खोटं कsssधी बोलू नये!
आयुष्यात प्रत्येकजण खोटं बोलतोच. कधी न कधी. खूप वेळा. काहीजण तर नेहमीच खोटं बोलतात.
मीही अनेकदा खोटं बोलले. लहानपणी तर बरेचदा. "अमुक अमुक कुणी केलं? तू केलंस का?" ह्या आई-वडिलांच्या, मोठ्या भावाच्या प्रश्नाला मी नेहमी,"मी नाही बाई, कुणास ठाऊक, मला काय माहीत?"अशी खोटी उत्तरे दिली आहेत.
"दुधावरची साय कुणी खाल्ली?"-"मी नाही खाल्ली.
"इथलं नेलकटर कुठाय?"-"मला काय माहीत?"
"ह्या डब्यातला सुई दोरा कुठं गेला?"-"मी नाही घेतला. शप्पत. मला माहीत नाही."
खोटं बोलणारेच जास्त शपथा घेतात. तशीच मीही वारंवार शपथ घ्यायची.
लहानपण सरलं. तारुण्य आलं, तशी खोटं बोलण्याची कारणं बदलली.
"किती मार्कस् पडले?"-"चांगले"
"म्हणजे किती?"-"शंभरपैकी त्रेसष्ठ."(त्यावेळी हे मार्कस् चांगले समजले जात.)
"पेपर दाखव."-"मैत्रीणीनं नेलाय".
"तो मुलगा कोण होता?"-"नोटस् द्यायला आला होता. हुशार आहे. त्यांच्यामुळे माझा पण अभ्यास सुधारेल ना?"
"मैत्रीणीकडून का नाही घेतल्यास नोटस्?"-"सगळ्या खडूस आहेत. देत नाहीत." इ.इ.
वय वाढत गेलं तसं खोटं बोलण्याची प्रमाण कमी कमी होत गेलं. नोकरी लागल्यावर बाॅस विचारायचा."काम झालं का?"कामाला हातही न लावता मी उत्तर द्यायची,"होत आलंय सर. थोडंसं राहिलंय. उद्या नक्की देते."
मग लग्न झाल्यावर खोटं बोलण्याची पद्धत बदलली. अंगात ताप असला तरी,कंबर, डोकं दुखणं असलं तरी, मुलाला नवऱ्याला काळजी वाटू नये, त्यांनी घाबरून जाऊ नये म्हणून "मी मजेत आहे. मला काहीही झालेलं नाही." असं मी बेलाशक खोटं बोलायची. मोलकरणीच्या दारुड्या नवऱ्याला मुद्दामच तिचा पगार कमी सांगून वरचे पैसे तिच्या नावाने बॅंकेत खातं उघडून त्यात गुपचूप टाकायची. बाबांनी मुलांना रागावू नये म्हणून मुलाच्या चुका दडवायची. असं खोटं बोलण्याचं स्वरुप बदललं.
आता रिटायरमेंट नंतर खोटं बोलण्याची सवय पार गेली.
आता खोटं बोलायची गरजच भासत नाही. कसं मुक्त, मोकळं वाटतं.
माझं एक खोटं बोलणं मात्र माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. माझ्या लहानपणी आमच्या घरात एक गाय होती. तिला चारा टाकायचं आणि बादलीतून पाणी प्यायला द्यायचं काम माझ्याकडे होतं. मी ते रोज नित्यनेमाने करायची. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी काय झालं,आमची रात्रीची जेवणं झाली. मी आणि ताईनं मागचं सगळं आवरलं. आम्ही गाद्या घातल्या आणि पहुडलो. अचानक माझ्या लक्षात आलं की आज गायीपुढं पाण्याची बादली ठेवायची राहिली. मग मनात विचार आला की राहू दे. एक दिवस राहिलं म्हणून काही बिघडत नाही. आता गादीतून उठून तिच्यापुढे पाणी ठेवायचा कंटाळा आलाय. मी डोळे मिटून घेतले.
वडिलांनी विचारलं,"गायीपुढं पाणी ठेवलंस का?"
"होsss! मगाशीच." मी सरळ थाप ठोकली.
आम्ही झोपलो.
वडील नेहमी आमच्या आधी लवकर उठायचे. त्यांनी उठवल्यानंतर गोठ्याकडे फेरी मारली. गायीसमोर पाण्याची बादली नव्हती. गाय जीभ बाहेर काढून हंबरत उभी होती. त्यांनी गायीसमोर पाणी ठेवलं. आत आले आणि मला हाक मारली. मी त्यांच्यासमोर उभी राहिले.
ते माझ्या अंगावर ओरडले, "गायीसमोर पाणी ठेवलंय असं रात्री खोटं का सांगितलंस? मुकं जनावर ते! त्याला बोलता येत नाही. रात्रभर तहानलेली राहिली ती. मी पाणी ठेवल्यावर ती हपापून पाणी प्यायली. पाणी संपल्यानंतर रिकामी बादली चाटत राहिली. मग आणखी थोडं पाणी घातलं मी. उन्हाळ्याचे दिवस आहेत. जास्त तहान लागते. देऊ का एक ठेवून?”
मी घाबरले. मला वाटलं वडील आता मला मारणार! पण त्यांनी मला मारलं नाही. त्यांनी उभ्या आयुष्यात आम्हां मुलांना कधीच मारलं नाही. त्या दिवशीही फक्त एवढंच म्हणाले," पुन्हा असं होता कामा नये."
मी खालमानेनं होकार दिला. धावत गायीकडे गेले. मला खूप पश्चात्ताप झाला होता. अपराध्यागत वाटत होतं. ऐन उन्हाळ्यात एका मुक्या जनावराला मी रात्रभर तहानलेलं ठेवलं होतं. "मला माफ कर" मी तिच्यापुढे हात जोडले. माझे डोळे पाणावले. पण माझी चूक गायीनं कधीच माफ केली होती. माझ्याकडं पाहून त्या निष्पाप जीवानं शेपूट उंचावली. मी खाजवावं म्हणून मान वाकडी करत आपला गळा माझ्यापुढं केला. मी प्रेमानं तिचा गळा, गाल, कपाळ आणि तिची पोळी खाजवत राहिले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |