मामलेदार नावाचं गारूड
काल मामलेदार मिसळ चे जनक गेले आणि प्रकर्षाने तात्याची आठवण झाली. ज्या संकेतस्थळाचं नाव मिसळपाव आहे त्यावर मामलेदार मिसळ विषयी काही तरी लिहावे अशी अतीव इच्छा झाली.
या संकेतस्थळाचा जनक तात्या अभ्यंकर आणि मामलेदार मिसळ म्हणजे तात्याचा जीव की प्राण.
बाहेरून आलेल्या कुण्या जालमित्राला मामलेदार ला घेऊन जाणं हा तात्याचा छंदच.
काल लक्ष्मण शेठ गेले आणि सर्व प्रसारमाध्यमांनी त्याची आवर्जून दखल घेतली, खास करून व्हॉट्स ॲप वर अनेकांनी मामलेदार मिसळ वर भरभरून लिहिलं. मामलेदार मिसळ ही ठाणे शहराची एक ओळखच.
आमंत्रण हे त्याचं जरा कौटुंबिक सामाजिक रूप. पण तिथे सुद्धा लाईन असतेच, फरक इतकाच की मूळ जागी आडवी लाईन तर आमंत्रण पहिल्या मजल्यावर असल्याने जिन्यावर उभी लाईन.
अट्टल मिसळबाजांच्या मते खरी मजा मूळ छोटेखानी जागेत रांगेत उभं राहून आणि गर्दीत बसून खाण्यातच. मित्रमंडळी जमून मामलेदार ला जायचं आणि लाईन लावायची अगदी टोकाला कांदा कापत बसलेल्या पोरापर्यंत. दारावरचा पोऱ्या प्यासा मधल्या गुरूदत्त ची फेमस पोज घेऊन उभा असायचा. मापात पाप नाही, जितके आतून बाहेर पडतील तितकेच लाईनवाले आत जाणार. नेहमी जाणारे आमच्या सारखे पोऱ्या 'फक्त चार' बोंबलत असतानाही बेधडक पाचच्या घोळक्याने दडपून आत शिरायचो, वर त्याला 'राजा तू कशाला टेन्शन घेतो, आम्ही सांगतो शेठला' असं सांगायचो. नंबर लागला म्हणजे परब्रह्म भेटले! मग आंत शिरताच हात वर करून 'नमस्कार' असं अभिवादन गल्ल्यावर बसलेल्या बाळूशेटना करून लगबगीने दोनच्या बाकड्यावर तीन फीट्ट् बसायचो. ईथले सराईत सहज ओळखता यायचे. नवखा माणूस समोर उभा टाकलेल्या वेटरला क्या अच्छा मिलता है असं विचारणार किंवा मेनू कार्ड लाव म्हणताच समस्त जनांना तो *** पहिल्यांदाच आलाय हे समजायचं. एक तर काय मिळतं विचारणार आणि तेही हिंदीत म्हणजे भाऊ नवखा किंवा चुकून आलेला.
तिथे खाणं हा एक मोठा पद्धतशीर कार्यक्रम. आत शिरल्यावर सरळ रिकाम्या जागी बसून घ्यायचं, समोरच्या खरकट्या बशांची पर्वा न करता आपल्या दिशेने येणाऱ्या वेटरला फक्त बोटं वर करून ' तिखट' वा ' मिडियम' अशी ऑर्डर द्यायची अर्थातच मिसळ हा शब्द न उच्चारता. नेहमी जाणाऱ्या परिचितांना रस्सा मागवायची गरज पडायची नाही, खाणाऱ्याच्या बशीतली मिसळ कोरडी पडलेली दिसली की मागवायच्या आधीच वेटर रश्शाची बशी ओतायचा.
ती पुसुन पुसुन सनमायक्यावरील डिझाईन गायब झालेली टेबलं, वर मालगाडीच्या डब्यागत लावलेले पाण्याचे ग्लास ही मिसळीची नांदी.
चाळीस एक वर्षांचा राबता. अनेक आठवणी. ती गर्दी, जागा मिळाल्याचा आनंद, भर गर्दीच्या डोक्यावरून तुकारामांच्या गाथेगत तरंगत येणारं गरमागरम रश्श्याचं तसराळं, कुणाची बर्फाची फर्माईश असा जबरदस्त माहोल मिसळ आपली साथीला. बर्फावरुन आठवलं: एकदा एका गिऱ्हाईकाने टेचात ऑर्डर दिली, ' दोन तिखट, बिगर बटाटा' मस्त झणझणीत आण, बर्फ लागला पाहिजे. पोऱ्या मिसळीबरोबर बर्फही एका बशीत घेऊन आला. बर्फाकडे पाहत गिऱ्हाईकानं विचारलं'हे काय'? पोऱ्या म्हणाला तुम्ही बोललात ना बर्फ लागला पाहिजे म्हणून? खदाखदा हसत ते दोघे म्हणाले अरे बर्फ लागला पाहिजे म्हणजे उद्या सकाळी लागला पाहिजे. सगळे जोरदार हसले. इथे एक से एक तिखट खाणारे पाहायला मिळाले, तिखट मिसळ पाव न घेता नुसती खाणारे. मला तिथे येणारे एक गुरूजी अजून आठवतात. धोतर, पांढरा सदरा काळी गोल टोपी अशा पोशाखात येणारे हे गुरूजी नुसती उसळ चापून खायचे, वर तर्री मागवायचे.
तिखट, मिडियम व लाईट अशा तीन श्रेणी असल्या तरी माल एकच, फरक असतो तो ढवळण्याचा आणि डावाच्या खोलीचा. आणणाऱ्याचा मूड खराब असेल तर त्या दिवशी मिडियमसुद्धा पाणी काढायची. इथे समाजवाद खऱ्या अर्थाने पाहायला मिळायचा. गाडीवाला आणि हातगाडीवाला एकाच बाकड्यावर खेटून बसून खाताना सर्रास दिसायचे. पण चेहऱ्यावरील तृप्ती आणि नाकावरचे, कपाळावरचे घर्मबिंदू सारखेच
एकदा मी तात्या, पेठकर साहेब आणि आणखी एक दोघं मामलेदार ला गेलो होतो, अर्थातच रविवार असल्याने मैफिल आमंत्रण ला रंगली. एकदा मी हापिसात असताना तात्याचा फोन , ' अरे साक्षी, आपला नंदन आलाय सध्या इकडे, आज त्याच्याबरोबर मामलेदार ला आलोय बोल त्याच्याशी. एकदा संतोषकडे मामलेदार मिसळ कार्यक्रम झाला होता. संतोषकडचा एक आचारी बरोब्बर मामलेदार मिसळ बनवायचा, त्याला बोलावून संतोष कडे मिसळ पार्टी झाली होती. मी , तात्या , रामदास नक्की आठवतंय पण आणखी काही मिपाकर होते, मध्यरात्र झाली संपेपर्यंत पण मजा आली.
काल मामलेदार मिसळवाले लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर गेल्याचं वाचलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या
तरच
आमंत्रण मध्ये जायचे कारण तेथे मामलेदाराचे वातावरण नाही. फ्रॅन्चायजी मध्ये तेवढा दम नाही हे सत्य परंतु त्यांचे पार्सल घरी घेऊन येणे हि सर्वानी१०-१५ जण असतील तर ( सह कुटुंब सह परिवार) उठून जायच्या ऐवजीची सोय आहे. त्यांचा रस्सा पातळ असतो आणि फरसाण मध्ये फक्त गाठ्या पापडी असते. यामुळे आम्ही अमूलचे ताक आणि डीप फ्रिजरमध्ये ठेवायचे, वेगळे फरसाण आणायचे आणि प्रत्यक्ष खायच्या वेळेस रस्सा एकदम गरम करून घ्यायचा असे करून दुधाची तहान ताकावर भागवतो. अजून एक आठवण म्हणजे आमचे डॉक्टर मित्रवर्य यांच्या बरोबर रविवारी सकाळी आमंत्रण किंवा आम्हाला सुटी असली तर मामलेदार सकाळी ७ वाजता अर्धा पाऊण तास तळ्यात बोटिंग करून (ठाण्याच्या तळ्याचे बोटिंगची मालक हे त्याचे रुग्ण असल्यामुळे वेळ काळ याचे बंधन नसे) मग मिसळ खाऊन भाजल्या तोंडाने तेथेच चहा पिऊन आपली सुटी/ रविवार साजरा करत असू