Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अहिराणीचे भवितव्य

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
Mon, 02/01/2021 - 10:56
💬 4 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा. बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या. (सर्वच भाषा आधी बोलीच्या स्वरुपातच अस्तित्वात असतात.) संपूर्ण भारतात आढळून येणाऱ्या बोलीभाषांची संख्या जवळजवळ अठराशे आहे. त्यांपैकी अनेक बोलीभाषा पूर्वीच नष्ट झालेल्या आहेत तर अनेक बोलीभाषा आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंपरेने अशीच एक बोलीभाषा म्हणून अहिराणीचा उल्लेख होत असतो. महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यांमध्ये अहिराणी मोठ्या प्रमाणावर बोलली जात असूनही तिला आजपर्यंत प्रमाणभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. (हा दर्जा आपोआप कोणी देत नाही.) भाषाशास्त्रानेही अहिराणीला मराठी भाषेची एक पोटजात किंवा बोलीभाषा म्हणून तिची उपेक्षा केलेली दिसून येते. प्राचीन काळी अहिराणी अभिर लोकांची भाषा होती. म्हणून तिला ‘अभिराणी’ असं संबोधलं जात असे. कालांतराने तिचा अपभ्रंश होऊन तिला अहिरांची ‘अहिराणी’ संबोधण्यात येऊ लागलं आणि आजही आपण तिला ‘अहिराणी’ म्हणूनच संबोधतो. (अभिर-अहिर-अहिराणी). अभिर लोकांचे संदर्भ रामायण, महाभारत कालखंडातही आढळून येतात. ‘भरताचे नाट्यशास्त्र’ ह्या ग्रंथात अहिराणीचा उल्लेख बोलीभाषा असाच केलेला आहे. ह्या भाषेचा उदयकाल साधारणतः इसवीसनाच्या तिसऱ्या - चौथ्या शतकात झालेला असावा, असे मानले जाते. प्रदेशाच्या नावाने खान्देशात बोलली जाणारी ‘खान्देशी’ तर राजवटीच्या नावाने बागलाण राजवटीत बोलली जाणारी म्हणून तिला ‘बागलाण़ी’ही संबोधले जात होते. मराठी, हिन्दी, गुजराती, राजस्थानी, बंगाली ह्या भाषेतील काही शब्दही अहिराणी भाषेत आढळून येतात. म्हणूनच अहिराणीला कोणत्याही एका विशिष्ट भाषेची पोटभाषा संबोधने सर्वस्वी चुकीचेच ठरेल. बोलीभाषेच्या संदर्भात काही अपवाद वगळता बेजबाबदार लिखाणच अधिक प्रकाशित झालेले दिसून येते. जे बोलीभाषांच्या विकासासाठी मारक ठरते. बोलीभाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशा हेतूने बोलीभाषेतील बलस्थानांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. दुय्यम प्रतीचे लेखन, उदाहरणांचा अभाव, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधाने, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेच्या आततायी कल्पना, दुसऱ्या भाषेच्या संदर्भातील अज्ञान, पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, ठोस पुराव्यांचा अभाव, ऋण मानण्याचा अभाव, गटबाजी, पाहताक्षणीच लक्षात न येणारी जोडतोड करुन लिखाण करणे आदी प्रकारांमुळेच बोलीभाषांचा विकास खुंटलेला दिसून येतो. सर जॉर्ज ग्रिअर्सन (१८५१-१९४६) यांनी भारतातील संपूर्ण भाषांचा सखोल अभ्यास केलेला आहे. क्षेत्रीय व्यापकता, भाषांची संख्या आणि विविधतेच्या दृष्टीतून बघितले तर त्यांचे भाषाविषयक कार्य निश्चितच अनमोल आहे. ह्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती ‘Linguistic Survey of India ’ ह्या नावाने ग्रथित करण्यात आलेली आहे. ह्या ग्रंथाच्या नवव्या भागात त्यांनी अहिराणीच्या संदर्भात आपले मत प्रकट केले आहे. त्यांनी अहिराणीला भिलांची भाषा म्हटले आहे. (ते इंग्रजी मातृभाषिक असल्याने त्यांना भाषा सर्वेक्षणात काही मर्यादा होत्या. भाषेच्या काही साम्य घटकांमुळे त्यांनी तसे म्हटले असावे.) परंतु अहिराणीसुध्दा हिन्दी - मराठी वा अन्य भाषांप्रमाणेच एक लोकभाषा आहे. त्यामुळे केवळ अहिराणीचाच नव्हे तर कोणत्याही भाषेचा संबंध कोणत्याही जाती- जमातीशी लावला तर मानवतेच्या दृष्टीकोनातून ते योग्य ठरत नाही. भाषेमुळे जर व्यक्तीवर विशिष्ट जातीचा शिक्का मारला जात असेल, तर ते बोलीभाषेच्या विकासाला मारक ठरते. लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित होत असते, प्रवाहित होत असते. म्हणूनच कोणत्याही बोलीभाषेचा अभ्यास हा त्या बोलीभाषेतील लोकवाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय अपूर्णच ठरत असतो. लोकवाङ्मयाच्या माध्यमातूनच अदिवासी बंधु - भगिनींच्या श्रद्धा, रीतीरिवाज, पूजा-अर्चना, लोकसंस्कृती, आशा - आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण- उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो. ‘ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ’ ज्याप्रमाणे विचारले जात नाही, त्याप्रमाणे भाषेचे मूळसुद्धा विचारले जायला नको. कारण भाषा ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक संस्कृतीतून उगम पावलेली असते. मग ती कोणतीही भाषा असो. अगदी इंग्रजी असली तरीसुद्धा. आदिवासी बोलीभाषांचे ‘डॉक्युमेंटेशन’ आज आवश्यक झाले आहे. जी माणसं निरक्षर राहिलेली आहेत, तीच केवळ बोलीभाषेतून व्यवहार करताना दिसतात. साक्षर झालेली माणसं मात्र लिखाणासाठी आणि व्यवहारातही प्रमाणभाषेचाच वापर करताना दिसून येतात. मग ते अहिराणी भाषिक असोत की आणखी अन्य बोलीभाषक. ते मराठी, हिन्दी किंवा इंग्रजीतच लिहिण्याचा अट्टहास करतात. मातृभाषेतून संवाद साधण्यातही जिथे कोणाला संकोच वाटू लागतो, तिथे मातृभाषेतून लिखाण तर दुरापास्तच बाब आहे. हा संकोच दूर करण्यासाठीच बडोद्याला स्थापन झालेले ‘भाषा केंद्र’ राष्ट्रीय पातळीवरील ‘ढोल’ हे नियतकालिक दहा भाषांमध्ये प्रकाशित करीत आहे. एकीकडे जिथे बोलीभाषेसाठी न्यूनगंड दिसून येतो, तिथेच दुसऱ्या बाजूला ह्या बोलीभाषांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘ढोल’च्या माध्यमातून प्रयत्नही सुरू झालेले आहेत. आपल्या भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. त्या अन्वये कोणत्याही भारतीय व्यक्तीस आपली भाषा बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तरीही शाळा -महाविद्यालयांमध्ये बोलीभाषेतून शिकवण्यासाठी अरुची दाखवली जाते. लोकांना आपल्या भाषेपासून दूर ठेवणे त्यांची जिभ कापण्यासारखेच असते. म्हणूनच लोकांना आपल्या भाषेपासून वंचित करणे हे लोकअधिकारांचे उल्लंघनच ठरते. भाषा कोणतीही असो, जर ती व्यवहार भाषा, वाङ्मय भाषा आणि ज्ञानभाषा होत असेल तर ती प्रमाणभाषेचा दर्जा आपोआप प्राप्त करु शकते. बोलीभाषांचे संवर्धन करणे हाच ‘ढोल’चा प्रमुख उद्देश आहे. भाषा हे संस्कृतीचे माध्यम आहे. हा उद्देश जर सफल होत असेल तर भारतीय बोलीभाषांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. पण हा ढोल वाजवण्यासाठी नितांत आवश्यकता आहे ती आपल्या सर्व हातांची. (दिनांक १०-१२-२००१ रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ‘लोकअधिकार परिषदेत’ हिंदीत वाचलेला निबंध आणि ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ पुस्तकात समाविष्ट मराठी लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) © डॉ. सुधीर रा. देवरे ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

प्रतिक्रिया द्या
2871 वाचन

💬 प्रतिसाद (4)
उ
उपयोजक Mon, 02/01/2021 - 16:51 नवीन
ही मराठीची तीच बोली आहे का ज्यात ळ हा उच्चार नाहीये?
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Tue, 02/02/2021 - 05:39 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
प
पॉपकॉर्न Mon, 02/01/2021 - 17:32 नवीन
जयगाव, धुये किंवा जडगाव, धुडे (जळगाव, धुळे)
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Tue, 02/02/2021 - 05:40 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉपकॉर्न
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा