मनाचिये गुंती
नमस्कार मागील काही महिन्यात जी उलथापालथ माझ्या जीवनात झाली,ती या चार छोट्या लेखात मांडली. त्यामालिकेतील हा शेवटचा भाग.
आपल्या प्रतिक्रिया वरून आपल्या ला हे लिखाण भावले आवडले असे दिसते.छान वाटले.धन्यवाद.हा भाग कसा वाटला कळवावे.
४
मनाचिये गुंती..
गणेश चतुर्थीच्या दिवशी रुग्णालयात गेलो.एंजिओप्लास्टी होऊन,सहा दिवसांनी ,महालक्ष्मीचे शेवटचे दिवशी, घरी परतलो.
माझी जीवनशैली ,प्रकृती ,सवयी इ.लक्षात घेता मला हार्ट एटॅक यावा हा मलाच नाही तर मला ओळखणारे सर्वांसाठी धक्काच.अगदी शिस्तबद्ध नसलो तरी मी बेशिस्त ही नाही. वयाचे चौसष्टावे वर्षीही प्रकृती ठणठणीत.मधुमेह वा रक्तदाब नाही.अस्थम्यासाठीचा इनहेलर सोडता कुठलेही औषध चालू नाही. कुठलेही व्यसन नाही.आहार ही साधाच.
हॉटेल वा बाहेरचे चमचमीत मसालेदार खाणे क्वचित.वीस वर्षापासून नियमितपणे योगासने ,फिरणे असते.वजन पण नियंत्रणात आहे .मागील नोव्हेंबर मधे आरोग्य तपासण्या
केल्या होत्या .त्या पाहून डॉक्टरांनी अभिनंदन केले व 'तरुणाला लाजवेल असे रिपोर्ट आहेत 'असा शेरा मारला.
मित्र परिवार असा नाही. पण वाचन ,संगीत ऐकणे या छंदामुळे ती कमी जाणवत नाही. गृहसौख्य चांगले. कुठली
जबाबदारी नाही.आर्थिक आघाडी समाधान कारक.
जे आहे ते खूप भरभरून मिळाले हीच भावना आहे .
करोना मुळे घरी काम करणारी माणसे येणे बंद झाली, तेव्हा घरातील कामे ,अगदी स्वयपांकापासून,घराची स्वच्छता ,भांडे धुणे इ.कामात मनापासून सहभागी असायचो.बाहेरची कामें खरेदी वगैरे पण मीच करत असे.
करोना काळात एक शिस्तही लागली.रोज सकाळी गच्चीवर कोवळ्या सुर्यप्रकाशात योगासने,सूर्यनमस्कार ,
ध्यान इ.मग घरातील कामे. नातू मैत्रू त्या काळात चार महिने सोबत होता.त्याच्यासोबत खेळणे मस्तीमधे वेळ जाई.संगीत ऐकणे तर आहेच , अवांतर वाचना सोबत दुपारी ज्ञानेश्वरी,दासबोध,भागवत ई.चे घरी सामुहिक वाचन होत होते .संध्याकाळी अर्धा तास घराचे गच्चीवर फिरणे हा नीत्यक्रम होता. टिव्ही वर सिनेमे, अधून मधून वेब सीरीज पाहाणे,कॉम्प्युटर वर गाणी ऐकत पत्त्यांचा खेळ, शिवाय
वाटसएप, फेसबूक यूट्यूब.इ.मधे वेळ जात असे.कधीतरी थकवा जाणवायचा. धाप लागायची.पण ते जुना मित्र 'अस्थम्याशी' संबंधीत असणार हेच मनात. एकंदरीत आपण साठीचे मध्यावर आलो तरी पूर्णपणे तंदुरुस्त आहोत हा विश्वास वअभिमान पण असे.या वयात ही अगदी मुंबई, पूण्याहून औरंगाबाद पर्यंत एकटा गाडी चालवत असे.पण
हा झटका बसलाअन स्वतः विषयीचा अभिमान हे अज्ञान होते,हे ज्ञान झाले .
डॉक्टरांशी बोलण्यातून कळले की वरवर तंदुरुस्त दिसणारे शरीर ,आपल्याला वा इतरांना'आदर्श 'वाटणारी आपली जीवन शैली,यावरून आपल्याला हृदयरोग होणारच नाही हा गैरसमज आहे .आनुवंशिकता,अति काळजी करणे,
भावनाप्रधान,अति संवेदनशील,स्वभाव हे पण ह्रदरोगास कारणीभूत होऊ शकतात .
एकतीस वर्षापूर्वी वडील हार्ट एटॅक ने गेले होते. ही बाब तर खरी. पण त्याचा काही परिणाम माझ्या वर असा होईल असे कल्पनेतही वाटले नव्हते.
स्वभाव निश्चित संवेदनशील आहे. स्वतः व कुटुंबच नाही, तर इतरांची पण काळजी करण्याचा आहे.करोनाआल्या पासून, लोक नियम पाळत नाहीत याचा त्रास व्हायचा. त्यापायी अनेकांशी वाईटपणा ही घेतला.त्याचे पडसाद मनःपटलावर उमटले असावेत.
जीवनात,बरेवाईट प्रसंग तर येतातच.मागच्या काही वर्षात अनेक अनपेक्षित धक्के बसले.परिस्थितीत बदल झाले.
"सुख सुख म्हणता हे दुःख दाटुन आले"असे प्रसंग आले. नोकरीत मान सन्मान मिळाला. पण शेवटी अपेक्षाभंग,
उपेक्षा,अपमानासही तोंड द्यावे लागले. अर्थात निवृत्ती नंतर अनेक चांगली, सामाजिक कामे हातून झाली.त्याचे कौतुकही झाले.हे समाधान आहे.
तरीही गलिच्छ राजकारणामुळे जे मिळायला हवे होते ते मिळाले नाही,हातून निसटले.लायकी असूनही जे हवे ते आपल्याला न मिळता इतरांना मिळाले,याची रुखरुख कुठेतरी खोलवर आत दडून बसलेली असावी .
अगदी जवळची माणसेअनपेक्षितपणे गेली.सोडून गेली.
नकळत त्याचा परिणाम पण प्रकृती वर झालाअसावा.
चंचल मन ,सतत निरर्थक विचारात भटकत असते.काय काय दडवून ठेवलेले असते आत ;आपणच,तिथे आपल्याही नकळत ते कळत नाही.दिसतही नाही. मनाच्या अंधार कोठडीत,भूतकाळातील बंदिस्त असलेली भुतावळ ,काही तत्कालीन कारणांनी मुक्त झाली,अन त्यांनी हल्लाबोल केला असे घडलेअसेल?
हार्ट एटॅक कारणांचे शोध घेण्याचे प्रयत्नांत,हाती लागले ते असे विखूरलेले तुकडे.एकसंघ चित्र गवसत नाही.जे गवसलेली वाटते ते खरे ऊत्तर आहे का माहिती नाही.
खूप विचारांती शेवटी वाटले; अहंकार,त्या पोटी उद्भवणारे गैरसमज,रागादी अनेक विकार, विखार,या सगळ्यांचा गुंता मनात झालेला असतो. तोच याच्या मुळाशी असेल का?.
ज्ञानेश्वर माऊली सारखा एखादाच महामानव ,
"मनाचिये गुंती गुंफियला शेला "ही किमया करू शकतो.
माझ्या सारखा एक सामान्य माणूस काय करू शकतो?
स्वतःलाच प्रश्न.मग मीच मला दिले उत्तर आणि आश्वासनही ,स्वतःला. .
मनाच्या गुंत्यातील किमान काही धागे उकलण्याचा प्रयत्न करीन .एंजिओप्लास्टी नंतरचे आयुष्य,हा देवाने दिलेला बोनस /प्रसाद आहे, म्हणून स्विकारून आनंदाने जगेन.आपण समाजाचे काही देणे लागतो .ते फेडण्याचा प्रयत्न करीन.हे जग सुंदर आहे.जाताना ते आणखी सुंदर करायचा प्रयत्न करीन.
नीलकंठ देशमुख .
'आपण समाजाचे काही देणे लागतो .ते फेडण्याचा प्रयत्न करीन.हे जग सुंदर आहे.जाताना ते आणखी सुंदर करायचा प्रयत्न करीन.'
ह्या अतिशय महत्वाच्या विचाराकडे जाऊन थांबले आहे. आपण कोणाचे काहीही देणे लागत नसतो असे वाटत असले तरीही आपल्या असण्याचे काहीतरी प्रयोजन असते, मोठ्या जीग-सॉ पझलचा आपण एक तुकडा असतो. तो कसा फीट करायचा पझल मधे ते आपल्याला माहिती नसते पण 'आपण समाजाचे काही देणे लागतो .ते फेडण्याचा प्रयत्न करीन' हा विचारच आपल्याला योग्य दिशेकडे नेतो आणि आपल्या असण्याचा हेतू साध्य करतो आणि आपण पझलमधे फीट बसतो.🎯
अखंड आणि अविरत विचारप्रवाहच सर्व भावनांचे आणि पर्यायाने विकारांचे कारण आहे. त्या विचारांना थांबवून विकारमुक्त होणं ही साधना तुम्ही आता बोनस मिळालेल्या आयुष्यात जोमाने करा. तसं करतना समाजाचे देणं आपसूकच फेडलं जात राहिल. - (मनाच्या गुंत्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी