्या प्रवाशांच्या सीटस बळकाउन झोपले होते. आणी हे बहुतेक त्यांचे नेहमीचेच होते.
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Tue, 11/03/2020 - 11:45
नवीन
हा अनुभव आह्माला ही आला आहे. स्वराज एक्सप्रेस ने जाताना मध्यप्रदेश मध्ये ४ ते ५ जणांचा ग्रुप जागेवरुन अरेरावी करत होता. त्यांना हटकले असता ते रेल्वेचे खेळाडु असुन त्याच्याकडे पास अस्ल्याच सांगु लागले. संध्याकाळी ५/६ ची वेळ होती व कोणीही वाद घालायच्या मुड मध्ये नव्हते त्यामुळे दिले बसायला.
अशा घटना/बात्म्या वाचल्या आहेत.
Press Trust of India/NDTV Updated: May 18, 2013 11:29 pm IST
Man thrown out of speeding train
Greater Noida: A clash over seat took an uglier turn when a young man was thrown out of a speeding EMU train near Maripat station, leaving him critically wounded.
Satish (28), a resident of Aligarh and working in a Delhi company, was going from the national capital to Aligarh by the train when some passengers boarded from Ghaziabad station.
A clash broke out over seat between Satish and the passengers.
When the train neared Maripat station, some passengers threw him out of the train.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 11/03/2020 - 13:23
नवीन
(टीप. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. पण हिंदुस्थानात असे कधी घडले नसेल किवा असे कधी घडणारच नाही याची खात्री मला तरी नाही. )
हेच तर दुर्दैव आहे!
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Wed, 11/04/2020 - 04:01
नवीन
म्हणून एक विचारतो आहे.
इथे बर्याच जणांच्या मते सदर कथेत घडले तसे भारतात घडणे सहज शक्य आहे.
प्रगत देशांमधे म्हणजे युएस,युके,जर्मनी,फ्रान्स,अॉस्ट्रेलिया,जपान या देशांमधे रेल्वेत अशी दादागिरी होते का? कोणीही कोणत्याही डब्यात शिरणे, धावत्या रेल्वेत लुटणे , मारामारी , तिकीट तपासनीस बेजबाबदार असणे वगैरे? तिथे असे काही गैरप्रकार होत नाहीत का?
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 11/04/2020 - 07:55
नवीन
स्वातंत्र्यपूर्व काळात दोन धटींगणांनी एका भारतीयाला ट्रेनमधुन बाहेर काढले होते.पुढचा इतिहास तर सर्वश्रुतच आहे.
- Log in or register to post comments
V
Vinayak Khot
Sun, 09/12/2021 - 13:24
नवीन
तुमच्या लेखातील हा विचार एकदम करेक्ट आहे - "त्यांना परत नेहमी पडतो तो प्रश्न पडला दुर्जन जेव्हडे पटकन एकत्र येतात तेव्हडे सज्जन का येत नाहीत ?" योग्य असो की नसो, वस्तुस्थिती अशीच आहे.
गोष्टीचा अखेर सुद्धा अनपेक्षित आणि मनाला चटका लावणारा आहे. त्याच्यावर जो अत्याचार झाला त्या बद्दल वाईट वाटतेच पण त्याहीपेक्षा त्याच्या मदतीला कोणीही येत नाही ही ज्यास्त दुःखाची गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2