बाबा महाराज डोंबोलीकर आणि आर्थिक षडरिपू....
खालील लेख हा तद्दन फालतू असून, खूप विचार करत बसू नका. ज्यांच्या कडे, वेळ नसेल, त्यांनी लेख वाचायची तसदी घेतली नाही तरी चालेल, कारण, खालील लेखांत कुठलेही मौलिक ज्ञान नाही आणि काही मौलिक ज्ञान मिळाल्यास, तो योगायोग समजावा....सर्वज्ञ मंडळींनी, आपला मौलिक वेळ वाया घालवू नये, ही विनंती....
-------------------------------
हळद लागवड झाली आणि मी रिकामटेकडा झालो... आमच्या हळदीचे एक बरे आहे, लागवड करा आणि विसरून जा.हळद येतेच.
ह्या वर्षी हळद लागवड करता करता, मुलाच्या अंगाला पण हळद लावायचा विचार होताच.गावी रहात असल्याने, लवकर लग्न, म्हणजेच, सांसारिक जबाबदारीतून, लवकर मुक्ती, ही विचारसरणी नक्की झाली आहे.
अर्थात, मी जरी काही निर्णय घेत असलो तरी, सल्लागार म्हणून, बाबा महाराज डोंबोलीकर, यांनाच नेमले आहे...नेहमी प्रमाणे, एका प्रवचनांत काम न करता, त्यांनी ह्या वेळी 6 प्रवचने घेतली, त्याचाच गोषवारा देत आहे....
मिपाकर हे उत्तम वाचक असल्याने, जास्त फाफटपसारा लावण्याची गरज नाही.
----------------------
मी: बाबा कसे आहात? मुलासाठी वधुसंशोधन करत आहे.आशीर्वाद हवा आहे.
बाबा:तो तर आहेच पण, नुसते आशीर्वाद देऊन कामे होत नाहीत. जसे, जपजाप्य करत हिंदू धर्म टिकला नाही, तलवार होती म्हणूनच हिंदू धर्म टिकला, तसेच निव्वळ आशीर्वाद देऊन कामे होत नाहीत, काही व्यावहारिक गोष्टी पण पाळाव्या लागतात.
आता मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका.
आपल्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात, आर्थिक संकटे किंवा शत्रू, येतच असतात.
आजारपण, पैपाहुणे, कौटुंबिक वाढदिवस,केळवणे, हे येतात आणि जातात पण,साखरपुडा, लग्न, मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे आणि मुंज, हे खरे आर्थिक षडरिपू...ह्या 6 जणांना जितके दूर ठेवाल तितके आर्थिक बळ वाढत जाते....
आता पहिली गोष्ट म्हणजे, साखरपुडा..... खरं तर ही खूप कमी खर्चिक प्रथा आहे.फक्त घरच्या नातेवाईक मंडळींशी, जिवलग मित्र-मैत्रिणींची, एकमेकांशी ओळख करून देणे, ह्या पलीकडे, ह्या प्रथेला महत्व नाही आणि ह्या गोष्टीला कुठलाही शास्त्राधार नाही.मौर्य काळात ही प्रथा न्हवती.सरळ लग्नच लाऊन देत होते....त्यामुळे, साखरपुडा करण्याची काही आवश्यकता नाही आणि केलेच तर, अतिशय कमी खर्चात करा.
दुसरी गोष्ट म्हणजे, लग्न.....कितीही उत्तम मुहूर्त असला, कितीही उत्तम शिक्षण असले, तरीही विधीलिखित टळत नाही.तडजोड हा सांसारिक जीवनाचा पाया आहे, हे समजले नाही की, काडीमोड किंवा घुसमट, ही ठरलेलीच.
कोर्टात केलेले लग्न पण टिकते आणि मुहूर्त पाहून, मनसोक्त खर्च करून केलेले लग्न पण टिकत नाही. बाबा आमटे, पुल देशपांडे, डाॅक्टर कोल्हे ह्यांनी कोर्टात लग्न केले आणि ते उत्तम टिकले, ह्या उलट, राजेश खन्ना, हृतिक रोशन, यांच्या लग्नाचा फियास्कोच झाला.कोर्ट मॅरेज, हा आर्थिक दृष्टीने एकदम योग्य पर्याय आहे आणि वैदिक पद्धतीने, कमीत माणसांच्या साक्षीने केलेले लग्न हा मध्यम पर्याय आहे.
तिसरी गोष्ट म्हणजे मंगळागौर...... सध्याच्या काळांत, ही अतिशय अयोग्य प्रथा आहे. पुर्वीच्या काळी ही योग्य प्रथा होती कारण ह्या निमित्ताने, नविन सुनेचे गूण समजत होते, गायन, नर्तन, हजरजबाबीपणा इतर स्त्रीयांना समजत होते आणि ह्या निमित्ताने, दोन्ही घराण्यातील स्त्रीयांना एकमेकांचा स्वभाव पण समजत होता.
आता एकतर, बहुतांशी स्त्रीया नौकरी करतात.प्रत्येकीला बुधवारी सुट्टी कशी काय मिळणार? मंगळागौरीचा मुळ हेतूच जर साध्य होणार नसेल तर, शनिवारी गौरी मांडा आणि मस्त पैकी दडपण न बाळगता, खेळा...
गौरीची पुजा असल्याने, घरीच खेळलेले उत्तम... त्यासाठी मुद्दाम मंगल कार्यालय घ्यायची काही गरज नाही...
चौथी गोष्ट म्हणजे, डोहाळजेवण...... मुळांत ही गोष्ट, गर्भवती स्त्रीला आनंद वाटावा, तिचे शारिरीक आरोग्य उत्तम रहावे हा मुळ हेतू आहे... डोहाळजेवणातील खाद्य पदार्थ पौष्टिक असावेत, हे भान ठेवलेच पाहिजे. ही देखील एक घरगुती प्रथा असल्याने, मुद्दाम कार्यालय घ्यायची काही गरज नाही....
पाचवी गोष्ट म्हणजे, बारसे..... चार-चौघी बायकांच्या साक्षीने, अपत्याचे नामकरण करणे, ह्या पलीकडे ह्या प्रथेला स्थान नाही.
पण सध्या बारसे म्हणजे, बाळाला आणि बाळंतीणीला, जास्तीत जास्त त्रास कसा होईल? हेच बघीतल्या जाते. सकाळ पासून ते रात्री पर्यंत, मोठ्या आवाजात लावलेले स्पीकर्स, भरपूर पाहुणेराहुणे, जो येतोय तो अपत्याच्या गालाचा मुका घेत असल्याने, बाळाला होत असलेला जंतू संसर्ग आणि बाळाची आणि बाळंतीणीची होणारी झोपमोड, कुणीही लक्षांत घेत नाही. हा विधी पण घरगुती असल्याने, मुद्दाम कार्यालय घ्यायची काही गरज नाही आणि बाळंतीणीची आणि बाळाची काळजी घेऊनच, हा विधी पुर्ण कर ....
सहावी गोष्ट म्हणजे, मुंज...... मुलगा जर संध्या करणार नसेल किंवा पौराहित्य करणार नसेल तर, हा विधी करण्याची काहीही गरज नाही... खरं तर हा विधी आधी अत्यावश्यक होता.. मुलाला एखादी कला आणि स्वतः पुरता स्वैपाक येत असेल तरच मुंज केली जात होती आणि त्याला शिक्षण घेण्यासाठी गुरूगृही पाठवत होते.वाटेत भूक लागली तर असावेत म्हणून काही खाद्यपदार्थ आणि अडीनडीला उपयोगी पडावेत म्हणून काही पैसे देत होते...अगदीच अडचण आली तर, एखादा दागिना हवा म्हणून भिकबाळी, गळेसर किंवा अंगठी देत होते...पण आता, ह्या प्रथेची तुला तरी काहीही गरज नाही आणि हा विधी केला नाही तरी तुला आणि तुझ्या मुलांना चालण्यासारखे आहे...
सध्याच्या काळांत, मुलगा 3-4 वर्षांचा झाला की त्याला योग्य ते शारिरीक शिक्षण देणे आणि व्यायाम करायला लावणे हीच खरी मुंज.कुठल्याही काळात, शरीरं आद्यं, खलू धर्म साधनं.
तस्माद, वरील सहा गोष्टींवर, जितका कमी खर्च करता येईल, तितका कमी खर्च कर.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |