Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बॅंक- एक भयाण अनुभव

श
शब्दानुज
Fri, 12/18/2020 - 06:38
💬 12 प्रतिसाद
आज महत्वाचे काम होते बॅंकेचे. काहीही करून ते आजच पूर्ण करायचे होते. काम तसे पाच मिनिटाचेच होते. पण पुर्वानुभव लक्षात घेता चांगला एक - दीड तास बाजूला काढून ठेवला होता. गाडी चालू केली की लक्षात आले पेट्रोल संपले आहे. बहुधा माझ्या मुलाने संपवले असावे. रोजचे दोन - दोनचे 'पॅक' संपतात म्हणजे काय ? एवढे काय फिरायचे असते काय माहिती ! एकचा नवीन पॅक टाकून मी गाडी सुरु केली. मुख्य रस्यावर पोहचलो तर स्त्यावर ही मोठी गर्दी. कसाबसा बॅंकेच्या गेटपर्यंत पोहचलो. तिथे एक वॉचमन निर्विकार चेह-याने माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. गेट उघडायला तो तयारच होईना. "आधी मला ड्रेस बदलून 'अपडेट' होऊ द्या मगच आत जाऊ देईन!" इति वॉचमन. "अरे पण परवाच तर हे अपडेटचे प्रकार झाले होते ना ? मग आता काय पुन्हा ? आणि जेव्हा गडबड असते तेव्हाच तुम्हाला असले प्रकार करायचे असतात का ? जा एकदाचा हो पटकन अपडेट. " हळूहळू माझा पारा आता चढू लागला होता. शेवटी एकदाचा तो 'अपडेट' होऊन आला. माझ्याकडे एकदा पाहिले आणि "आयडी दाखवा" अशी आज्ञा दिली. मी गपगुमान आयडी काढून त्याच्या हातात ठेवले. एकदा आयडीकडे आणि एकदा माझ्याकडे तुच्छतेने पाहात तो उद्गारला ," आयडी जुना झाला हा. नवीन काढा जा. नवीन फोटो काढा तो लावा इथे. " मी खिशातला एक फोटो काढून दिला " लाव तो त्यावर" मी पुटपुटलो. "हे नाही चालणार साहेब. संपुर्ण बॉडीचा फोटो लागतो आता. 'अप्पर बॉडीवर' जोधपुरी कोट , 'लोवर बॉडी'वर एक जिन्स पॅन्ट, डोक्यावर पगडी आणि खिशावर एखादा आकडा असा फोटो काढून आणा. आता दरवेळी येताना तोच ड्रेस घालून यावा लागणार आता. आम्ही तो ड्रेस बघून सोडणार साहेब आत. आणि तुमचा ड्रेस तुम्ही दुस-याला देऊ नका. नुकसान झालं तर आम्हाला माहिती नाही. " शेवटी एकदाचा तसला ड्रेस घालून मी बॅंकेत आलो. आता समोर त्याने एक पाटी ठेवली. " वाचून दाखवा साहेब!" तो पुटपुटला. "अरे पदवीधर आहे मी. हे असले ए , बी , सी , डी कशाला विचारतो ? ते पण किती घाण अक्षर आहे ते. पान खाऊन थुंकला का त्या पाटीवर ? "माझा पारा आता चांगलाच चढला होता. " प्रोसेस आहे साहेब !" तो थंडपणे उत्तरला." ठीक आहे. डी , के , २१ सी " मी हे बोललो आणि त्याने पाटी खाली ठेवली. " चुकलं साहेब. के कॅपीटल होता. आता हे वाचा " माझ्यासमोर त्याने दुसरी पाटी धरली. आता माझा धीर सुटत चालला होता. " ओ .. नाही नाही झिरो , टी , वाय." मी प्रश्नार्थक चेहरा करून वॉचमनकडे पाहिले. "बरोबर आहे साहेब. तूम्ही ' माणूस ' आहात. " इति वॉचमन. " तूम्ही लोक मात्र राक्षस आहात. कूठे फेडाल ही पापे?" मी हे बोलतोय तोपर्यंत मी बॅंकेत पोहचलो होते. आत बॅंकेत गेल्या गेल्या इंशूरन्स काढणारा माणूस त्याची पाटी घेऊन माझ्याकडे धावत आला. " आज काढून टाका साहेब. भविष्य सुरक्षित करा" त्याला कसाबसा मी बाजूला ढकलला. आणि मला पाहिजे असलेला काऊंटर शोधू लागलो . बॅंक आता खूप बदलली होती असे ऐकून होते. ते आता प्रत्यक्षात दिसत होते. काऊंटरची जागा आता टॅबसनी घेतली होती. आधी हा काऊंटर ते तो काऊंटर असा पळत होतो , आता हा टॅब ते तो टॅब असा पळू लागलो. तेवढ्यात नेमका फोन आला. फोन तसा अर्जंटच होता. मी फोन घेतो न घेतो तोपर्यंत वॉचमन धावत आला. " फोन अलाऊड नाही " असे सुनावत मला त्याने बॅंकेबाहेर हाकलले. माझ्या रागाची जागा आता कंटाळ्याने घेतली होती. शेवटी एकदाचा तो फोन झाला. पुन्हा वॉचमनची हुज्जत घालणे , पाट्या वाचून दाखवणे असले प्रकार करून एकदाचा आत आलो. आणि एकदाचा तो कामाचा 'टॅब' सापडला. १२ वर्ष तपस्या केल्यावर परमेश्वराने दर्शन द्यावे त्या थाटात तिथल्या अधिका-याचे दर्शन मला झाले. " माझा मोबाईल नंबर बदलायचा आहे. " मी केविलवाण्या स्वरात बोललो. "तुमच्या कुत्र्याचे नाव सांगा ? " " हा काय प्रश्न आहे ? " " अहो हा सिक्यूरीटी प्रश्न आहे . नाव सांगा . " " अहो मग वॉचमननी झाडाझडती घेतली ते काय होते ? असो. मोनू नाव आहे कुत्र्याचं. " तो अधिकारी ते नाव टाईप करू लागला. " नाव चुकीच आहे साहेब. तूम्ही चोर आहात. आता केवळ दोन संधी आहेत तुमच्याकडे . जर चुकलात तर बॅंकेतून २४ तासासाठी हद्दपार करू. " " अहो थांबा थांबा. त्या मोनूचा 'एम' कॅपीटल करा. " त्या अधिका-याने तसे केले. ते मॅच झाले असावे. " नंबर बोला" . तो पुटपुटला. माझा नंबर मी त्याला दिला. " ओटीपी आला असेल तो सांगा " मी वॉचमन पहात घाबरत मोबाईल बाहेर काढला. "आला नाही ओटीपी अजुन. " मी त्रासिक स्वरात बोललो. " थांबा जरा. " तो तितक्याच थंड आवाजात बोलला. शेवटी एकदाचा तो ओटीपी आला. " सी , बी , टी , क्यू १,८,४, ५ , जी , यू, सी ,सी ...." मला धाप लागेपर्यंत मी ती इंग्रजीची सव्वीस खडी वाचत राहिलो. अणूबॉंम्ब टाकताना सुद्धा एवढा मोठा ओटीपी लागत नसेल अशी माझी खात्री होती.तो ओटीपीचा निबंध वाचून झाल्यावर मी अपेक्षेने अधिका-याकडे पाहिले. माझ्याकडे न पहाता तो बोलू लागला ," जुन्या मोबाईल नंबरवर ओटीपी आला असेल तो सांगा " " जुना नंबर? अहो तो तर बंद पडला म्हणून तर इथे आलो ना ? दुसरा ऑपशन द्या तुम्ही. " "होम ब्रांचला जा" तो असे म्हणतोय न म्हणतोय तोवर वॉचमन आलाच बाहेर काढायला. मी तिथलीच एक खुर्ची पकडून बसलो. " काम होईपर्यंत मी इथून उठणार नाही !" अशी सिंहगर्जना केली. वॉचमन हाताला धरून "ऊठा , ऊठा" असे ओरडू लागला. मी मात्र जागचा हललो नाही. शेवटी वॉचमनने पाण्याचा ग्लास आणून माझ्या तोडांवर पाणी मारले. मी एकदम चमकून जागा झालो. माझी बायको पाण्याचा ग्लास घेऊन माझ्या बेडपाशी उभी होती. "केव्हापासून उठतेयं! आज ते बॅंकेचे काम करून टाका. तेव्हढा नवीन मोबाईल नंबर तर अपडेट करायचा आहे. पाच मिनिटाच काम !" बॅंकेचे नाव ऐकताच मी बायकोचा हातातला ग्लास हिसकावला. त्यातले राहिलेले पाणी गटागटा पिऊन टाकले आणि पुन्हा पांघरूणात शिरलो. तिकडे बायको फिसकारुन बाथरुमकडे निघाली. कदाचित ग्लासऐवजी बादली आणायला गेली असावी. मी भयचकीच होऊन तिच्याकडे पहात राहिलो...

प्रतिक्रिया द्या
6894 वाचन

💬 प्रतिसाद (12)
र
राजाभाउ Fri, 12/18/2020 - 07:25 नवीन
हा हा हा. जबरा !!!!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 12/18/2020 - 07:41 नवीन
ब्वॉक. कसली भीती बसली बँकेची.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/18/2020 - 07:53 नवीन
ब्यांकेची जर इतकी भिती वाटत असेल तर ती घालवण्यासाठी एखाद्या सरकारी हापिसात जा, गेला बाजार मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयात नुसती चक्कर मारा, ब्यांकेची भिती वाटेनाशी होईल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 12/18/2020 - 12:00 नवीन
+१२३४^९८७६ प्रचंड सहमत. बँका तुलनेने फार सरळ, सभ्य, सुस्वभावी असतात. किमान बसायला जागा तरी असते. - (सरकारी ऑफिस टाळणारा) पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ख
खेडूत Fri, 12/18/2020 - 08:05 नवीन
:) आवडले...मस्तच.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Fri, 12/18/2020 - 08:11 नवीन
सरकारी बँकेने दिलेले दु:ख अगदी शब्दाशब्दातुन दिसत आहे...फारच भयाण अनुभव...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 12/18/2020 - 08:15 नवीन
ग्राहक चे काम न करणे हेच ब्रीद असावे बँकांचे.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 12/18/2020 - 08:21 नवीन
मस्त खुषखुशीत! - (बॅकएन्ड बॅंकर) सोकाजी
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 12/18/2020 - 11:21 नवीन
असा प्रकार झाला तर! ऑनलाईन ब्यांकेसारखे जर व्यवहार ब्यांकांच्या ब्रँचमध्ये व्हायला लागले तर लैच औघड होईल. तुम्ही नकळत ब्यांकांना अशी आयडियाच दिली आहे. आता बस्सा! ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 12/18/2020 - 16:53 नवीन
लेख वाचताना सुरुवातीला हा एक खरोखर घडलेला त्रासदायक अनुभव आहे असे वाटले . पुढे वाचताना हे विडंबन आहे हे लक्षात आले .
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 12/29/2020 - 13:04 नवीन
खतरनाक कल्पना विलास ! लै हसलो !
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 12/29/2020 - 23:50 नवीन
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=178379483983835&id=100294205125697 बघा नक्कि
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा